Home Blog Page 761

सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयांचे निर्णय आणि न्यायप्रक्रिया यांचे भाषांतर आणि प्रकाशन यासाठीच्या उपाययोजना

0

मुंबई-: 28 NOV 2024

न्यायिक कागदपत्रांच्या भाषांतरासाठी कृत्रिम बुद्धीमत्ता (AI) वापरण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्वीकृती दिली आहे. तोंडी वादविवादांचे भाषांतर, विशेषतः घटनापीठाशी संबंधित, फेब्रुवारी 2023 पासूनच्या खटल्यांमधील तोंडी वादविवादांचे भाषांतर करण्यासाठीदेखील AI ची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयांच्या निर्णयांच्या स्थानिक भाषेतील भाषांतरावर देखरेख करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या नेतृत्वात एक समिती स्थापन करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा समावेश असलेल्या उपसमित्यादेखील नेमण्यात आल्या असून स्थानिक भाषेतील भाषांतर जलद गतीने होण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची समिती या उपसमितीत्यांबरोबर नियमित बैठका घेणार आहे.  

उच्च न्यायालयांच्या AI भाषांतर समित्या सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय स्थानिक भाषेत भाषांतरित करण्याशी संबंधित संपूर्ण कामाची देखरेख करत आहेत. आजपर्यंत १७ उच्च न्यायालयांनी इ-उच्च न्यायालय अहवाल (e-HCR) / इ भारतीय कायदे अहवाल (e-ILR) तयार करण्यास सुरुवात देखील केली आहे.

केंद्र सरकारचे व राज्य सरकारचे सर्व कायदे, नियम, प्रतिबंध इत्यादी स्थानिक भाषेत भाषांतरित करुन ते राज्याच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करावेत अशी विनंती उच्च न्यायालयांच्या AI भाषांतर समित्यांनी संबंधित राज्य सरकारांना करावी असे त्यांना सांगण्यात आले आहे. यामुळे सामान्य नागरिकांना ही सर्व माहिती प्रादेशिक भाषेत वाचता येईल. भारतीय राज्यघटनेनुसार न्यायालयाच्या निर्णयांचे भाषांतर न्यायहक्काशी संबंधित असल्यामुळे सर्व राज्य सरकारांनीही आपल्या उच्च न्यायालयांना भाषांतराच्या प्रक्रियेत संपूर्णपणे मदत करावी असे त्यांना सांगण्यात आले आहे.

25 नोव्हेंबर 2024 पर्यंत सर्वोच्च न्यायालयाच्या 36,316 निर्णयांचे हिंदी भाषेत आणि 42,457 निर्णयांचे अन्य 17 प्रादेशिक भाषेत भाषांतर करण्यात आले आहे. हे सर्व सर्वोच्च न्यायालयाच्या e-SCR पोर्टलवर उपलब्ध आहे. 

या भाषांतराच्या प्रकल्पासाठी सर्वोच्च न्यायालयाला वेगळा निधी देण्यात आलेला नाही.

कायदे मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र कारभार) अर्जुन राम मेघवाल यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

कला चित्रपट कठीण आणि गुंतागुंतीचे असतात”: क्यूहवान जिओन, ‘लॉस्ट हॉर्स’ चे दिग्दर्शक


रॉड्रिगो क्विंटेरो अरौझ यांचा चित्रपट ‘दे कॉल मी पॅन्झर’ हा पनामानियन फुटबॉल दिग्गज रोमेल फर्नांडेझ गुटरेझ यांच्या जीवनापासून प्रेरित

हंगेरियन चित्रपट निर्माते बॅलिंट झिमलर यांचा चित्रपट ‘लेसन लर्न्ड’ म्हणजे दडपशाही शिक्षण व्यवस्थेवर केलेली टीका

#IFFIWood, 28 नोव्‍हेंबर 2024

दक्षिण कोरिया, हंगेरी आणि पनामा येथील तीन मनोवेधक चित्रपटांनी भारताच्या ५५व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) रसिकांना आनंद दिला.‌ सिनेमा ऑफ द वर्ल्ड विभागात क्यूहवान जिओनचा दक्षिण कोरियायी चित्रपट लॉस्ट हॉर्स आणि रॉड्रिगो क्विंटेरो अरौझचा स्पॅनिश भाषेतील पनामेनियन चित्रपट दे कॉल मी पॅन्झर यांचा समावेश होता. बालिंट झिमलर दिग्दर्शित लेसन लर्न्ड हा हंगेरियन चित्रपट देखील आयसीएफटी-युनेस्को गांधी पदकाच्या स्पर्धेत आहे. या चित्रपटांच्या दिग्दर्शकांनी आज पत्रकार परिषदेत सहभाग नोंदवला.

लॉस्ट हॉर्स

जिओन क्यू-ह्वानचा चित्रपट किम या वृद्ध माणसाच्या संघर्षाचे चित्रण करतो, ज्याचे 20 प्रेमळ घोडे जेजू बेटावरील त्याच्या कुरणातून गूढपणे गायब झाले. बेकायदेशीर स्थलांतरित मांस विकण्यासाठी जंगलात चोरलेल्या पशुधनाची कत्तल करत आहेत हे कळल्यावर किमने या भागात छापा टाकण्यासाठी एक क्रॅकडाऊन पथक तयार केले.

जीओनने त्याच्या चित्रपटावर चर्चा करताना, कोरिअन सिनेमांना  जागतिक लोकप्रियता असूनही अशा चित्रपटांना ओळख मिळवून देण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन, स्वतंत्र चित्रपट तयार करण्याच्या आव्हानांचा खुलासा केला, त्यांनी आर्ट फिल्म्सची जटिलता विशद केली, परंतु  त्याने त्यांचे उत्पादन सक्षम करण्यासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मला श्रेय दिले. तो म्हणाला, “मला सहाय्यक निर्माते मिळाले आणि इफ्फी सारख्या महोत्सवात माझे चित्रपट प्रदर्शित करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य आहे.”

दे कॉल मी पॅन्झर

पनामानियन चित्रपट निर्माते रॉड्रिगो क्विंटेरो अरौझ यांचा चित्रपट दिग्गज पनामानियन आणि टेनेरिफ फुटबॉलपटू रोमेल फर्नांडेझ गुटरेझ यांच्या जीवनापासून प्रेरणा घेतो, त्याची उत्कटता, चिकाटी आणि खेळाची परिवर्तनीय शक्ती प्रदर्शित करतो. रोमेलचे 1993 मध्ये 27 व्या वर्षी एका कार अपघातात दुःखद निधन झाले.

