काँग्रेसपक्षातर्फे ‘वकील दीन’ साजरा!
पुणे -देशात कसोटीच्या क्षणी, कायद्याची बूज राखण्यासाठी जागरूक व संघर्षरत राहणे ही काळाची गरज असुन, ‘संविधान व लोकशाही’च्या अस्तित्वासाठी वकील वर्गा कडून अपेक्षा अधिक असल्याने, कायद्याचे संरक्षक म्हणून वकील वर्गावर जबाबदारी अधिक असल्याचे प्रतिपादन काँग्रेस नेते व राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केले. अध्यक्ष’स्थानी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे होते.
“राष्ट्रीय वकील दिना”च्या व काँग्रेसच्या लीगल सेल’च्या पदाधिकाऱ्यांच्या वाढदिवसाचे औचित्याने सदर कार्यक्रमाचे संयोजन पुणे काँग्रेसच्या लीगल सेल’ने केले होते. महाराष्ट्र प्रदेश इंटक’चे पदाधिकारी तसेंच प्रदेश सचिव ऍड फैयाज शेख, तसेच पुणे शहर कॅांग्रेस लिगल सेल चे उपाध्यक्ष ॲडव्होकेट श्रीकांत पाटील यांच्या जन्मदिन केक कापून व वकीलांचा सत्कार करून “राष्ट्रीय वकील दिन” साजरा करण्यात आला.
ॲड फैयाज शेख व ॲड श्रीकांत पाटील हे हाडाचे कार्यकर्ते पेक्षा प्रामाणिक काँग्रेसजन असल्याचे व काँग्रेस पक्षाच्या लीगल सेल ने गरजू जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढे यावे असे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी यावेळी बोलतांना सांगितले.
सुत्र संचालन भोला वांजळे यांनी केले तर आभार प्रदर्शन काँग्रेस लीगलचे शहर उपाध्यक्ष ऍड. आरुडे यांनी केले.
या प्रसंगी प्रदेश काँग्रेस लीगल सेल चे उपाध्यक्ष ऍड. शाहिद अख्तर शेख, ऍड. अनिल कांकरिया ऍड अयुब पठाण सि आय डी ॲड काळेबेरे, माजी नगरसेवक श्रीकांत पाटील, प्रदेश काँग्रेस प्रतिनिधी मेहबूब नदाफ यांनी शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी ॲड विद्या पेळपकर, ॲड. रशिदा सय्यद, ॲड. डिसूझा, ॲड. अतुल गुंड पाटील, ॲड. राजाभाऊ चांदेरे, ॲड. चव्हाण, ॲड. सतीश कांबळे, ॲड. बलकवडे, ॲड भुंडे, ॲड सुरेश नांगरे, ॲड बाळासाहेब बावणे इ वकील मंडळी मोठ्या संख्येने ऊपस्थित होती.. तसेच राजीव गांधी स्मारक समितीचे सदस्य तसेच जेष्ठ काँग्रेसजन बाळासाहेब मारणे, रामचंद्र शेडगे, रमण पवार, सुभाष काळे, राजेश मंजरे, धनंजय भिलारे, सुनील तिखे, विकास दवे, गणेश शिंदे, नरेश आवटे इ उपस्थित होते.
‘न्याय संस्था व संविधाना’च्या अस्तित्वासाठी वकील वर्गावर जबाबदारी अधिक⁃ काँग्रेस नेते गोपाळ तिवारी
ट्रक भाड्यात घट; नोव्हेंबरमध्ये मालवाहतूक वाहनांच्या ताफ्याच्या वापरात 60% कमी
· एनसीआर भागात BS4 वाहनांच्या प्रवेशावर बंदीमुळे ट्रकभाड्यात घसरण आणि त्यामुळे मालवाहतूक खर्चात वाढ· महाराष्ट्रातील मतदानामुळे मालवाहतूकीच्या धंद्यात घट· गत महिन्याच्या तुलनेत दुचाकी वाहनांच्या विक्रीत 27% वाढ· उत्तम मॉन्सून आणि रब्बी हंगामात चांगल्या उत्पादनाच्या आशेने गत महिन्याच्या तुलनेत कृषी ट्रॅक्टरच्या विक्रीत जोरदार वाढ· सणासुदीनंतर कार विक्रीत मोठ्या प्रमाणात घसरण· इलेक्ट्रीक वाहनांच्या विक्रीत घसरण सुरुच
पुणे : सणासुदीच्या हंगामानंतर ऑक्टोबर 2024 मध्ये सामान्य पातळीवर स्थिरावलेल्या ट्रकभाड्यात नोव्हेंबर 2024 मध्ये, बहुतांश ट्रक मार्गांवर परिवहन सेवांची मागणी कमी झाल्यामुळे, ट्रकभाड्यात मोठी घट झाली. गत महिन्याच्या तुलनेत नोव्हेंबर २०२४ मध्ये मालवाहतूक वाहनांच्या ताफ्याच्या वापरात सुमारे 60% पर्यंत घसरण नोंदविली गेली आहे. या घसरणीमागे वाहनांच्या विविध श्रेणीत अतिशय अल्प मागणी, वायू प्रदूषणाच्या समस्यांमुळे एनसीआर प्रदेशात BS4 ट्रकवर बंदी, महाराष्ट्रातील मतदानाची प्रक्रिया आणि शेतमाल उत्पादनांच्या वाहतूकीत झालेली घट यासारखे अनेक घटक कारणीभूत आहेत. मालवाहतूक क्षेत्रातील बहुतांश ट्रक्स हे BS4 निकषांचे पालन करणारे असून एनसीआर भागात त्यांच्या प्रवेशावर घालण्यात आलेल्या बंदीमुळे हे ट्रक मालाची एनसीआर प्रदेशाच्या सीमेपर्यंतच वाहतूक करत आहेत. तेथे या ट्रक्समधील माल छोट्या आकाराच्या BS6 अथवा सीएनजी ट्रकमध्ये चढविला जातो आणि एनसीआर विभागाच्या आतील भागात पोहचविला जातो. यामुळे एनसीआर प्रदेशात मालवाहतूकीच्या खर्चात वाढ झाली आहे. ट्रकभाड्यांच्या दरावर परिणाम होण्याचे आणखी एक कारण म्हणजे महाराष्ट्रात नुकतीच पार पडलेली मतदान प्रक्रिया आहे. मतदान प्रक्रियेमुळे मालवाहतूकीच्या कामकाजाचा वेग मंदावल्याने ट्रकच्या भाडेदरात (वक्राकार फेऱ्या) घसरण झाली