पुणे- महापालिका निवडणुकीच्या निकालाने शहराच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणली आहे. प्रभाग क्रमांक १८ (ड) मधून काँग्रेसचे उमेदवार आणि माजी महापौर प्रशांत जगताप यांनी जोरदार विजय मिळवत काँग्रेससाठी विजयाचे खाते उघडले आहे. या निवडणुकीचा निकाल केवळ राजकीयच नव्हे, तर भावनिकदृष्ट्याही चर्चेचा ठरला आहे.
अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत प्रशांत जगताप यांनी भाजपचे उमेदवार अभिजीत शिवरकर यांचा तब्बल १८०० मतांनी पराभव केला. विशेष म्हणजे, याच निवडणुकीत प्रशांत जगताप यांची आई आणि अनुभवी नेत्या रत्नप्रभा जगताप यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे “पुण्यात मुलगा जिंकला, आई हरली” अशी दुर्मिळ आणि चटका लावणारी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे माजी शहराध्यक्ष असलेले प्रशांत जगताप यावेळी काँग्रेसच्या तिकीटावर मैदानात उतरले होते. त्यांच्या विजयामुळे पुण्यात काँग्रेसला नवी ऊर्जा मिळाल्याचे चित्र आहे. दुसरीकडे, रत्नप्रभा जगताप यांच्या पराभवामुळे स्थानिक राजकारणात मोठ्या उलटसुलटीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

