भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सामाजिक प्रगतीसाठी अंमलात आणणे आवश्यक-राज्यमंत्री माधुरी मिसाळ
पुणे : अनुसूचित जाती आणि जमातींवरील अत्याचारग्रस्त कुटुंबांना दिलासा देण्यासाठी ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत मृत झालेल्या व्यक्तींच्या ८८९ पात्र वारसदारांना शासन सेवेत संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आज दिली.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागात आयोजित कार्यक्रमात मिसाळ बोलत होत्या. या वेळी पुणे जिल्ह्यातील १८ वारसदारांना मिसाळ यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले.
आमदार बापू पठारे, समाजकल्याण आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे, सहआयुक्त प्रमोद जाधव, प्रादेशिक आयुक्त वंदना कोचूरे, सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांची या वेळी प्रमुख उपस्थिती.
मिसाळ म्हणाल्या, “केंद्र सरकारच्या १९८९ च्या ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत अत्याचारग्रस्तांना आर्थिक मदत आणि पुनर्वसनाची तरतूद करण्यात आली होती. राज्यात १९९५ मध्ये हा कायदा लागू करण्यात आला. गरजेनुसार त्यामध्ये दुरुस्त्या करण्यात आल्या.”
मिसाळ पुढे म्हणाल्या, “२०१६ मध्ये करण्यात आलेल्या दुरुस्तीनुसार खून किंवा मृत्यू झाल्यास पीडित व्यक्तीच्या कुटुंबाला अर्थसहाय्य किंवा एका व्यक्तीला आवश्यक असल्यास नोकरी देण्याची तरतूद करण्यात आली होती. त्यानुसार २०१२ ते २०२५ या कालावधीत एकूण ३२० प्रकरणात वारसदारांचे पुनर्वसन करण्यात आले. त्यापैकी ४४ वारसांना नोकरी २६६ वारसांना निवृत्तीवेतन, एका वारसाला जमीन आणि १० वारसांना घरकुल देण्यात आले.”
कायद्यातील तरतुदी पुरेशा स्पष्ट नसल्याने पीडितांच्या वारसांना नोकरी देण्याचे प्रमाण खूपच कमी होते. त्यासाठी अधिकाऱ्यांनी शासनाकडून मार्गदर्शन मागविले होते. त्यानुसार जुलै २०२५ अखेर राज्यात प्रलंबित असलेल्या ८८९ प्रकरणासंबंधी एक वेळची विशेष बाब म्हणून ‘ड’ संवर्गातील शासकीय पदांवर नियुक्ती देण्यास शासनाने मान्यता दिली. आज पुणे जिल्ह्यातील १८ जणांना नियुक्तीपत्रे देण्यात आल्याचे मिसाळ यांनी सांगितले.”
“महात्मा ज्योतिराव फुले यांचे द्विशताब्दी जयंती वर्ष, संत गाडगेबाबा यांचे १५० वे जयंती वर्ष आणि चवदार तळे सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष राज्यात सामाजिक समता व समरसता वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे.–माधुरी मिसाळ

श्रीमती मुधोळ-मुंडे म्हणाल्या, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या जयंतीचे औचित्य साधून सामाजिक समता सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्या पुढे म्हणाल्या, महामानवांचे कार्य, त्यांचे विचार, आपल्याकडून अपेक्षित असलेले वर्तवणूक तसेच समाज कल्याण विभागामार्फत विविध योजनांची माहिती दिली.

सहआयुक्त प्रमोद जाधव यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शेतक-यांसाठी केलेले कार्य” या विषयावर व्याख्यान दिले.

श्रीमती कोचुरे यांनी समाज कल्याण कार्यालयाच्या अंतर्गत असणाऱ्या वसतिगृह, निवासी शाळांमध्ये ८ ते १४ एप्रिल २०२४ या कालावधीमध्ये सामाजिक समता सप्ताहानिमित्त घेण्यात आलेल्या विविध कार्यक्रमाबाबत माहिती दिली.

श्री. लोंढे यांनी उपस्थित विद्यार्थी व नागरीकांना शुभेच्छा संदेश देताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणादायी विचार घेवून जीवनाची वाटचाल यशस्वी करावी, असे आवाहन केले.
यावेळी समाज कल्याण विभागातील विविध अधिकारी व कर्मचारी यांच्यासह शासकीय वसतिगृहातील गृहप्रमुख व गृहपाल तसेच विद्यार्थी- विद्यार्थींनी, नागरिक उपस्थित होते.



