नानासाहेब गोरे स्मृती दिनानिमित्त अभिवादन सभेला चांगला प्रतिसाद
पुणे :एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशन व एस. एम. जोशी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने समाजवादी नेते नानासाहेब गोरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित अभिवादन सभा १ मे २०२६ रोजी सकाळी नवी पेठ येथील एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशनच्या सभागृहात पार पडली. ‘समाजवादी चळवळीचे राष्ट्र उभारणीतील योगदान’ या विषयावर आधारित या सभेत म. फुले समता प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड. मोहन वाडेकर यांनी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष सुभाष वारे होते. संदेश दिवेकर यांनी प्रास्ताविक केले. दत्ता पाकिरे यांनी आभार मानले.सूत्रसंचालन फाउंडेशनचे सहसचिव उपेंद्र टण्णू यांनी केले.नानासाहेब गोरे यांचे पुतणे सुरेश गोरे, शिलाताई आढाव, चंद्रकांत निवंगुणे, मधु पाटील , राहुल भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी नानासाहेब गोरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.. नानासाहेब गोरे यांचे पुतणे सुरेश गोरे यांनीही आठवणीना उजाळा दिला.

आपल्या भाषणात अॅड. मोहन वाडेकर यांनी समाजवादी चळवळीचा इतिहास, तिचे तत्त्वज्ञान आणि देशाच्या उभारणीत केलेले योगदान यावर सखोल प्रकाश टाकला. त्यांनी नानासाहेब गोरे यांच्या कार्याचा विशेष उल्लेख करत त्यांच्या विचारांची आजच्या काळातही असलेली उपयुक्तता अधोरेखित केली. ‘समाजवादी नेते त्यागी आणि झपाटलेले होते. त्यांच्याकडे प्रभावी कृती कार्यक्रम होते. महिला, दलित, अल्पसंख्य, कामगार, कष्टकरी, मजूर, शेतकरी अशा सर्व स्तरातील अप्रगत समूहांना सामाजिक न्याय मिळावा यासाठी समाजवादी चळवळीने आग्रह धरला.अनेक अपयशासाठी समाजवाद्यांना जबाबदार धरण्यात येते, पण समाजवादी सत्तेत असताना मंडल आयोगाची स्थापना झाली आणि समाजवादी सत्तेत असतानाच मंडल आयोगाची अंमलबजावणी सुरू झाली हे विसरता येत नाही.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष सुभाष वारे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात लोकशाही समाजवादी विचारांचे स्वतंत्र अस्तित्व आणि देश उभारणीसाठी त्याची गरज अधोरेखित करत नव्या पिढीपर्यंत हे पोहोचवण्याची आवश्यकता मांडली.. ते म्हणाले, ‘नानासाहेब गोरे हे बुद्धिप्रामाण्यवादी नेते होते. सामाजिक चळवळ आणि चिंतन यासोबत त्यांनी साहित्य लेखनास वेळ दिला असता, तर मोठे लेखक म्हणून नावाजले गेले असते.साहित्य संमेलनाचे अध्यक्षही झाले असते’.छोडो भारत आंदोलनात समाजवादी नेत्यांनी झोकून देऊन काम केले. महाराष्ट्रातील शोषित समाजाच्या संविधानिक चळवळी समाजवादी विचारांच्या कार्यकर्त्यांनी निष्ठेने चालवल्या व तसे अनेक कायदे करण्यास त्या-त्या वेळच्या सत्ताधाऱ्यांना भाग पाडले. जनसंघटना तसेच ग्रामीण विकास, आदिवासी विकास या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांमधील समाजवादी कार्यकर्त्यांचे योगदान पाहता लोकशाही समाजवादच या देशाला प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाईल, याची खात्री पटते. आपण चांगुलपणा आणि सत्याची कास सोडता कामा नये आणि आपले स्वतंत्र अस्तित्व विसरता कामा नये.
‘या अभिवादन सभेला समाजवादी विचारसरणीशी निगडित कार्यकर्ते, अभ्यासक तसेच नागरिकांनी चांगली उपस्थिती दर्शवली. कार्यक्रमादरम्यान नानासाहेब गोरे यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले आणि त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. समाजवादी चळवळीचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला..

