मुंबई:विधानसभा अध्यक्षांसमोर राष्ट्रवादी आमदारांच्या अपात्रेतवरील सुनावणी शनिवारी होती, परंतु अजितदादा गटाच्या वकिलांनी 4 दिवस मुदतवाढीची मागणी केल्याने येत्या मंगळवार, 23 जानेवारीपासून पुढील सुनावणी सुरू होईल. याच सुनावणीपूर्वी तटकरे यांच्या शपथपत्रावरून नवा वाद निर्माण झाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हुकूमशाही पद्धतीने पक्ष चालवायचे, असा घणाघाती आरोप अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी शपथपत्रात केला आहे.
पक्षाध्यक्ष या नात्याने शरद पवार एका नेत्यांचे म्हणणे ऐकून घ्यायचे नाही. ते फक्त जवळच्या निवडक नेत्यांचे ऐकायचे, असा आरोप खासदार तटकरे यांनी विधानसभा अध्यक्षांना दिलेल्या प्रतिज्ञापत्रात केला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगासमोर झालेल्या सुनावणीदरम्यान अजित पवार गटाकडून असा आरोप करण्यात आला होता हे विशेष.
मात्र या प्रकरणावर महाराष्ट्रातील पवार गटाच्या नेत्यांनी पलटवार केल्यावर अजित पवार गटाने या आरोपातून अंग काढून घेतले. त्यामुळेच आता खासदार तटकरे यांच्या आरोपावरून आणखी एक वाद पेटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, 23 आणि 24 जानेवारी रोजी जयंत पाटील यांच्यासह शरद पवार गटाच्या चार साक्षीदारांचे जबाब नोंदवले जाणार आहेत. अजित पवार गटातील आमदार 25 फेब्रुवारीला साक्ष देण्याची शक्यता आहे. 27 जानेवारीला विधानसभा अध्यक्ष दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकणार आहेत.