भारतीय कुस्ती महासंघाच्या मान्यतेने व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या सहकार्याने आणि पै. ज्ञानेश्वर कटके फाऊंडेशन आणि सुरेंद्रदादा पठारे फाऊंडेशन यांच्या वतीने आयोजन
पुणे : भारतीय कुस्ती महासंघाच्या मान्यतेने व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या सहकार्याने आणि पै. ज्ञानेश्वर कटके फाऊंडेशन आणि सुरेंद्रदादा पठारे फाऊंडेशन यांच्या वतीने खराडी येथील कै.विठोबा मारुती पठारे क्रीडा संकुलात वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक २९ ते ३१ जानेवारी दरम्यान ही स्पर्धा होणार आहे. २५ राज्यांचे ७५० कुस्तीगीर या स्पर्धेत सहभागी होत आहे, अशी माहिती स्पर्धेचे आयोजक ज्ञानेश्वर कटके आणि सुरेंद्र पठारे यांनी दिली.
स्पर्धेसाठी भारतीय कुस्ती महासंघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष संजय कुमार सिंह हे उपस्थित राहणार असून त्यासोबत अनेक नामवंत मल्ल देखील उपस्थित राहणार आहेत. तब्बल २३ वर्षानंतर वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा होत आहे. या आधी २००० साली अमरावती येथे ही स्पर्धा संपन्न झाली होती.
ज्ञानेश्वर कटके म्हणाले, वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा पुरुष फ्रीस्टाईल, पुरुष ग्रिकोरोमन, महिला अशा ३ विभागामध्ये होत आहे. भारतातील अनेक नामवंत व आंतरराष्ट्रीय पदक प्राप्त कुस्तीगीर या स्पर्धेत सहभागी होत असल्याने ही स्पर्धा अतिशय रंगतदार व चुरशीची होणार आहे.
सुरेंद्र पठारे म्हणाले, दिनांक २९ जानेवारी रोजी पुरुष फ्रीस्टाईल विभागातील कुस्ती स्पर्धा होतील, तर दिनांक ३० जानेवारी रोजी पुरुष ग्रिकोरोमन विभागातील कुस्ती स्पर्धा होतील व शेवटी ३१ जानेवारी रोजी महिला विभागातील कुस्ती स्पर्धा होतील.