Home Blog Page 754

देवेंद्र फडणवीस यांची निवड होताच पुण्यात जल्लोष

पुणे –
भारतीय जनता पक्षाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्या निमित्त पुण्यातील अलका टॉकीज चौकात भाजपच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला. पुणे भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी कार्यकर्त्यांसह स्वतः ढोल वादन करत देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागल्या निमित्त आनंद साजरा केला.
यावेळी पुणे शहर सरचिटणीस , ,पुनीत जोशी, राघवेंद्र मानकर राहुल भंडारे , सुभाष जंगले,वर्षा तापकीर, प्रमोद कोंढरे,,रवींद्र साळे गावकर गणेश घोष,माजी नगरसेवक जयंत भावे आदित्य माळवे, अजय खेडेकर, राजेंद्र काकडे, पुष्कर तुळजापूरकर,राजू परदेशी ,प्रणव गंजीवाले, उमेश शाह, दिलीप उंबरकर, संदीप काळे उपस्थित होते.
घाटे म्हणाले, देवेंद्र फडणवीस हे राज्याचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदावर विराजमान होत आहे. राज्यातील युवक आणि महिला यांचा सन्मान आणि उद्धार करण्यासाठी फडणवीस यांची निवड पदावर करण्यात आली आहे. राज्यातील लाडकी बहीण यांना त्यांचा हक्काचा देवाभाऊ मिळणार आहे. पुण्यातील सर्व पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी असे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते शपथविधीसाठी उद्या मुंबई मध्ये जाणार आहे. देवेंद्र फडणवीस हे समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन यापुढील काळात वाटचाल करतील. 2014 ते 2019 या दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी यशस्वीपणे राज्याची धुरा सांभाळलेली आहे .त्यामुळे ते पुन्हा एकदा चांगल्याप्रकारे राज्याला विकासाच्या वाटेवर नेतील असा विश्वास राज्यातील जनतेला आहे. लाडक्या बहिणी सोबत लाडके भाऊ देखील भाजपच्या पाठीशी विधानसभा निवडणूकीत राहिलेली आहे. महायुतीला राज्यात ऐतिहासिक यश मिळालेले असून विरोधकांचा सुफडा साफ झालेला आहे.

देवेंद्र फडणवीस होणार नवे CM:भाजप गटनेतेपदी निवड

मुंबई-महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर 11 दिवसांनी आज नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा झाली. भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार आहे. विधीमंडळ पक्षाचा नेता निवडीसाठी भाजपचे केंद्रीय निरीक्षक विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. आज दुपारी महायुतीमधील नेते राज्यपालांना भेटून सरकार स्थापनेचा दावा करतील. 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता आझाद मैदान, मुंबई येथे शपथविधी होणार आहे.
देवेंद्र फडणवीस हे वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहेत. वर्षावर एकनाथ शिंदेसोबत ते चर्चा करत असून काही वेळाने हे नेते राज्यपालांकडे जातील.देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर दुपारी 2 वाजता महायुतीच्या तिन्ही प्रमुख पक्षांच्या नेत्यांचीम्हणजे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व अजित पवार यांची बैठक होणार आहे. महायुतीची ही पहिलीच अधिकृत बैठक असेल. या बैठकीत मंत्रिमंडळाच्या खातेवाटपाला अंतिम स्वरूप देण्यात येईल. त्यानंतर दुपारी 3.30 वाजता हे तिन्ही नेते एका शिष्टमंडळासह राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा सादर करतील.

सुप्रीम कोर्टाचा पुणे पोलिसांना झटका:पोलीस कारभाराचा व्हिडीओ FB वर टाकणाऱ्यावरील पोलीस कारवाई रद्द

अभिव्यक्ती स्वातंत्र्य कायद्यानुसार सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट करणे नागरिकांच्या स्वातंत्र्याचा भाग आहे. त्यावर कोणी इतर व्यक्ती अपमानजनक टिपणी करत असेल, तर पोस्ट करणाऱ्यांचा तो अपराध नाही

पोलिसांकडून बेकायदेशीर कारभार झाल्याने,हि समस्या सार्वजनिक स्वरूपात मांडली.त्यामुळे FB पोस्ट टाकणाऱ्यावर पोलिसांनी सूड भावनेतून कारवाई केली. .

पुणे -येथे 27 नोव्हेंबर 2022 रोजी पुण्यातील जंगली महाराज रस्ता येथे विजय सागर यांनी फुटपाथच्या बाजूला त्यांचे वाहन पार्किंग केले होते. त्यावेळी महिला वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांनी संबंधित वाहन उचलून शिवाजीनगर वाहतूक पोलिस चौकीत नेले. सागर हे त्यांची मुलगी आणि एक वर्षाचा नातू यांच्यासह सदर ठिकाणी गेल्यानंतर त्यांना 785 रुपयांचे चलन भरण्यास सांगितले. तसेच महिला वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांनी 1000 रुपयांचा ‘कार्पोरेशन फाईन’ सांगत एकप्रकारे लाचेचीही मागणी केली. सागर यांनी ही लाच देण्यास नकार दिला. तसेच याबाबतचा फेसबुक लाईव्ह व्हिडिओ केला.हा फेसबुक लाईव्ह व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊन महिला पोलिस कर्मचारी विरोधात अनेक जणांनी अवमानकारक टिप्पणी केली. याबाबतची माहिती सागर यांना समजल्यानंतर सागर यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावरून काढून टाकला. मात्र, 29 नोव्हेंबर 2022 रोजी संबंधित महिला पोलिस हवालदाराने सागर आणि अज्ञात व्यक्ती यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता कलम 500, 509 ,34 सूचना प्रद्योगिक अधिनियम कलम 67 नुसार एफआयआर दाखल केला.

