पुणे, दि. २८ नोव्हेंबर: विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत व श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने संत शिरोमणी तत्वज्ञ श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७२८ व्या संजीवन समाधी सोहळा व जागतिक सहिष्णुता सप्ताहाचा समारोप ‘श्री संत ज्ञानेश्वर-तुकाराम ज्ञानतीर्थ’, विश्वरूप दर्शन मंच, श्रीक्षेत्र आळंदी येथे दुपारी १२ वा. वारकर्यांच्या उपस्थितीत पार पडला. इद्रायणीत वारकर्यांच्या गुलाल, बुक्का व फुलांची ओंजळ वाहून ज्ञानेश्वर माऊलीचे भावपूर्ण स्मरण केले. भजन करून नामस्मरणाचा गरज केला. यावेळी विश्वरूप दर्शन मंचावर घंटानाद करण्यात आला. विश्वशांती केंद्राच्या वतीने वारकर्यांना महाप्रसाद देण्यात आला.
तत्पूर्वी हभप डॉ. सुदाम महाराज पानेगावकर यांनी काल्याचे कीर्तन केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली. याद्वारे शेकडो वर्षांची परंपरा जपण्यात आली. इंद्रायणीच्या घाटावर वरकर्यांनी या समाधी सोहळ्याच्या काल्याच्या महाप्रसादाचा लाभ घेतला.
या समारंभासाठी विश्वशांती केंद्र आळंदी, माईर्स एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, हभप तुळशीराम दा. कराड, सौ. उषा विश्वनाथ कराड, माईर्स मायमर वैद्यकीय महाविद्यालयाच्या कार्यकारी संचालिका डॉ. सुचित्रा कराड नागरे, प्रा. स्वाती कराड चाटे, आचार्य श्री शिवम, प्रसाद रांगणेकर, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन. पठाण, डॉ. मिलिंद पांडे, योगगुरू पाडेकर गुरूजी उपस्थित होते.
या सप्ताहात सुफी सं व इस्लाम धर्माचे अभ्यासक लतिफ पटेल, भागवतार्चा स्वामी डॉ. तुळशीराम महाराज गुट्टे, संत साहित्याचे अभ्यासक हभप डॉ. रविदास महाराज शिरसाठ, हभप डॉ. तुकाराम महाराज गरुड ठाकुरबुवा दैठणकर व हभप बापूसाहेब मोरे देहूकर या सारख्या नामवंत कीर्तनकारांनी कीर्तनरुपी सेवा सादर केली. तसेच श्रृती पाटील, मानसी वझे, डॉ. आशिष रानडे व विश्वशांती संगीत कला अकादमीच्या शिक्षक व विद्यार्थ्यांनीी अभंगवाणी व भक्तीसंगीताचे कार्यक्रम सादर केले.
हभप बापूसाहेब मोरे देहूकर म्हणाले,”सृष्टीवर संताच्या वचनामुळे मानवाचे कल्याण होते. संत हे वात्सल्य मूर्ती असून त्यांची महिमा शब्दात सांगता येत नाही. संत दुसर्यांचे दुख सावरण्यास पुढे येऊन त्याना सुख व शांतीचा मार्ग दाखवतात.”
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,” या सप्ताहात प्रवचन, कीर्तन, गायन व भजन या मार्गाने नामवंतांनी माऊलीचरीण सेवा रूजू केली. पुढील वर्षभर लोकशिक्षणाचे विविध कार्यक्रम व विश्वरूप दर्शन मंचावर होणार आहेत. यामध्ये सुसंस्कृत समाजनिर्मितीसाठी जनजागृतीद्वारे विज्ञान व अध्यात्म यांचा संगम होईल. पवित्र तीर्थ क्षेत्रांचे खर्या अर्थाने ज्ञान तीर्थ क्षेत्रामध्ये परिवर्तन घडविण्याचा आमचा प्रयत्न आहे. ज्ञान, कर्म आणि भक्तीतून ईश्वर दर्शन होते. त्याग आणि समर्पणाचा संतानी दिलेला संदेश व त्यांची शिकवण आत्मसात करून या मार्गाने चालण्याचा प्रयत्न करावा.”
हभप शालीकराम खंदारे यांनी सूत्रसंचालन व महेश महाराज नलावडे यांनी आभार मानले.