Home Blog Page 753

पोलिसांच्या प्रचंड ताफ्याने राहुल-प्रियांकांना अडवले,संभलला जाऊ दिले नाही,गाझीपूर सीमेवरून माघारी पाठवले

दिल्ली- उत्तर प्रदेशातील संभलमध्ये बुधवारी झालेल्या हिंसाचारानंतर पीडितांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी गेलेल्या राहुल आणि प्रियांका गांधी यांना पोलिसांनी गाझीपूर सीमेवर रोखले.संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. राहुल यांनी अधिकाऱ्यांशीही चर्चा केली. म्हणाले- मी पोलिसांच्या वाहनात एकटा जायला तयार आहे. मात्र अधिकाऱ्यांना ते मान्य केले नाही राहुल-प्रियांका गाझीपूर सीमेवर 2 तास थांबले, पण अधिकाऱ्यांनी त्यांना पुढे जाऊ दिले नाही. हातात संविधान घेऊन राहुल गांधी कारमध्ये चढले. माध्यमांना संबोधित केले. यानंतर राहुल-प्रियांका दिल्लीला परतले. ते म्हणाले- आता आपण 6 डिसेंबरला परत येऊ.

गाझीपूर सीमेवर पोलिसांच्या ताफ्यामुळे आणि त्यांच्याकडून होणाऱ्या तपासणीमुळे 5 किलोमीटर लांब वाहतूक कोंडी झाली होती. जाममध्ये अडकलेल्या लोकांनी काँग्रेस कार्यकर्त्यांशी वाद घालत झटापट झाली. यानंतर लोकांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना मारहाणही केली.संभल येथील न्यायालयाच्या आदेशानुसार 24 नोव्हेंबर रोजी जामा मशिदीचे सर्वेक्षण करण्यात आले होते. यावेळी हिंसाचार उसळला, ज्यात गोळी लागल्याने चार तरुणांचा मृत्यू झाला.यापूर्वी शनिवारी सपाच्या शिष्टमंडळाने तर रविवारी काँग्रेसच्या शिष्टमंडळानेही सावध राहण्याची घोषणा केली होती. मात्र, पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी करून कोणालाही जाऊ दिले नाही.

राहुल गांधी म्हणाले- आम्ही संभलला जाण्याचा प्रयत्न करत आहोत, पण पोलिस परवानगी देत ​​नाहीत. विरोधी पक्षनेता म्हणून तेथे जाणे हा माझा अधिकार आहे, तरीही ते मला रोखत आहेत. मी म्हणालो की मी एकटा जायला तयार आहे, मी पोलिसांसोबत जायला तयार आहे, पण त्यांनी हेही मान्य केले नाही. आता काही दिवसात आम्ही परत आलो तर ते आम्हाला सोडून देतील, असे सांगत आहेत. हे विरोधी पक्षनेत्याच्या अधिकाराविरुद्ध आहे, त्यांनी मला जाऊ द्यावे.

हे संविधानाच्या विरोधात आहे, आम्हाला फक्त जमायचे आहे, लोकांना भेटायचे आहे आणि तिथे काय झाले ते पाहायचे आहे. मला माझे घटनात्मक अधिकार दिले जात नाहीत. हा नवा भारत आहे, हाच भारत आहे जो संविधान नष्ट करतोय, आम्ही लढत राहू.

प्रियांका गांधी म्हणाल्या- राहुल गांधी विरोधी पक्षनेते आहेत, त्यांना घटनात्मक अधिकार आहेत, त्यांना अशा प्रकारे थांबवता येणार नाही. हा त्यांचा घटनात्मक अधिकार आहे, त्यांना पीडितांची भेट घेण्याची परवानगी द्यावी. त्यांनी असेही सांगितले की ते यूपी पोलिसांसोबत एकटे जाणार आहेत, परंतु पोलिसांनी हेदेखील मान्य केले नाही.

ब्रॅन्डेड कंपनीच्या नावाखाली बोगस कपड्यांची विक्री पुण्यात पुन्हा छापा -८ लाखाचा माल पकडला

पुणे-ब्रॅन्डेड कंपनीच्या नावाखाली बोगस कपड्यांची विक्री करण्याच्या प्रकारात पुण्यात तुफान वाढ झालेली असून आज याप्रकरणी दुसरा छापा टाकून पोलिसांनी ८ लाखाचा माल पकडला. puma कंपनीचा लोबो वापरून या बनावट मालाची विक्री करण्यात येत होती .
पुणे शहरात वेगवेळ्या ठिकाणी ब्रेन्डेड कंपनीचा बनावट मालाची विक्री होत असलेबाबत माहिती मिळाली होती. त्या अनुषंगान कारवाई करणेकामी पोलीस उप आयुक्त गुन्हे निखिल पिंगळे यांचे मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे शाखा युनिट २ प्रभारी प्रताप मानकर, यांचे पथकातील अधिकारी अंमलदार व puma कंपनीचे अधिकृत प्रतीनिधी मार्फत पुणे शहरात शोध मोहिम चालू असताना प्राप्त माहितीनुसार, आंबेगाव बुद्रुक लिपाणे वस्ती कात्रज पुणे येथील stylox fashion hub या शॉपमध्ये मोठया प्रमाणावर puma या ब्रँडेड कंपनीचे लोबो वापरुन बॅग, टि शर्ट, स्पोटस शुज, स्लाईडर चप्पल, जॅकेट, ट्रॉव्हझर, बॉक्सर पॅन्ट विक्री चालू होती त्याप्रमाणे सदर माहितीची खात्री केली.
दिनांक ३/१२/२०२४ रोजी गुन्हे शाखा युनिट २ कडील पथकाने आंबेगाव बुद्रुक निपानी वस्ती कात्रज पुणे येथील stylox fashion hub या शॉपमध्ये छापा कारवाई केली असता सदर शॉपमध्ये एकुण ८,०२,६०० रु.चा किमंतीचा puma या ब्रँडेड कंपनीचे लोबो वापरुन बॅग, टि शर्ट, स्पोटस शुज, स्लाईडर चप्पल, जॅकेट, ट्रॉव्हझर, बॉक्सर पॅन्ट असा मुददेमाल जप्त केला असून असून शॉप मालक याचेवर आंबेगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि क्रमांक १०१८/२०२४ कॉपीराईट अॅक्ट १९५७ चे कलम ५१,६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरची कामगिरी, मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे १ श्री गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. प्रताप मानकर, सहा. पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उप निरीक्षक नितिन कांबळे, पोलीस अंमलदार शंकर नेवसे, अमोल सरडे, ओमकार कुंभार, संजय आबनावे, विनोद चव्हाण, पुष्पेद्र चव्हाण, साधना ताम्हाणे, विजय पवार, प्रमोद कोकणे, निखिल जाधव, गणेश थोरात नागनाथ राख या पथकाने केली आहे.

राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा –

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर 11 दिवसांनी आज नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा झाली. भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार आहे. विधीमंडळ पक्षाचा नेता निवडीसाठी भाजपचे केंद्रीय निरीक्षक विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. महायुतीमधील प्रमुख नेते फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी राज्यपालांना भेटून सरकार स्थापनेचा दावा केला. 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता आझाद मैदान, मुंबई येथे शपथविधी होणार आहे.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांचे नाव महायुतीकडून ठरल्यानंतर कार्यकर्त्यांसह नेत्यांमध्ये प्रचंड उत्साह आणि आनंद दिसतोय. दरम्यान, उद्या मुंबईतील आझाद मैदानवर राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार आहे. असे असताना त्यापूर्वी महायुतीतील अनेक प्रमुख नेते राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल झाले .या भेटीत महायुतीकडून सत्तास्थापनेचा दावा केला गेला.

सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी शिवसेनेचे एकनाथ शिंदे, भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे तिन्ही प्रमुख नेते एकाच गाडीतून राज भवनावर गेले. यावेळी तिघांनी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे तीन नेते राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेत राज्यात सत्तास्थापनेचा दावा केला . तर या शपथविधीसाठी इतर पक्षाचे अनेक दिग्गज नेते आणि प्रमुख ही हजेरी लावणार आहे. यासाठी दिल्ली, मणीपूर, नागालॅंड आणि मेघालय राज्याचे प्रमुख आज मुंबईत येणार असल्याची माहिती दिली .भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ,आमदार प्रवीण दरेकर आमदार प्रसाद लाड आणि पंकजा मुंडे गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन भाजपचे रवींद्र चव्हाण, अशोक चव्हाण भाजप नेते विनोद तावडे, आमदार श्रीकांत भारती आमदार निरंजन डावखरे आमदार रत्नाकर गुट्टे आणि विनय कोरे आमदार कालिदास कोळंबकर आमदार आशिष शेलार रावसाहेब दानवे चंद्रकांत पाटील सुधीर मुनगंटीवार यावेळी राजभवनात उपस्थित होते.

मातृभूमीला समर्पित होऊन संतांनी काम केले-ह.भ.प. वासुदेव बुवा बुरसे

: शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी पुणे आणि सेवा मित्र मंडळ यांच्या वतीने  पुणे कीर्तन महोत्सव
पुणे : आज माणसाने माणसाला जातीपातीत विभागले आहे. भगवंताने विषमता निर्माण केली नाही. भगवंताने वैविध्य निर्माण केले. परंतु माणसाने विषमता, उच्च-नीच निर्माण केले. या विषमतेत एकता निर्माण करण्याचे सुसंघटित काम संतांनी केले. अनेक हाल अपेष्टा, निंदा त्यांनी सहन केल्या, परंतु ते मागे सरकले नाहीत. मातृभूमीला समर्पित होऊन संतांनी काम केले,  असे प्रतिपादन ह.भ.प. वासुदेव बुवा बुरसे यांनी केले. 
शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी पुणे आणि सेवा मित्र मंडळ यांच्या वतीने प.पू. जगद्गुरु शंकराचार्य करवीर पीठ यांच्या शुभाशीर्वादाने आणि ह.भ.प किसन महाराज साखरे गौरवार्थ पुणे कीर्तन महोत्सवाचे आयोजन ऐतिहासिक लाल महालात करण्यात आले आहे. महोत्सवाचे उद्घाटन आनंदी वास्तूचे आनंद पिंपळकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नामदेव अध्यासन प्रमुख डॉ. श्यामा घोणसे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रबोधिनीचे अध्यक्ष आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे, प्रा. संगीता मावळे, सेवा मित्र मंडळचे अध्यक्ष पराग शिंदे, ह.भ.प. मंगलमूर्ती औरंगाबादकर उपस्थित होते. महोत्सवाचे यंदा १६ वे वर्ष आहे. कार्यक्रमात आनंद पिंपळकर यांनी २१ हजार रुपयांचा धनादेश शाहीरी भवन या वास्तूसाठी देणगी म्हणून सुपूर्द केला. 

ह.भ.प. वासुदेव बुवा बुरसे म्हणाले, मनुष्याकडून देवत्वाकडे जाण्याचा मार्ग अवघड असतो. मोठेपणा स्वस्तात मिळत नाही आणि जर ते मिळाले तर टिकत नाही. झटकन मोठा झालेला माणूस तितक्याच वेगात खाली सुद्धा येतो. परंतु खरे मोठेपण केवळ वर्षानुवर्षे नाही तर युगानुयुगे टिकतो.  
आनंद पिंपळकर आणि डॉ. श्यामा घोणसे यांनी मनोगत व्यक्त केले. अक्षदा इनामदार यांनी सूत्रसंचालन केले. शाहीर हेमंतराजे मावळे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. संगीता मावळे यांनी आभार मानले.

चीनमध्ये लोकशाही अस्तित्वात आली तर भारताला आणि जगाला देखील फायदा होईल – अविनाश धर्माधिकारी

  • पराग देव लिखित ‘ड्रॅगनच्या लोकशाहीची प्रेमकथा’ कादंबरीचे प्रकाशन

पुणे : चीनने 1950 साली तिबेटवर आक्रमण केले त्यावेळी सरदार वल्लभभाई पटेल यांनी चीन कडून धोका असल्याचे म्हंटले होते. मात्र पुढे पं. जवाहरलाल नेहरूंनी हिंदी – चीनी भाई भाई ची घोषणा दिली, पुढे 1962 साली आपल्याला किंमत चुकवावी लागली. अलीकडे गलवान मध्ये तसे करण्याचा प्रयत्न केले मात्र आजच्या भारताने आरे ला कारे उत्तर दिले. आजच्या परिस्थितीत चीनमध्ये लोकशाही अस्तित्वात आली तर भारताला आणि जगाला देखील फायदा होईल असे मत माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी  यांनी व्यक्त केले. 

चेतक बुक्सने प्रकाशित केलेल्या आणि पराग देव यांनी लिहिलेल्या ‘ड्रॅगनच्या लोकशाहीची प्रेमकथा’ या कादंबरीचे प्रकाशन करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून धर्माधिकारी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे होते. यावेळी लेखक पराग देव, अनय जोगळेकर आदि मान्यवर उपस्थित होते. 