फौजदारी गुन्हा दाखल झाल्यानंतर सागर यांनी याबाबत सत्र न्यायालयातून जामीन मिळवून घेतला. तसेच फौजदारी गुन्हा रद्द करण्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. परंतु उच्च न्यायालयाने याबाबत दोषारोपपत्र दाखल झाल्याने, सदर याचिका निकाली काढण्यास असमर्थता दर्शवली. त्यामुळे सागर यांनी सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भात याचिका दाखल करून दाद मागितली. त्यांचे वकील सत्या मुळे यांनी न्यायालयात युक्तिवाद केला की, घटनेच्या कलम 19 (१) (ए) नुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्य कायद्यानुसार सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट करणे नागरिकांच्या स्वातंत्र्याचा भाग आहे. त्यावर कोणी इतर व्यक्ती अपमानजनक टिपणी करत असेल, तर पोस्ट करणाऱ्यांचा तो अपराध नाही. महाराष्ट्र नगरनिगम अधिनियम नुसार एक हजार रुपये वाहतूक पोलिसांनी मागणे बेकायदेशीर गोष्ट होती.

सर्वोच्च न्यायालयाने याबाबत सांगितले की, संबंधित प्रकरण आणखी पुढे घेऊन जाणे कायदेशीर कारवाईचा दुरुपयोग ठरेल. संबधित प्रकरण हे उच्च न्यायालयाने यापूर्वीच रद्द करण्याची गरज होती. कोणत्या पोस्टवर कोणी अश्लील आणि अपमानजनक भाष्य केले असेल तर तक्रारदार यांना त्यांच्या विरोधात तक्रार करण्याचा हक्क आहे. मात्र, सागर यांच्या विरोधात कोणतीही अपराधी गोष्ट असल्याचे दिसून येत नाही. त्यांनी केवळ त्यांची समस्या सार्वजनिक स्वरूपात मांडली. पोलिसांकडून एक हजार रुपये मागणी बेकायदेशीर होते. त्यामुळे त्यांच्यावर पोलिसांनी सूड भावनेतून कारवाई केली.

पुण्यात विधानसभा मतमोजणीसाठी संगणक पुरवठादार ठेकेदारावर गुन्हा दाखल

पुणे:महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत पुण्यातील काेरेगाव पार्क येथे मतमाेजणी केंद्र ठेवण्यात आले हाेते. सदर ठिकाणी मतमाेजणीच्या 1 दिवस अगोदर म्हणजे 22 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत मतमाेजणी पूर्व रंगीत तालीम घेणे गरजेचे हाेते. परंतु मतमाेजणीच्या प्रक्रियेत संगणक पुरवठा व जाेडणीचे कामकाज करणाऱ्या इंदु इन्फाेटेक कंपनीने दिरंगाई केली. त्यामुळे मतमाेजणी रंगीत तालीम घेता न आल्याने संबंधित कंपनीवर काेरेगाव पार्क पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत मंडल अधिकारी पुष्पा वसंत गाेसावी (वय-54) यांनी इंदु इन्फाेटेक कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्याविरोधात पाेलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार लाेकप्रतिनिधी अधिनियम 1951 चे कलम 134 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मतमाेजणीच्या दिवशी इंदु इन्फाेटेक या कंपनीस संगणक पुरवठा व जाेडणीच्या कामकाजाकरिता करारनामा करुन आदेशित केले हाेते. संबंधित करारनाम्यानुसार संगणक पुरवठा व जाेडणीचे कामकाज मतदानाच्या 1 दिवस अगोदर म्हणजे 22 नोव्हेंबर रोजी भारतीय खाद्य निगम, काेरेगाव पार्क, पुणे याठिकाणी सकाळी 11 वाजेपर्यंत पूर्ण न केल्याने मतमाेजणी पूर्व रंगीत तालीम घेता आली नाही. याबाबत पुढील तपास सहाय्यक पाेलिस निरीक्षक पुरुषाेत्तम देवकर करत आहेत.