कौटुंबिक जबाबदाऱ्या संतुलित करण्याबाबचे रोमेलचे प्रयत्न चित्रपटाच्या केंद्रस्थानी असल्याचे रॉड्रिगो यांनी स्पष्ट केले. ” पनामा सोडल्यावर रोमेल पॅन्झर बनला,” दिग्दर्शकाने नमूद केले. रोमेलला वैयक्तिकरित्या ओळखणाऱ्या अनेकांनी चित्रपटासाठी योगदान दिले, ज्यात त्याची बहीण जॅकलीन होती, जिने त्याच्या आयुष्यातील महत्त्वाचे क्षण सामायिक केले. रोमेलने आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी आपले कुटुंब सोडण्याचा निर्णय घेतला, हा चित्रपटाच्या टर्निंग पॉइंट असल्याचे रॉड्रिगो यांनी वर्णन केले. ते म्हणाले, “‘स्वप्न आणि कौटुंबिक प्रेमावरील चित्रपट’ असा त्याचा सारांश सांगता येईल.”

पनामामधील चित्रपट उद्योगाबद्दल बोलताना रॉड्रिगो म्हणाले की, त्यांच्या देशात दीर्घ कालावधीसाठी चित्रपट प्रदर्शित करणे कठीण आहे. त्यामुळे लोकांना तिथे चित्रपट पाहण्याची फारशी संधी मिळत नाही. ते पुढे म्हणाले, “4 दशलक्ष लोकसंख्या असलेल्या देशात जेमतेम 100 चित्रपट निर्माते आहेत.”

लेसन लर्न्ड

समाजाला आरसा दाखविणारे चित्रपट निर्माण करण्याचे हंगेरियन चित्रपट निर्माते बॅलिंट झिमलर यांचे उद्दिष्ट त्यांच्या ‘लेसन लर्नड’ या चित्रपटात प्रतिबिंबित होते. ही कथा कालबाह्य शालेय पद्धतींना आव्हान देणारा एक तरुण शिक्षक जुसी आणि हंगेरीच्या आव्हानात्मक शिक्षण व्यवस्थेशी जुळवून घेण्यासाठी धडपड करणारा नवोदित पाल्को यांची आहे. “त्यांच्या वैयक्तिक कथा दडपशाही व्यवस्थेबाबत ची त्याची अंतर्दृष्टी  व्यक्त करतात, व्यापक हंगेरियन समाजाला प्रतिबिंबित करतात,” बॅलिंट यांनी स्पष्ट केले.

बॅलिंट, जे स्वतः वयाच्या नवव्या वर्षी अमेरिकेमधून हंगेरीला गेले होते, तेव्हा नवीन शिक्षण पद्धतीशी जुळवून घेण्याच्या वैयक्तिक अनुभवांमधून त्यांनी यांचे रेखाटन केले. “शिक्षण व्यवस्था दुहेरी जाचक आहे. एक समाज म्हणून आम्हाला कठोर नियमांची सवय झाली आहे. चित्रपटाच्या माध्यमातून या मुद्द्यांवर प्रकाश टाकणे मला भाग पडले, असे ते म्हणाले.

एकोणीस निर्मात्यांनी या चित्रपट प्रकल्पासाठी सहकार्य केले, पटकथा पूर्ण केली आणि अवघ्या पाच महिन्यांत चित्रीकरण करण्यात आले. लेसन लर्न्डचा 55 व्या इफ्फीमध्ये आशिया प्रीमियर झाला.

सशस्त्र सेना ध्वजदिन निधीमध्ये योगदान देण्यासाठी क्युआर कोडची सुविधा

पुणे, दि. २७: सशस्त्र सेना ध्वजदिन निधीमध्ये योगदान देता यावे यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने क्युआर कोडची सुविधा उपलब्ध करुन दिली असून इच्छुकांना योगदान देण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे.

युद्ध क्षेत्रात किंवा अतिरेकी कारवायांमध्ये शहीद, दिव्यांगत्व आलेले जवान तसेच माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियासाठी राज्यशासनाच्यावतीने विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहे. या योजनांकरीता लागणारा खर्च ध्वजदिन निधी संकलनाच्या माध्यमातून उभारला जातो. सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचे कार्य जिल्हाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत करण्यात येते.

ध्वजदिन निधीमध्ये देण्यात येणाऱ्या देणगी रक्कमेवर आयकर अधिनियम १९६१ कलम ८० जी (५) (६) च्या अंतर्गत आयकर सवलत लागू राहणार आहे, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल (नि.) स. दै. हंगे यांनी दिली आहे.

खडकवासला कार्यालयाने निवडणूक प्रक्रियेसाठी नवा आदर्श निर्माण केला:डॉ. यशवंत माने

पुणे : खडकवासला विधानसभा क्षेत्रातील निवडणूक प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्यात कर्मचाऱ्यांनी अत्यंत मेहनत घेतली. त्याचबरोबर त्यांच्या कार्यशक्तीच्या आणि कुशलतेच्या जोरावर प्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. खडकवासला कार्यालयाने पारदर्शक व अचूक निवडणूक प्रक्रियेसाठी एक नवा आदर्श निर्माण केला आहे, असे मत खडकवासला मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने यांनी व्यक्त केले.
खडकवासला विधानसभा निवडणूक प्रक्रियेच्या यशस्वी आयोजनानंतर कार्यालयाने अधिकाऱ्यांचा व कर्मचाऱ्यांचा सन्मान
करण्यासाठी निरोप सामारंभाचे आयोजन केले. या सामारंभात निवडणूक प्रक्रियेतील उत्कृष्ट व्यवस्थापन, अचूकता आणि पारदर्शकतेचा उल्लेख करत योगदान देणाऱ्यांचा गौरव करण्यात आला.तर, मतमोजणी प्रक्रिया, ईव्हीएम व्यवस्थापन आणि मतदान केंद्र नियोजनात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या कौशल्याबद्दल सहायक निवडणूक निर्णय अधिकारी किरण सुरवसे यांनी आभार मानले. प्रशिक्षक प्रा. तुषार राणे आणि प्रा. माधुरी माने यांनी मतमोजणी प्रक्रियेतील तांत्रिक आणि व्यवस्थापकीय बाजूंवर मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले. नायब तहसीलदार सचिन आखाडे (इव्हीएम कक्षाचे नोडल अधिकारी), नारायण पवार (इव्हीएम कक्षाचे सहाय्यक), अंकुश गुरव (कार्यक्रम समन्वयक), मनीष झंसारी, दीपगौरी जोशी (पोस्टल बॅलेट कक्ष अधिकारी), प्रमोद भांड (सहा. महसूल अधिकारी), धम्मदीप सातकर, साहिर सय्यद, भूमेश मसराम (मनुष्यबळ कक्ष अधिकारी) यांच्या निवडणूक प्रक्रियेत अचूकता आणि दक्षता राखण्याच्या कार्याची प्रशंसा केली. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी समन्वय कक्षाचे नोडल अधिकारी प्रा. मनीष खोडस्कर यांच्या कामगिरीचेही विशेष कौतुक करण्यात आले. मीडिया कक्ष प्रमुख योगेश हांडगे यांनी जागरुकता निर्मितीसाठी घेतलेल्या पुढाकाराचे सर्वांनी कौतुक केले.

