पुणे : आज भारत आर्थिकदृष्ट्या जागतिक स्तरावर प्रगती करत आहे. मात्र, दुर्दैवाने शिक्षणाला अद्यापही प्राधान्य दिले जात नाही. शासनाच्या विविध योजना जाहीर होतात, पण त्यांची अंमलबजावणी कितपत प्रभावी होते, हे स्पष्ट नाही. शिक्षणाकडे गांभीर्याने पाहण्याचा दृष्टिकोन नसल्याचे जाणवते. एका संस्थेच्या अनेक शाखा सुरू करण्यापेक्षा मोजक्याच शाखांमधून दर्जेदार शिक्षण देणे अधिक महत्त्वाचे आहे. याशिवाय, औपचारिक शिक्षणाबरोबरच अनौपचारिक शिक्षणाकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे, असे मत अॅड. अभय आपटे यांनी व्यक्त केले.
विद्या महामंडळ संस्थेच्या ६३ व्या वर्धापनदिनी व ‘लोकशिक्षण दिनानिमित्त ‘पु. ग. वैद्य स्मृती पुरस्कार’ प्रदान सोहळा आपटे रस्त्यावरील संस्थेच्या सभागृहात सोहळा संपन्न झाला. आपटे प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी डॉ. वर्षा बापट यांना अॅड अभय आपटे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष राम रानडे, कार्याध्यक्ष अमोल साने, कार्यवाह लिलाधर गाजरे, उपाध्यक्षा अपर्णा कुलकर्णी, आदी मान्यवर उपस्थित होते. मानचिन्ह, मानपत्र, पुष्पगुच्छ, रोख रक्कम अकरा हजार असे पुरस्काराचे स्वरूप होते.
पुरस्काराला उत्तर देताना डॉ. वर्षा बापट म्हणाल्या, आपटे प्रशालेचे वैशिष्ट्य म्हणजे पु. ग. वैद्य सरांनी केलेले प्रयोग. त्यांच्या प्रयोगांमुळे आम्ही दरवेळी काहीतरी नवीन शिकत गेलो. वैद्य सरांनी आणि इथल्या शिक्षकांनी दिलेल्या संस्कारांचा आम्हाला आजही उपयोग होत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच मी शिक्षण क्षेत्रात काम करण्यास प्रेरित झाले, असेही त्यांनी सांगितले. सुमेधा जोशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. लिलाधर गाजरे यांनी प्रास्ताविक केले आणि गौतम मगरे यांनी आभार मानले.