विद्यापीठात क्रीडा संस्कृती व क्रीडा क्षेत्राला नव संजीवनी देणार

पुणे, दि.३ डिसेंबर: क्रीडा क्षेत्रातील मातब्बर देश म्हणून उदयास आणायचे असेल, तर खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास करणे, क्रीडा धोरणाची अंमलबजावणी करणे, अनुभवी खेळाडूंचा सल्ला व मार्गदर्शन घेणे, विद्यापीठ स्तरावर खेळाबाबत सकारात्मक विचार विकसित करणे आणि क्रीडा कार्यक्रमांबाबत जागरूकता निर्माण करणे. हा मुख्य उद्देश ठेऊन एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीने प्रथमच ‘स्पोर्टस अ‍ॅडव्हायझरी बोर्डची’ स्थापना केली.
डब्ल्यूपीयूच्या क्रीडा विभागाच्या वतिने स्थापित करण्यात आलेल्या ‘स्पोर्टस अ‍ॅडव्हायझरी बोर्ड’ची पहिली बैठक डब्ल्यूपीयूच्या संत श्री ज्ञानेश्वर हॉलमध्ये संपन्न झाली. या वेळी उपस्थित मान्यवरांनी वरील निर्णयाला संमती दर्शवून लवकरात लवकर कार्यास सुरूवात करण्यात येणार आहे.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी एमआयटी डब्ल्यूपीयूचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड होते. तसेच डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड, कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, कुलसचिव गणेश पोकळे, डब्ल्यूपीयूचे क्रीडा संचालक डॉ.पी.जी. धनवे व सह संचालक अभय कचरे उपस्थित होते.
या ‘स्पोर्टस अ‍ॅडव्हायझरी बोर्ड’ मध्ये देशातील नामांकित क्रीडा खेळाडूंपैकी अंजली भागवत (शुटींग, राजीव गांधी खेल रत्न अवॉर्ड), शांताराम जाधव (कबड्डी, अर्जुन अवॉर्ड), मनोज पिंगळे (बॉक्सिंग, अर्जुन अवॉर्ड),श्रीरंग इनामदार (खो खो, अर्जुन अवॉर्ड), अभिजित कुंटे (बुद्धिबळ, ध्यानचंद पुरस्कार), प्रा. विलास कथुरे (कुस्ती, शिव छत्रपती पुरस्कार), मनोज एरंडे (स्विमिंग, शिव छत्रपती पुरस्कार), अजित जरांडे (जिम्नॅस्टिक, शिव छत्रपती पुरस्कार), योगेश धाडवे ( ज्यूडो, शिव छत्रपती पुरस्कार), वैशाली फडतरे (व्हॉलीबॉल, शिव छत्रपती पुरस्कार), डॉ. कौस्तुभ राडकर (आयर्न मॅन, शिव छत्रपती पुरस्कार), डॉ. पल्लवी कवाणे (योगा, वर्ल्ड चॅम्पियन), कपीलेश भाटे ( हॉर्स रायडींग, आंतरराष्ट्रीय खेळाडू ), मंदार ताम्हाणे (फूटबॉल, सीईओ नॉर्थ इस्ट युनायटेड फूटबॉल क्लब), असिम पाटील (ई स्पोर्टस आणि इंडस्ट्रीयलिस्ट), सुंदर अय्यर (सचीव, भारतीय लॉन टेनिस संघटना), कमलेश पिसाळ (सचिव, एमसीए), अपुर्व सोनटक्के (बास्केटबॉल, आंतरराष्ट्रीय खेळाडू), उमेश झिरपे (एव्हरेस्ट वीर), योगेश नातू (फूटबॉल), डॉ. अजित मापारी (स्पोर्ट मेडिसिन), डॉ. स्वरूप सवनूर (मेंटल ट्रेनिंग कोच ) आणि मिंलिंद ढमढेरे (ज्येष्ठ क्रीडा पत्रकार) यांचा समावेश असून ते बैठकीला उपस्थित होते.
 या व्यतिरिक्त रेखा भिडे (हॉकी, अर्जुनी अवॉर्ड), कमलेश मेहता (टेबल टेनिस,अर्जुन अवॉर्ड) व आदित्य कानिटकर (गोल्फ कोच) हे ऑनलाईन उपस्थित होते.
बैठकीमध्ये मान्यवरांनी विचार मांडून क्रीडा विषयक शास्त्रोक्त माहिती, क्रीडा विषयक उपक्रम, राष्ट्रीय क्रीडा दिन व क्रीडा सप्ताहाचे आयोजन करणे आणि बोर्डाच्या माध्यमातून खेळाडूंना भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचविण्यासाठी परिपूर्ण मदत केली जाणार आहे. डब्ल्यूपीयूच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्राला आवश्यक आंतरराष्ट्रीय सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहे. तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षक उपलब्ध करून खेळाडूंना मार्गदर्शन दिले जाईल. विभिन्न खेळासाठी आवश्यक अत्याधुनिक क्रीडा सुविधा, विद्यापीठ स्तरावर पुण्यातील व खाजगी विद्यापीठांमध्ये विभिन्न खेळाच्या लीग स्पर्धेचे आयोजन आणि भविष्यात स्पोर्टस युनिव्हर्सिटी उघडण्याचा मानस आहे. क्रीडा संस्कृतीला वृध्दिगत करण्यासाठी बहु आयामी दृष्टीकोण ठेऊन यामध्ये विद्यार्थी, प्राध्यापक, प्रशासन, क्रीडा तज्ज्ञ आणि व्यापक समुदाय यांचा समावेश आवश्यक आहे.
या बैठकीला एमआयटी डब्ल्यूपीयूचे आंतरराष्ट्रीय खेळाडू व विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थिती होते.

आदर्श परिचारिका व आदर्श माता कै. अन्नपूर्णाबाई जोशी पुरस्कार सोहळा संपन्न


पुणे ः  अबला महिलांसाठी मदत करणाऱ्या आणि शिक्षणसेवेसाठी नेहमी तत्पर असणाऱ्या अन्नपूर्णाबाई जोशी यांनी नेहमीच काळाच्या पुढे जाऊन विचार केला आणि समाजसेवेत मोलाचे योगदान दिले. अन्नपूर्णाबाई जोशी यांचे कार्य हे उद्याच्या पिढीला प्रेरणादायी आहे, असे मत गीताधर्म मंडळाचे अध्यक्ष डाॅ. मुकुंद दातार यांनी व्यक्त केले. 