आजच्या आव्हानात्मक युगात ध्यान हे एक सशक्त माध्यम – मधुरा दातार

अखंड ध्यान आणि तप यांद्वारे जागतिक चेतनेमध्ये आमूलाग्र परिवर्तन होईल – तेजविद्या

‘अखंड ध्यान की ज्वाला’ हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला

पुणे -सिंहगड रोडवर स्थित मनन आश्रमात 25 तासांवर आधारित अखंड ध्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसिद्ध मराठी आणि हिंदी पार्श्वगायिका मधुरा दातार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी तेजज्ञान फाउंडेशनच्या विश्वस्त तेजविद्याही उपस्थित होत्या. या सोहळ्यात पुणे आणि पुणे परिसरातील शेकडो लोक सहभागी झाले होते.

यावेळी पार्श्वगायिका मधुरा दातार यांनी ध्यानाचे महत्त्व सांगणारे एक सुंदर भजन गायले आणि तेजज्ञान फाऊंडेशनच्या 25 वर्षांच्या असाधारण आणि समर्पित प्रवासाबद्दल अभिनंदन केले. आपले विचार व्यक्त करताना त्या म्हणाल्या, आजच्या आव्हानात्मक काळात, आपल्या केंद्रस्थानी राहण्यासाठी आणि आपल्या आंतरिक शांतीशी जोडण्यासाठी ध्यान हे एक शक्तिशाली, प्रभावी माध्यम आहे. अखंड ध्यानामुळे शांतता आणि सकारात्मकतेची लाट निर्माण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या वैभवशाली प्रसंगी, तेजज्ञान फाउंडेशनच्या विश्वासू तेजविद्या यांनी 25 तास सतत ध्यान करण्याचा उद्देश स्पष्ट केला. ज्याप्रमाणे पाण्याचे वाफेत रूपांतर होण्यासाठी तीव्रतेची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे 25 तासांचे अविरत ध्यान, जागतिक चेतनेमध्ये आमूलाग्र परिवर्तन घडवून आणेल. म्हणूनच जगातील प्रत्येक व्यक्तीने ध्यानाच्या सान्निध्यात यावे. या शुद्ध निःस्वार्थ भावनेने सर्वांनी अखंड ध्यान करणे गरजेचे आहे, असे ही आवाहन त्यांनी केले.

ध्रुव ग्लोबलने वॉटर पोलो मध्ये सुवर्णपदक पटकाविले

पुणे, २८ नोव्हेंबर : जिल्हा परिषद वॉटर पोलो स्पर्धा नुकतीच संपन्न झाली . यामध्ये ध्रुव ग्लोबल स्कूलच्या खेळाडूंनी पहिल्याच दिवशी पाण्यातून पदक मिळवून शाळेचा गौरव वाढविला. शेकडो खेळाडूंमध्ये शाळेच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करून सुवर्णपदक मिळवून विजेतेपद पटकावले.
ध्रुव ग्लोबल स्कूलचे संचालक यश मालपाणी व मुख्याध्यापिका संगीता राऊतजी यांनी सर्व खेळाडूंचे यशाबद्दल अभिनंदन केले.
ध्रुव ग्लोबल स्कूलच्या जलतरण तलावात स्पर्धेला सुरूवात झाली. यामध्ये ध्रुव ग्लोबल स्कूलचा जलतरणपटू मंदार कोल्हटकर याने उत्कृष्ट कामगिरी करत विजयाचे पहिले खाते उघडले. डेक्कन मराठा ज्युनियर कॉलेज लांडेवाडी स्पर्धेत त्याने जोरदार डुबकी मारली आणि रौप्य पदक मिळवले. ध्रुव ग्लोबल स्कूल नांदेने पदक पटकावून आपली प्रतिभा चमकवली.
या स्पर्धेत इशान मंत्री, सोहम बारी, पारिजात चंद्र, जैत्रा भोर, आदर्श खोब्रागडे, पार्थ पोटे, सुमेध पानसे, मंदार कोल्हटकर, यश रेवतकर, विवान काळे, शर्विल जंगम, आयुष नशी आणि अद्विक भालेकर यांनी सहभाग घेतला.  यांच्या थरारक खेळाने पदक जिंकून यांनी आपल्या प्रतिभेची  चमक दाखवली. आयोजित स्पर्धेत मुळशी तालुक्यातील अनेक शाळांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. दरम्यान वॉटरपोलो प्रकारात ध्रुव ग्लोबल स्कूल संघांनी डेक्कन मराठा ज्युनिअर कॉलेज लांडेवाडीचा ११-१ असा पराभव केला.
स्पर्धेचे उद्घाटन प्राचार्य संगीता राऊतजी, क्रीडा समन्वयक रोहित पाटील, क्रीडा विभाग प्रमुख दत्तात्रय काठे यांच्या प्रमुख उपस्थित झाला.

टाटा समूहात नोकरीची संधी! वॉक-इन इंटरव्ह्यूचे वेळापत्रक अन् इतर निकष जाणून घ्या…

0

पुणे : टाटा समूहातील टाटा ऍडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेड (टीएएसएल) ही कंपनी देशात एरोस्पेस आणि डिफेन्स सोल्युशन्स बनवणारी आघाडीची खासगी कंपनी आहे. या कंपनीने पुण्यामध्ये ३० नोव्हेंबरला वॉक-इन इंटरव्ह्यूचे आयोजन केले आहे. टीएएसएलच्या हैदराबाद आणि बंगळुरूतील प्रकल्पांमधील विविध पदांसाठी या मुलाखती घेतल्या जाणार असून त्या पुण्यात होणार आहेत.