आहे. दिल्ली-चेन्नई-दिल्ली आणि दिल्ली-बंगळूर-दिल्ली यासारख्या मार्गांवर ट्रकभाडेदरात गत महिन्याच्या (महिना-दर-महिना) तुलनेत अनुक्रमे 1.4% आणि 1% घसरण झाली आहे. वाय. एस. चक्रवर्ती, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, श्रीराम फायनान्स लिमिटेड म्हणाले, “दळणवळण क्षेत्रात सणासुदीच्या हंगामाबद्दलचा उत्साह मावळला आहे. GDP मध्ये 60% वाटा असलेले खासगी उपभोग क्षेत्र 6% ने वाढले असले तरी पहिल्या तिमाहीतील 7.4% वाढीच्या तुलनेत त्यात घसरण झालेली आहे. ग्रामीण भागात मागणीत पुन्हा वाढ सुरु झाली असली तरी शहरी भागात वस्तूंच्या उपभोगात झालेली घट, अन्नदराने मारलेली उसळी, महागलेले कर्ज आणि वास्तविक वेतनात अल्प वाढ यामुळे खासगी उपभोग क्षेत्रात घट दिसून आलेली आहे. BS4 वाहनांवरील बंदीमुळे एनसीआर भागात ट्रक व्यवसाय जवळपास ठप्प झाला होता. मालवाहतूक वाहनांच्या ताफ्याचा वापरसुध्दा 60% च्या नव्या तळपातळीवर येऊन ठेपला होता. शेतमाल उत्पादनात जुलै-सप्टेंबरमध्ये वार्षिक 3.5% वाढ झाली असून ती गत तिमाहीतील 2% वाढीपेक्षा अधिक आहे जो एकमेव आशादायक बिंदू ठरला.”नोव्हेंबर 2024 मध्ये दुचाकी वाहनांच्या विक्रीत महिन्या-दर-महिन्याच्या आधारावर 27% वाढ झाली. दिवाळी ऑक्टोबरच्या शेवटच्या दिवशी असल्याने, दिवाळीच्या दिवशी झालेली विक्री नोव्हेंबरच्या विक्रीत मोजली गेली असल्यामुळे ह्या महिन्यात ही वाढ दिसत आहे. दुचाकी वाहनांच्या व्यतिरिक्त, इतर सर्व वाहन प्रकारानंपैकी, फक्त कृषी ट्रॅक्टर मध्ये वाढ दिसली ज्यात महिना-दर-महिना आधारावर 29% वाढ दिसून अली. चांगल्या पावसानंतर डिसेंबर/जानेवारीमध्ये आगामी रब्बी हंगामासह चांगल्या कृषी उत्पादनाची अपेक्षा हे ट्रॅक्टर विक्रीतील या लक्षणीय वाढीचे कारण असू शकते .प्रवासी वाहनांच्या विक्रीबाबतच्या बातम्या मात्र फारशा उत्साहवर्धक नाहीत. गत महिन्याच्या तुलनेत कार विक्रीत 36% घसरण झाली आहे. कार उत्पादकांनी सणासुदीसाठीच्या सवलत योजना काढून घेतल्याने ही घसरण असू शकते. त्याचप्रमाणे व्यावसायिक वाहनांच्या विक्रीतसुध्दा तीव्र घसरण झाली असून बसेसची विक्री तब्बल 32% घसरली आहे. इलेक्ट्रीक वाहनांच्या (दोन, तीन आणि चारचाकी) च्या विक्रीत घट होत राहिली, ऑक्टोबर महिन्याचा अपवाद वगळता जेथे सणासुदीच्या ऑफरने विक्रीला काही प्रमाणात चालना दिली. महिन्या-दर-महिन्याच्या आधारावर ईव्ही कारच्या विक्रीत 38% ने घट झाली आहे, तर दुचाकी ईव्हीच्या विक्रीत महिन्या-दर-महिन्याच्या आधारावर 19% ने घट झाली आहे. नवीन दुचाकी आणि चार चाकी ईव्हीच्या आगामी लॉन्चमुळे येत्या काही महिन्यांत विक्री वाढण्यास मदत होईल का हे पाहणे बाकी आहे. इंधन खपाच्या बाबतीत डिझेलच्या वापरात नोव्हेंबर २०२४ मध्ये गत महिन्याच्या तुलनेत 7% वाढ झाली आहे, तर पेट्रोलच्या खपात 0.3% वाढ झाली आहे. दरम्यान, फास्टटॅगच्या संकलनात मासिक आधारावर 4% वाढ दिसून आली असून ही वाढ वाहतूकीचे प्रमाण वाढल्याचे दर्शवत आहे. तसेच एकूण टोल संकलन गतमहिन्याच्या तुलनेत 0.7% घटल्याचे दर्शवत असले तरी ही घट छोट्या अंतरावरील सहली किंवा लहान वाहनांच्या वापरामुळे मोठ्या वाहनांच्या तुलनेत द्यावा लागणाऱ्या कमी टोल दरामुळे असू शकते.
पुण्यातून सिद्धार्थ शिरोळे यांना मंत्रीपद मिळण्याची मोठी शक्यता
पुणे- माधुरी मिसाळ यांचे नाव काही माध्यमातून मंत्रिपदासाठी सातत्याने येत असताना प्रत्यक्षात भीमराव तापकीर किंवा युवा नेतृत्व म्हणून सिद्धार्थ शिरोळे या दोहोंपैकी एकाला मंत्रीपद देण्यात देवेंद्र फडणविसांना अनुकुलता भासत असल्याचे सूत्रांनी येथे सांगितले.माधुरी मिसाळ या चौथ्यांदा निवडून आल्याने त्या बळकट आहेतच , भीमराव तापकीर देखील शांत संयमी आमदार चौथ्यांदा निवडून आले आहेत . मात्र युवा शक्तीला बल देण्यासाठी आणि पुण्यातून नवा चेहरा उदयास आणण्यासाठी माजी खासदार अनिल शिरोळे यांचे सुपुत्र असलेले सुसंस्कारी नेतृत्व म्हणून देवेंद्र फडणवीस पुण्यातून दुसऱ्यांदा निवडून आलेले आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्याकडे मंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्याची दाट शक्यता असल्याचे वृत्त अचानक येथे हाथी आले आहे. गेल्या सरकारमध्ये मंत्री राहिलेले चंद्रकांतदादा पाटील तसेच भीमराव तापकीर किंवा माधुरी मिसाळ या सर्वांना वगळून सिद्धार्थ शिरोळे यांचे नाव आता पुढे आले आहे.
दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुतीच्या नव्या सरकारच्या खातेवाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. त्यानुसार भाजपला 20 ते 22, शिवसेनेला 12 व राष्ट्रवादी काँग्रेसला 9 ते 10 खाती मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, नव्या मंत्र्यांचा शपथविधी आज नव्हे तर 11 तारखेला होणार असल्याचा दावा केला जात आहे. शिवसेना नेते भरत गोगावले व संजय शिरसाट यांनी असे संकेत दिलेत.देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारचा आज शपथविधी होणार आहे. त्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, तर अजित पवार व एकनाथ शिंदे हे दोन्ही नेते उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यानंतर 11 डिसेंबर किंवा त्यानंतर एखाद्या सोयीच्या तारखेला उर्वरित मंत्रिमंडळाचा शपथविधी होईल. त्यात जवळपास 30 आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील अशी माहिती आहे. म्हणजे फडणवीस सरकारमध्ये मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह 33 मंत्री असतील. शिवसेना नेते भरत गोगावले व संजय शिरसाट यांनी 11 किंवा 12 डिसेंबरच्या आसपास उर्वरित मंत्रिमंडळाचा शपथविधी होईल, असे सांगितले आहे.
दुसरीकडे, देवेंद्र फडणवीस सरकारच्या खातेवाटपाचा फॉर्म्युला ठरल्याचीही माहिती समोर आली आहे. या फॉर्म्युल्यानुसार महायुतीमधील भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांना 6 आमदारांमागे 1 मंत्रीपद मिळेल. म्हणजे भाजपला सर्वाधिक 20 ते 22 मंत्रिपदे मिळतील. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 12, तर अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसला 9 ते 12 खाती मिळतील. पण कोणत्या पक्षाला कोणती खाती मिळणार? हे अद्याप स्पष्ट झाले नाही.सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप स्वतःकडे गृह मंत्रालयासह सर्वच महत्त्वाची खाती ठेवणार आहे. तर शिवसेनेला गृह खात्याच्या मोबदल्यात मलाईदार महसूल खाते सोडण्यात येणार असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीकडे अर्थ मंत्रालय कायम राहील अशीही माहिती आहे.
खाली वाचा भाजपचे संभाव्य मंत्री
चंद्रशेखर बावनकुळे
गिरीश महाजन
पंकजा मुंडे
अतुल सावे
राधाकृष्ण विखे पाटील
आशिष शेलार
रविंद्र चव्हाण
गणेश नाईक
मंगलप्रभात लोढा
अतुल भातखळकर
शिवेंद्रसिंहराजे भोसले
गोपीचंद पडळकर
सिद्धार्थ शिरोळे
शिवसेना संभाव्य मंत्र्यांची नावे
एकनाथ शिंदे(उपमुख्यमंत्री )
उदय सामंत
दादा भुसे
शंभूराज देसाई
गुलाबराव पाटील
संजय शिरसाट
अर्जुन खोतकर
राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य मंत्र्यांची यादी
अजित पवार(उपमुख्यमंत्री )
छगन भुजबळ
हसन मुश्रीफ
आदिती तटकरे
धनंजय मुंडे
अनिल पाटील
नरहरी झिरवळ
संजय बनसोडे
इंद्रनील नाईक
संग्राम जगताप
सुनिल शेळके
देवाभाऊंचे देव देव ….आणि गोमातांचे पूजन
मुंबई-
देवेंद्र फडणवीस यांनी दादर येथील सिद्धिविनायक मंदिरात जात दर्शन घेतले. शपथविधीपूर्वी फडणवीस यांनी श्रीगणरायाचरणी प्रार्थना केली. यावेळी त्यांच्यासोबत गिरीश महाजन देखील उपस्थित होते.देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधीपूर्वी गोमातेचे पूजन करुन आर्शीवाद घेतले.मुंबादेवी मंदिरातही फडणवीसांनी दर्शन घेतले.

महाराष्ट्रातील निवडणूक निकालानंतर 13 दिवसांनी आज नवीन सरकार स्थापन होणार आहे. आज सायंकाळी 5.30 वाजता आझाद मैदानावर शपथविधी होणार आहे. देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

त्याचवेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार सहाव्यांदा उपमुख्यमंत्री होणार आहेत. त्यांच्याशिवाय शिवसेना नेते एकनाथ शिंदे हेही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्रीपदावरून उपमुख्यमंत्री होणारे शिंदे हे दुसरे नेते आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह अनेक भाजप नेते या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
याशिवाय भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनाही निमंत्रण पाठवण्यात आले आहे. याशिवाय देशभरातील 400 संत-मुनी सहभागी होणार आहेत.

फडणवीस यांचा शरद पवार, उद्धव, राज ठाकरेंना फोन:शपथविधीचे दिले निमंत्रण,400 संत-मुनी सहभागी होणार
मुंबई-भाजपचे नेते देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना फोन करत शपथविधीला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आहे. मात्र, संसदेचे अधिवेशन सुरू असल्याने शरद पवार दिल्लीत असल्याने ते शपथविधीला येणार नसल्याचे फडणवीसांना कळवल्याची माहिती आहे.भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आज तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत. त्यांच्यासह एकनाथ शिंदे अन् अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. यासाठी उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना देखील फोन करुन निमंत्रण दिले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह अनेक भाजप नेते या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. याशिवाय भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनाही निमंत्रण पाठवण्यात आले आहे. याशिवाय देशभरातील 400 संत-मुनी सहभागी होणार आहेत.
दरम्यान देवेंद्र फडणवीसांनी फोन करत निमंत्रण दिल्यानंतरही ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे हे शपथविधीला जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे. राज ठाकरे हे त्यांच्या व्यैयक्तिक कारणामुळे शपथविधीला उपस्थित राहणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थित राहण्यामागचे कारण समजू शकेल नाही
आज मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल पाटील यांनी सांगितले. तसेच सात आणि नऊ डिसेंबर रोजी आमदारांचे शपथविधी होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
मिसेस महाराष्ट्र 2024 सीझन 8: साहस, आत्मविश्वास आणि मुकुट
पुणे-
दीर्घ प्रतीक्षेनंतर आलेल्या मिसेस महाराष्ट्र 2024 स्पर्धेचा यशस्वी समारोप 1 डिसेंबर 2024 रोजी HYATT पुणे येथे झाला. या कार्यक्रमाचे आयोजन अंजना आणि कार्ल मस्करेनहास यांनी, DIVA Pageants या संस्थेचे संस्थापक म्हणून केले होते. या वर्षीची स्पर्धा ही बुद्धिमत्ता, सौंदर्य, आणि सामाजिक जागरूकता यांना अधोरेखित करणारी होती, ज्याने सौंदर्य स्पर्धेचा पारंपरिक दृष्टिकोन बदलला.
