महापालिका अधिकार्यांना शिविगाळ: महापालिका अभियंता संघाकडून निषेध
महापौर मोहोळ म्हणाले ,’ धंगेकरांना ही मस्ती आली कुठून
पुणे : कुठवर सहन करणार राजकारण्यांची गुंडागर्दी – निव्वळ निषेध व्यक्त करून संपेल का त्यांची दंडेलशाही ? असे प्रश्न उपस्थित करत आज पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी भर गर्दीत,भर दिवसा सर्वांसमक्ष पाणीपुरवठा प्रमुख नंदकिशोर जगताप यांना झालेल्या अर्वाच्य शिवीगाळ आणि दमदाटी विरोधात निषेध सभा घेतली आशानगर येथील पाण्याच्या टाकीच्या उद्घाटन प्रसंगी काँग्रेस आमदर रविंद्र धंगेकर यांनी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांना शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी हा व्हिडीओ २७ जानेवारी रोजी दुपारी ट्वीट केला आहे.
सुसंस्कृत कसब्याचे काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर महापालिका अधिकाऱ्यांना शिव्या देताहेत…ही मस्ती आली कुठून? यांचे नेते दिवसरात्र ‘मोहब्बत की दुकान’ म्हणून तोंडच्या वाफा टाकतात…पण या ‘मोहब्बत की दुकान’चा हाच खरा चेहरा आहे,जो धंगेकरांनी सर्वांसमोर दाखवला…अवघ्या वर्षभराच्या आतच आमदारकीची हवा धंगेकरांच्या डोक्यात गेली. पण हा मस्तवालपणा पुणेकर लवकरच उतरवतील…असे आपल्या ट्वीट मध्ये मोहोळ यांनी म्हटले आहे.
दरम्यान ज्या दिवशी ज्या ठिकाणी हि घटना घडली तिथेच त्याचवेळेस याच दिवशी याच कार्यक्रमाचे चित्रीकरण करायला गेलेल्या पुढारी च्या बातमीदाराला पोलिसांनी गचांडले होते आणि दमदाटी करत त्याच्या मोबाईलचे नुकसान केले होते.यावेळी अनेकांचे मोबाईल हिसकावण्याचे प्रयत्न देखील पोलिसांनी केले होते
महापालिका अभियंता संघाकडून पुन्हा एकदा निषेध
दरम्यान महापालिका अधिकाऱ्यांना शिवीगाळ करणे, दमदाटी करणे हे काही नवीन उरलेले नाही आता याची जवळजवळ सर्वानांच सवय होत चाललेली आहे,आणि अशाच पार्श्वभूमीवर आज अशीच सवय झालेली एक निषेध सभाही झाली
आज नंदकिशोर जगताप यांना आमदार धंगेकर यांच्याकडून शिवीगाळ प्रकरणी महापालिका अभियंता संघाच्या वतीने निषेध सभा घेण्यात आली. महापालिका अधिकार्यांबाबत वारंवार हे प्रकार घडत असून ही पुण्याची संस्कृती नाही त्यामुळे नागरिकच याचे उत्तर देतील अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. अभियंता संघाचे कार्याध्यक्ष प्रशांंत वाघमारे, सचिव सुनील कदम सह सचिव संजय पोळ, खजिनदार केदार साठे, उपाध्यक्ष मुकुंद बर्वे यांच्यासह, पथ विभागाचे प्रमुख अनिरूध्द पावसकर, विद्युत विभागाचे मुख्य अभियंता श्रीनीवास कंदूल, प्रकल्प विभागाचे श्रीनीवास बोनाला, अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप, नंदकिशोर जगताप यांच्यासह महापालिकेतील सर्व विभागांचे अभियंते उपस्थित होते.
स्वतंत्र सेल करण्याची मागणी– राजकीय कार्यकर्ते तसेच पदाधिकार्यांकडून महापालिका अधिकार्यांना धमकावणे, शिवीगाळ करणे, धक्काबुक्की करणे असे प्रकार घडत आहे. या प्रकरणी एकटया अधिकार्याने पोलिसांमध्ये तक्रार दिल्यास उलट अधिकार्याला त्रास होतो. त्यामुळे, भविष्यात असे प्रकार रोखण्यासाठी महापालिकेच्या विधी विभागाच्या माध्यमातून सेल तयार करून त्यांच्या माध्यमातून पोलिसात तक्रार करण्यात यावी अशी मागणी संघाच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन महापालिका आयुक्तांनाही देण्यात आले तसेच, उद्घाटनाच्या कार्यक्रमाची जबाबदारी नगरसचिव विभागाकडे असून भविष्यात विभाग प्रमुखांवर हे काम दिले जाऊ नये अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
आय ए एस राजेंद्र निंबाळकर यांनाही चप्पल मारण्याचा केला होता प्रयत्न
आमदार होण्यापूर्वी नगरसेवक असताना धंगेकर यांनी तत्कालीन अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनाही चप्पल मारण्याचा प्रयत्नकेला होता.त्यावेळी त्यांना अटक ही झाली होती आणि पोलीस कस्टडीत देखील राहावे लागले होते.याची हि आठवण आज करून देण्यात आली.आता ते आमदार झालेत त्यामुळे आय ए एस अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षात चप्पल थेट श्रीमुखात खायची तयारीही आता ठेवली पाहिजे असे टोमणेही आता महापालिका वर्तुळातून मारले जाऊ लागलेत.