टाटा ऍडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेड कंपनीकडून हैदराबादमधील उत्पादन प्रकल्पात विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे. त्यात प्रामुख्याने तांत्रिक पदांचा समावेश असून, त्यात असेंब्ली मेकॅनिकल, इलेक्ट्रिक असेंब्लर, ग्राउंड टेस्ट-इलेक्ट्रिकल अँड एव्हियॉनिक्स आणि ग्राउंड टेस्ट – मेकॅनिकल सिस्टिम्स या पदांचा समावेश आहे. या पदांसाठी संबंधित क्षेत्रातील ३ ते ५ वर्षांचा अनुभव आवश्यक असेल. यासाठी उमेदवार एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंग अथवा पदविधारक असणे अपेक्षित आहे, असे कंपनीने म्हटले आहे.याचबरोबर कंपनीच्या बंगळुरूतील प्रकल्पातही विविध जागांसाठी भरती केली जाणार आहे. त्यात क्वालिटी इन्स्पेक्टर मेकॅनिकल, क्वालिटी इन्स्पेक्टर इलेक्ट्रिकल आणि पेंटर या पदांची भरती केली जाणार आहे. या पदांसाठी शैक्षणिक अर्हता एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंग अथवा पदविधारक असणे अपेक्षित आहे. याचबरोबर उमेदवाराला किमान ३ ते ५ वर्षांचा संबंधित कामाचा अनुभव असावा, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.

मुलाखती कधी अन् कुठे?
टाटा ऍडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेड कंपनीकडून वरील सर्व पदांसाठी मुलाखती ३० नोव्हेंबरला घेण्यात येणार आहेत. लेमन ट्री प्रिमियर, सिटी सेंटर, कॅनॉट रोड, पुणे येथे या मुलाखती होणार आहेत. या मुलाखतींची वेळ सकाळी ९.३० वाजता ते सायकाळी ५.३० वाजेपर्यंत असेल.टाटा ऍडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेडविषयी…
जागतिक पातळीवरील आघाडीच्या एरोस्पेस आणि डिफेन्स कंपन्यांसोबत भागीदारी करून टाटा ऍडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेड आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळीतील एक अविभाज्य सहयोगी आहे. आघाडीच्या डिफेन्स ओईएम कंपन्यांसाठी ही कंपनी ग्लोबल सिंगल सोर्स प्रोव्हायडर आहे. टाटा ऍडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेडने म्हटले आहे की, कंपनी सर्व कर्मचाऱ्यांना समान संधी देते. सर्वात नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अत्याधुनिक सेवासुविधा उत्पादने विकसित करण्यासाठी कर्मचाऱ्यांना आपल्या ज्ञान व अनुभवाचा वापर करता यावा यासाठी पूरक वातावरण पुरवण्यासाठी ही कंपनी वचनबद्ध आहे.

संत श्री ज्ञानेश्वर माऊलींचा ७२८ वा संजीवन समाधी सोहळा व जागतिक सहिष्णुता सप्ताहाचा समारोप सोहळा संपन्न

पुणे, दि. २८ नोव्हेंबर: विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत व श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने संत शिरोमणी तत्वज्ञ श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७२८ व्या संजीवन समाधी सोहळा व जागतिक सहिष्णुता सप्ताहाचा समारोप ‘श्री संत ज्ञानेश्वर-तुकाराम ज्ञानतीर्थ’, विश्वरूप दर्शन मंच, श्रीक्षेत्र आळंदी येथे दुपारी १२ वा. वारकर्‍यांच्या उपस्थितीत पार पडला. इद्रायणीत वारकर्‍यांच्या गुलाल, बुक्का व फुलांची ओंजळ वाहून ज्ञानेश्वर माऊलीचे भावपूर्ण स्मरण केले. भजन करून नामस्मरणाचा गरज केला. यावेळी विश्वरूप दर्शन मंचावर घंटानाद करण्यात आला. विश्वशांती केंद्राच्या वतीने वारकर्‍यांना महाप्रसाद देण्यात आला.
तत्पूर्वी हभप डॉ. सुदाम महाराज पानेगावकर यांनी काल्याचे कीर्तन केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली. याद्वारे शेकडो वर्षांची परंपरा जपण्यात आली. इंद्रायणीच्या घाटावर वरकर्‍यांनी या समाधी सोहळ्याच्या काल्याच्या महाप्रसादाचा लाभ घेतला.
या समारंभासाठी विश्वशांती केंद्र आळंदी, माईर्स एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, हभप तुळशीराम दा. कराड, सौ. उषा विश्वनाथ कराड, माईर्स मायमर वैद्यकीय महाविद्यालयाच्या कार्यकारी संचालिका डॉ. सुचित्रा कराड नागरे, प्रा. स्वाती कराड चाटे, आचार्य श्री शिवम, प्रसाद रांगणेकर, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन. पठाण, डॉ. मिलिंद पांडे, योगगुरू पाडेकर गुरूजी उपस्थित होते.
या सप्ताहात सुफी सं व इस्लाम धर्माचे अभ्यासक लतिफ पटेल, भागवतार्चा स्वामी डॉ. तुळशीराम महाराज गुट्टे, संत साहित्याचे अभ्यासक हभप डॉ. रविदास महाराज शिरसाठ, हभप डॉ. तुकाराम महाराज गरुड ठाकुरबुवा दैठणकर व हभप बापूसाहेब मोरे देहूकर या सारख्या नामवंत कीर्तनकारांनी कीर्तनरुपी सेवा सादर केली. तसेच श्रृती पाटील, मानसी वझे, डॉ. आशिष रानडे  व विश्वशांती संगीत कला अकादमीच्या शिक्षक व विद्यार्थ्यांनीी अभंगवाणी व भक्तीसंगीताचे कार्यक्रम सादर केले.
हभप बापूसाहेब मोरे देहूकर म्हणाले,”सृष्टीवर संताच्या वचनामुळे मानवाचे कल्याण होते. संत हे वात्सल्य मूर्ती  असून त्यांची महिमा शब्दात सांगता येत नाही. संत दुसर्‍यांचे दुख सावरण्यास पुढे येऊन त्याना सुख व शांतीचा मार्ग दाखवतात.”
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,” या सप्ताहात प्रवचन, कीर्तन, गायन व भजन या मार्गाने नामवंतांनी माऊलीचरीण सेवा रूजू केली. पुढील वर्षभर लोकशिक्षणाचे विविध कार्यक्रम व विश्वरूप दर्शन मंचावर होणार आहेत. यामध्ये सुसंस्कृत समाजनिर्मितीसाठी जनजागृतीद्वारे विज्ञान व अध्यात्म यांचा संगम होईल. पवित्र तीर्थ क्षेत्रांचे खर्‍या अर्थाने ज्ञान तीर्थ क्षेत्रामध्ये परिवर्तन घडविण्याचा आमचा प्रयत्न आहे. ज्ञान, कर्म आणि भक्तीतून ईश्वर दर्शन होते. त्याग आणि समर्पणाचा संतानी दिलेला संदेश व त्यांची शिकवण आत्मसात करून या मार्गाने चालण्याचा प्रयत्न करावा.”
हभप शालीकराम खंदारे यांनी सूत्रसंचालन व महेश महाराज नलावडे यांनी आभार मानले.

