पुणे:कात्रज कडून स्वारगेटच्या दिशाने येणाऱ्या दुचाकी वाहन चालक सद्गुरु श्रीशंकर महाराज उड्डाण पुलावर आला असता नायलॉन मांजा ने गळा कापून जखमी झाला. अचानक मांज्याने कापल्या गेल्यामुळे दुचाकीस्वार गाडीवरून खाली पडला.मात्र मागून कोणतेही वाहन येत नसल्याने तो बालंबाल बचावला. काही दिवसांपुर्वीच येरवडा येथे एका ज्येष्ठ दुचाकीस्वाराचा मांजाने गळा कापला गेला होता. त्याच्यावर आयसीयुमध्ये उपचार करावे लागले होते. दरम्यान उड्डाणपुलावरील घटनेसंदर्भात पोलिसांत कोणतीही नोंद करण्यात आली नाही.
याप्रकरणी माहिती देताना राष्ट्रवादी अर्बन सेलचे अध्यक्ष नितीन कदम यांनी सांगितले नितीन महागरे (४५, रा.धायरी) हे धायरी येथून कात्रजमार्गे स्वारगेटकडे चालले होते. ते अचानक मांज्याने कापले गेल्यामुळे दुचाकीस्वार गाडीवरून खाली पडले. त्यांना नागरिकांनी तातडीने पुणे महापालिकेच्या कै शिवशंकर पोटे दवाखाना येथे उपचारास नेले. त्यांना साधारण 10 ते 12 सेंटीमीटर लांब व अर्धा सेंटीमीटर खोल जखम होऊन प्रचंड रक्तस्त्राव होत होता. जखमी कदम खूपच घाबरलेले होते. त्यांना योग्य मलमपट्टी करून प्राथमिक उपचार करण्यात आले.
अर्धा तासाने रक्तस्त्राव थांबल्यावर त्यांना सोडण्यात आले. अर्बन सेलने एका महिन्यापूर्वीच पोलीस व महापालिका आयुक्त यांना यासंदर्भात पत्र देऊन नायलॉन मांजाच्या विक्रीस अटकाव घालण्याची विनंती केली .दुर्दैवाने कोणतीच कारवाई न केल्यामुळे पुणेकर नागरिक असे जखमी होताना दिसत आहेत. दरम्यान पोलिसांनी सांगितले की जखमी उपचार करुन घरी निघुन गेला.