आदर्श परिचारिका व आदर्श माता कै. अन्नपूर्णाबाई जोशी पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन सदाशिव पेठेतील गीताधर्म मंडळातील सभागृहात करण्यात आले. यंदाचा पुरस्कार आदर्श विद्यार्थी प्रकाशनचे रमेश कुंदूर यांना प्रदान करण्यात आला. या प्रसंगी शिक्षणतज्ञ डॉ. न.म. जोशी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ आणि सन्मानपत्र असे होते. या कार्यक्रमात रमेश कुंदूर यांनी कैलासाचे दिव्य अंतरंग हा स्लाईड शो सादर केला.

रमेश कुंदूर म्हणाले, मला मिळालेला हा पुरस्कार म्हणजे आणखी जोमाने काम करण्याची जबाबदारी आहे. ‘श्यामची आई’ या पुस्तकाच्या माध्यमातून घराघरातील मुलांमध्ये चांगले संस्कार रुजवण्याचा प्रयत्न केला. मला ही प्रेरणा माझ्या आई-वडिलांकडून मिळाली आहे. यापुढेही माझ्या हातून उत्तम कार्य घडावे, असेही त्यांनी सांगितले.शैलजा कात्रे यांनी प्रास्ताविक केले. सुरेखा जोशी यांनी आभार मानले. 

जिल्ह्यात राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचे आयोजन अकरा लाखाहून अधिक जंतनाशक गोळ्यांचे वितरण होणार

पुणे, दि. ३: राष्ट्रीय जंतनाशक दिनाचे औचित्य साधून ४ ते १० डिसेंबर २०२४ या कालावधीत मोहीम राबविण्यात येणार असून जिल्ह्यात सुमारे ११ लाख ६० हजार २७२ लाभार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे वितरण करण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई यांनी दिली आहे.

राष्ट्रीय जंतनाशक दिनाचा उद्देश १ ते १९ वर्षे वयोगटातील सर्व मुलांमुलींना शाळा व अंगणवाडी केंद्रस्तरावर जंतनाशक गोळी देऊन त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे असा आहे. ही मोहीम केंद्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार सार्वजनिक आरोग्य, महिला व बालविकास आणि शिक्षण विभागामार्फत सर्व अंगणवाडी, शाळा, महाविद्यालयात मोहीम राबविण्यात येणार आहे.

या अंतर्गत सर्व शासकीय शाळा, शासकीय अनुदानित शाळा, आश्रम शाळा, महानगरपालिका शाळा, सर्व खाजगी अनुदानित शाळा, सर्व खाजगी अनुदानित शाळा, सैनिकी शाळा, सी.बी.एस.सी. स्कूल, नवोदय विद्यालय, सुधारगृह, सर्व खाजगी इंग्रजी माध्यमिक शाळा, मदरसे, मिशनरी स्कूल, गुरुकुल, संस्कार केंद्र, सर्व कनिष्ठ महाविद्यालय व वरिष्ठ महाविद्यालय प्रथम वर्षाचे विद्यार्थी, नर्सिंग कॉलेज, आय.टी.आय., तंत्रनिकेतन, अभियांत्रिकी, कला, वाणिज्य व विज्ञान, फार्मसी महाविद्यालय. डी.एड. महाविद्यालय, सर्व ग्रामीण व शहरी अंगणवाडी व मिनी अंगणवाडी केंद्र आदी ठिकाणी मोहीम राबविण्यात येणार आहे.

जंतनाशक गोळीचे सेवन केल्यानंतर सौम्य प्रकारची लक्षणे आढळल्यास सावलीत विश्रांती घ्यावी तसेच स्वच्छ पाणी पिण्यास द्यावे, तीव्र स्वरुपाची लक्षणे आढळल्यास नजीकच्या आरोग्य केंद्रास घेवून जावे. याबाबत अधिक माहितीकरीता १०४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, अशी माहिती डॉ. देसाई यांनी दिली आहे.

संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद: सक्षम भारताच्या निर्मितीसाठी सशक्त युवापिढी घडविणे अत्यंत महत्वाचे आहे. याकरिता ४ डिसेंबर २०२४ रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात १०८ प्राथमिक आरोग्य केंद्र, ५४४ उपकेंद्र (आरोग्य मंदिरे) अंतर्गत असणाऱ्या ५ हजार ५७० शाळा आणि ४ हजार ६९३ अंगणवाडी व १६५ महाविद्यालय मध्ये एकूण ११ लाख ६० हजार २७२ इतक्या जंतनाशक गोळ्या देण्यात येणार आहेत. पालकांनी १ ते १९ वर्ष वयोगटातील मुलामुलींना जंतनाशक गोळी अवश्य घ्यावी.
0000

पुणे येथे बाल आनंद मेळावा संपन्न

दिव्यांग विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुण ओळखून त्यांना प्रोत्साहित करावे- दिव्यांग कल्याण आयुक्त प्रवीण पुरी

पुणे, दि. 3: शिक्षकांनी दिव्यांग विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुण ओळखून त्यांना त्या त्या क्षेत्रात प्रोत्साहित करण्यासह यशस्वी वाटचालीकरीता मार्गदर्शन करावे, असे आवाहन दिव्यांग कल्याण विभागाचे आयुक्त प्रवीण पुरी यांनी केले.

आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्यावतीने आयोजित बाल आनंद मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी राधाकिसन देवढे, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे आदी उपस्थित होते.

श्री. पुरी म्हणाले, शासकीय व शासन अधिपत्याखालील आस्थापनेवर राखीव असलेल्या ४ टक्के जागांवर दिव्यांग उमेदवारांना नोकरी मिळण्यासोबतच शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ मिळण्याकरीता शासकीय यंत्रणांनी प्रयत्न करावेत.

श्री. पाटील म्हणाले, कार्यक्रमाच्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या कला व गुण बघितले असता तेही सर्वसामान्यापेक्षा कमी नाहीत. सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्व क्षेत्रांमध्ये प्राविण्य मिळवण्याबाबत प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

श्री. देवढे यांनी आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनाचे महत्त्व, जिल्ह्यामध्ये दिव्यांग क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संस्था, दिव्यांगासाठी शासन स्तरावरून अंमलबजावणी करण्यात येणाऱ्या योजना आदींची माहिती दिली.

यावेळी दिव्यांग मुलांच्या विशेष शाळेतील विद्यार्थ्यांचे सनई चौघडा वादन, गणेश वंदना व मल्लखांब प्रात्यक्षिकद्वारे सांस्कृतिक कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चित्रकला, अॅबिलिकपिक्स, कला, संगीत व क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या ४१ यशस्वी दिव्यांग विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला.

बाल आनंद मेळाव्यामध्ये जिल्ह्यातील ८१ दिव्यांगाच्या विशेष शाळा व कर्मशाळातील ३ हजार २०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला,
0000

भाजपचा कारभार म्हणजे वधू – वराचा पत्ता नाही आणि हॉल बुक करत आहेत:अनंत गाडगीळ यांचा टोमणा

पुणे:विधानसभेच्या निवडणूका होऊन १० दिवस उलटले तरी अजूनही भा.ज.प. नेता निवडू शकलेली नाही. लोकशाही प्रथेप्रमाणे निकालांनंतर बहुमतवाला पक्ष नेता निवड करतो. त्यांनतर सदर नेता राज्यपालांची भेट घेऊन बहुमताचा पुरावा देतो. त्या अनुषंगाने राज्यपाल सरकार स्थापन करण्यासाठी बहुमतवाल्या पक्षाच्या नेत्यास आमंत्रित करतात व त्यांनतर शपथविधी होतो.

महाराष्ट्रात प्रथा तर सोडाच पण हि प्रक्रियाही सुरु होण्यापूर्वीच भा.ज. प. चेच अध्यक्ष शपथविधीची तारीख जाहीर करतात. ह्यातुन एकाधिकारीशाही, संविधानाची पायमल्ली, लोकशाही प्रथांचे विसर्जन याचे प्रतिबिंब दिसून येते. ही देशाच्या आणि लोकशाहीच्या दृष्टीने धोकादायक बाब आहे. थोडक्यात, भा. ज. प. चा गेल्या आठ दिवसातील कारभार म्हणजे हॉल बुक केला आहे , म्हणून आता वधू वर शोधायचा, “जावई निवडीपूर्वीच रुसलेले” अश्यातला प्रकार असल्याची उपरोधक टीका काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते माजी आमदार अनंत गाडगीळ यांनी केली आहे.

राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाच्या भरारी पथकाच्या कारवाईत ९ लाखाहून अधिक रुपयाचा मुद्देमाल जप्त

पुणे, दि. 3: पुणे विभागाच्या राज्य उत्पादन शुल्क विभागीय भरारी पथकाच्यावतीने करण्यात आलेल्या कारवाईत आंबेगाव तालुक्यात मंचर गावचे हद्दीत चाकण रोडवरील पेट्रोल पंपासमोर चविष्ठ ढाब्याजवळ, भोरवाडी येथे वाहनाची तपासणी केली असता वाहनातून परराज्यनिर्मीत असलेला भांग मिश्रीत पदार्थाच्या वाहनासह एकूण ९ लाख ५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे विभागीय उपायुक्त सागर धोमकर यांनी दिली आहे.

याप्रकरणी प्रविण मगाराम चौधरी, देहुफाटा, चाकण ता. खेड यांच्याविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा अधिनियम १९४९ अन्वये १ डिसेंबर रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच सदर गुन्हयामध्ये महालक्ष्मी आयुर्वेदिक फार्मानिर्मीत स्पेशल बावा विजयावटी भांग मिश्रीत पदार्थाने तयार केलेल्या गोळयांच्या पाकीटांनी भरलेल्या सुमारे ५० किलो ग्रॅमच्या एकूण ५ गोण्या अंदाजे २५० किलो ग्रॅम वजानाचे भांग मिश्रीत पदार्थ, एक पांढऱ्या रंगाचे मारुती सुझुकी कंपनीचे सीएनजी सुपर कॅरी मॉडेलचे चार चाकी वाहन क्रमांक व एक व्हिओ कंपनीचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे.