नॅशनल बुक ट्रस्टचे कार्यालय आता मुंबई येथून कायमस्वरूपी पुण्यात होणार – माजी मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे –
नॅशनल बुक ट्रस्टचे कार्यालय आता मुंबई येथून कायमस्वरूपी पुण्यात होणार असून त्यांना मनपाची एका इमारतीची जागा देखील तात्काळ भाड्याने दिली आहे. त्यामुळे आता केवळ पुणे पुस्तक मोहत्सव पुरते काम होणार नसून वर्षभर एनबीटी काम होणार आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे त्यामुळे याबाबत आता त्याची माहिती सर्वसामान्य लोकांना समजण्यासाठी एक फिल्म तयार करून मोहत्सवत दाखवण्यात यावे. मुलांसाठी चित्रपट मोहत्सव सोबत एक पुस्तक आधारित नाटक बसवण्यात यावे. पुस्तकाची आवड त्यातून मुलांमध्ये निर्माण होईल. पुणे शहर हे विविध क्षेत्रात अग्रेसर झाले आहे त्यामुळे पुणे पुस्तक मोहत्सव देखील यशस्वी होईल असे मत माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरवारी व्यक्त केले.
राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने यावर्षीच्या पुस्तक महोत्सवाचे आयोजन 14 ते 22 डिसेंबर या कालावधीत फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर करण्यात आले आहे. पुस्तक महोत्सवाचे कार्यालयाचे उद्घाटन आणि मांडवाचे भूमिपूजन माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते गुरवारी करण्यात आले. यावेळी महोत्सवाचे आयोजक राजेश पांडे , खासदार प्रा. मेधा कुलकर्णी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कुलगुरू सुरेश गोसावी, प्र – कुलगुरू पराग काळकर, एनबीटी संचालक युवराज मलिक, अध्यक्ष मिलिंद मराठे, उद्योजक कृष्णकुमार गोयल, डीक्कीचे अध्यक्ष मिलिंद कांबळे, डीईएस अध्यक्ष प्रमोद रावत, उपाध्यक्ष अशोक पलांडे, जेष्ठ संपादक किरण ठाकूर, भाजप नेते माधव भंडारी, खासदार मेधा कुलकर्णी, युवा सेना नेते किरण साळी, कुमार शंकर, सोमनाथ पाटील, प्रसेनजित फडणवीस, फर्ग्युसन महाविद्यालय प्राचार्य डॉ. विजय तडके, आरपीआय नेते मंदार जोशी, सुशील जाधव उपस्थित होते.
मेधा कुलकर्णी म्हणाल्या, पुणे हे विद्येचे माहेरघर आहे अनेक शैक्षणिक संस्था आहे. पुणे पुस्तक मोहत्सव यंदा मोठ्या प्रमाणात होईल. मुलांना चित्रपट मोहत्सव सोबत मुलांसाठी कथाकथन आणि पुस्तक वाचन कट्टा निर्माण करण्यात यावा. मला अभिमान आहे की, पुण्यात हा ऐतिहासिक मोहत्सव होत असल्याचा अभिमान आहे.
राजेश पांडे यांनी प्रास्ताविकात सांगितले की, हा मोहत्सव कोण एका व्यक्ती चा नाही तर पुणेकर यांचा आहे. लोकसहभाग यामध्ये महत्वाचा आहे. यावर्षी चार विश्व विक्रम यंदा होणार असून चीनचे विक्रम मोडीत कडण्यात येणार आहे. साडेसात लाख लोक मोहत्सवला यंदा भेट देतील अशी अपेक्षा आहे.अनेक व्यक्तींचा हा मोहत्सव आयोजन मध्ये सहभाग आहे. यावेळी पुणे पुस्तक मोहत्सव मध्ये ५९८ स्टॉल राहणार असून ही क्षमता तीन दिवसात भरून आणखी ८० जण स्टॉल मिळवण्याच्या प्रतीक्षेत आहे. साडेअकरा कोटीची मागील वेळी पुस्तक विक्री झाली यंदा ती दुप्पट होईल. परदेशातील लेखक देखील यंदा सहभागी होणार आहे. यंदा देखील एक लाख पुस्तके मोफत वाटप करण्यात येणार आहे. ११ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ ते १ यादरम्यान शांतता पुणेकर पुस्तक वाचत आहे उपक्रम राबवला जाणार आहे.
युवराज मलिक म्हणाले, पुणे शहरात साहित्य बद्दल जागरूकता आहे. मागील वेळी पुस्तक मोहत्सव मध्ये २०० स्टॉल होते यंदा त्याची संख्या तिप्पट वाढवून ६०० झालो तरी देखील अनेकजण विचारणा करत आहे. देशातील एक क्रमांकाचा हा मोहत्सव करण्याचा आमचा प्रयत्न आहे. पुढील वेळी हा मोहत्सव परदेशात घेऊन जाण्याचा आमचा संकल्प आहे. मोहत्सवात देशभरातील अनेक प्रतिष्ठित लेखक येऊन विविध भाषांत त्यांचे मत लिटरेचर फेस्टिवल मध्ये मांडतील. जगातील बालक यांच्यासाठी प्रसिद्ध चित्रपट दाखवण्यात येणार आहे. फूड फेस्टिवल देखील यंदा असणार आहे. मराठी भाषा अभिजात भाषा दर्जा मिळाला आहे आता मराठी पुस्तके इतर भाषांत मोठ्या प्रमाणात भाषांतरित करण्यात येतील. मराठी भाषा विभाग सक्षम करण्यात येतील. पुण्यातील नवीन कार्यालयात नोकरदार महिला कामावर जातील त्यावेळी त्यांची मुले आमच्या केंद्रात सोडतील आम्ही त्यांना पुस्तक वाचन माध्यमातून सुसंस्कृत करू, मोफत लायब्ररी, मोफत पुस्तक वाचन जागा, स्टोरीटेलिंग उपक्रम , पुणे पुस्तक मोहत्सव आणि एनबीटी यांची दोन स्वतंत्र कार्यालय असणार आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संजय चाकने यांनी केले, प्रसेनजीत फडणवीस यांनी आभार मानले.