या 8 व्या सलग वर्षीच्या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांतील 53 अंतिम स्पर्धकांनी भाग घेतला. या महिलांनी आपल्या अप्रतिम क्षमतांचे प्रदर्शन करत, वय, क्षेत्र किंवा पार्श्वभूमी यांच्यामुळे सौंदर्य, कौशल्य आणि कृपेच्या मर्यादा कधीही येत नाहीत हे दाखवून दिले.
कार्यक्रमाला प्रसिद्ध ज्यूरींची उपस्थिती लाभली. यात सोनाली कुलकर्णी, ज्यांनी “दिल चाहता है”, “सिंघम” यांसारख्या आयकॉनिक चित्रपटांमधून आपली छाप पाडली, तसेच अभिनेता विराट मडके यांचा समावेश होता. याशिवाय, अपेक्षा दबराल (DIVA क्वीन आणि Universal Woman India 2024 Social Project विजेत्या), कार्ल मस्करेनहास (DIVA Pageantsचे डायरेक्टर), फरहा अन्वर (मिसेस इंडिया 2016 आणि मिसेस एशिया 2018), मेघना देवान गोपाल (Woman of the Universe Indo Asia 2024), विद्या तिवारी (लोकप्रिय खाद्य समीक्षक आणि फॅशन स्टायलिस्ट), आणि शिखा सिंग (मिसेस महाराष्ट्र 2023 विजेत्या) हे ज्यूरी म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चैतन्य राठी यांनी केले, ज्यांनी प्रेक्षकांना संपूर्ण रात्र खिळवून ठेवले. अंजना आणि कार्ल मस्करेनहास, सिसिलिया सन्याल, माधवी घोष, आणि अपेक्षा दबराल यांच्या नेतृत्वाखाली अंतिम स्पर्धकांना त्यांच्या उत्कृष्टतेची ओळख करून देण्यासाठी प्रशिक्षित करण्यात आले.
स्पर्धेच्या चार दिवसांत, स्पर्धकांना पोझिंग, सादरीकरण, प्रश्नोत्तर, रॅम्प वॉक आणि इतर अनेक गोष्टींवर वैयक्तिक प्रशिक्षण देण्यात आले. पूजा सिंग यांनी कोरिओग्राफी केली, ज्यामुळे कार्यक्रम अधिक भव्य झाला. DIVA मार्गारेट शिबू यांना मिसेस मिलेनियम युनिव्हर्स इंडिया 2025, आणि DIVA राधिका भूषण यांना वुमन ऑफ द युनिव्हर्स इंडिया 2025 म्हणून गौरविण्यात आले. त्या आता आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करतील.
कार्यक्रमाचे यश हे मृणालिनी भारद्वाज, मृणाली तायडे, तनुजा बंगेरीया, सिसिलिया सन्याल, आणि स्पेंटा पटेल यांच्या समर्पित कार्यसंघामुळे शक्य झाले, ज्यांनी प्रत्येक गोष्टीची अचूक योजना आखली.
विजेते: मिसेस महाराष्ट्र 2024 सीझन 8
सिल्व्हर श्रेणी
• विजेती: नंदिता चौहान
• फर्स्ट रनर-अप: मेहर इक्बाल
• सेकंड रनर-अप: प्रतीक्षा जगताप
• थर्ड रनर-अप: मोनिका भोसले
गोल्ड श्रेणी
• विजेती: डॉ. स्वेता कारलापुडी
• फर्स्ट रनर-अप: डिंपल झवेरी
• सेकंड रनर-अप: प्रियांका गोवर्धन
• थर्ड रनर-अप: अमृता कौर
एलीट श्रेणी
• विजेती: प्राजक्ता भोईर
• फर्स्ट रनर-अप: अनुपमा सिंग
• सेकंड रनर-अप: डॉ. मनीषा नाईक (सहायक आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका)
• थर्ड रनर-अप: प्रमिता शेट्टी
रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या वतीने आयोजित कार्यशाळेत पीआयसीटीच्या प्राध्यापकांचा सहभाग
पुणे: रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ (RTMSSU) यांच्या वतीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) अंतर्गत ‘आधुनिक अध्यापन कौशल्ये व पद्धती’ या विषयावर विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी (PICT) मधील प्रा. योगेश हांडगे, प्रा. पराग जांभुळकर, डॉ. श्वेता धर्माधिकारी आणि प्रा. मृणाल मुळे यांनी सहभाग नोंदवला.
कार्यक्रमात प्रमुख वक्ते डॉ. अपूर्वा पालकर, कुलगुरू, RTMSSU यांनी ‘शैक्षणिक प्रणालीतील नवकल्पना व स्टार्टअप्स’ या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी आधुनिक अध्यापन कौशल्ये विकसित करण्यासाठी विविध दृष्टिकोन मांडले.
कार्यशाळेत शिक्षकांसाठी प्रभावी अध्यापन पद्धती, विद्यार्थी सहभाग वाढवण्यासाठीच्या युक्त्या आणि केस स्टडी पद्धतीचा शैक्षणिक क्षेत्रातील उपयोग यावर सखोल चर्चा करण्यात आली. हार्वर्ड बिजनेस स्कूलसारख्या संस्थांच्या उदाहरणांचा संदर्भ देऊन केस स्टडी पद्धतीचे महत्त्व पटवून देण्यात आले.‘केस स्टडी विश्लेषण: अध्यापन पद्धती’ या सत्रात विविध गटचर्चा व कृती कार्यक्रमांद्वारे केस स्टडी कशी तयार करावी आणि ती कशी निवडावी, यावर मार्गदर्शन करण्यात आले. या सत्रासाठी भावेश कोठारी (CEO, आय स्पार्क), निलेश सरवटे, आणि डॉ. अमर सक्सेना ( RTMSSU) यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
कार्यशाळेचा समारोप सहभागी शिक्षकांनी आपले अनुभव आणि संकल्पना मांडून करण्यात आला. या कार्यशाळेने शिक्षणक्षेत्रातील नवकल्पना स्वीकारण्यासाठी प्रोत्साहन दिल्याचे मत सहभागी शिक्षकांनी व्यक्त केले. डॉ. अमर सक्सेना आणि डॉ. राजेंद्र तळवारे यांनी उपस्थितांचे आभार मानत कार्यशाळेचा समारोप केला.