सदरची कारवाईत निरीक्षक नरेंद्र थोरात, दुय्यम निरीक्षक विराज माने व धिरज सस्ते, प्रताप कदम, सतिश पौंधे, शशिकांत भाट,रणजीत चव्हाण, अनिल थोरात, अमोल दळवी, राहुल तारळकर सहभाग घेतला. अवैद्य दारू व्यवसाय करणाऱ्यावर अशाच प्रकारची कारवाई सूरू राहणार असून कोठेही अवैद्य दारू व्यवसाय सूरू असल्यास राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांक ०२०-२९९११९८६ वर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून करण्यात आले आहे.

शिक्षण क्षेत्राला प्राधान्य देण्याची गरज- अॅड अभय आपटे 

पुणे : आज भारत आर्थिकदृष्ट्या जागतिक स्तरावर प्रगती करत आहे. मात्र, दुर्दैवाने शिक्षणाला अद्यापही प्राधान्य दिले जात नाही. शासनाच्या विविध योजना जाहीर होतात, पण त्यांची अंमलबजावणी कितपत प्रभावी होते, हे स्पष्ट नाही. शिक्षणाकडे गांभीर्याने पाहण्याचा दृष्टिकोन नसल्याचे जाणवते. एका संस्थेच्या अनेक शाखा सुरू करण्यापेक्षा मोजक्याच शाखांमधून दर्जेदार शिक्षण देणे अधिक महत्त्वाचे आहे. याशिवाय, औपचारिक शिक्षणाबरोबरच अनौपचारिक शिक्षणाकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे,  असे मत अॅड. अभय आपटे यांनी व्यक्त केले. 

विद्या महामंडळ संस्थेच्या ६३ व्या वर्धापनदिनी व ‘लोकशिक्षण दिनानिमित्त ‘पु. ग. वैद्य स्मृती पुरस्कार’ प्रदान सोहळा आपटे रस्त्यावरील संस्थेच्या सभागृहात सोहळा संपन्न झाला. आपटे प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी डॉ. वर्षा बापट यांना अॅड अभय आपटे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष राम रानडे, कार्याध्यक्ष अमोल साने, कार्यवाह लिलाधर गाजरे,  उपाध्यक्षा अपर्णा कुलकर्णी, आदी मान्यवर उपस्थित होते. मानचिन्ह, मानपत्र, पुष्पगुच्छ, रोख रक्कम अकरा हजार असे पुरस्काराचे स्वरूप होते.

पुरस्काराला उत्तर देताना डॉ. वर्षा बापट म्हणाल्या, आपटे प्रशालेचे वैशिष्ट्य म्हणजे पु. ग. वैद्य सरांनी केलेले प्रयोग. त्यांच्या प्रयोगांमुळे आम्ही दरवेळी काहीतरी नवीन शिकत गेलो. वैद्य सरांनी आणि इथल्या शिक्षकांनी दिलेल्या संस्कारांचा आम्हाला आजही उपयोग होत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच मी शिक्षण क्षेत्रात काम करण्यास प्रेरित झाले, असेही त्यांनी सांगितले.  सुमेधा जोशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. लिलाधर गाजरे यांनी प्रास्ताविक केले आणि गौतम मगरे यांनी आभार मानले.

भाजपला 22, राष्ट्रवादी काँग्रेसला 10 मंत्रिपदे.. शिंदेंना बिनमहत्वाची १२ मंत्रिपदे

मुंबई-महायुतीचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबर रोजी होणार असून मुख्यमंत्री पद तसेच खातेवाटपाबाबत कोणताही निर्णय झाला नाही. मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून माघार घेतल्यानंतर एकनाथ शिंदे गृहमंत्री पदासाठी अडून बसल्याची माहिती आहे. अशातच आता महायुतीच्या खातेवाटपाचा संभाव्य फॉर्म्युला समोर आला आहे. यामध्ये भाजप स्वत:कडे 21 ते 22 खाती ठेवणार असल्याचे समजते आहे. यामध्ये गृह मंत्रालय तसेच सभापतीपद भाजपला मिळण्याची शक्यता आहे. भाजपकडून पंकजा मुंडे, अतुल सावे, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, आशिष शेलार, अतुल भातखळकर, शिवेंद्रसिंहराजे भोसले, चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. भाजपचे 16 मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती आहे.

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे 11 ते 12 खाती मिळून शकतात. यामध्ये एकनाथ शिंदे, दादा भुसे, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील, अर्जुन खोतकर, संजय राठोड आणि उदय सामंत यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.मात्र अगदी बिन महत्वाची आणि सामान्य दर्जाची मानली जाणारी खाती यांच्या गळ्यात मारली जाण्याची शक्यता वर्तविली जाते आहे.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 10 खाती मिळणार असून अद्यापही कोणाला संधी मिळणार ही माहिती समोर आली नाही. मात्र, अर्थ खाते हे राष्ट्रवादीकडेच जाणार असल्याची माहिती आहे.