स्पा, मसाज सेंटरमध्ये वाढले गैरप्रकार! शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली गंभीर नोंद

0

स्पा, मसाज सेंटरमध्ये वाढलेल्या गैरप्रकाराबाबत, शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले महत्त्वाचे निर्देश!

राज्यातील स्पा आणि मसाज सेंटरमधील गैरप्रकार रोखण्यासाठी उपसभापती विधानपरिषद डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या गृहसचिवांस सूचना.

मुंबई दि. 27 नोव्हेंबर 2024 : नवी मुंबई येथील स्पा सेंटरमध्ये, काम करणा‌ऱ्या, मुलीवर झालेल्या अत्याचाराबाबत न‌वीमुंबई पोलिसांनी नुकताच गुन्हा दाखल केलेला आहे. याची गंभीर दखल डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली. याबाबत राज्याचे अपर मुख्य सचिव, गृहविभाग यांना असे गैरप्रकार रोखण्यासाठी राज्यभरात खालीलप्रमाणे कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

राज्यातील सर्व स्पा, मसाज सेंटर, पार्लर येथे गैरप्रकार रोखण्यासाठी तपासणी मोहिम राबविण्यात यावी. तिथे काम करणाऱ्या मुली व महिला यांच्या सुरक्षितेची जबाबदारी स्पा चालक यांची राहील याचे प्रतिज्ञापत्र परवाना देताना घेण्यात यावे.

नवी मुंबई येथे घडलेल्या घटनेतील आरोपीस तत्काळ अटक करून गुन्ह्याचा तपास निष्णात पोलीस अधिकाऱ्यांमार्फत करावा व सत्वर दोषारोप पत्र दाखल करावे. अशा सूचना डॉ. नीलम गोन्ह यांनी दिल्या आहेत.

जिल्हास्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धा शनिवारपासून

पुणे जिल्हा हौशी पॉवरलिफ्टींग असोसिएशनच्या वतीने आयोजन
पुणे : पुणे जिल्हा हौशी  पॉवरलिफ्टींग असोसिएशनच्या वतीने आमदार चंद्रकांत पाटील पुरस्कृत ‘दी आयर्न गेम्स जिल्हास्तरीय पॉवरलिफ्टिंग’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक ३० आणि १ डिसेंबर रोजी धायरी येथील समृद्धी लॉन्स येथे ही स्पर्धा पार पडणार आहे, अशी माहिती पुणे जिल्हा हौशी पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष राजहंस मेहंदळे यांनी दिली.

स्पर्धेचे यंदा ७ वे वर्ष आहे. स्पर्धेचे उद्घाटन आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे. सब ज्युनिअर, ज्युनिअर, सीनियर, मास्टर आणि खुल्या गटात ही स्पर्धा होणार आहे. नवोदित खेळाडूंसाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यापूर्वी झालेल्या स्पर्धेतील विजयी खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होत भारतासाठी पदकांची कमाई केली आहे.

पुणे जिल्ह्यातून २०० पेक्षा अधिक स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. प्रत्येक गटाच्या प्रथम क्रमांकाला २ हजार रुपये रोख, पदक आणि प्रमाणपत्र मिळणार आहे तसेच स्पर्धेतील स्ट्रॉंग मॅन आणि स्ट्रॉंग वुमन किताब पटकाविणाऱ्यांना ४ हजार रुपये रोख आणि ट्रॉफी मिळणार आहे. प्रत्येक सहभागी खेळाडूंना सहभाग प्रमाणपत्र मिळणार आहे.

दिंडी सोहळ्यातील भेदभाव कमी करणाऱ्या सत्याग्रहाचा पन्नासावा कार्यक्रम साजरा करणार : बाबा कांबळे

  • आळंदीत वारकरी भूषण, समाज भूषण, समाज रत्न पुरस्कार प्रदान सोहळा

पिंपरी : प्रतिनिधी

आळंदीत दिंडी सोहळ्यातील जातीय विषमता संपवून समतेचा विचार जोपासणारा लढा उभारण्यात आला होता. त्‍याला यश आले आहे. संत रोहिदास, आजा मेळा, चोखामेळा या दिंड्या, दलित दिंड्या घोड्याच्या पुढे आणि मुख्य पालखी सोहळ्याच्या बाहेर चालत होत्या. त्यांना घोड्याच्या पाठीमागे व पालखी सोहळ्यामध्ये प्रवेश मिळावा, या मागणीसाठी १९७७–७८ साली सत्याग्रह करण्यात आला होता. या सत्याग्रहामुळे दलित दिंड्यांना मुख्य सोहळ्यामध्ये चालण्यास परवानगी मिळाली. त्‍यामुळे आळंदीत माऊलीच्‍या दर्शनाला येणारा प्रत्‍येक भाविक, वारकरी समतेचे विचार पुढे घेऊन जात आहे. समतेचा हा विचार तळागाळात रुजविण्यासाठी दिंडी साहेळ्यातील भेदभाव कमी करणाऱ्या सत्‍याग्रहाचा पन्‍नासावा उत्‍साहात साजरा करणार असल्‍याचे प्रतिपादन आळंदी येथील संत रोहिदास मठ व समस्त हराळे वैष्णव समाज धर्मशाळेचे अध्यक्ष हभप बाबा कांबळे यांनी केले.

