रॉबोटिक शस्त्रक्रियेच्या मदतीने डॉक्टरांनी महिलेला जीवनदान दिले
० पुण्यातील या महिलेच्या ओटीपोटात मोठा मध्यम आकाराचा हार्निया काढण्यासाठी डॉक्टरांनी शस्त्रक्रियेदरम्यान शरीरावर कमी चीरा काढून गुंतागुंतीच्या प्रक्रियेवर मात केली
० संबंधित महिला रुग्णाला अस्थमा, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि वाढत्या वयोमानासह विविध आजारांनी ग्रासले होते
पुणे – ५ डिसेंबर २०२४, पुणे येथील रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयातील नामवंत डॉक्टरांनी ६५ वर्षीय महिला रुग्णाच्या शरीरातील हॉर्नियाची रॉबोटिक शस्त्रक्रियेतून सुटका केली. ओटीपाटातील हार्निया अतिशय गुंतागुंतीचा आणि मोठा मध्यम आकाराचा तयार झाल्याने रुग्णाची प्रकृती सुधारत नव्हती. रुग्णाला अस्थमा, उच्च रक्तदाब तसेच मधुमेहाचाही त्रास असल्याने हार्नियाच्या दुखण्याने असह्य वेदना होत होत्या. तिच्या ओटीपोटावर हार्नियामुळे फुगवटा तयार झाल्याने सततच्य दुखण्याने महिला रुग्ण हैराण झाली होती.
महिला रुग्णाचे वय, स्थूलता, विविध आजार तसेच तीनदा शस्त्रक्रियेच्या मदतीने प्रसूती झालेली असल्याने हार्नियाची शस्त्रक्रियेबाबत मोठे आव्हान उभे राहिले. रुग्णाला कोणतीही बाधा होऊ नये म्हणून डॉक्टरांमी रॉबोटिक शस्त्रक्रियेच्या मदतीने गुंतागुंतीच्या हार्नियावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी रॉबोटिक शस्त्रक्रियेतील दा व्हिन्सी प्रणालीचा वापर केला. हा प्रणालीच्या मदतीने शस्त्रक्रियेदरम्यान गुंतागुत निर्माण होण्याची शक्यता नसते. ही शस्त्रक्रिया विनाअडथळा पार पडते.
रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयाचे जनरल आणि रॉबोटिक सर्जन आणि वरिष्ठ सल्लागार डॉ. सुप्रशांत कुलकर्णी यांनी या शस्त्रक्रियेचे नेतृत्व केले. या अत्याधुनिक शस्त्रक्रियांचे महत्त्व पटवून देताना डॉ. सुप्रशांत कुलकर्णी म्हणाले, ‘‘ शस्त्रक्रियेला सुरुवात करण्यापूर्वी आम्ही रुग्णाची प्रकृतीत सुधारणा करण्यावर लक्ष केंद्रित केले होते. शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाला संसर्गाची बाधा होऊ नये म्हणून मधुमेह नियंत्रणात आणले. श्वसनाचा त्रास होऊ नये म्हणून फुफ्फुसरोगतज्ज्ञाची मदत घेतली. या दोन महिन्यांच्या कालावधीत रुग्णाच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा दिसून आली. वृद्धांमध्ये बरेचदा नैसर्गिक विधी पार पाडताना अडथळे निर्माण होतात. रुग्ण महिलेला कोणताही त्रास होऊ नये, त्यांच्या नैसर्गिक विधी प्रक्रियेत अडथळा निर्माण होऊ नये यासाठी आम्ही वेळोवेळी आवश्यक सर्व उपचार दिले. ’’