PICT महाविद्यालयाचे संचालक डॉ. पी. टी. कुलकर्णी, प्राचार्य डॉ. संजय गंधे, आणि कॉम्प्युटर विभागप्रमुख डॉ. गीतांजली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापकांनी कार्यशाळेत सहभाग नोंदवला.ही कार्यशाळा शिक्षकांना नवीन दृष्टिकोन आणि कौशल्ये आत्मसात करण्यासाठी उपयुक्त ठरली असल्याचे सहभागी शिक्षकांनी नमूद केले.
कबुतरांपासून उद्भवणाऱ्या समस्या: आरोग्यासाठी गंभीर धोका आणि प्रतिबंधात्मक उपाय
कबुतरं ही माणसांच्या शहरी जीवनाचा एक अविभाज्य भाग बनली आहेत. त्यांच्या शांत स्वभावामुळे आणि उघड्यावर सहज अन्न मिळाल्यामुळे त्यांची संख्या झपाट्याने वाढते. धार्मिक श्रद्धा आणि कबुतरांना अन्न टाकण्याच्या सवयी यामुळे त्यांना प्रोत्साहन मिळते. मात्र, या पक्ष्यांमुळे श्वसनसंस्थेशी संबंधित अनेक गंभीर आजार होऊ शकतात. कबुतरांच्या पिंता आणि विष्ठेतून होणाऱ्या आजारांबाबत पुणे महानगरपालिका सातत्याने इशारे देत आहे. कबुतरांची अनियंत्रित संख्या आता सार्वजनिक आरोग्यासाठी मोठा धोका बनली आहे.
कबुतरांपासून होणाऱ्या आरोग्यविषयक समस्या
कबुतरांच्या पिंता आणि विष्ठेमध्ये सूक्ष्म जीवजंतू, प्रथिने, आणि फफुंदीजन्य घटक असतात, जे हवेत मिसळून श्वसनमार्गातून शरीरात जातात. हे कण अनेक प्रकारच्या आरोग्य समस्यांना कारणीभूत ठरतात:
- हायपर सेंसिटिव्ह न्यूमोनिया (HP): हा आजार कबुतरांच्या विष्ठेतून बाहेर पडणाऱ्या सूक्ष्म कणांमुळे होतो. फुफ्फुसांवर परिणाम करणारा हा आजार दीर्घकालीन आणि गंभीर असतो. पुणे महानगरपालिकेच्या अहवालानुसार, श्वसनविकारांनी ग्रस्त नागरिकांमध्ये HP आजार होण्याचे प्रमाण 60-65% आहे.
- एलर्जी आणि दमा: कबुतरांच्या पिंतात असलेल्या प्रथिनांमुळे श्वसनमार्गात सूज येते, ज्यामुळे दमा आणि एलर्जी होऊ शकते.
- त्वचाविकार: कबुतरांच्या संपर्कामुळे काही व्यक्तींना त्वचेला खाज, पुरळ, किंवा चट्टे येण्याची तक्रार असते.
- जीवाणूजन्य आणि फफुंदीजन्य संसर्ग: कबुतरांच्या विष्ठेमुळे सैल्मोनेलोसिस आणि क्रिप्टोकोकोसिस यांसारख्या आजारांचा धोका असतो.
- श्वसनाचे दीर्घकालीन विकार: सतत कबुतरांच्या संपर्कात राहणाऱ्या लोकांना दीर्घकालीन श्वसन समस्या होऊ शकतात, ज्यामुळे जीवनशैलीत मोठा अडथळा निर्माण होतो.
पुण्यातील वाढती समस्या
पुणे शहरात कबुतरांची संख्या वेगाने वाढत आहे. उघड्यावर अन्न टाकण्याच्या सवयीमुळे आणि त्यांच्या पोषणासाठी अनुकूल वातावरण मिळाल्यामुळे त्यांच्या वावरात मोठी वाढ झाली आहे.
सार्वजनिक ठिकाणी, सोसायट्यांमध्ये आणि व्यस्त रस्त्यांवर कबुतरांचे मोठे थवे दिसून येतात.
त्यांच्यामुळे पिंता आणि विष्ठेचे प्रमाणही वाढले आहे, ज्यामुळे शहरातील हवेचा दर्जा खराब होतो.
या समस्यांमुळे पुणे महानगरपालिकेला शहरातील स्वच्छतेवर विशेष लक्ष द्यावे लागत आहे.
महानगरपालिकेच्या उपाययोजना
पुणे महानगरपालिका या समस्येवर प्रभावीपणे काम करत आहे. त्यांनी खालील उपाययोजना हाती घेतल्या आहेत:
- कबुतरांना अन्न टाकण्यावर बंदी: कबुतरांना उघड्यावर अन्न टाकणे हा त्यांची संख्या वाढवण्याचा प्रमुख घटक असल्याने, महापालिकेने अशा कृतींवर कडक बंदी घातली आहे.
- दंडात्मक कारवाई: जर कोणी अन्न टाकताना आढळले, तर संबंधित व्यक्तींवर दंड आकारण्याचा आदेश दिला आहे.
- आरोग्यविषयक जनजागृती: नागरिकांना कबुतरांपासून होणाऱ्या आजारांविषयी माहिती देण्यासाठी विशेष मोहिमा राबवल्या जात आहेत.
- सार्वजनिक स्वच्छता मोहिमा: शहरातील कबुतरांच्या विष्ठेचे प्रमाण कमी करण्यासाठी स्वच्छता मोहिमा राबवल्या जात आहेत.
नागरिकांची जबाबदारी
महानगरपालिकेच्या सूचनांचे पालन करणे आणि कबुतरांची संख्या कमी करण्यासाठी प्रयत्न करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.
- खाद्य टाकणे टाळा: कबुतरांना उघड्यावर अन्न देऊ नका.
- घर आणि परिसर स्वच्छ ठेवा: कबुतरांचे घरटे तयार होणार नाही, याची खबरदारी घ्या.
- आरोग्यविषयक सावधानता: कबुतरांच्या संपर्कात येण्यापासून बचाव करण्यासाठी मास्क घाला.