पुढे बोलताना धर्माधिकारी म्हणाले, नेहरू यांच्या चुकीच्या धोरणामुळे चीन आपल्याला डोईजड झाला होता. आजही त्यांचे परिणाम आपल्याला दिसत असून आपल्या देशाला धोका असलेल्या देशांच्या यादीत आजही चीन नंबर एक वर आहे. यामुळे आपल्याला चीनचा अभ्यास करणे अत्यावश्यक आहे. 

कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना डॉ. मोरे म्हणाले, बौद्ध धम्म चीन मध्ये गेला त्यावेळी अनेक चीनी अभ्यासक, विचारवंत भारतात आले, त्यांनी आपल्या देशाचा अभ्यास केला, इथले आणेक ग्रंथ चीनी, तिबेटी मध्ये अनुवादित केले. आपल्याकडे परकीय आक्रमणा नंतर अनेक ग्रंथ नष्ट झाले मात्र ते तिकडे उपलब्ध आहेत, त्यांचे आपल्याकडे पुन्हा येणे गरजेचे आहे. जागतिक राजकारणावर भाष्य करणारी ही कादंबरी योग्य वेळी प्रकाशित झाली असून ती इंग्रजी मध्ये भाषांतरीत व्हावी अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली.

जोगळेकर म्हणाले की भारताच्या शेजारी असलेला आणि जागतिक राजकारणात महत्वाचा देश असलेल्या चीन बद्दल आपल्याला फार काही माहिती नसते पण अशा स्वरूपाच्या कादंबरीमुळे आपल्याला शेजारच्या देशाबद्दल नक्कीच माहिती मिळू शकते. 

लेखक पराग देव यांनी मनोगत व्यक्त करताना पुस्तकामागील प्रेरणा आणि भूमिका मांडली.  पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

महाराष्ट्रात प्रथमच श्री सीता – रामचंद्र विवाह सोहळा

 श्री रामजी संस्थान तुळशीबाग यांच्या वतीने आयोजन ;  प्रभू श्रीराम आणि श्री सीतामाई यांचा शुभविवाह
पुणे : श्री रामजी संस्थान तुळशीबाग यांच्या वतीने महाराष्ट्रात प्रथमच राजा दशरथ यांचे ज्येष्ठ सुपुत्र प्रभू श्रीराम आणि राजा जनक यांची ज्येष्ठ कन्या श्री सीतामाई यांच्या विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा विवाह सोहळा मार्गशीर्ष शुद्ध पंचमी म्हणजेच शुक्रवार, दिनांक ६ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजून ४८ मिनिटांनी श्रीराम मंदिर तुळशीबाग येथे होणार आहे, अशी माहिती संस्थानचे कार्यकारी विश्वस्त भरत तुळशीबागवाले यांनी दिली.

भक्त कल्याणार्थ हा विवाह सोहळा करण्यात होणार असून, प्रभू श्री सीतारामचंद्र यांचे आशीर्वाद घेण्याकरिता आणि हा विवाह सोहळा प्रत्यक्ष अनुभवण्याकरिता पुणेकर भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मंदिराच्या वतीने करण्यात आले आहे.

भरत तुळशीबागवाले म्हणाले, श्री सीता रामचंद्र विवाह सोहळा हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि आनंददायी उत्सव आहे. हा सोहळा भगवान श्रीराम आणि माता सीता यांच्या विवाहाची आठवण म्हणून साजरा केला जातो. हा दिवस धर्म, नीती, आणि कर्तव्याचे प्रतीक आहे. भगवान राम आणि माता सीता यांचा विवाह वैदिक परंपरेनुसार संपन्न झाला होता, जो भारतीय विवाहसंस्थेचा आदर्श मानला जातो. श्रीराम हे धर्माचे प्रतीक असून माता सीता या श्रद्धा आणि भक्तीचे प्रतीक आहेत, त्यामुळे त्यांचा विवाह भक्तांसाठी आदर्श सहजीवनाचा संदेश देतो.

दादा म्हणाले ,मै रुकनेवाला नही ..शिंदे म्हणाले,’दादांना काय सकाळी आणि संध्याकाळी हि शपथ घेण्याचा अनुभव

मुंबई- महायुतीच्या नेत्यांनी बुधवारी राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापन करण्याचा दावा केला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाविषयी प्रश्न केला. त्यावर शिंदेंनी उत्तर देण्यापूर्वीच अजित पवारांनी शिंदेंचे माहिती नाही, पण मी मात्र निश्चितच शपथ घेणार आहे, असे स्पष्ट केले. त्यांच्या या उत्तरामुळे वार्तालापात एकच हस्यकल्लोळ उडाला.

देवेंद्र फडणवीस यांची बुधवारी भाजपच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्यासह राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेऊन सरकार स्थापन करण्याचा दावा सादर केला. त्यानंतर राज्यपालांनी फडणवीस यांना सरकार स्थापन करण्याचे औपचारिक निमंत्रण दिले. त्यानंतर महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले.या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या मंत्रिमंडळातील संभाव्य समावेशावर प्रश्न केला. या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, या प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांच्यासह मी स्वतःही भूमिका स्पष्ट केली आहे. सायंकाळपर्यंत थांबा, सर्व चित्र स्पष्ट होईल, असे ते म्हणाले. शिंदे बोलत असताना अजित पवारांनी मध्येच हस्तक्षेप करत शिंदेंचे माहिती नाही, पण मी मात्र निश्चितपणे शपथ घेणार आहे, मी थांबणार नाही, असे स्पष्ट केले. त्यांच्या या उत्तरावर शिंदेंसह देवेंद्र फडणवीस व उपस्थित पत्रकार खळखळून हसले.

त्यानंतर एकनाथ शिंदे यांनीही अजित पवारांना चपखल प्रत्युत्तर दिले. दादांना पहाटे व सायंकाळीही घेण्याचा (शपथ) अनुभव आहे, असे ते म्हणाले. त्यांच्या उत्तरावरही पत्रकार परिषदेत हास्यकल्लोळ उडाला. शिंदे यांच्या उत्तरानंतर शांत बसतील ते अजित पवार कसले, ते पुढे म्हणाले, पूर्वी आम्ही दोघांनी (फडणवीस व पवार) सकाळी शपथ घेतली होती. तेव्हा हे राहून गेले होते. पण आता पुढे 5 वर्षे आम्ही हे पद ठेवणार आहोत. यावरही उपस्थित खळखळून हसले.

