मृताच्या कुटुंबीयांना तात्काळ पाच लाखांची मदत द्या; प्रमोद नाना भानगिरे यांची मागणी
पुणे : हडपसर परिसरात पुणे महानगरपालिकेच्या कचरा वाहतूक करणाऱ्या डंपरच्या धडकेत धर्मराज जयस्वाल या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर मृताच्या कुटुंबीयांना पुणे महापालिकेने तात्काळ पाच लाख रुपयांची सानुग्रह मदत द्यावी आणि संबंधित चालक तसेच कंत्राटदाराची जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी केली आहे.
हा अपघात सर्वे नंबर ५७, जीएसपीएम महाविद्यालयाच्या मागे, बाबाजी मंदिराशेजारी, आदर्शनगर, हांडेवाडी रस्ता, उरुळी देवाची परिसरात घडल्याचे सांगण्यात आले. अपघातानंतरच्या छायाचित्रांमध्ये पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाचा कचरा डंपर आणि त्याखाली अडकलेली दुचाकी दिसत आहे.
भानगिरे म्हणाले की, एका तरुणाचा अशा प्रकारे मृत्यू होणे ही अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी बाब आहे. धर्मराज जयस्वाल यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबाचा आधार हिरावला असून, महापालिकेने संवेदनशीलता दाखवत कोणताही विलंब न करता पाच लाख रुपयांची सानुग्रह मदत कुटुंबीयांच्या स्वाधीन करावी.
कचरा वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांवर नियंत्रणाची मागणी
महापालिकेच्या कचरा वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांकडून वाहतूक आणि सुरक्षिततेचे नियम पाळले जात आहेत का, याची तातडीने तपासणी करण्याची गरज असल्याचे भानगिरे यांनी म्हटले आहे.
कचरा डंपर भरधाव वेगाने चालविणे, निर्धारित वेगमर्यादेचे उल्लंघन करणे, विरुद्ध दिशेने वाहन चालविणे, धोकादायक पद्धतीने ओव्हरटेक करणे तसेच पादचारी आणि दुचाकीस्वारांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करणे अशा प्रकारांवर कठोर नियंत्रण असावे, अशी त्यांची मागणी आहे.
GPS, वेगमर्यादा आणि वाहन तपासणी सक्तीची करा
प्रत्येक कचरा वाहतूक वाहनावर जीपीएसद्वारे नियमित नजर ठेवावी, वाहनाचा वेग नोंदवून नियंत्रित करावा तसेच ब्रेक, टायर, दिवे आणि इतर सुरक्षा यंत्रणांची नियमित तांत्रिक तपासणी बंधनकारक करण्यात यावी, असे भानगिरे यांनी सुचविले आहे.
वाहनचालकाचा परवाना, अनुभव, प्रशिक्षण, वैद्यकीय आणि दृष्टी तपासणीची खातरजमा केल्यानंतरच त्याला अवजड वाहन चालविण्याची परवानगी द्यावी. कचरा वाहतूक वाहनांचे मार्ग आणि वेळ निश्चित करून त्यांचे नियमित सुरक्षा लेखापरीक्षणही करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली.
चालकासोबत कंत्राटदाराचीही जबाबदारी निश्चित करा
या अपघाताची निष्पक्ष चौकशी करून चालकासोबत संबंधित कंत्राटदाराचीही जबाबदारी निश्चित करावी. निष्काळजीपणा किंवा नियमभंग आढळल्यास चालक आणि कंत्राटदारावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी भानगिरे यांनी केली आहे.
कचरा वाहतूक करणाऱ्या कंत्राटदारांसाठी स्वतंत्र आणि अधिक कठोर नियमावली तयार करून त्यात वेगमर्यादा, जीपीएस निरीक्षण, चालकांचे अनिवार्य प्रशिक्षण, वाहनांची तांत्रिक तपासणी आणि सुरक्षा लेखापरीक्षण बंधनकारक करावे. गंभीर किंवा वारंवार नियमभंग करणाऱ्या कंत्राटदाराचा करार रद्द करण्याची तरतूदही असावी, असे त्यांनी म्हटले आहे.
“कचरा वाहतुकीचे कंत्राट म्हणजे नागरिकांचे जीव धोक्यात घालण्याचा परवाना नाही. धर्मराज जयस्वाल यांच्या कुटुंबीयांना तातडीने पाच लाखांची मदत देऊन दोषींवर कठोर कारवाई करावी. अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशाराही प्रमोद नाना भानगिरे यांनी दिला आहे.