- डॉक्टरांचा सल्ला घ्या: श्वसनाचे कोणतेही त्रास जाणवल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या.
धार्मिक आणि भावनिक दृष्टिकोन
कबुतरांना अन्न टाकणे ही धार्मिक श्रद्धांशी संबंधित कृती असते. मात्र, सार्वजनिक आरोग्यासाठी याचा त्रास होतो. त्यामुळे श्रद्धा पाळतानाही आरोग्याला प्राधान्य दिले पाहिजे. कबुतरांना अन्न टाकण्याऐवजी अन्य पर्याय शोधणे योग्य ठरेल.
कबुतरांपासून होणाऱ्या समस्यांवर प्रतिबंध लावणे ही आजची गरज आहे. पुणे महानगरपालिकेच्या आदेशांचे काटेकोर पालन करून आपण आपल्या आरोग्याचे रक्षण करू शकतो. नागरिकांनी स्वच्छता राखून आणि कबुतरांच्या संपर्कात येण्यापासून बचाव करून या समस्येवर तोडगा काढावा. आरोग्य टिकवा, कबुतरांना उघड्यावर अन्न टाकणे थांबवा!
लेखक: प्रा. योगेश अशोकराव हांडगेपाटील , कात्रज, पुणे.
विशेष : देवेंद्र फडणवीस तसेच त्यांच्या पत्नीकडे कुठलेही चारचाकी वाहन नाही..पहा त्यांची आहे किती संपत्ती
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन आता सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला असून आता महायुती सरकारचे भाजपचे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असणार आहेत. आज 5 तारखेला मुंबई येथील आझाद मैदानावर फडणवीस मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. याच पार्श्वभूमीवर जाणून घेऊया देवेंद्र फडणवीस यांची एकूण संपत्ती किती आहे.
निवडणूक आयोगासमोर देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीच्यावेळी त्यांच्या संपत्तीची माहिती सादर केली होती. त्यानुसार फडणवीस यांची एकूण 13.27 कोटी रुपयांची संपत्ती आहे. याचसोबत त्यांच्यावर 62 लाख रुपयांचे देणे देखील आहे.विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस तसेच त्यांच्या पत्नीकडे कुठलेही चारचाकी वाहन नाही. 2023-24 या कालावधीत देवेंद्र फडणवीस यांचे उत्पन्न एकूण 79.3 लाख रुपये होती. याच्या एक वर्षांपूर्वी त्यांचे उत्पन्न जवळपास 92.48 लाख रुपये इतकी होती.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे स्थावर मालमत्ता बघितली तर पती-पत्नी दोघांकडे मिळून 1.27 कोटी रुपयांची शेतजमीन आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर 3 कोटींचे एक घर आणि 47 लाख रुपयांचे दुसरे घर आहे. या व्यतिरिक्त त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्या नावावर देखील 36 लाखांची रेसिडेन्शियल प्रॉपर्टी आहे.
निवडणूक आयोगासमोर सादर करण्यात आलेल्या उत्पन्न दाखल्यानुसार देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्या बँक खात्यात 5 लाखांहून अधिक डिपॉजिट आहे. देवेंद्र फडणवीस यांनी शेअर बाजार, बॉन्ड इत्यादीमध्ये गुंतवणूक केलेली नाही, मात्र त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी जवळपास 5.63 कोटी रुपयांचे बॉन्ड, शेअर आणि म्यूचुअल फंडमध्ये गुंतवणूक केली आहे. या व्यतिरिक्त देवेंद्र फडणवीस यांच्या एनएसएस पोस्टल सेव्हिंग खात्यात 17 लाख रुपये जमा आहेत, तसेच त्यांच्याकडे 3 लाख रुपयांची एलआयसी पॉलिसी देखील आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या इतर संपत्ती बद्दल बोलायचे झाले तर त्यांच्याकडे जवळपास 450 ग्रामचे सोने आहे व त्यांच्या पत्नी अमृता यांच्याकडे 900 ग्राम सोने आहे. याची किंमत जवळपास 98 लाख रुपये एवढी सांगितली जाते. . देवेंद्र फडणवीस यांच्यावर दोन कर्ज आहेत, जे त्यांच्या पत्नीकडून घेण्यात आले आहे, जवळपास 62 लाख रुपयांचे हे कर्ज त्यांच्यावर आहे.
शपथविधी सोहळ्यात 10 हजार लाडक्या बहिणींसाठी झाली स्वतंत्र कक्षाची उभारणी,२५०० पेक्षा अधिक पोलिस तैनात
देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे, अजित पवारांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी सोहळा गुरुवारी (५ डिसेंबर) सायंकाळी साडेपाच वाजता मुंबईतील आझाद मैदानात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह अनेक मुख्यमंत्री, संत-महंतांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमास ४० हजार लोक येतील, असा अंदाज असला तरी ३० हजारांपेक्षा जास्त लोक बसतील एवढा मोठा मंडप उभारण्यात आला आहे. शपथविधीसाठी मुख्य मंच ८ हजार चौरस फुटांचा आहे. याशिवाय ४ हजार चौरस फुटांचे दोन स्वतंत्र मंच उभारण्यात आले आहेत. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे महायुतीला पुन्हा सत्तेत येण्यासाठी सिंहाचा वाटा उचलणाऱ्या दहा हजार लाडक्या बहिणी शपथविधी सोहळ्याला येतील. त्यांच्यासाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे.
मुंबईत शपथविधी सोहळ्याला व्हीव्हीआयपी उपस्थित राहणार असल्याने अडीच हजारांहून अधिक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. १० पोलिस उपायुक्त, २० सहायक पोलिस आयुक्त, १०० पोलिस निरीक्षक, १५० सहायक व पोलिस उपनिरीक्षकांसह १५०० पेक्षा अधिक पोलिस शपथविधी सोहळ्यावर नजर ठेवतील. ड्रोनद्वारेही नजर असणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वासुदेव बळवंत फडके चौक, हजारीमल सोमाणी मार्गावरील चाफेकर बंधू चौक ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मार्ग, प्रिन्सेस स्ट्रीट ब्रिज ते कोस्टल रोडदरम्यानची दोन्ही बाजूंची वाहतूक गुरुवारी दुपारी १२ वाजल्यापासून ते कार्यक्रम संपेपर्यंत बंद राहणार असल्याचे वाहतूक पोलिस विभागाने कळवले आहे.
