पुणे जिल्हा हौशी पॉवरलिफ्टींग असोसिएशनच्या वतीने आयोजन
पुणे : पुणे जिल्हा हौशी पॉवरलिफ्टींग असोसिएशनच्या वतीने आमदार चंद्रकांत पाटील पुरस्कृत ‘दी आयर्न गेम्स जिल्हास्तरीय पॉवरलिफ्टिंग’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक ३० आणि १ डिसेंबर रोजी धायरी येथील समृद्धी लॉन्स येथे ही स्पर्धा पार पडणार आहे, अशी माहिती पुणे जिल्हा हौशी पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष राजहंस मेहंदळे यांनी दिली.
स्पर्धेचे यंदा ७ वे वर्ष आहे. स्पर्धेचे उद्घाटन आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे. सब ज्युनिअर, ज्युनिअर, सीनियर, मास्टर आणि खुल्या गटात ही स्पर्धा होणार आहे. नवोदित खेळाडूंसाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यापूर्वी झालेल्या स्पर्धेतील विजयी खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होत भारतासाठी पदकांची कमाई केली आहे.
पुणे जिल्ह्यातून २०० पेक्षा अधिक स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. प्रत्येक गटाच्या प्रथम क्रमांकाला २ हजार रुपये रोख, पदक आणि प्रमाणपत्र मिळणार आहे तसेच स्पर्धेतील स्ट्रॉंग मॅन आणि स्ट्रॉंग वुमन किताब पटकाविणाऱ्यांना ४ हजार रुपये रोख आणि ट्रॉफी मिळणार आहे. प्रत्येक सहभागी खेळाडूंना सहभाग प्रमाणपत्र मिळणार आहे.