तत्पूर्वी, देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मुख्यमंत्री म्हणून आपल्याला पाठिंबा दिल्याची घोषणा केली. तसेच शिंदेंना मंत्रिमंडळात राहण्याची विनंती केल्याचेही सांगितले. ते म्हणाले, शिवसेनेचे अध्यक्ष व नेते म्हणून एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळात राहावे अशी विनंती मी त्यांना केली. ते आमची विनंती मान्य करतील असा मला विश्वास आहे. आमच्यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आदी पदे केवळ तांत्रिक आहेत. आम्ही सर्वजण मिळून महायुती सरकारचे काम करू, असे ते म्हणाले.

भाजपने देवेंद्र फडणवीस यांची गटनेतेपदी निवड केल्यानंतर तेच नवे मुख्यमंत्री होतील हे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर आता उद्या सायंकाळी 5.30 वा. ते मुख्यमंत्री म्हणून पद व गोपनीयतेची शपथ घेतील. सूत्रांच्या माहितीनुसार, उद्या केवळ मुख्यमंत्री व 2 उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होईल. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील प्रमुख नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत. पण संभाव्य मंत्रिमंडळाविषयी अत्यंत गुप्तता पाळण्यात आली आहे.

पुणे रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयातील डॉक्टरांच्या पुढाकाराने ६५ वर्षीय महिलेची गुंतागुंतीच्या हार्नियातून सुटका

रॉबोटिक शस्त्रक्रियेच्या मदतीने डॉक्टरांनी महिलेला जीवनदान दिले

० पुण्यातील या महिलेच्या ओटीपोटात मोठा मध्यम आकाराचा हार्निया काढण्यासाठी डॉक्टरांनी शस्त्रक्रियेदरम्यान शरीरावर कमी चीरा काढून गुंतागुंतीच्या प्रक्रियेवर मात केली

० संबंधित महिला रुग्णाला अस्थमा, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि वाढत्या वयोमानासह विविध आजारांनी ग्रासले होते

पुणे – ५ डिसेंबर २०२४, पुणे येथील रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयातील नामवंत डॉक्टरांनी ६५ वर्षीय महिला रुग्णाच्या शरीरातील हॉर्नियाची रॉबोटिक शस्त्रक्रियेतून सुटका केली. ओटीपाटातील हार्निया अतिशय गुंतागुंतीचा आणि मोठा मध्यम आकाराचा तयार झाल्याने रुग्णाची प्रकृती सुधारत नव्हती. रुग्णाला अस्थमा, उच्च रक्तदाब तसेच मधुमेहाचाही त्रास असल्याने हार्नियाच्या दुखण्याने असह्य वेदना होत होत्या. तिच्या ओटीपोटावर हार्नियामुळे फुगवटा तयार झाल्याने सततच्य दुखण्याने महिला रुग्ण हैराण झाली होती.

महिला रुग्णाचे वय, स्थूलता, विविध आजार तसेच तीनदा शस्त्रक्रियेच्या मदतीने प्रसूती झालेली असल्याने हार्नियाची शस्त्रक्रियेबाबत मोठे आव्हान उभे राहिले. रुग्णाला कोणतीही बाधा होऊ नये म्हणून डॉक्टरांमी रॉबोटिक शस्त्रक्रियेच्या मदतीने गुंतागुंतीच्या हार्नियावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी रॉबोटिक शस्त्रक्रियेतील दा व्हिन्सी प्रणालीचा वापर केला. हा प्रणालीच्या मदतीने शस्त्रक्रियेदरम्यान गुंतागुत निर्माण होण्याची शक्यता नसते. ही शस्त्रक्रिया विनाअडथळा पार पडते.

रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयाचे जनरल आणि रॉबोटिक सर्जन आणि वरिष्ठ सल्लागार डॉ. सुप्रशांत कुलकर्णी यांनी या शस्त्रक्रियेचे नेतृत्व केले. या अत्याधुनिक शस्त्रक्रियांचे महत्त्व पटवून देताना डॉ. सुप्रशांत कुलकर्णी म्हणाले, ‘‘ शस्त्रक्रियेला सुरुवात करण्यापूर्वी आम्ही रुग्णाची प्रकृतीत सुधारणा करण्यावर लक्ष केंद्रित केले होते. शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाला संसर्गाची बाधा होऊ नये म्हणून मधुमेह नियंत्रणात आणले. श्वसनाचा त्रास होऊ नये म्हणून फुफ्फुसरोगतज्ज्ञाची मदत घेतली. या दोन महिन्यांच्या कालावधीत रुग्णाच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा दिसून आली. वृद्धांमध्ये बरेचदा नैसर्गिक विधी पार पाडताना अडथळे निर्माण होतात. रुग्ण महिलेला कोणताही त्रास होऊ नये, त्यांच्या नैसर्गिक विधी प्रक्रियेत अडथळा निर्माण होऊ नये यासाठी आम्ही वेळोवेळी आवश्यक सर्व उपचार दिले. 

शस्त्रक्रियेअगोदरच महिला रुग्णाला उच्च प्रथिने तसेच फायबरयुक्त आहार दिला गेला. रुग्णाला किमान ३० मिनिटे ते एक तास पायी चालण्याच्या व्यायाम करण्यावर भर दिला गेला. रुग्णाच्या फुफ्फुसाची आणि हृदयाची स्थिती अनुकूल राहावी याकरिता इन्स्पिरेटरी आणि स्पायरोमॅट्री पद्धतीचा अवलंब केला गेला. शस्त्रक्रियेअगोदर रुग्णाच्या विविध आजारांवर नियंत्रण मिळवल्यास शस्त्रक्रियेनंतर कोणताही अडथळा निर्माण होत नाही, हा मुद्दा डॉ सुप्रशांत कुलकर्णी यांनी अधोरेखित केला. ते म्हणाले, ‘‘  महिला आणि पुरुषांच्या पोटातील नाभीवर हार्निया निर्माण होतो. नाभीवरील डाग कमकुवत झाल्याने, प्रसूतीदरम्यान सी-सॅक्शन शस्त्रक्रियेमुळे किंवा गर्भधारणेच्या काळात पोटाजवळील स्नायू जखडल्याने आता महिलांमध्ये हार्नियाचे निदान होणे सर्वसामान्य आहे. या महिला रुग्णावर प्रसूतीदरम्यान तीनदा सी सॅक्शन शस्त्रक्रिया केली गेली. परिणामी,तिच्या पोटाजवळील स्नायू कमकुवत झाल्याने ओटीपोटावर फुगवटा निर्माण झाला. यामुळे तिच्या शरीरात एकाहून अधिक हार्निया तयार होत गेले. या प्रकाराला ओटीपोटातील अनेक दोषांमुळे तयार होणा-या एका विशिष्ट आकारामुळे निर्माण झालेला ‘स्वीझ चीज डिफेक्ट’ असेही संबोधले जाते. महिलांमधील हार्निया तयार होण्याची शक्यता टाळण्यासाठी वाढत्या वयात त्यांच्या शरीरातील स्नायूंच्या बळकटीकरणावर भर द्यायला हवा. महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रसूतीपूर्व तसेच प्रसूतीनंतरच्या काळातही त्यांनी स्नायू बळकट करण्यावर भर द्यावा. ’’

