पुणे:
पिंपरी महापालिकेत कनिष्ठ अभियंता म्हणून नोकरी करीत असलेल्यास १ लाख रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले. कंपनीतून वायु प्रदुषण होत असून त्याबाबत गुन्हा दाखल करु नये, यासाठी १ लाख रुपयांची लाच मागितली होती. स्वप्नील मनोहर पाटील (वय ४०) असे या महापालिकेतील कनिष्ठ अभियंत्याचे नाव आहे. पाटील हा पिंपरी चिंचवड महापालिकेत पर्यावरण अभियांत्रिकी विभागात कार्यरत आहे.
याबाबत एका ३० वर्षाच्या उद्योजकाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे. तक्रारदार यांची भोसरी एमआयडीसीमध्ये श्री ट्रेडिंग नावाची कंपनी आहे. गेली १६ वर्षे यांची कंपनी कार्यरत आहे. २५ मार्च रोजी त्यांच्या कंपनीत दोघे जण आले. स्वप्नील पाटील याने सांगितले की, तुमच्या कंपनीच्या विरुद्ध वायु प्रदुषणाची सारथी अॅपवर ऑनलाईन तक्रार आली आहे. आजु बाजुच्या लोकांना कंपनीतून येणार्या वासाचा त्रास होत आहे, असे म्हणून मोबाईलमध्ये आलेली तक्रार दाखविली. त्यानंतर तक्रारदार यांनी त्यांना संपूर्ण कंपनी दाखविली. कोठेही वायु प्रदुषण होत नसल्याचे दाखविले. त्यानंतर तक्रार करणार्याला स्वप्नील पाटील याने बोलावून घेतले. त्यांनी कंपनीत बसून पंचनामा तयार केला. त्यानंतर त्यांना तुमच्याकडे महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण बोर्डाचे सर्टिफिकेट आहे का अशी विचारणा केली. त्यावर त्यांनी सर्टिफिकेट नसल्याचे सांगितले.
त्यानंतर काही दिवसांनी तुमच्याकडे प्रदुषण नियंत्रण बोर्डाचे सर्टिफिकेट नसल्याने तुमच्यावर गुन्हा दाखल करणार आहे. त्याची नोटीस तयार असल्याचे सांगितले. तक्रारदार स्वप्नील पाटील याला पिंपरी महापालिकेतील कार्यालयात जाऊन भेटल्यावर त्याने कारवाई करायची नसेल तर १ लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. त्यानंतर स्वप्नील पाटील याने तक्रारदार, त्यांचे वडिल, कंपनीचे मॅनेजर यांना वारंवार फोन करुन लाचेची मागणी केली. त्यानंतर १४ मे रोजी त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
या तक्रारीची पडताळणी केली असता स्वप्नील पाटील याने १ लाख रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पिंपरी चिंचवड महापालिकेत सापळा रचला. महापालिकेतील कार्यालयाबाहेर स्वप्नील पाटील आला. तक्रारदार यांच्या कारमध्ये येऊन त्यांच्याकडून १ लाख रुपये घेऊन स्वप्नील पाटील याने आपल्याकडील सॅगमध्ये ही रक्कम ठेवली. त्याचवेळी तक्रारदार यांनी कारचे चारही इंटीकेटर लावून इशारा केला. तेथेच थांबलेल्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने स्वप्नील पाटील याला पकडले. न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाटील याला एक दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शितल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे तपास करीत आहेत.