मुंबई–मराठ्यांना सरसकट आरक्षण दिले जाणार नाही. तर ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडलेल्या आहेत, त्यांनाच आरक्षण मिळणार असल्याचे देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले आहे. तसेच, त्यांच्या रक्तातील नात्यातल्या लोकांना त्या आरक्षणाचा आणि नोंदींचा लाभ घेता येईल. मात्र, ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडलेल्या नाहीत, त्या मराठ्यांना आरक्षण दिले जाणार नसल्याचे फडणवीसांनी सांगितले.सरसकट गुन्हेही मागे घेणार नाही आंतरवाली ते महाराष्ट्रातील मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले जाणार आहेत. मात्र, ज्या लोकांनी सरकारी बसेस जाळल्या आहेत, ज्यांनी लोकांची घरे पेटवली, पोलिसांना मारहाण केली, अशा लोकांवरील गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत. तर असे गुन्हे हे केवळ कोर्टाच्या आदेशानुसारच मागे घेतले जात असल्याचेही फडणवीस म्हणालेत.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर शिंदेंच्या नेतृत्वात तोडगा काढण्यात आला. या निर्णयाचा मला अत्यंत आनंद आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा हा सुटला असून अत्यंत चांगला मार्ग काढल्याने या आंदोलनाची सांगता झाल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावल्याने फडणवीसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही कौतुक केले आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले- कायद्याच्या चौकटीत राहून जे आरक्षण मिळू शकतं, त्याच आरक्षणाची मागणी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात आली. सरकारने काढलेला अध्यादेश मनोज जरांगेंनी स्वीकारल्याने त्यांचेही अभिनंदन करण्यात आले. या मार्गातून अडचणी कमी होणार असल्याचेही ते बोलतांना म्हणालेत.
भुजबळांचा आक्षेप ही एक कार्यपद्धती आहे. मात्र ओबीसींवर कुठलाही अन्याय होईल असा कोणताही निर्णय घेतलेला नाही. मराठा बांधवांना नोंदी नसल्याने आरक्षण मिळण्यास अडचणी येत होत्या. त्यासाठी त्यांना आरक्षण मिळण्याचा रस्ता मोकळा केला. त्यांना आरक्षण मिळण्याची जी कार्यपद्धती क्लिष्ट होती. ती सोपी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.