पुणे : सामाजिक क्षेत्रात फासेपारधी समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणारे पद्मश्री गिरीश प्रभुणे, शैक्षणिक क्षेत्रात मराठवाडा मित्र मंडळाच्या माध्यमातून कार्यरत असलेले डॉ.बी.जी. उर्फ भाऊसाहेब जाधव आणि धार्मिक क्षेत्रातील योगदानाबद्दल प.पू. सद्गुरु प्रेमल माताजी यांना कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे देण्यात येणारा गुरुमहात्म्य पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तसेच लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार बालकामगारांसाठी कार्यरत असलेल्या कोल्हापूरच्या अवनी संस्थेच्या अनुराधा भोसले यांना श्री दत्तजयंती उत्सवात देण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सुनिल रुकारी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेला ट्रस्टचे राजू बलकवडे, अक्षय हलवाई, अॅड.रजनी उकरंडे, युवराज गाडवे, अॅड.शिवराज कदम जहागिरदार आदी उपस्थित होते. यांसह ट्रस्टचे विश्वस्त डॉ.पराग काळकर, अॅड.प्रताप परदेशी, महेंद्र पिसाळ यांनी देखील उत्सवाचे नियोजन केले आहे. ट्रस्टचे यंदा १२४ वे वर्ष आहे.
उत्सवाची सुरुवात सामाजिक पर्यावरण शुद्धीचा सिद्ध वेदघोष असलेल्या प.पू.वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी रचित लोकमंगल वर्धक घोरात्कष्टात स्तोत्राचे सामुदायिक पठण दत्तभक्त करणार आहेत. कै.लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट आणि प.पू. नाना महाराज तराणेकर प्रणीत अखिल भारतीय त्रिपदी परिवार, इंदोर तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन बुधवार पेठेतील दत्तमंदिरासमोरील उत्सव मंडपात रविवार, दिनांक १२ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजता करण्यात आले आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प.पू.श्री.गुरू षठब्रम्ह १०८ ज्ञानभास्कर महादेव शिवाचार्य स्वामीजी, वाई हे उपस्थित राहणार आहेत. तर, अखिल भारतीय त्रिपदी परिवार, इंदोरचे प.पू. बाबामहाराज तराणेकर यांचे आॅनलाईन प्रवचन होणार आहे.
* दत्तजयंती उत्सवात सप्तस्वरोत्सव व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन :-
दत्तजयंती सोहळ्यातील मुख्य कार्यक्रम असलेला गुरुमहात्म्य पुरस्कार व लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार प्रदान सोहळा सोमवार, दिनांक १३ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.नितीन करमाळकर, ज्येष्ठ साहित्यिक डॉ.सदानंद मोरे, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे माजी अध्यक्ष डॉ.अतुल भोसले यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. यावेळी स्वरतीर्थ स्व.सुधीर फडके यांच्या चिरस्मरणीय श्रवणीय गीतांचा बहारदार कार्यक्रम असलेला बाबूजी व मी हा ज्येष्ठ गायक व संगीतकार श्रीधर फडके आणि सहकारी सादर करणार आहेत.
बुधवार, दिनांक १५ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे संत ज्ञानेश्वरांच्या जीवनचरित्रावर आधारित मोगरा फुलला हा कार्यक्रम व्याख्याते गणेश शिंदे व गायिका सन्मित्रा शिंदे सादर करणार आहेत. यावेळी गरजू विद्यार्थी शिष्यवृत्ती अर्थसहाय्य प्रदान समारंभ असून पुणे मनपा स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे. तसेच श्री गुरुदत्त दिनदर्शिका रौप्य महोत्सवी वर्ष २०२२ चे प्रकाशनही कार्यक्रमात होणार आहे. श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या मानद सचिवपदी निवड झाल्याबद्दल अण्णा थोरात व सदस्यपदी निवड झाल्याबद्दल दत्तमंदिराचे माजी विश्वस्त बी.एम.गायकवाड यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
दत्तजयंती उत्सवांतर्गत मंदिरासमोरील मंडपात दररोज दुपारी १ ते रात्री ९ दरम्यान भजन, कीर्तन, सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले आहेत. कोविड प्रतिबंधक अनुरूप व्यवहाराच्या शासकीय नियमावली नुसार मुखपट्टी अनिवार्य असेल, दर कार्यक्रमानंतर उत्सव मंडपाचे निर्जंतुकीकरण, अभ्यागतांचे प्रवेशद्वारावर तापमान मापन, इ. कार्यप्रणालीची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येईल. दत्तजयंती सोहळा व सप्तस्वरोत्सवाकरीता प्रवेश विनामूल्य असून पुणेकरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.