‘खुला आसमान’ स्पर्धेतील निवडक चित्रांचे प्रदर्शन
पुणे- ‘खुला आसमान’ या विद्यार्थ्यांसाठीच्या ऑनलाईन चित्रकला स्पर्धेतील निवडक ३० चित्रांचे प्रदर्शन २० मे ते २ जून या कालावधीत भोसलेनगरमधील इंडियाआर्ट गॅलरीत भरविण्यात येणार आहे. सकाळी ११ ते रात्री ८ या कालावधीत प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.
‘खुला आसमान’ ही स्पर्धा विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला वाव देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे. ५ ते १५ आणि १५ ते २५ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी ही ऑनलाईन स्पर्धा विनामूल्य खुली आहे. देशभरातून विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होतात. दर तीन महिन्यांतील निवडक चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात येते. या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वेबपेज उपलब्ध करून दिले जाते. या स्पर्धेत अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजक मिलिंद साठे यांनी केले आहे.