पुणे:महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत पुण्यातील काेरेगाव पार्क येथे मतमाेजणी केंद्र ठेवण्यात आले हाेते. सदर ठिकाणी मतमाेजणीच्या 1 दिवस अगोदर म्हणजे 22 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत मतमाेजणी पूर्व रंगीत तालीम घेणे गरजेचे हाेते. परंतु मतमाेजणीच्या प्रक्रियेत संगणक पुरवठा व जाेडणीचे कामकाज करणाऱ्या इंदु इन्फाेटेक कंपनीने दिरंगाई केली. त्यामुळे मतमाेजणी रंगीत तालीम घेता न आल्याने संबंधित कंपनीवर काेरेगाव पार्क पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत मंडल अधिकारी पुष्पा वसंत गाेसावी (वय-54) यांनी इंदु इन्फाेटेक कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्याविरोधात पाेलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार लाेकप्रतिनिधी अधिनियम 1951 चे कलम 134 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मतमाेजणीच्या दिवशी इंदु इन्फाेटेक या कंपनीस संगणक पुरवठा व जाेडणीच्या कामकाजाकरिता करारनामा करुन आदेशित केले हाेते. संबंधित करारनाम्यानुसार संगणक पुरवठा व जाेडणीचे कामकाज मतदानाच्या 1 दिवस अगोदर म्हणजे 22 नोव्हेंबर रोजी भारतीय खाद्य निगम, काेरेगाव पार्क, पुणे याठिकाणी सकाळी 11 वाजेपर्यंत पूर्ण न केल्याने मतमाेजणी पूर्व रंगीत तालीम घेता आली नाही. याबाबत पुढील तपास सहाय्यक पाेलिस निरीक्षक पुरुषाेत्तम देवकर करत आहेत.