रॉबोटिक शस्त्रक्रियेच्या मदतीने शस्त्रक्रिया अचूक आणि योग्यरित्या पार पाडली जाते. परिणामी, रुग्णाच्या शरीराला त्रास होत नाही. सदर महिला रुग्णावर तब्बल साडेपाच तास शस्त्रक्रिया सुरु राहिली. शस्त्रक्रियेनंतर महिलेला वॉर्डमध्ये आणले गेले. वॉर्डमध्ये आणल्यानंतर काही काळाने तिला चालताही येत होते. दोन दिवसांच्या औषधोपचारानंतर रुग्णाला डिस्चार्ज दिला गेला.

या प्रसंगी ६५ वर्षीय महिला रुग्णानेही डॉक्टर्स आणि रुग्णालयाचे ऋण व्यक्त केले. ‘‘मी डॉ. सुप्रशांत कुलकर्णी आणि त्यांच्या टीमची कायमची ऋणी आहे. त्यांनी दिलेल्या उपचारामुळे माझ्या प्रकृतीत लवकर सुधारणा दिसून आली. डॉ. कुलकर्णी यांनी मला रॉबोटिक शस्त्रक्रियेचे महत्त्व पटवून दिले. या शस्त्रक्रियेमुळे हा आजार पुन्हा होणार नाही, याबद्दलही त्यांनी माहिती दिली. ’’ या शब्दांत महिला रुग्णाने डॉ. सुप्रशांत कुलकर्णी यांना धन्यवाद दिले.

रॉबोटिक शस्त्रक्रियेबद्दल डॉ. कुलकर्णी यांनीही माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘ हार्नियावर मात करण्यासाठी रॉबोटिक शस्त्रक्रिया अचूक ठरते. रॉबोटिक शस्त्रक्रियेमध्ये वापरल्या जाणा-या दा व्हिन्चि रॉबोटीक प्रणालीमधील उपकरणांमध्ये त्रिमितीय सूत्री, अचूकता या वैशिष्ट्यांसह विनाअडथळा कार्य पूर्ण करण्याची क्षमता आहे. या प्रणालीमुळे हार्नियावरील शस्त्रक्रियेत शरीरावर अगदी लहान चीर करुन मोठ्या आकाराचा हार्निया काढला जातो. इतर कोणत्याही पद्धतीच्या शस्त्रक्रियेत शरीरावर जास्त चीरा कराव्या लागतात, शिवाय जखमेवर पुन्हा संसर्ग होणे तसेच जखम भरुन निघण्यासही मोठा काळ लागतो.’’

पुणेकरांना भावली ‌‘तेव्हाची गोष्ट‌’कविता, गझल आणि रुबायांचे भावत्कोट अभिवाचन

पुणे : उबदार नात्यांच्या शोधात असणाऱ्या, दु:खाकडे पाहण्याची वेगळी नजर लाभलेल्या, जगण्यातले दुर्दैवी वास्तव आणि विचित्र विरोधाभास समर्थ लेखणीतून मांडणाऱ्या हिमांशु कुलकर्णी यांच्या कविता, गझल आणि रुबायांच्या प्रभावी अभिवाचनाची अनुभूती ‌‘तेव्हाची गोष्ट‌’ या कार्यक्रमातून पुणेकरांनी घेतली.
महाराष्ट्र कल्चरल सेंटर आणि श्रीराम लागू रंग-अवकाश यांच्या स्टेज इज युवर्स या उपक्रमाअंतर्गत सेतू अभिवाचन मंच, पुणेतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्रीराम लागू रंग-अवकाश येथे रसिकांच्या उपस्थितीत कार्यक्रम रंगला. कवी हिमांशु कुलकर्णी यांच्या कविता, गझल आणि रुबयांचे भावोत्कट अभिवाचन गीतांजली अविनाश जोशी, अनिरुद्ध दडके आणि दीपाली दातार यांनी केले. संहिता लेखन दीपाली दातार, दिग्दर्शन अनिरुद्ध दडके यांचे तर संगीत राघवेंद्र जेरे यांचे होते. कार्यक्रमाला हिमांशु कुलकर्णी यांच्यासह राजहंस प्रकाशनचे दिलीप माजगावकर, डॉ. सदानंद बोरसे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
मूळ, मूळ नसतं दफनवलेले फूल असतं
पानं, पानं नसतात उन्हासाठी पसरलेले हात असतात
अशा काव्याची निर्मिती पहिल्यांदा कवी हिमांशु कुलकर्णी यांच्याकडून झाली. नोकरी निमित्त देश-विदेशात फिरताना मनाला भावलेला निसर्ग, दृष्टीस पडलेली सामाजिक विषमता, रूढी-परंपरांच्या जोखडात बांधलेल्या-पिचलेल्या स्त्री मनाच्या व्यथा अशा कितरीतरी गोष्टींनी त्यांच्या संवेदनशील मनाला हाक घातली आणि त्यांच्या लेखणीतून अनेक कविता उमटत गेल्या.
कवी हिमांशु कुलकर्णी यांनी परक्या भाषेतील रुबाई हा काव्य प्रकार आपल्या भाषेत आणताना, आपली संस्कृती आणि भौगोलिक स्थितीचे भान जपले म्हणूनच मातीचा अनुबंध आणि मराठी संस्कृतीचा गंध त्यांच्या रुबयांमध्ये सहजतेने जाणवतो आणि तिचे परकेपणच संपते. जन्म-मृत्यूचे वास्तव, राधा-कृष्णाचे भावबंध, स्त्रीची सामाजिक स्थिती हे विषय मांडताना त्यांनी परखड शब्दांचा वापर केला आहे.
‌‘हात हातात घेत होते तेव्हाची गोष्ट‌’, ‌‘ही दुनिया म्हणजे मोठा एक फलाट‌’, ‌‘या जंगलातले सगळेच वड‌’, ‌‘ही रुबाई आवडण्याची सक्ती नाही दोस्त‌’, ‌‘कोण म्हणतं चंद्र एकच असतो‌’, ‌‘तू आणि मी सारखेच आहोत दोस्त‌’, ‌‘अश्रूंना आता मोल राहिले नाही‌’, ‌‘वेगळी वेगळी यादी अपराधांची‌’, ‌‘पुतळा झाला म्हणून हुरळून जाऊ नकोस‌’ असा गूढ भावार्थ दडलेल्या रचनांनी विशेष दाद मिळविली आणि ‌‘मैफिलीत बसले होते सगळेच रावण‌’, ‌‘मदिरा नव्हती का तेव्हाच्या द्राक्षात‌’ अशा रुबायांनी वातावरणात हास्याची पखरण केली.
यंत्रयुगातील कोलाहलापासून दूर गेलेल्या हिमांशु यांना प्रतिकूल वातावरणात आलेल्या एकटेपणातून, स्वत:च्या मनाशी एकरूह होण्याची आस लागली आणि त्यातूनच विविध प्रकारच्या कविता कागदावर उमटू लागल्या. चर्च, ऑर्गनचे सूर, अंधारलेले ग्रेव्हयार्ड, अंधुक मेणबत्ती अशा प्रतिमांमधून कवी हिमांशु यांची प्रतिभा प्रकट होऊ लागली. कवितांमधून गूढ, अनाकलनीय, कधी उजाड, उदास वातावरण निर्मिती झाली तर कधी त्यांच्या काव्यपंक्तीनी धगधगत्या वास्तवतेचे भान दिले.
माणासाच्या भावनांचे हिंदोळे दर्शविताना त्यांनी लिहिलेल्या ‌‘जगणे गहाण माझे उसनेच श्वास आता, वाळूत मृगजळाचे फसवेच भास आता‌’ या काव्यपंक्ती रसिकांना विशेष भावल्या. मंद पार्श्वसंगीतासह उत्तरोत्तर रंगत गेलेली ही अभिवाचनाची मैफल रसिकांच्या मनाचा ठाव घेणारी ठरली.