संत ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी सोहळ्याच्या निमित्ताने श्री क्षेत्र आळंदी देवाची येथील संत रोहिदास मठ, हराळे वैष्णव समाज धर्मशाळाच्या वतीने आयोजित वारकरी भूषण समाज भूषण समाज रत्न पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या निमित्ताने बाबा कांबळे बोलत होते. यावेळी हभप रामकृष्ण महाराज खाडे यांना वारकरी भूषण पुरस्कार, हभप रोहिदास साधू उगले यांना समाज भूषण पुरस्कार, तसेच सोनाबाई श्रीपती गाडेकर, अंकुश भिकाजी चव्हाण, नामदेव सदाशिव साळुंखे, भालचंद्र कोरेगावकर, खंडूसेठ बनसोडे, विश्वनाथ महादेव शेटे, मारुती बळीबा ढवळे, यांना समाज रत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी संत रोहिदास मठ व समस्त हराळे वैष्णव धर्मशाळेचे कार्याध्यक्ष अनिल सातपुते, सचिव बाळासाहेब चव्हाण, ज्येष्ठ विश्वस्त श्री कुमार काळे, संत रोहिदास दिंडी क्रमांक 24 चे अध्यक्ष हभप सुरेश सोनवणे, पुजारी नारायण गाडेकर, संस्थेचे उपाध्यक्ष सुखदेव आबनावे, सुरेखा सुर्वे, विश्वस्त दत्तात्रय शिंदे, नारायण कोकाटे, सिद्धेश्वर सोनवणे, तुषार नेटके, उषा विश्वनाथ नेटके, डॉ. के. टी. कांबळे, लता गाडेकर आदीसह वारकरी, संत रोहिदास मठ व समस्त हराळे वैष्णव धर्मशाळेचे पदाधिकारी, कार्यकर्ते सभासद, यावेळी उपस्थित होते.

बाबा कांबळे म्‍हणाले की, संत परंपरा ही महाराष्ट्रातील अत्यंत उज्वल व मोठी परंपरा आहे. आळंदी येथून निघणारी पालखी ही देशातील एकमेव समतेचे उदाहरण आहे. सामाजिक समता राखणारा हा सोहळा अनेक वर्षापासून सुरू आहे. संत ज्ञानेश्वर, संत रोहिदास, संत तुकाराम, संत नामदेव, संत चोखामेळा, संत जनाबाई, संत गोरा कुंभार या संतांनी समाजातील चुकीच्या रूढी परंपरा अंधश्रद्धा संपवण्यासाठी आपल्या लेखणीतून जनतेला संदेश दिला.

पन्नास वर्षांपूर्वी या सोहळ्यामध्ये जातीभेद व भेदभाव पाळला जात होता. संत रोहिदास महाराज चोखामेळा, आजामेळा, या चर्मकार मातंग व महार समाजाच्या दिंड्या, या सोहळ्याच्या बाहेर घोड्याच्या पुढे चालत होत्या. यासाठी आळंदी मध्ये सत्याग्रह झाला. या दिंड्यांना मुख्य सोहळ्यामध्ये समाविष्ट करून घ्यावे, अशी मागणी करण्यात आली. यानंतर या दिंड्या मुख्य सोहळ्यामध्ये सहभागी झाल्या. या घटनेला आता पन्नास वर्षे पूर्ण होतील.

या निमित्ताने आळंदी येथे या सत्याग्रहाच्‍या ५० वे वर्ष साजरे केले जाणार आहे. संत रोहिदास महाराज दिंडी क्रमांक 24, समस्त हराळे वैष्णव समाज धर्मशाळा व सर्व वारकरी भाविक भक्त यामध्ये सहभागी होतील. हा उत्‍सव साजरा करताना सामाजिक समता, जातिभेद विरोध, चुकीच्या रूढी परंपरा यावर प्रकाश टाकण्यात येणार आहे, असे संत रोहिदास महाराज मठ तसेच समस्त हराळे वैष्णव समाज धर्मशाळेचे अध्यक्ष हभप बाबा कांबळे म्‍हणाले.

हेल्मेटसक्तीचा नियम महामार्गांसाठी, शहरात नाही – आमदार हेमंत रासने

हेल्मेट सक्तीच्या नियमावरून नागरिकांमध्ये संभ्रमावस्था, आमदार रासनेंची पोलीस आयुक्तांसोबत चर्चा

पुणे: गेली दोन दिवसांपासून पुणे शहरात दुचाकीस्वारासह सहप्रवाशाला हेल्मेट सक्ती केली जाणार असल्याच्या चर्चा सुरू असल्याने नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. परंतु पुणे पोलिसांकडून अशा प्रकारचे कोणतेही आदेश काढण्यात आलेले नसून महामार्गांसाठी वरिष्ठस्तरावरून आदेश काढण्यात आले आहेत. पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील नागरिकांवर याचा परिणाम होणार नसून कारवाई केली जाणार नसल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आपल्याला सांगितल्याची माहिती आमदार हेमंत रासने यांनी दिली आहे.

पुणे शहरात दुचाकीस्वारासोबत सहप्रवाशांनी देखील हेल्मेट घालावे अन्यथा पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार, अशा बातम्या गेली दोन दिवसांपासून प्रसिद्ध होत आहेत. यामुळे पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील नागरिकांमध्ये देखील संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी संपर्क साधत चर्चा केली. दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढत असल्याने महामार्गांवरील दुचाकीस्वार व सहप्रवाशांसाठी हे आदेश काढण्यात आल्याचं यावेळी आयुक्तांनी सांगितलं आहे.

