पुणे ता. २२ : संविधानविरोधी, विज्ञानविरोधी, अस्पृश्यता पाळून हिंदुराष्ट्राची हाक देणाऱ्या बागेश्वरबाबाची देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी सहकुटुंब भेट घेतली. त्यांच्यासमोर ते नतमस्तक झाले, त्यामुळे जाहीरपणे अस्पृश्यता पाळणाऱ्या बागेश्वरधाम बाबाला गवई साहेबांचा पाठिंबा आहे का? असा प्रश्न राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ता सुनील माने यांनी विचारला आहे.
माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, राज्यघटनेत आपण अस्पृश्यता नष्ट केली आहे. मात्र ही अस्पृश्यता जाहीर कार्यक्रमात जोर जोरात सांगणाऱ्या बागेश्वरधाम महाराजाला भूषण गवई साहेब कुटुंबासह भेटतात, त्यांच्यासमोर नतमस्तक होतात हे खूप क्लेशदायक आहे. बागेश्वरधाम बाबाच्या हिंदू राष्ट्राच्या संकल्पना आहेत, त्या संकल्पना तयार करण्यासाठी ते प्रयत्न करतात त्यालाच प्रत्यक्ष – अप्रत्यक्षपणे गवई साहेबांनी पाठिंबा व्यक्त केला असाच त्याचा अर्थ घेतला जाईल. गवई साहेबांनी आंबेडकरवादी म्हणून फार मोठी चूक केली आहे. ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अशाप्रकारच्या कथित सनातनी प्रवृत्तींना दूर करण्यासाठी राज्यघटना निर्माण केली. शिक्षणाचे महत्व सांगितले. ज्या शिक्षणाने गवई साहेब सरन्यायाधीश झाले, ते आज गवई साहेबांच्या बाबत पूर्ण फोल ठरले कि काय ? अशी शंका आता येते. गवई साहेबांवर ज्या एका सनातनी म्हणवणाऱ्या व्यक्तीने बूट फेकला, आम्ही त्याचा निषेध केला. त्या संदर्भात भाषणे करून आवाज उठवला. भाषणात आम्ही आंबेडकरवादाचे, संविधानचे महत्व समजावून सांगितले. कोणी उच्च नीच नाही हे सांगितले. मात्र स्वत: गवई साहेबांनी या सगळ्या गोष्टीला हरताळ फासला. ही अतिशय दु:खद गोष्ट आहे. गवई साहेबांकडून खूप मोठी चूक झाली असल्याचे ते म्हणाले.
अस्पृश्यता पाळण्याऱ्या बागेश्वरबाबाला माजी सरन्यायाधीशांचा पाठिंबा आहे का ? – सुनील माने
Date:

