उपक्रमात हजारो तरुणांचा सहभाग
मुंबई दिनांक २५ जानेवारी २०२४
मुंबई भाजयुमोच्या वतीने मुंबईतील सहा लोकसभा क्षेत्रात खास युवकांसाठी “नमो नवमतदाता” संमेलनाचे आयोजन करण्यात आले. संमेलनात पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ प्रक्षेपणाच्या माध्यमातून युवकांना मार्गदर्शन केले. मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार,भाजयुमो अध्यक्ष तजिंदर सिंग तिवाना यांच्या प्रयत्नांतून हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये मुंबई भाजपा खासदार, आमदार, मोर्चा आघाडी सेलच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच मुंबईतील विविध महाविद्यालयातील हजारो विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
व्हिडीओ प्रक्षेपणाच्या माध्यमातून बोलताना पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी म्हणाले, ज्याप्रमाणे १९४७ च्या पूर्वी देशाला स्वतंत्र करण्याची जबाबदारी तरुणांवर होती, त्याचप्रमाणे २०४७ पर्यंत म्हणजेच येत्या २५ वर्षात विकसित भारत घडवण्याची जबाबदारी तरुणांवर आहे. ते पुढे म्हणाले की, १८ ते २५ वर्षे वयोगट अत्यंत महत्वाचा आहे. हा वयोगट अनेक बदलांचा साक्षीदार असतो. त्यामुळे लोकशाही प्रक्रियेत तरुणाईचा सहभाग महत्वाचा आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होणे ही आपली जबाबदारी असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. पुढील २५ वर्षांचा कालावधी दोन कारणांसाठी खूप महत्त्वाचा आहे. प्रथम, तुम्ही सर्वजण अशावेळी मतदार झाला आहात जेव्हा भारताचा अमृतकाल सुरू झाला आहे. दुसरे म्हणजे, उद्या २६ जानेवारीला आपला देश ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. पुढील २५ वर्षे तुमच्यासाठी आणि भारतासाठी महत्त्वाची आहेत. येणाऱ्या काळात तरुणांना स्वतःचे आणि भारताचे भविष्य घडवायचे आहे असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
या उपक्रमामध्ये जे. बी. नगर येथील बगडका महाविद्यालय, मिठीबाई महाविद्यालय, नानावटी नर्सिंग कॉलेज, प्राईड कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट , गोदिवला कॉलेज मधील शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमानंतर अनेक नवमतदारांनी उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात देश अधिक सुरक्षित आणि मजबूत बनला असल्याची प्रतिक्रिया अनेक तरुण नवमतदारांनी दिली.