भाजपकडे गृह आणि महसूल सारखे खाते कायम राहू शकते. याशिवाय त्यांना सभापती आणि विधान परिषद अध्यक्ष पदही मिळू शकते. राष्ट्रवादीला अर्थ, तर शिंदेंच्या शिवसेनेला शहरी विकास खाते मिळू शकते. याशिवाय इतर खात्यांवर नंतर चर्चा केली जाणार आहे. तत्पूर्वी, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे महायुतीचे तिनही नेते मुंबईत बैठक घेऊन नवीन मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या फॉर्म्युल्यावर चर्चा करणार आहेत. मात्र, कार्यवाहक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती अद्यापही खालावलेलीच असल्याने बैठका टळत आहेत.मुख्यमंत्रिपद भाजपकडे गेल्यानंतर एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. एकनाथ शिंदे गृह खात्यासाठी अडून बसल्याची माहिती होती. दरम्यानच्या काळात एकनाथ शिंदे यांची तब्येत बिघडल्याने महायुतीची बैठक झाली नाही. त्यामुळे खातेवाटपाबाबत चर्चा होऊ शकली नाही. पण आता शिंदेंच्या शिवसेनेकडून हालचाली सुरू असून उदय सामंतांनी देवेंद्र फडणवीसांची सागर बंगल्यावर भेट घेतली आहे. या भेटीत गुरूवारी होणाऱ्या शपथविधीच्या तयारीवर चर्चा झाली असून उदय सामंत यांनी देवेंद्र फडणवीसांसमोर शिवसेनेचा प्रस्ताव ठेवल्याची माहिती आहे.

मुंबईत मधुमेहाच्या प्रकरणांमध्ये चिंताजनक वाढ: तज्ज्ञांनी संपूर्ण अन्न, वनस्पती-आधारित आहार आणि जीवनशैली बदलांची केली शिफारस

मुंबई, 3 डिसेंबर 2024 : मुंबईत मधुमेहाशी संबंधित मृत्यूंच्या संख्येत मोठी वाढ झाली असून, हा रोग एक गंभीर सार्वजनिक आरोग्य संकट बनला आहे. प्रजा फाउंडेशनच्या अलीकडील अहवालानुसार, 2014 ते 2022 दरम्यान मधुमेहामुळे 91,318 जणांचा मृत्यू झाला, ज्यात 2022 मधील 14,207 मृत्यूंचा समावेश आहे. 2014 मध्ये ही संख्या फक्त 2,544 होती, यावरून ही वाढ किती गंभीर आहे, हे दिसून येते.

मधुमेहाचा उद्रेक फक्त मुंबईपुरता मर्यादित नाही. द लॅन्सेटच्या अहवालानुसार, 2022 मध्ये जागतिक स्तरावर 828 दशलक्ष प्रौढ मधुमेहाने ग्रस्त होते, ज्यामध्ये भारताचा वाटा 212 दशलक्ष म्हणजेच एक चतुर्थांशहून अधिक होता.

आजारासाठी बहुतेक रुग्ण औषधांवर किंवा इन्सुलिनच्या इंजेक्शनवर अवलंबून असतात.

तथापि, वाढत्या संशोधनातून असे दिसून येते की, संपूर्ण अन्न, वनस्पती-आधारित आहाराचा अवलंब केल्याने प्रकार 1 आणि प्रकार 2 मधुमेह असलेल्या रुग्णांच्या आरोग्यात लक्षणीय सुधारणा झाल्या आहेत. प्रकार 1 मधुमेहावरील एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, कॅलरीज किंवा कार्बोहायड्रेटवर कोणतेही निर्बंध न लादता कमी फॅट असलेल्या वनस्पती-आधारित आहाराचे पालन केल्याने रुग्णांची इन्सुलिन संवेदनशीलता 127% ने वाढली.

त्याचप्रमाणे, प्रकार 2 मधुमेहावरील अभ्यासात दिसून आले की, या आहाराचा अवलंब करणाऱ्या रुग्णांनी आजाराच्या लक्षनाथ सुधारणा आणि संभाव्य रेमिशन (आजाराचे लक्षणे अदृश्य होणे) साध्य केले.

डॉ. झीशान अली, पीएच.डी, फिजिशियन्स कमिटी फॉर रिस्पॉन्सिबल मेडिसिन (PCRM) मधील संशोधन कार्यक्रम तज्ज्ञ, यांनी डी.वाय. पाटील विद्यापीठाच्या स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटी अँड टुरिझम स्टडिजमध्ये आयोजित सत्रात या गोष्टीवर भर दिला. 130 हून अधिक पाककला विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते म्हणाले, “मुंबईत वाढणारी मधुमेह महामारी केवळ एक आकडेवारी नाही, ती एक धोक्याची घंटा आहे. डॉक्टर, परिचारिका, पोषणतज्ज्ञ आणि भावी शेफ यांना संपूर्ण अन्न, वनस्पती-आधारित आहाराच्या महत्त्वाची जाणीव असणे आवश्यक आहे, कारण ते सार्वजनिक आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे.”

PCRM ही एक ना-नफा संस्था असून, ती प्रतिबंधात्मक वैद्यकशास्त्राचा प्रसार करते आणि पोषण व जीवनशैलीत बदलांच्या माध्यमातून असंसर्गजन्य आजारांचे व्यवस्थापन करण्याबाबत सक्रियपणे जनजागृती करते.

मुंबईतील वाढत्या मधुमेह संकटावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. वनस्पती-आधारित आहाराचा स्वीकार आणि जीवनशैलीतील काही बदल यामुळे या समस्येवर नियंत्रण मिळविता येईल आणि शहरातील सार्वजनिक आरोग्य परिणामांमध्ये सकारात्मक बदल घडविता येईल.

