पुणे : समाजातील मंदिर, मशीद, चर्च, विहार हे सर्व समाज व जातीधर्म एकत्र जोडण्याचे काम करतात. जाती-धर्माच्या पलीकडे जावून विपश्यना केंद्र अभ्यास केंद्र होण्याची गरज आहे. बुद्ध विपश्यना केंद्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्र आणि ग्रंथालयाच्या उभारणीसाठी खासदार निधी उपलब्ध करून दिला जाईल,” असे प्रतिपादन खासदार गिरीश बापट यांनी केले.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) अध्यक्ष रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेविका सुनीता वाडेकर व रिपब्लिकन नेते परशुराम वाडेकर यांच्या प्रयत्नातून प्रभाग ८ मध्ये विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाजवळील परिसरात बुध्द विपश्यना केंद्र, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्र व ग्रंथालयाचे भूमिपूजनावेळी गिरीश बापट बोलत होते. यावेळी नगरसेवक विजय शेवाळे, आदित्य माळवे, कार्यक्रमाचे आयोजक रिपाइं पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष परशुराम वाडेकर, नगरसेविका सुनिता वाडेकर, वसंत जुनाणे, रिपाइंचे पुणे शहर युवक अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, सरचिटणीस महिपाल वाघमारे, सहउपायुक्त शिवाजी लंके, अभियंता सुशिल मोहीते, भीमराव वाघमारे, अविनाश कदम, नंदा निकाळजे, राजश्री कांबळे, सुनिल कांबळे, सुरेंद्र आठवले, अकबर शेख, संतोष खरात यांच्यासह स्थानिक नागरीक, महिला व कार्यकर्ते उपस्थित होते होते.
गिरीश बापट म्हणाले, “प्रभागात विपशना व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्र लवकर सुरू होईल. विपशना विहारामुळे सर्व जातीधर्म एकत्रित येईल. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त चिखलवाडी येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हाॅकी स्टेडिएम येथे नामफलकाचे व भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर व्यायामशाळा, नवीन इमारतींचे काम होत आहे. या भागातील नागरिकांसाठी ही आनंदाची बाब आहे.”
परशुराम वाडेकर यांनी प्रास्ताविक करताना उपक्रमांविषयी माहिती दिली. सुनीता वाडेकर यांनी आभार मानले.