आंतर-शालेय बॅडमिंटन स्पर्धेत ध्रुव ग्लोबल स्कूल चमकले

पुणे, ४ डिसेंबरः सूस येथील ध्रुव ग्लोबल स्कूल ने नुकत्याच संपन्न झालेल्या मुळशी तालुकाच्या जिल्हा परिषद आंतर शालेय विभागीय स्तरावरील बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदक जिंकले. या मध्ये वेगवेगळ्या शाळांमधील खेळाडूंनी उभ्या केलेल्या तगड्या स्पर्धेच्या दरम्यान ध्रुव ग्लोबल स्कूलने विविध वयोगटांमध्ये पदके मिळवून एक उत्तम खेळाडू म्हणून उदयास आले आहे. अपवादात्मक कौशल्य आणि दृढनिश्चियाचे प्रदर्शन करताना, ध्रुव ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आयोजित बॅडमिंटन स्पर्धेत विजय मिळवला.
१९ वर्षाखालील मुलांच्या गटात देव वीरमणी, शौर्य पाल, मंदार कोल्हटकर, रणवीर माने आणि नैतिक जैन यांनी चतुराई व शक्तीचे मनमोहक प्रदर्शन करत प्रतिस्पर्ध्याला पराभूत करून सुवर्णपदक मिळवले. १७ वर्षाखालील मुलांच्या गटात साईश भुरके, ऋषील कौल, आदित्य दहाड, वीरेन घोडके, श्रीकर वेलनाटी यांनी त्यांच्या वरिष्ठांचे कौशल्य आणि स्वभाव या दोन्ही गोष्टींचे अनुकरण करून तृतीय क्रमांक पटकावत कांस्य पदक जिंकले.
त्याच प्रमाणे १९ वर्षाखालील मुलींच्या गटात आहाना पवार, कांचन सिंग, अवंती किर्लोस्कर, रिचा कर्नावट या सुवर्णपदकाच्या मानकरी ठरल्या. १४ वर्षाखालील मुलींच्या गटात संयम आणि चिकाटीचे प्रदर्शन करून नीती पंडित, रीत पाल, अनुश्री पिसाळ, आदित्री चौधरी, अन्वी डालके यांनी द्वितीय क्रमांक पटकावून रौप्य पदक मिळविले.
प्रशिक्षक आशुतोष किरकिसे आणि कुणाल जाधव यांनी या खेळाडूंना मार्गदर्शन केले.
या विजयावर भाष्य करताना, ध्रुव ग्लोबल स्कूलचे संचालक यश मालपाणी व प्रिन्सीपल संगीता राऊतजी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि सांगितले की जिल्ह्यातील खेळाडूंच्या अनुकरणीय कामगिरीमुळे क्रीडा प्रतिभेचे पालन पोषण आणि ऍथलेटिक्समधील उत्कृष्टतेला प्रोत्साहन देण्यासाठी संस्थेची बांधिलकी अधोरेखित होते. हे विद्यार्थी आणि त्यांचे प्रशिक्षक या दोघांच्याही समर्पण आणि कठोर परिश्रमाचा दाखला आहे.

रंगत-संगत प्रतिष्ठानचा काव्य जीवन गौरव पुरस्कार अंजली कुलकर्णी यांना जाहीर

पुणे : रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे दिल्या जाणाऱ्या काव्य जीवन गौरव पुरस्काराने ज्येष्ठ कवयित्री अंजली कुलकर्णी यांचा सन्मान केला जाणार आहे.
पुरस्कार वितरण समारंभ मंगळवार, दि. 10 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता पत्रकार भवन, दुसरा मजला, नवी पेठ येथे आयोजित करण्यात आला आहे. पुरस्काराचे वितरण महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त निमंत्रितांचे कविसंमेलन आयोजित करण्यात आले असून यात विजय सातपुते, सुजित कदम, स्वप्नील पोरे, मिलिंद शेंडे, राजश्री सोले, राजश्री महाजनी, स्वाती दाढे, मीना सातपुते, स्वाती यादव, माया मुळे, डॉ. मृणालिनी गायकवाड, आशा ठिपसे, डॉ. रेखा देशमुख, वैजयंती विझें-आपटे यांचा सहभाग असणार आहेत. ज्येष्ठ कवयित्री प्रभा सोनवणे अध्यक्षस्थानी असणार आहेत. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

जागतिक दिव्यांग दिवसाच्या निमित्ताने एसबीआयतर्फे २९ पॅरालिम्पिक विजेत्यांचा गौरव

भारतभरातील २० ठिकाणी एएलआयएमसीओच्या सहकार्याने सुमारे ९००० दिव्यांगजनांना साहाय्यक उपकरणांचे वितरण

मुंबई, 4 डिसेंबर २०२४: देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ने जागतिक दिव्यांग दिवसाच्या निमित्ताने पॅरिस २०२४ पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेतील भारताच्या पॅरालिम्पिक विजेत्यांचा सन्मान करण्यासाठी सन्मान सोहळ्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमादरम्यान, बँकेने २९ पॅरालिम्पिक विजेत्यांना धनादेश प्रदान केले आणि त्यांच्या अद्वितीय कामगिरीचा गौरव केला. भारताने या पॅरालिम्पिकमध्ये आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी करत १८ वा क्रमांक मिळवला.

