मुंबई – अंधेरी पश्चिम येथील आपल्या बंगल्यालगतचे कार्यालय वाचवण्यासाठी मुंबई महापालिकेच्या अधिका-यांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनीही पैसे- लाच मागितल्याचा आरोप करणारा विनोदवीर कपिल शर्मा याच्यावर आज मनसेच्या चित्रपट सेनेने खरमरीत टीका केली. पैसे मागणा-या मनसे पदाधिका-याचे नाव उघड करून त्याचे पुरावे 48 तासात न दिल्यास ‘द कपिल शर्मा शो’ मनसे बंद पाडेल, असा इशाराच महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर व कार्याध्यक्षा शालिनी ठाकरे यांनी दिला. माहीम येथे आयोजित करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
अंधेरी पश्चिम येथील आपल्या बंगल्याजवळच्या जागेत कपिल शर्माने कोणतीही अधिकृत परवानगी न घेता स्वताचे कार्यालय थाटले होते. तसेच बंगल्याचे वाढीव बांधकामही केले होते. यासंदर्भात मुंबई महापालिका प्रशासनाने 16 जुलै 2016 रोजी नोटीस दिली होती. अखेर चार आॅगस्टला प्रशासनाने कारवाई करत हे बांधकाम तोडून टाकले. या घटनेला तब्बल एक महिन्याहून अधिक काळ उलटून गेल्यानंतर आज कपिल शर्माने ट्विटरद्वारे आपला निषेध नोंदवला होता. तसेच मनसेच्या एका पदाधिका-याने माझ्याकडून पैसे मागितल्याचा आरोपही त्याने प्रसारमाध्यमांशी बोलताना केला होता.
कार्यालयाचे अनधिकृत बांधकाम तोडल्यानंतर एक महिन्याने कपिल शर्माला अचानक मनसेच्या पदाधिका-याची आठवण कशी काय आली, असा सवाल करत अमेय खोपकर म्हणाले, “कपिलने आता 48 तासांत मनसेवर केलेले आरोप सिद्ध करून दाखवावेत. हे आरोप सिद्ध न झाल्यास ‘द कपिल शर्मा शो’च्या पुढील एकाही भागाचे शूटिंग महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना होऊ देणार नाही.”असा इशारा यावेळी देण्यात आला .
कपिल शर्माने स्वताच्या घरावर अनधिकृतपणे चार मजले चढवले आहेत. तसंच, त्याने तेथील तिवरांची कत्तलही केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशा बेकायदेशीर कृत्ये करणा-याला का पाठिशी घालत आहेत. मुळात मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना तत्काळ कपिल शर्मालाच अटक करायचे आदेश द्यायला हवेत, अशी मागणी यावेळी शालिनी ठाकरे यांनी केली.
कपिल शर्माने मनसेचा अपमान केला असून त्याने जाहीर माफी मागायला हवी, अशी मागणीही अमेय खोपकर व शालिनी ठाकरे यांनी यावेळी केली.
कपिल शर्माचा सेट का जळाला…
पालिका प्रशासन तसंच राजकीय कार्यकर्त्यांवर टीका करणारा कपिल शर्मा हा कसा खोटारडा आहे, हे आज मनसेच्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले . स्वताच्या घरात तसेच कार्यालयाचे अनधिकृत बांधकाम करणा-या कपिलने त्याच्या शोच्या सेटमध्येही अनेक अनधिकृत बाबी केल्याचा आरोप मनसेने केलाय. ‘सेटवर आग लागू नये, याबाबत जे नियम असतात ते कपिल शर्माने न पाळल्यामुळेच त्याच्या या आधीच्या शोच्या सेटला आग लागली होती‘, अशी माहिती यावेळी शालिनी ठाकरे यांनी दिली. लवकरच कपिलच्या अनधिकृत सेटबाबतची आणखी माहिती पुराव्यांनिशी आम्ही पुढे आणू, असेही शालिनी ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
खळ्ळ-फटॅकची वेळ आणू नका…
“महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर आपण केलेले आरोप सिद्ध न झाल्यास आपला ‘द कपिल शर्मा शो’च्या पुढील एकाही भागाचे शूटिंग महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना होऊ देणार नाही, याची खात्री बाळगावी. खळ्ळ-फटॅकची वेळ आपणावर येऊ नये, अशा शुभेच्छांसह” कपिल शर्माची कानउघाडणी करणारे पत्र महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेने कपिल शर्माला पाठवल्याची माहिती अमेय खोपकर व शालिनी ठाकरे यांनी पत्रकारांना दिली.