याविषयी बोलताना आमदार रासने म्हणाले, “गेली दोन दिवसांपासून पुणे शहरात हेल्मेटसक्तीची कारवाई कडक करण्यात येणार असून सहप्रवाशाला देखील हेल्मेट असणे गरजेचे असल्याचे वृत्त येत आहे. यामुळे मध्यवस्तीतील नागरिकांमध्ये संभ्रमावस्था असून अनेकांनी मला फोन करून विचारणा केली. याबद्दल पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी हे आदेश महामार्गांसाठी असून मध्यवस्तीतील नागरिकांवर याचा परिणाम होणार नसल्याच सांगितले आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही, परंतु वाहतुकीचे नियम हे आपल्या सुरक्षेसाठीच असतात महामार्गांवर गाडी चालवताना सर्वांनी त्याचे पालन करावे”

वयाच्या 95 व्या वर्षी EVM विरोधात एल्गार:बाबा आढाव यांचे उपोषण, म्हणाले – लोकशाहीचे वस्त्रहरण सुरू

ईव्हीएममध्ये घोटाळा, बाबा आढावांचा आरोप

पुणे : आज देशात लोकशाहीचे अक्षरशः वस्त्रहरण सुरू झाले आहे. त्याविरोधात राज्य घटनेने दिलेल्या अधिकारांनुसार तीन दिवसांचे आत्मक्लेश आंदोलन करत आहे. आता नागरिकांनी रस्त्यावर उतरण्याची गरज आहे. हे करूनही गरज भासल्यास या सरकारविरोधात सत्याग्रह करावा लागेल, अशी टीका ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी केली. ईव्हीएमबाबत संशय घेण्यास जागा आहे, असेही त्यांनी नमूद केले.राज्यघटना आणि लोकशाहीची सुरु असलेल्या थट्टेचा निषेध करण्यासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी आजपासून 3 दिवस आत्मक्लेश उपोषण सुरु केले आहे. महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून महात्मा फुले वाडा येथे आत्मक्लेश उपोषण सुरु केलंय. बाबा आढाव यांनी वयाची 95 वर्ष पूर्ण केली आहेत. निवडणुकीच्या तोंडावर पैसे वाटप करणारी सरकारी योजना जाहीर करणे म्हणजे भ्रष्टाचाराला अधिकृत करणे आहे. त्यावर निवडणूक आयोगाने कसलाही आक्षेप न घेणे अनाकलनीय आहे असे मत बाबा आढाव यांनी व्यक्त केलं आहे.

ईव्हीएममध्ये घोटाळा झाला असल्याचा आरोप देखील बाबा आढाव यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीत लोकशाहीच वस्त्रहरण करण्यात आलं आहे. लोकसभा निवडणुकीलाठी निर्णय वेगळा आणि लगेच झालेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल वेगळा कसा लागतो? असा सवाल देखील आढाव यांनी उपस्थित केला आहे. EVM आणि पैशाच्या वापरामुळे हा निकाल आला आहे. या निवडणुकीत सतत मतदानाची टक्केवारी बदलत गेली आहे. दरम्यान, मी तीन दिवस आत्मक्लेश आंदोलन करणार आहे. त्यानंतर सरकारच्या विरोधात सत्याग्रह करणार असल्याचे बाबा आढाव म्हणाले.

यावेळी बोलताना बाबा आढाव म्हणाले की, गौतम अदानींवर कारवाई झाली पाहिजे. आदानींच्या विरोधात लोकसभेत बोलू दिलं जात नाही. याबाबत मी सरकारच्या विरोधात सत्याग्रह करणार असल्याचे बाबा आढाव म्हणाले. दरम्यान, आढाव यांचे वय 95 वर्ष आहे. याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले की, वय वाढलं म्हणून काय झालं? असं ते म्हणाले.

लोकशाहीतील एक नागरिक म्हणून माझं कर्तव्य आहे, की सरकार जर चुकत असेल तर त्यांना वेळीच सांगितलं पाहिजे असे बाबा आढाव म्हणाले. आज देशात लोकशाहीचं वस्त्रहरण सुरु झालं आहे. रोज लोकांचे अधिकार काढून घेतले जात आहे. शेतकऱ्यांचे, तरुणांचे मोठे प्रश्न आहेत. या सर्व गोष्टीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मी आत्मक्लेष उपोषण करणार असल्याचे आढाव म्हणाले. निवडणुकीच्या काळात सरकारी पैशांचा मोठा गैरवापर झाल्याचे देखील आढाव म्हणाले. याच्याविरोधात आवाज उठवणं गरजेचं असल्याचे आढाव म्हणाले.

 मनसेलाही ईव्हीएमवर संशय:राज ठाकरे यांचे पराभूत उमेदवारांना ईव्हीएम विरोधात पुरावे गोळा करण्याचे निर्देश

पुणे-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यात मनसेच्या पराभूत उमेदवारांची बैठक घेतली. राज ठाकरे यांनी उमेदवारांचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी पराभूत उमदेवारांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केला. निवडणुकीत कोणते फॅक्टर महत्त्वाचे ठरले यावरही बैठकीत चर्चा झाली. राज ठाकरे यांनी सर्वांची मते ऐकून घेतली. तसेच ईव्हीएमबाबत पुरावे गोळा करण्याच्या सूचना उमेदवारांना दिल्या. या सर्व घडामोडींवर राज ठाकरे लवकरच आपली भूमिका मांडणार आहेत.

राज ठाकरे यांनी घेतलेल्या बैठकीत राज्यातील मनसेचे पराभूत झालेले 82 उमेदवार तसेच त्या-त्या जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष उपस्थित होते. यावेळी निवडणुकीसंदर्भात उमेदवारांकडे विचारणा करण्यात आली. यावेळी उमेदवारांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केला. मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी आपल्या गावात एकही मत न मिळाल्याचे म्हटले आहे. हडपसर मतदारसंघात मतमोजणीमध्ये मनसेच्या उमेदवाराला 1000 मते जास्त मिळाली. तर राष्ट्रवादीच्या उमेदवाराला 600 मते जास्त मिळाल्याचे सांगण्यात आले. पोस्टल मतमोजणीवेळी महाविकास आघाडीला बहुमत मिळण्याचा अंदाज दिसत होता. मात्र, ईव्हीएम मशीनमधील मतमोजणी झाल्यानंतर सगळे निकाल वेगळे लागायला लागले. अशा अनेक शंका मनसेच्या उमेदवारांनी या बैठकीत सांगितल्या.सर्व पराभूत उमेदवारांचे म्हणणे राज ठाकरे यांनी ऐकून घेतले. घरातील लोकांचे मत देखील मिळाले नसल्याचा दावा उमेदवारांनी राज ठाकरेंसमोर केला. दरम्यान, 2014 पासून राज ठाकरे यांनी ईव्हीएमविरोधात बोलायला सुरुवात केली होती. मात्र, त्यावेळी कोणताही पक्ष सोबत आला नाही. यंदाच्या निवडणुकीत त्यांना फटका बसल्याने सगळे एकत्र आले आहेत. ईव्हीएमविरोधात जसे पुरावे मिळतील, त्यानुसार पुढील पावले उचलली जातील, असे मनसेच्या वतीने सांगण्यात आले.