संघटनवाढ,शेतकरी, विद्यार्थी, दुर्बल घटकांसाठी विशेष कार्यक्रम
पुणे :
युवक क्रांती दलाच्या कार्यवाह पदावर जांबुवंत मनोहर यांची निवड झाली आहे.जांबुवंत मनोहर हे युवक क्रांती दलाचा लढाऊ चेहरा मानले जातात.ही नियुक्ती ३ वर्षांसाठी आहे.’संघटना वाढविण्यासाठी महाराष्ट्र भर दौरा काढणार असून युवती आणि महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहे, आंतरजातीय -आंतरधर्मीय विवाहांना संरक्षण, शेतकरी, विद्यार्थी आणि दुर्बल घटकांसाठी विशेष कार्यक्रम येणाऱ्या काळात राबविण्यात येणार आहेत’,अशी माहिती या निवडीनंतर बोलताना जांबुवंत मनोहर यांनी दिली.
युवक क्रांती दलाची राज्य कार्यकारिणीची बैठक शनिवारी पुण्यात पार पडली. या बैठकीत राज्य कार्यवाहपदी जांबुवंत मनोहर यांची एकमताने निवड झाली.युक्रांदचे जेष्ठ नेते अन्वर राजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नवीन पदाधिकारी, सदस्य निवडण्यात आले. युक्रांदचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या हस्ते गांधी भवन येथे नियुक्ती पत्रे देऊन अभिनंदन करण्यात आले.
युक्रांद च्या राज्य उपाध्यक्षपदी संदीप बर्वे, राज्यसंघटक पदी अप्पा अनारसे, सहकार्यवाह पदी राजकुमार डोंबे व डॉ. रश्मी सोवनी, मराठवाडा संघटक शाम तोडकर यांची निवड करण्यात आली. यावेळी युवक क्रांती दलाचे पुणे शहर अध्यक्ष सचिन पांडुळे,अहमदनगर जिल्हा अध्यक्ष सुदाम लगड, नीलम पंडीत, सुदर्शन चखाले, प्रसन्न मराठे, विवेक काशीकर, रोहन गायकवाड, मयुर शिंदे,आदित्य आरेकर, दीपक मोहिते, आबेद सय्यद उपस्थित होते.