एचआयव्ही बाधीतांनी त्रिसूत्रीचा अंगीकार केल्यास चांगले आयुष्य जगणे शक्य – अर्चना शिंदे

नूतन भोसरी रुग्णालयात एचआयव्ही जनजागृती कार्यक्रम

पिंपरी,- एचआयव्ही बाधीत ६० टक्के लोकांना क्षयरोगाचा (टीबी) चा प्रादुर्भाव होण्याचा धोका जास्त असतो. एचआयव्हीची बाधा झाल्यास घाबरून न जाता योग्य औषध उपचार, सकस आहार आणि नियमित व्यायाम या त्रिसूत्रीचा अंगीकार केल्यास चांगले आयुष्य जगणे सहज शक्य आहे. या आजारामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते असे मार्गदर्शन नूतन भोसरी रुग्णालयातील आयसीटीसी समुपदेशक अर्चना शिंदे यांनी केले.
नूतन भोसरी रुग्णालय येथे जागतिक एड्स जनजागृती सप्ताह निमित्त आयसीटीसी विभागाच्या वतीने विविध जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये परिसरातील शाळा व अंगणवाडी शिक्षकांना एचआयव्ही, एड्स, क्षयरोग व गुप्तरोग आजारांविषयी माहिती देण्यात आली. एचआयव्ही बाधित रुग्णांनी अधिक माहितीसाठी १०९७ या टोल फ्री क्रमांक संपर्क साधण्याचे आवाज शिंदे यांनी केले.
भोसरी परिसरात जनजागृती फेरी काढण्यात आली.
अर्चना शिंदे वेळी यांनी सांगितले की, सर्व सरकारी रुग्णालयांतील आयसीटीसी सेंटर मध्ये एचआयव्ही बाधित व्यक्तींसाठी सर्व उपचार, तपासणी, चाचणी, मोफत उपलब्ध आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, नूतन भोसरी रुग्णालयाचे ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी ढगे, डॉ. ऋतुजा लोखंडे, डॉ. सुजाता गायकवाड, डॉ. किरण कांबळे, पीएचएन अनुपम वेले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

२०/२५ वर्षांच्या ३ तरुणांना पकडून २० लाखाचे अंमली पदार्थ हस्तगत

पुणे- पुणे पोलिसांनी तिघांना पकडून एकूण १९,४५,०००/- रू कि.चा ओजीकुश गांजा, एम.डी. व एल.एस.डी. हे अंमली पदार्थ व इतर ऐवज हस्तगत केले .

या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी पुणे शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्याकरिता तसेच अंमली पदार्थ तस्करांची माहिती काढुन त्यांचेविरुध्द कारवाई करणेबाबत दिलेल्या सुचना व आदेशानुसार,
अंमली पदार्थ विरोधी पथक-१ कडील (अति. कार्यभार) पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, व पोलीस निरीक्षक उल्हास कदम यांचे मार्गदर्शनाखाली दि.०२/१२/२०२४ रोजी सिंहगडरोड पो.स्टे कार्यक्षेत्रात अंमली पदार्थ विरोधी पथक-१ कडील अधिकारी व अंमलदार पेट्रोलिंग करीत असताना, पेट्रोलिंग दरम्यान पोलीस अंमलदार संदिप शिर्के यांना प्राप्त झालेल्या माहितीचे अनुषंगाने कृष्णा/घोडनदीकर टॉवर बिल्डींग जवळ, श्री लॉज समोर सार्वजनिक रोड लगत, भूमकर चौक, नऱ्हे आंबेगाव पुणे या ठिकाणी सापळा रचुन इसम नागे १) अंशुल संतोष मिश्रा वय २७ वर्षे, रा. सराफ लाईन मिश्रानिवास बुलढाणा २) आर्श उदय व्यास वय २५ वर्षे, रा. १८५/५/८०, त्रिशुल शिवाजी टेक्निकल स्कुल समोर, पंत नगर, घाटकोपर इस्ट मुंबई ३) पियुश शरद इंगळे वय २२ वर्षे, रा. फ्लॅट नं ०८, आदित्य हेरिटेज, स्पाईन रोड, चिखली, चिंचवड पुणे यांना ताब्यात घेतले असता, त्यांचे झडतीमध्ये. १७,४१,०००/- रू. किं. चा, त्यामध्ये २५१ ग्रॅम वजनाचा ओजीकुश गांजा, १५ ग्रॅम वजनाचे एम.डी. व ६२ मि.ग्रॅम वजनाचे एल.एस.डी. असा अंमली पदार्थ व २,०४,०००/-रू. कि.चा इतर ऐवज असा एकूण १९,४५,०००/- रू कि.चा ऐवज हा अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या विक्रीकरीता जवळ बाळगताना मिळुन आल्याने त्यांचेविरुध्द सिंहगड रोड पोलीस ठाणे, पुणे याठिकाणी एन. डी. पी. एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (ii) (अ), २२ (ब), २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त अमितेश कुमार,पोलीस सह आयुक्त, रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, निखील पिंगळे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे १. गणेश इंगळे, यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक, १ गुन्हे शाखा पुणे शहर कडील (अति. कार्यभार) पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड व पोलीस निरीक्षक उल्हास कदम सहा. पो. निरीक्षक, अनिकेत पोटे, पोलीस उप निरीक्षक दिगंबर कोकाटे, पोलीस अंमलदार संदिप शिर्के, सचिन माळवे, विनायक साळवे, प्रविण उत्तेकर, संदेश काकडे, दत्ताराम जाधव, सुजित वाडेकर, नुतन वारे, रेहाना शेख, विपुल गायकवाड यांनी केली.