ग्रंथ पारायण दिंडीच्या वतीने शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिर येथे महारुद्र स्वाहाकार सोहळा
पुणे : पुण्याला प्राचीन वारसा आहे. काही वर्षांपूर्वी झालेल्या संशोधनातून अशी माहिती समोर आली की पुणे हे २ हजार वर्षांपेक्षा जास्त जुने शहर आहे. परकीयांनी मंदिरांचा विध्वंस करून त्या ठिकाणी मशिदी बांधल्या. अनेक शतके पुण्याच्या आणि आजूबाजूच्या भागात मंदिरे देखील नव्हती. सन १७३० मध्ये पेशवे पुण्यात आले आणि मंदिरे बांधली गेली. त्यातूनच आगळे वेगळे वैशिष्ट्य असलेले शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिर बांधले गेले, अशी माहिती ज्येष्ठ इतिहास तज्ञ पांडुरंग बलकवडे यांनी दिली.
ग्रंथ पारायण दिंडीच्या वतीने शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिर येथे महारुद्र स्वाहाकार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचे उद्घाटन पांडुरंग बलकवडे, ज्येष्ठ संपादक विजय कुवळेकर, यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी ग्रंथ पारायण दिंडीचे वीरेंद्र कुंटे, द्वारकानाथ उंडे उपस्थित होते.
उद्घाटन सोहळ्यानंतर शिवशक्ती या विषयावर किर्तन जुगलबंदी सादर झाली. यावेळी कीर्तनकार ह.भ.प. कौस्तुभबुवा परांजपे आणि ह.भ.प. संकेत बुवा भोळे यांनी कीर्तन केले. विजय कुवळेकर यांनी मनोगत व्यक्त केले.
विरेंद्र कुंटे म्हणाले, ग्रंथ पारायण दिंडीच्या वतीने महारुद्र स्वाहाकार सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये श्री समर्थ सद्गुरु रामदास स्वामी पाद्यपूजा, तालवाद्य कार्यक्रम, मंत्र जागर आणि आरती, देवांश मंदार भाटे यांचा भक्ती गीतांचा कार्यक्रम आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.