पुणे: पल्लवी प्रधान, त्रिगूण राजे आणि अमेय भिसे यांनी व्यक्तिगत पातळीवर एकत्रित येऊन पुण्यात प्रथमच ‘कायस्थ कार्निवल’चे आयोजन केले आहे. खास सीकेपी शैलीत तयार केलेले शाकाहारी मांसाहारी पदार्थ, दिवाळीच्या फराळाचे पदार्थ व हस्तकलेतील आकर्षक वस्तूंचा या प्रदर्शनात प्रामुख्याने समावेश असणार आहे. जंगली महाराज रस्त्यावरील, संभाजी उद्यानासमोर असलेल्या हॉटेल सेंट्रल पार्क येथे या अनोख्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. केवळ पुण्यातच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातच प्रथम होणाऱ्या या कार्निवलचे उदघाटन येत्या शुक्रवारी(ता. 21) मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर आणि महापौर प्रशांत जगताप यांच्या हस्ते दुपारी 4 वाजता होणार आहे. प्रसिद्ध अभिनेते दिलीप प्रभावळकर, राजन भिसे, ‘जय मल्हार’ मालिकेतील गणपती शेनॉय भिसेही यांचीही विशेष उपस्थिती यावेळी लाभणार आहे.
तीन दिवसाचे हे कार्निवल सकाळी 10 ते रात्री 10 यावेळेत सर्वांसाठी खुले असेल. या कार्निवलमध्ये सुरमईचे कालवण, भरला पापलेट, तळलेली तुकडी, कोळंबीची खिचडी, सोड्याची खिचडी, लिप्त अशा खास सीकेपी शैलीतून तयार करण्यात आलेल्या मांसाहारी पदार्थांची रेलचेल असेल तर कडव्या वालाचे बिर्डे, मसुराची आमटी, वडीचे सांबार असे झणझणीत तर पुरणपोळीप्रमाणे तेलपोळी, करंजी सारखा कानवला, निनाव यांसारख्या शाकाहारी पदार्थांचाही आस्वाद खवय्यांना घेता येणार आहे. याबरोबरच भरतकाम केलेला कुर्ता, टी शर्टस, पैठणी, पर्स, अलंकार याबरोबरच खास दिवाळीसाठी आकर्षक पणत्या, आकाशकंदील आदी हस्तकलेचे अप्रतिम नमुनेहीे पाहण्याची सांधी यातून लाभणार आहे. तीन दिवसीय या प्रदर्शनाला वंदना गुप्ते, उमेश कामत, तुषार दळवी, संदीप कुलकर्णी आदी कलाकारही आवर्जून भेट देणार आहेत. लहान मुलांना प्रोत्साहन देण्याकरिता वेशभूषा स्पर्धा तसेच खास महिलांकरिता पाककला स्पर्धेचेही यावेळी आयोजन करण्यात आले आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींनाही यावेळी विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
पुण्यासह मुंबई, नाशिक, सातारा, सांगली, फलटण, कोकण विभाग, बडौदा, इंदौर आदी भागातील नागरिक यात उत्स्फूर्तपणे सहभागी होणार आहेत. “कायस्थ काय असत एकदा येऊन तर बघा” असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.