‘लाडकी बहीण कक्षात १० हजार महिला असतील. या लाडक्या बहिणी राज्याच्या विविध भागांतून येणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपने ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा दिला होता. आता शपथविधी सोहळ्यातही ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा दिसणार असून त्यासाठी खास कक्ष निर्माण करण्यात आला आहे. या ठिकाणी ‘एक हैं तो सेफ हैं’ अशा आशयाचे मजकूर असलेले टी-शर्ट परिधान करून महायुतीचे कार्यकर्ते बसणार आहेत. तसेच शेतकरी, संविधान असे आणखी दोन कक्ष निर्माण करण्यात आले आहेत.
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदास राजी,गृहसह सर्व महत्त्वाची खाती भाजपलाच
मुंबई – पक्ष टिकवायचा असेल तर सत्ता गरजेची आहे या अनुषंगाने काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास तयार झाले आहेत . शिंदे उपमुख्यमंत्री होण्यास राजी झालेत.असे शिंदे गटाचे शिरसाठ यांनी म्हटले आहे. मात्र गृह, विधी व न्याय, जलसंधारण, गृहनिर्माण, राजशिष्टाचार, महसूल, दुग्ध व पशुसंवर्धन, वन, सांस्कृतिक, उच्च व तंत्रशिक्षण, ओबीसी, सार्वजनिक बांधकाम (उपक्रम सोडून), कामगार, ऊर्जा, कौशल विकास, रोजगार या महत्त्वाच्या खात्यांवर भाजपने दावा केला आहे. २०१४ मध्ये भाजपचे १२३ आमदार असल्याने त्यांनी शिवसेनेला दुय्यम खाती दिली होती. यंदा १३२ आमदार असलेला भाजप अर्थ व नगरविकास सोडली तर मित्रपक्षांना कमी महत्त्वाची खाती देणार आहे.
गृह मंत्रालय मिळाले तरच सरकारमध्ये सामील होऊ, अशी ताठर भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. त्यांच्या पक्षाचे आमदार मात्र सत्तेत सहभागी होण्यासाठी उत्साही आहेत. शिंदे यांनी सत्तेबाहेर राहण्याचा विचारही न करता उपमुख्यमंत्रिपद घ्यावे, अशी गळ ते घालत आहेत. गेल्या वेळी शिंदेसेनेच्या काही आमदारांना मंत्रिपदाने हुलकावणी दिली होती. त्यांना आता संधी मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे शिंदेंच्या मनधरणीसाठी भाजपच्या नेत्यांसोबत शिवसेनेचे प्रमुख नेतेही सक्रिय हाेते.
आझाद मैदानावर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार शपथ घेतील हे निश्चित झाले आहे. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदी शपथ घेतील की नाही, हे अनिश्चित हाेते. गृह मंत्रालयावर ते अडून होते, तर भाजप ही मागणी पूर्ण करण्यास तयार नाही. पण रात्री उशिरा शिंदे शपथ घेण्यास राजी झाले. मुख्यमंत्र्यांसोबत काही कॅबिनेट मंत्र्यांचाही शपथविधी करावा, यासाठी शिंदे सेना व अजित पवार गट आग्रही आहे. पण भाजप हायकमांडकडून त्याला संमती मिळाली नव्हती.
युरोकुल युरोलॉजी इन्स्टिट्यूटतर्फे ७ व ८ डिसेंबरला’रिकन्स्ट्रक्टीव्ह युरोलॉजी’वर आंतरराष्ट्रीय कार्यशाळा
दोन दिवसीय कार्यशाळेत जगभरातून पाचशे तज्ज्ञ युरोलॉजिस्ट होणार सहभागी
पुणे : मूत्राशयाच्या किचकट शस्त्रक्रियांचे प्रात्यक्षिक, मूत्राशय व प्रोस्टेट संबंधित गुंतागुंतीचे आजार, तसेच आधुनिक उपचार पद्धती याविषयी चर्चा करण्यासाठी बाणेर येथील युरोकुल युरोलॉजी इन्स्टिट्यूटच्या वतीने दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय कार्यशाळा आयोजिली आहे. येत्या ७ व ८ डिसेंबर २०२४ रोजी ही कार्यशाळा होणार असल्याची माहिती युरोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. संजय कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी भारतातील पहिल्या महिला लॅप्रोस्कोपी सर्जन डॉ. ज्योत्स्ना कुलकर्णी, युरोलॉजिस्ट डॉ. पंकज जोशी आदी उपस्थित होते.
डॉ. संजय कुलकर्णी म्हणाले, “दोन दिवसांच्या या कार्यशाळेत जवळपास ३५ ते ४० शस्त्रक्रिया होणार असून, ‘युरोकुल’मध्ये होणाऱ्या या शस्त्रक्रियांचे लाईव्ह प्रक्षेपण बंतारा भवन येथील सभागृहात जगभरातून आलेले युरोलॉजिस्ट पाहणार आहेत. डॉ. संजय कुलकर्णी, डॉ. पंकज जोशी यांच्यासह लंडन येथील प्रा. अँथनी मंडी, इटली येथील डॉ. गुइडो बार्बगली, तामिळनाडू येथील डॉ. गणेश गोपालकृष्णन, लंडन येथील ज्युलियन शाह, डॉ. मिरोस्लाव्ह दोर्डोव्हिक, कतार येथील डॉ. तारिक अब्बास, अमेरिकेतील डॉ. ली झाह, डॉ. दिमित्री निकोलावास्की या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनात ही कार्यशाळा होणार आहे. भारतातील पाचशे, तर विदेशातील ८० तज्ज्ञ युरोलॉजिस्ट या कार्यशाळेत सहभागी होणार आहेत.”
‘युरेथ्रोप्लास्टी’मुळे मूत्राशय आणि संबंधित विकारांच्या रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. काही मुलांना जन्मतःच मूत्रविसर्गाची जागा शिश्नाच्या खालील बाजूस असते. अशा रुग्णांसाठी अद्ययावत शस्त्रक्रिया उपलब्ध आहे. तसेच संभोग करण्यास पुरुषाचे लिंग जर अकार्यक्षम असेल, तर रुग्णाच्या शरीरात ‘थ्री पीस पिनाईल प्रोस्थेसिस’ हे उपकरण शस्त्रक्रियेद्वारे बसवले जाते. त्यानंतर रुग्णाच्या इच्छेनुसार अंडकोषाजवळ बसवलेले बटन दाबल्यानंतर पुरुषाचे लिंग ताठ होते आणि तो संभोग करण्यास सक्षम होऊ शकतो, असे डॉ. संजय कुलकर्णी यांनी नमूद केले.