कार्यक्रमात विचार मांडताना एसबीआय अध्यक्ष सी. एस. सेटी म्हणाले, “पॅरिस २०२४ पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेमधील भारताची कामगिरी हा आपल्या देशाच्या क्रीडा प्रवासातील एक निर्णायक क्षण ठरला. या खेळाडूंनी केवळ जिद्द आणि संयमाच्या जोरावर अशक्य ते शक्य करून दाखवले, अडथळे पार केले आणि देशाला प्रेरणा दिली. एसबीआयमध्ये आम्हाला या विजेत्यांना पाठिंबा देण्यात अभिमान वाटतो आणि आम्ही भारतीय क्रीडाविश्वासाठी अधिक समावेशक, प्रोत्साहन पूरक वातावरण निर्माण करण्यासाठी वचनबद्ध आहोत.”

सर्वसमावेशकतेच्या दिशेने आपल्या वचनबद्धतेला अनुसरून, एसबीआयने २०२४-२५ या आर्थिक वर्षातील आपल्या सीएसआर उपक्रमांचा भाग म्हणून आर्टिफिशियल लिम्ब्स मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एएलआयएमसीओ) सोबत सहयोग करण्याची घोषणा केली. या भागीदारीचा उद्देश देशभरातील २० ठिकाणी सुमारे ९००० दिव्यांगजनांना साहाय्यक उपकरणे वितरीत करणे आहे.

या उपक्रमातून व्यक्तिगत सक्षमीकरण, सर्वसमावेशकतेला चालना आणि भारतीय क्रीडा प्रकारांना पाठिंबा देण्यासाठी असलेली एसबीआयची बांधिलकी अधोरेखित होते.

पदक विजेते (झलक):

सुवर्णपदक: Harvinder Singh, Sumit Antil, Dharambir, Praveen Kumar, Navdeep Singh, Nitesh Kumar, Avani Lekhara

रौप्यपदक: Nishad Kumar, Yogesh Kanthuniya, Sharad Kumar, Ajeet Singh, Sachin Khilari, Pranav Soorma, Thulasimathi Murugesan, Suhas Yathiraj, Manish Narwal

2019 मध्ये आम्हाला मिळालेला कौल हिसकावून घेण्यात आला..आता स्पष्ट बहुमताने महायुतीचे सरकार

मुंबई-देवेंद्र फडणवीस यांची बुधवारी भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. यावेळी बोलताना फडणवीस यांनी आपली निवड केल्याबद्दल पक्षाचे आभार मानले. तसेच महाराष्ट्राला विकासाच्या एका नव्या उंचीवर नेण्याचा निर्धारही व्यक्त केला. विशेषतः यावेळी त्यांनी यंदाची निवडणूक अत्यंत ऐतिहासिक ठरल्याचे नमूद करत ‘एक है तो सेफ है’, ‘मोदी है तो मुमकीन है’चा नाराही दिला.देवेंद्र फडणवीस म्हणाले, 2019 मध्येही जनतेचा कौल आपल्याला मिळाला होता. पण दुर्दैवाने जनतेचा कौल हिसकावून घेण्यात आला. त्यावेळी जनतेसोबत बेईमानी झाली. माझी त्या इतिहासात जाण्याची इच्छा नाही. आपण एक नवी सुरूवात करत आहोत. पण एका गोष्टीचा निश्चित उल्लेख करेन, की सुरुवातीच्या अडीच वर्षात ज्या प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला त्रास देण्यात आला, आपल्या आमदारांना त्रास देण्यात आला, नेत्यांना त्रास देण्यात आला. त्यानंतरही एकही आमदार आपल्याला सोडून गेला नाही. सर्व आमदार, सर्व नेते संघर्ष करत होते. त्या संघर्षामुळेच 2022 मध्ये पुन्हा आपले सरकार आले. त्यातूनच आज पुन्हा एकदा स्पष्ट बहुमताने महायुतीचे सरकार आले. हे एक अभूतपूर्व यश आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदी एकमताने निवड केल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. ही निवड प्रक्रिया करण्यासाठी आलेले केंद्रीय निरीक्षक विजय रुपाणी व निर्मला सीतारामन यांचेही मी आभार मानतो. विशेषतः या संपूर्ण प्रक्रियेत आमच्यासोबत असणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेही मी आभार मानतो. आपल्याला सर्वांना याची कल्पना आहे की, यावेळची निवडणूक अत्यंत ऐतिहासिक ठरली. या निवडणुकीचे विश्लेषण करायचे झाले तर, तर मी असे म्हणेन की, या निवडणुकीने एक गोष्ट आपल्यापुढे निश्चितपणे ठेवली आहे, ती म्हणजे एक है तो सेफ है आणि मोदी है तो मुमकीन है.

लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा देशात विजयाची मालिका सुरू झाली. महाराष्ट्राच्या जनतेला माझा साष्टांग दंडवत. त्यांनी खूप मोठा जनादेश आम्हाला दिला. यंदाचे वर्ष अतिशय महत्त्वाचे आहे. आपण सर्वजण ज्या प्रक्रियेतून निवडून येतो, त्या संविधानाला यंदा 75 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे अत्यंत महत्त्वाच्या वर्षात आज आपण सरकार स्थापन करत आहोत.

महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीवर अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सोपवली. आम्हाला प्रचंड मोठा जनादेश दिला. या जनादेशाचा आनंद आहेच, पण यामुळे आपली जबाबदारीही तेवढीच वाढली आहे. एका मोठ्या जबाबदारीची जाणीव करून देणारा जनादेश जनतेने आम्हाला दिला आहे. विशेषतः आपल्या लाडक्या बहिणी असतील, लाडके भाऊ असतील, शेतकरी किंवा तरुण असतील या सर्वांनी आणि समाजातील दलित, वंचित, ओबीसी, आदिवासी सर्वांनी दिलेल्या जनादेशाचा सन्मान राखण्याचे काम आपल्याला करावे लागणार आहे.म्हणून आपली प्राथमिकता ही आपण सुरू केलेल्या योजना आणि आपण दिलेली आश्वासने पूर्ण करण्याला असेल. तसेच महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी, महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी आपल्या सर्वांना सातत्याने कार्यरत राहायचे आहे.माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला राज्याच्या सर्वोच्च पदाची 3 वेळा संधी दिल्याबद्दल मी पंतप्रधान मोदींचे आभार मानतो. हा पक्ष ज्या प्रकारे त्यांच्या नेतृत्वात मोठा झाला, त्यातूनच सामान्य कार्यकर्त्यांना वेगवेगळी पदे मिळाली. काम करण्याची संधी मिळाली.देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी आपल्या सहकाऱ्यांना भविष्यातील काही गोष्टींचीही जाणिव करून दिली. ते म्हणाले, आपल्याला जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लाणार आहे. आपल्याला जनतेच्या अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत. हे करताना आपल्याला महायुतीमधील सर्वांना सोबत घेऊन पुढे जावे लागेल. काहीवेळा सर्वांच्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत. पण आपण एक मोठा विचार घेऊन राजकारणात आलो आहोत हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे.भविष्यात काही गोष्टी आपल्या मनासारख्या होतील व काही गोष्टी मनाविरोधात होतील. पण त्यानंतरही आपण सर्वजण एकदिलाने काम करू. आपली शक्ती दाखवून देऊ. मी राज्यातील जनतेला आश्वस्त करू इच्छितो की, आमचे सराकर महाराष्ट्राच्या सर्वांगिन विकासासाठी, प्रगतीसाठी 24 तास काम करेल व सामान्य माणसांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल, असेही देवेंद्र फडणवीस यावेळी बोलताना म्हणाले.

महायुती सरकारचा शपधविधी 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता मुंबईतील आझाद मैदानावर पार पडणार आहे. देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. यावेळी अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची तर काही आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्याची निमंत्रण पत्रिका समोर आली आहे.

बाणेरला मुरकुटे पाटील कॉम्प्लेक्समध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय

पुणे- बाणेरला मुरकुटे पाटील कॉम्प्लेक्समध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली चालविल्या जाणाऱ्या वेश्याव्यवसायावर छापा मारून पुणे पोलिसांनी ३ पिडीत महिलांची सुटका केली आणि हा व्यवसाय चालविणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’दि.०३/१२/२०२४ रोजी गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, “मून थाई सपा”ऑफिस नंबर ३सर्वे नंबर 4 बापूसाहेब मुरकुटे पाटील कॉम्प्लेक्स तिसरा मजला तुळशी प्युअर व्हेज व महाबळेश्वर हॉटेल शेजारी बाणेर रोड पुणे येथे स्पा च्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालू असले बाबत गोपनीय माहिती प्राप्त झाल्याने सदर ठिकाणी बनावट गिऱ्हाईक पाठवून खात्री केली असता नमूद स्पा नावाखाली वेश्याव्यवसाय चालवीत असल्याचे निष्पन्न झाल्याने अचानक छापा कारवाई करून एकूण ०३ भारतीय पीडित महिला यांची सुटका करून आरोपी नामे 1) मॅनेजर – सताउद्दीन मोहम्मद दिलावर हुसेन वय 22 वर्ष रा. जुनी सांगवी पुणे व आणखी एक फरार आरोपी त्यांचेविरुद्ध बाणेर पोलिस स्टेशन येथे बी एन एस कलम 143,3(5) सह अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंध कायदा 1956 चे कलम 3,4,5, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई अपर पोलीस आयुक्त गुन्हे, पुणे शहर शैलेश बलकवडे , पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा, पुणे शहर निखिल पिंगळे,सहा.पोलीस आयुक्त गुन्हे १,पुणे गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली भरोसा सेल गुन्हे शाखा,पुणे शहर च्या पोलीस निरीक्षक श्रीमती संगीता जाधव , पोलीस उपनिरीक्षक चव्हाण व त्यांचा स्टाफ यांनी केली आहे.

गीता परिवार तर्फे बावधन येथील स्टार गेझ सोसायटी मध्ये गीता जयंती कार्यक्रम संपन्न

पुणे –
गीता जयंतीनिमित्त देश-विदेशात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे,ज्यामुळे गीतेच्या मूल्यांचा प्रभावी प्रसार सर्वांपर्यंत करता येईल आणि प्रत्येक हिंदू कुटुंबाला श्रीमद्भगवद्गीतेच्या पठन व अभ्यासाशी जोडता येईल.

याच उपक्रमाचा भाग म्हणून गीता परिवार, पुणे यांनी दि. १ डिसेंबर रोजी बावधन येथील स्टारगेझ सोसायटी मध्ये श्रीमद्भगवद्गीतेच्या १८ अध्यायांच्या पठणाचा कार्यक्रम तेथील नागरिकांच्या हर्षोल्हासात आयोजित केला.या कार्यक्रमात सर्व नागरिकांनी उत्साहाने भाग घेतला,आणि गीता परिवार देखील या आयोजनाचा भाग बनला.

या कार्यक्रमात मुलांनी गीतेचे पठण आणि हनुमान चालीसेचे सामूहिक गायन केले.
कार्यक्रमाचा मुख्य उद्देश गीतेच्या उपदेशांचा प्रसार करणे आणि सामाजिक एकोप्याला चालना देणे हा होता,ज्यामध्ये सर्वांनी आपले योगदान दिले.

कार्यक्रमात गीतेचे वितरणही करण्यात आले. सोसायटीतील सर्व रहिवाशांनी या कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेतला.यामध्ये १०० नागरीकांनी यात भाग घेतला आणि गीतेच्या शिकवणींना जीवनात आत्मसात करण्याचा संकल्प केला.

कार्यक्रमाचे संचालन श्रीमती रेखा गिल्ड यांनी केले. रेखा गिल्ड या सोसायटीत मुलांसाठी गीतेच्या वर्गांचे आयोजन देखील करतात.
हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी श्रीमती रेखा गिल्ड, श्री मधुकर पौर्णेकर, श्री दिलीप खोपडे, श्री श्रीमंत जगताप, श्रीमती रागिणी शर्मा, श्रीमती नेहा औरंगाबादकर, श्रीमती अश्विनी,आणि श्री अखिल औरंगाबादकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.