- संध्याकाळी साडे सहा वाजता शिवाजी पार्कवर होतील अंत्यसंस्कार
- पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार
- 2001 साली लता मंगेशकर यांना ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे निधन झाले आहे. वयाच्या 93 व्या वर्षी गानकोकिळेने या जगाचा कायमचा निरोप घेतला आहे. त्यांचे पार्थिव आता त्यांच्या प्रभूकुंज निवासस्थानावरुन शिवाजी पार्कवर आणण्यात आले आहे. शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. त्यामुळे त्यांच्या पार्थिवावर भारतीय ध्वज ठेवण्यात आला आहे. प्रभूकुंजबाहेर फुलांनी सजवण्यात आलेल्या ट्रकमधून दीदींचे पार्थिव शिवाजी पार्कवर आणण्यात आले . दीदींच्या पार्थिवासोबत आशा भोसले आणि उषा मंगेशकर आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, अजित पवार, दिलीप वळसे पाटील, राज ठाकरे, पियुष गोयल यावेळी तिथे उपस्थित आहेत.
जिथून जिथून दीदींची अंत्ययात्रा गेली, तिथे रस्त्याच्या दुतर्फा दीदींच्या अंत्यदर्शनासाठी चाहत्यांची मोठी गर्दी जमा झालेली दिसली.
- स्वरकोकिळा यांच्या निधनाची बातमी मिळताच पंतप्रधान मोदींनी गोव्यातील त्यांची व्हर्च्युअल रॅली रद्द केली आहे.
- भाजपने उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध करण्याचा कार्यक्रम पुढे ढकलला आहे.
- महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर पोहोचून अंत्यसंस्काराच्या व्यवस्थेचा आढावा घेतला.
- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर लताजींच्या अंत्यदर्शनासाठी ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये पोहोचले
संध्याकाळी साडे सहा वाजता शासकीय इतमामात शिवाजी पार्कवर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. विद्युत दाहिनीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. लता दीदींना अखेरचा निरोप देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. दुपारी 4.30 वाजता ते मुंबईत दाखल होणार आहेत.
त्यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नितीन गडकरी यांच्यासह अनेक मान्यवरांनी रुग्णालयात जाऊन त्यांचे अंत्यंदर्शन घेतले आहे.