शस्त्रक्रियेअगोदरच महिला रुग्णाला उच्च प्रथिने तसेच फायबरयुक्त आहार दिला गेला. रुग्णाला किमान ३० मिनिटे ते एक तास पायी चालण्याच्या व्यायाम करण्यावर भर दिला गेला. रुग्णाच्या फुफ्फुसाची आणि हृदयाची स्थिती अनुकूल राहावी याकरिता इन्स्पिरेटरी आणि स्पायरोमॅट्री पद्धतीचा अवलंब केला गेला. शस्त्रक्रियेअगोदर रुग्णाच्या विविध आजारांवर नियंत्रण मिळवल्यास शस्त्रक्रियेनंतर कोणताही अडथळा निर्माण होत नाही, हा मुद्दा डॉ सुप्रशांत कुलकर्णी यांनी अधोरेखित केला. ते म्हणाले, ‘‘ महिला आणि पुरुषांच्या पोटातील नाभीवर हार्निया निर्माण होतो. नाभीवरील डाग कमकुवत झाल्याने, प्रसूतीदरम्यान सी-सॅक्शन शस्त्रक्रियेमुळे किंवा गर्भधारणेच्या काळात पोटाजवळील स्नायू जखडल्याने आता महिलांमध्ये हार्नियाचे निदान होणे सर्वसामान्य आहे. या महिला रुग्णावर प्रसूतीदरम्यान तीनदा सी सॅक्शन शस्त्रक्रिया केली गेली. परिणामी,तिच्या पोटाजवळील स्नायू कमकुवत झाल्याने ओटीपोटावर फुगवटा निर्माण झाला. यामुळे तिच्या शरीरात एकाहून अधिक हार्निया तयार होत गेले. या प्रकाराला ओटीपोटातील अनेक दोषांमुळे तयार होणा-या एका विशिष्ट आकारामुळे निर्माण झालेला ‘स्वीझ चीज डिफेक्ट’ असेही संबोधले जाते. महिलांमधील हार्निया तयार होण्याची शक्यता टाळण्यासाठी वाढत्या वयात त्यांच्या शरीरातील स्नायूंच्या बळकटीकरणावर भर द्यायला हवा. महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रसूतीपूर्व तसेच प्रसूतीनंतरच्या काळातही त्यांनी स्नायू बळकट करण्यावर भर द्यावा. ’’
रॉबोटिक शस्त्रक्रियेच्या मदतीने शस्त्रक्रिया अचूक आणि योग्यरित्या पार पाडली जाते. परिणामी, रुग्णाच्या शरीराला त्रास होत नाही. सदर महिला रुग्णावर तब्बल साडेपाच तास शस्त्रक्रिया सुरु राहिली. शस्त्रक्रियेनंतर महिलेला वॉर्डमध्ये आणले गेले. वॉर्डमध्ये आणल्यानंतर काही काळाने तिला चालताही येत होते. दोन दिवसांच्या औषधोपचारानंतर रुग्णाला डिस्चार्ज दिला गेला.
या प्रसंगी ६५ वर्षीय महिला रुग्णानेही डॉक्टर्स आणि रुग्णालयाचे ऋण व्यक्त केले. ‘‘मी डॉ. सुप्रशांत कुलकर्णी आणि त्यांच्या टीमची कायमची ऋणी आहे. त्यांनी दिलेल्या उपचारामुळे माझ्या प्रकृतीत लवकर सुधारणा दिसून आली. डॉ. कुलकर्णी यांनी मला रॉबोटिक शस्त्रक्रियेचे महत्त्व पटवून दिले. या शस्त्रक्रियेमुळे हा आजार पुन्हा होणार नाही, याबद्दलही त्यांनी माहिती दिली. ’’ या शब्दांत महिला रुग्णाने डॉ. सुप्रशांत कुलकर्णी यांना धन्यवाद दिले.
रॉबोटिक शस्त्रक्रियेबद्दल डॉ. कुलकर्णी यांनीही माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘ हार्नियावर मात करण्यासाठी रॉबोटिक शस्त्रक्रिया अचूक ठरते. रॉबोटिक शस्त्रक्रियेमध्ये वापरल्या जाणा-या दा व्हिन्चि रॉबोटीक प्रणालीमधील उपकरणांमध्ये त्रिमितीय सूत्री, अचूकता या वैशिष्ट्यांसह विनाअडथळा कार्य पूर्ण करण्याची क्षमता आहे. या प्रणालीमुळे हार्नियावरील शस्त्रक्रियेत शरीरावर अगदी लहान चीर करुन मोठ्या आकाराचा हार्निया काढला जातो. इतर कोणत्याही पद्धतीच्या शस्त्रक्रियेत शरीरावर जास्त चीरा कराव्या लागतात, शिवाय जखमेवर पुन्हा संसर्ग होणे तसेच जखम भरुन निघण्यासही मोठा काळ लागतो.’’