विक्रम काकडे हे पार्थ पवारांचे विश्वासू सहकारी मानले जातात. याबरोबरच पक्षाचे नेतृत्व दिवंगत अजित पवार यांच्याबरोबरही विक्रम काकडे यांनी काम केले आहे आणि त्यांना राजकीय पार्श्वभूमी असून त्यांचे वडील संजय काकडे माजी खासदार आहेत.चर्चेत असलेल्या चार प्रमुख नावांवर विचार करता परिवार आणि पक्ष संघटना याच्याशी एकनिष्ठता असलेल्या व्यक्तीला संधी मिळू शकते.
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला येणाऱ्या विधान परिषदेच्या एका जागेसाठी आता पक्षात जोरदार रस्सीखेच होत असल्याचं चित्र आहे. एका जागेसाठी अनेकजण इच्छुक असल्याने कुणाला संधी द्यायची यावर पक्षात चर्चा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आज रात्री कोअर कमिटीची बैठक पार पडणार असल्याची माहिती आहे. या बैठकीला पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित राहतील असे वृत्त आहे
राष्ट्रवादी काँग्रेसच्या या कोअर कमिटीच्या बैठकीत विक्रम काकडे, सुरेश बिराजदार, झिशान सिद्दीकी आणि राजेंद्र जैन यांच्या नावांची चर्चा होऊन निर्णय होईल असे सांगितले जातेय विक्रम काकडे हे माजी खासदार संजय काकडे यांचे चिरंजीव आहेत तर सुरेश बिराजदार हे धाराशिव जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष आहेत. झिशान सिद्दीकी हे पक्षाचे महत्त्वाचे नेते आहेत. विधानसभेमध्ये त्यांचा पराभव झाला होता. तर राजेंद्र जैन पक्षाचे माजी विधान परिषद आमदार आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांचे निकटवर्तीय आहेत.
विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपच्या वाट्याला 6, शिवसेना 2, राष्ट्रवादी 1 आणि महाविकास आघाडीच्या वाट्याला 1 जागा येणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या वाटेला येणाऱ्या एका जागेसाठी जोरदार रस्सीखेच आहे.
विधान परिषदेतील 9 आमदारांचा कार्यकाळ संपणार-
उद्धव ठाकरे (शिवसेना – ठाकरे)
नीलम गोऱ्हे (शिवसेना)
शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी – शरद पवार गट)
अमोल मिटकरी (राष्ट्रवादी – अजित पवार गट)
गोपीचंद पडळकर (भाजप)
रणजितसिंह मोहिते-पाटील (भाजप)
राजेश राठोड (काँग्रेस)
प्रवीण दटके (भाजप)
रमेश कराड (भाजप)
विधान परिषदेच्या निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम-
निवडणुकीची अधिसूचना जारी करणे : 23 एप्रिल, 2026
उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस: 30 एप्रिल 2026
उमेदवारी अर्जांची छाननी: 2 मे 2026
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख: 4 मे 2026
मतदानाची तारीख: 12 मे 2026
मतदानाची वेळ: सकाळी 9 वाजेपासून ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आहे.
मतमोजणी: 12 मे 2026 संध्याकाळी 5 वाजता
निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख: 13 मे 2026

