दोन राष्ट्रीय महामार्ग ठप्प;कोकणाची वाट बंदच किती दिवस?

Date:

ताम्हिणी महामार्ग बंद करून आठ दिवस झाले; पुढे काय?
पाऊस थांबला, पण महामार्ग सुरू नाही; काम नेमके कुठे सुरू आहे, नुकसान किती, सुरक्षित पट्टा खुला का नाही आणि ‘डेडलाइन’ कुठे?

पुणे | शरद लोणकर

पुणे आणि रायगड या दोन जिल्ह्यांना जोडणारा, कोकणाकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी महत्त्वाचा पौड–माणगाव व्हाया ताम्हिणी घाट राष्ट्रीय महामार्ग ५ जुलैपासून सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद आहे. आदरवाडी परिसरात रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्याचा प्रवाह आणि दरड कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन उपविभागीय अधिकारी मावळ–मुळशी यांनी पोलिसांशी समन्वय साधून सुरक्षेच्या कारणास्तव मार्ग बंद करण्याचा निर्णय घेतला.मार्ग बंद करण्याचा निर्णय नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक होता. मात्र आता आठ दिवस उलटून गेल्यानंतर प्रश्न मार्ग का बंद केला, हा नाही; प्रश्न आहे—मार्ग पूर्ववत करण्यासाठी गेल्या आठ दिवसांत नेमके काय केले?

दुसरीकडे, पुणे जिल्ह्यातील भोरमार्गे कोकणाकडे जाणारा वरंधा घाटमार्गही पावसाळ्यातील संभाव्य दरडी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ डीडीवरील राजेवाडी ते वरंधा घाट हा पट्टा ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.त्यामुळे ताम्हिणी घाटमार्ग अनिश्चित काळासाठी बंद आणि वरंधा घाटमार्ग दीर्घ कालावधीसाठी बंद असल्याने पुणे–कोकण दळणवळणावर परिणाम होत असून, प्रवासी, स्थानिक नागरिक, वाहतूकदार आणि पर्यटनावर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत.

नागरिकांची सुरक्षितता सर्वोच्च असली, तरी राष्ट्रीय महामार्ग दीर्घकाळ बंद ठेवण्याऐवजी धोकादायक ठिकाणी आवश्यक प्रतिबंधात्मक कामे, दुरुस्तीचा कालबद्ध कार्यक्रम आणि शक्य असेल तेथे नियंत्रित वाहतुकीचे पर्याय प्रशासनाने तपासले आहेत का, हा प्रश्नही उपस्थित होत आहे.

सद्यस्थितीत पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाच्या नुकसानीची तांत्रिक पाहणी पूर्ण झाली आहे का, रस्त्याचे नेमके किती नुकसान झाले, दरडीचा धोका कोणत्या ठिकाणी कायम आहे, दुरुस्तीचे काम नेमके कुठे सुरू आहे आणि महामार्ग पुन्हा सुरू करण्यासाठी संभाव्य तारीख निश्चित करण्यात आली आहे का, याची अधिकृत माहिती नागरिकांसमोर येणे आवश्यक आहे.

संपूर्ण मार्ग बंद ठेवण्याची आवश्यकता अजूनही आहे का?

माय मराठीने केलेल्या स्थानिक पडताळणीनुसार मुळशी ते वारदपर्यंतच्या मार्गावर सध्या वाहतुकीला अडथळा निर्माण करणारी परिस्थिती दिसून येत नाही. त्यामुळे किमान या सुरक्षित पट्ट्यापर्यंत वाहतूक सुरू ठेवून पर्यटक, स्थानिक नागरिक आणि व्यावसायिकांना दिलासा देता येऊ शकतो का, याबाबत प्रशासनाने स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी मागणी पुढे येत आहे.

महामार्गाचा काही भाग सुरक्षित असेल, तर सुरक्षित पट्ट्यापर्यंत नियंत्रित स्थानिक वाहतूक सुरू ठेवण्याची शक्यता प्रशासनाने तपासली आहे का?

मुळशी, ताम्हिणी परिसरातील हॉटेल, रिसॉर्ट, दुकाने, पर्यटन व्यवसाय, स्थानिक वाहतूकदार आणि इतर छोटे व्यावसायिक पावसाळी हंगामावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहेत. यंदा पाऊस उशिरा सुरू झाला आणि पर्यटनाचा हंगाम सुरू होताच महामार्ग बंद झाला. त्यामुळे संपूर्ण मार्गबंदीचा या व्यावसायिकांवर किती परिणाम झाला आहे, याचाही विचार होणे आवश्यक आहे.

एक लेन सुरू करण्याची शक्यता तपासली का?

जर दोन्ही लेन वाहतुकीसाठी असुरक्षित असतील, तर त्यामागील तांत्रिक कारण सार्वजनिक केले पाहिजे. मात्र एक लेन सुरक्षित असेल, तर नियंत्रित एकेरी वाहतूक, ठरावीक वेळेत हलकी वाहने, पायलट वाहनाच्या मदतीने वाहतूक किंवा रात्री मार्ग बंद ठेवून दिवसा मर्यादित वाहतूक असे पर्याय तांत्रिक समितीने तपासले आहेत का?

सुरक्षिततेशी तडजोड होऊ शकत नाही. परंतु सुरक्षिततेच्या नावाखाली महामार्ग अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याऐवजी नुकसानीचे स्वरूप, सुरू असलेली कामे आणि मार्ग पूर्ववत करण्याचा कालबद्ध कार्यक्रम नागरिकांसमोर ठेवणे आवश्यक आहे.

दोन जिल्हे जोडणारा महामार्ग; समन्वय कोण करतोय?

ताम्हिणी घाटमार्ग पुणे आणि रायगड या दोन जिल्ह्यांना जोडतो. त्यामुळे पुणे जिल्हा प्रशासन, रायगड जिल्हा प्रशासन, पोलीस आणि संबंधित राष्ट्रीय महामार्ग यंत्रणा यांच्यात संयुक्त समन्वयाची व्यवस्था काय आहे?

संयुक्त तांत्रिक पाहणी झाली आहे का?

नुकसानीचा अहवाल तयार झाला आहे का?

दुरुस्तीसाठी किती मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री कार्यरत आहे?

काम पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराला मुदत देण्यात आली आहे का?

दररोजच्या कामाची प्रगती कोण तपासत आहे?

आणि सर्वात महत्त्वाचे—

ताम्हिणी महामार्ग पुन्हा सुरू करण्याची ‘डेडलाइन’ कोण जाहीर करणार?

संबंधित यंत्रणांनी या प्रश्नांची अधिकृत उत्तरे नागरिकांसमोर ठेवणे आवश्यक आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सांगवी पोलीस ठाण्यातील कथित मारहाण प्रकरण; DCP विवेक पाटील यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी

‘आप’ युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रविराज काळे यांचे मुख्यमंत्र्यांना ईमेल;...

सासवड–जेजुरी मार्गावर भीषण अपघात; तीन वारकरी महिलांचा मृत्यू, चार जखमी

पुणे-आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांवर...