पुणे -पुण्यातील ससून रुग्णालयाचे माजी डीन डॅा. संजीव ठाकुर यांना अटक करण्याची पुन्हा एकदा मागणी आमदार रविंद्र धंगेकर यांनी केली आहे. ठाकुर यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलिसांना परवानगी मागूनही 25 दिवस होऊनही सरकारने परवानगी दिलेली नाही. त्यामुळे आमदार रविंद्र धंगेकर यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफयांच्यावर सडकून टीका केली आहे. कारवाई करण्याची मागितलेली परवानगी नाकारली? आमदार रविंद्र धंगेकर म्हणाले की, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे पुणे पोलिसांनी संजीव ठाकूर यांच्यावर कारवाई करण्यासाठी परवानगी मागितली होती, पण ती नाकारण्यात आल्याची माझी माहिती आहे. मुश्रीफ स्वतः ईडीची कारवाई टाळण्यासाठी सरकारमधे जाऊन बसले आहेत, त्यांच्याकडून ठाकुरांवर कारवाई होईल ही अपेक्षा ठेऊ शकत नाही, अशा शब्दात धंगेकर यांनी हल्लाबोल केला. ते पुढे म्हणाले की, मुश्रीफ यांनी परवानगी नाकारुन कारवाईची फाईल मुख्यमंत्र्यांकडे पाठवली आहे. मुख्यमंत्र्यांनी ठाकुर यांच्यावर कारवाई करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. कारवाईस परवानगी दिली नाही तर, रस्त्यावर उतरुन आंदेलन करणार असल्याचा इशारा धंगेकर यांनी दिला. मुश्रीफ ठाकुर यांना पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोपही धंगेकर यांनी केला.