आरोपी विरोधात 15 दिवसात दोषारोपपत्र न्यायालयात सादर करणार,अशी ग्वाही पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी दिलीय.संपूर्ण प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवले जाईल, असे आश्वासन पोलिसांकडून देण्यात आलेय.
पुणे :भोर तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आजीकडे सुट्टीसाठी आलेल्या एका अवघ्या चार वर्षांच्या चिमुकलीवर 65 वर्षीय नराधमाने लैंगिक अत्याचार करून तिची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण पुणे जिल्हा हादरला असून परिसरात संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, संतप्त ग्रामस्थांनी चिमुकलीचा मृतदेह थेट पोलिस ठाण्याबाहेर ठेवून ‘रास्ता रोको’ आंदोलन सुरू केले. मिळालेल्या माहितीनुसार, ही चिमुकली आपल्या आजीच्या गावी सुट्टी घालवण्यासाठी आली होती. दुपारी घरासमोर खेळत असताना गावातील एका 65 वर्षीय नराधमाने तिला आमिष दाखवून गोठ्यात नेले. तिथे तिच्यावर पाशवी अत्याचार केल्यानंतर, आपले कृत्य उघड होऊ नये या भीतीने आरोपीने दगडाने ठेचून तिची हत्या केली. अत्यंत निर्दयीपणे त्याने चिमुकलीचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवून ठेवला.
दुपारपासून मुलगी बेपत्ता असल्याने कुटुंबीयांनी तिची शोधाशोध सुरू केली. अखेर गोठ्यात तिचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, आरोपी चिमुकलीला गोठ्याकडे घेऊन जाताना स्पष्टपणे दिसला. या पुराव्यावरून पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत.
या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच गावकरी आक्रमक झाले. संतापलेल्या ग्रामस्थांनी नराधमाला कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी चिमुकलीचा मृतदेह भोर पोलिस स्टेशनच्या बाहेर आणून ठेवला. संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन केल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. गुन्हेगाराला फाशीची शिक्षा होईपर्यंत मागे हटणार नाही, अशी भूमिका स्थानिकांनी घेतली आहे.

