थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठान ; श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांची २८६ वी पुण्यतिथी
पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रज्वलित केलेली आग हृदयात असल्याने श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांनी हिंदुस्थान तलवारीने गाजवला. त्यामुळे अटक ते कटक हे साम्राज्य जिवंत राहू शकले. त्यांचे स्मारक राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत उभे राहिले असून आता पालखेड येथे देखील भव्य स्मारक उभे रहात आहे. त्यासोबतच थोरले बाजीराव पेशवे यांचे तैलचित्र राज्याच्या विधानभवनात लावण्यास प्रयत्न करणार असल्याचे थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानच्या वतीने सचिव कुंदनकुमार साठे यांनी सांगितले.

थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानच्या वतीने शनिवारवाड्याच्या प्रांगणात श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या २८६ व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पुतळ्याला व प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. यावेळी समस्त पेशवे कुटुंबीय, पुष्करसिंह पेशवे, नगरसेविका स्वप्नाली पंडित, मिलिंद एकबोटे, ईस्काॅनचे संजय भोसले, इतिहास अभ्यासक मोहन शेटे, प्रतिष्ठानचे सचिव कुंदनकुमार साठे, श्रीकांत नगरकर, माधव गांगल, चिंतामणी क्षीरसागर, विश्वनाथ भालेराव, सचिन टापरे, सचिन बोधनी यांसह विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मोहन शेटे म्हणाले, ऊन, वारा, थंडी, पाऊस या कशाचीही तमा न बाळगता सैनिकांमध्ये रमणारे थोरले बाजीराव पेशवे हे व्यक्तिमत्व होते. त्यामुळे त्यांना देव योद्धा असेही म्हणतात. अटक ते कटक असे साम्राज्य जिवंत ठेवण्याचा प्रयत्न हा पालखेडची लढाई आणि निजामाचा पराभव यातून अबाधित राहिला.
विश्वनाथ भालेराव यांनी सूत्रसंचालन केले.
हायड्रॉलिक शिडीची देखभाल नाही
श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्याकरिता दोन वर्षांपूर्वी हायड्रॉलिक शिडी तयार करण्यात आली होती. मात्र देखभाल नसल्याने या शिडीचा वापर करता येत नाही. अनेकदा तक्रार करूनही याकडे दुर्लक्ष होत आहे. पुतळ्या पर्यंत ज्येष्ठांना जाणे या शिडीद्वारे शक्य होते. मात्र पुणे मनपा ने याची देखभाल करून ही शिडी त्वरित पूर्ववत करावी, अशी मागणी करीत पालखेड येथील स्मारकाचे काम ६० टक्के इतके पूर्ण झाले असून त्याचे लवकरच लोकार्पण करण्यात येईल, असे कुंदनकुमार साठे यांनी सांगितले.

