मुंबई – मुंबईतील सिनेसृष्टीला तसेच अनेक इव्हेंट्सना विदुतपुरवठा करणा-या जनरेटर ओनर्स असोसिएशनच्या सदस्यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेत प्रवेश केला.
आज मुंबईमध्ये सुमारे 1200 जनरेटर व्हॅन्स आहेत. 2014मध्येच जनरेटर्सच्या मालकांची ‘जीओए’ संघटना स्थापन करण्यात आली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी बुधवारी सकाळी जनरेटर ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष मिनाझ अली, कार्याध्यक्ष सचिन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जीओएने महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेची संलग्नता स्वीकारली. यावेळी मनचिकसेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर, कार्याध्यक्षा शालिनी ठाकरे, सरचिटणीस शशांक नागवेकर तसेच उपाध्यक्ष शरद बांबूळकर व आकाश रणधीर आदी मान्यवर उपस्थित होते. मनचिकसेनेचे उपाध्यक्ष सचिन चव्हाण यांनी यासाठी पुढाकार घेतला होता.
‘आंध्र प्रदेश, कर्नाटक, पंजाब व दिल्ली येथील सिनेउद्योगांत ज्याप्रमाणे जनरेटर्सबाबतच्या नियमांचे पालन होते, त्याप्रमाणे मुंबईत पालन होत नाही. त्याचा फटका येथील शूटिंग वा कार्यक्रमांसाठी जनरेटर्स पुरवणा-या व्यावसायिकांना होतो,’ अशी समस्या यावेळी जीओएच्या पदाधिका-यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यापुढे मांडली. त्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, “यापुढे चित्रपट सेनेने निर्मात्यांसोबत दर महिन्याला बैठक घेऊन त्यांना तंत्रज्ञ तसेच संबंधित व्यावसायिकांच्या अडचणी सांगाव्या. आपले मुद्दे कायदेशीर मार्गानेच मांडा. मात्र आपल्या पदाचा गैरवापर कुणी करणार नाही, याबाबत पुरेपूर काळजी घ्यावी.”