पुरुषांचे लिंग जर ताठ झाल्यावर वाकत असेल, तर तेही ऑपरेशन करून सरळ करता येते. याला ‘पेरोनीज डिसीज ‘असे म्हणतात. ऑपरेशननंतर पेशंटची लघवी गळत असेल, तर लघवीच्या मार्गाभोवती आर्टिफिशियल स्नायू बसवला जाऊ शकतो, जेणेकरून पेशंटचे लघवी गळणे थांबते, हेही ऑपरेशन युरोकूलमध्ये केले जाते. अपघातामध्ये किडनी व लघवीची पिशवी जोडणारी नळी तुटली व पोटात लघवी होऊ लागली तर त्या रुग्णाची नाजूक नळी परत जोडण्याचे ऑपरेशन रोबोटच्या साह्याने केले जाणार आहे. जगातील सर्वात अद्ययावत टेक्नॉलॉजी, रोबोटिक सर्जरी युरोकुलमधे मागील दीड वर्ष होत आहेत. ही शस्त्रक्रिया ‘दा विंची रोबोट’ वापरून केली जात आहे. या कार्यशाळेत विविध प्रकारच्या क्लिष्ट शस्त्रक्रिया रोबोटमार्फत केल्या जाणार आहेत, असे डॉ. संजय कुलकर्णी म्हणाले.
‘युरोकुल’ची बांधिलकी’
युरोलॉजी’ व ‘नेफ्फरोलॅाजी’साठी समर्पित १०५ बेडचे ‘युरोकुल’ भारतातील तिसरे मानांकित हॉस्पिटल आहे. मूत्रमार्गाच्या विकारांवरील अद्ययावत व सुसज्ज सेवा एकाच छताखाली २४ तास उपलब्ध आहेत. रुग्णांवर परवडणाऱ्या किंमतीत शस्त्रक्रिया, तसेच बिल भरण्यासाठी पैसे नाहीत म्हणून रुग्णाला परत पाठवले जात नाही, हे येथील वैशिष्ट्य आहे. या सामाजिक बांधिलकीमुळे देश-विदेशातील रुग्णांमध्ये ‘युरोकुल’ आपलेसे झाले आहे. जगातील सुमारे ५० देशांमध्ये जाऊन प्रात्यक्षिकांसह ‘युरेथ्रोप्लास्टी’ शस्त्रक्रिया करणारे डॉ. संजय कुलकर्णी ‘युरोकुल’चे प्रमुख आहेत, असे डॉ. ज्योत्स्ना कुलकर्णी यांनी सांगितले.
१२ दिवस चर्चेचा खल, पण भाजपसमोर एकमेव पर्याय..देवेंद्र फडणवीस
विधानसभेत भाजपला १३२ तर महायुतीला २३० हून अधिक जागांचे बहुमत मिळूनही १२ दिवस लांबलेल्या मुख्यमंत्री निवडीच्या चर्चेवर बुधवारी पडदा पडला. .निकालापासून १२ दिवस भाजपने मुंबईपासून ते दिल्लीपर्यंत मुख्यमंत्रिपदासाठी अनेक नावांची चाचपणी केली. भाजपमधील फडणवीसविराेधी गटाने मराठा किंवा आेबीसी चेहराच कसा गरजेचा आहे हे भाजप श्रेष्ठींना पटवून देत विनोद तावडे, रवींद्र चव्हाण, मुरलीधर माेहोळ यांची नावे चालवली. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. भाजपसह मित्रपक्षांतील बहुतांश आमदारांची देवेंद्र यांनाच पसंती होती. त्यामुळे केंद्रीय निरीक्षकांसमोर दुसऱ्या नावाचा पर्यायही आला नाही.केंद्रीय निरीक्षक विजय रुपाणी व निर्मला सीतारमण यांच्या उपस्थितीत सकाळी ११ वाजता भाजपच्या आमदारांची बैठक झाली. त्यात देवेंद्र फडणवीस यांना गटनेते बनवण्याचा प्रस्ताव एकमुखाने मंजूर करण्यात आला. एकनाथ शिंदे व अजित पवारांनीही त्यांना समर्थन दिले. नंतर फडणवीस, शिंदे व पवार यांनी राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केला
गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह यांची प्रमुख उपस्थिती राहिल. या वेळी मुख्यमंत्री व २ उपमुख्यमंत्रीच शपथ घेतील, असे भाजप नेते गिरीश महाजन, अतुल सावे, संजय शिरसाट यांनी सांगितले. पण गृह खात्यावर अडलेल्या शिंदेंनी रात्रीपर्यंतचा वेळ मागितला होता. फडणवीसांनी सलग दुसऱ्या दिवशी शिंदेंशी ५० मिनिटे चर्चा करून मन वळवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी निर्णय दिला नाही, पण शिरसाट यांच्या मते, शिंदे उपमुख्यमंत्री होण्यास राजी झालेत.
देवेंद्र फडणवीस यांना मराठा समाजाचा विरोध असल्याचे चित्र उभे केले होते. मात्र भाजपला सर्वच समाजातून भरघोस मतदान मिळाले, त्यातून हा भ्रम दूर झाला. आता मुख्यमंत्रिपदासाठी त्यांच्या नावाचा प्रस्ताव विधिमंडळाच्या बैठकीत मांडताना सर्व प्रमुख जातींच्या आमदारांना अनुमोदक म्हणून उभे करत फडणवीस हे सर्वमान्य नेतृत्व असल्याचे ठसवण्याचा भाजपने प्रयत्न केला. चंद्रकांत पाटील यांनी प्रस्ताव मांडला. ओबीसी नेते सुधीर मुनगंटीवार यांनी त्याला समर्थन देताना ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर श्रद्धा ठेवून चालणारे शिवभक्त’ अशी देवेंद्र यांना उपमा दिली. रवींद्र चव्हाण, आशिष शेलार, प्रवीण दरेकर, मेघना बोर्डीकर या मराठा आमदारांनीही अनुमोदन दिले. ओबीसी नेत्यांमधून पंकजा मुंडे, गोपीचंद पडळकर, दलित नेते संजय सावकारे, आदिवासी नेते दिलीप बोरसे व अशोक उईके या आमदारांनीही अनुमोदन दिले. ‘गावगाड्याचे रक्षणकर्ते, बहुजनांचे उद्धारक, गोरगरीब उपेक्षितांचे हृदयसम्राट’ अशी विशेषणे पडळकर यांनी लावली. तर बोरसे यांनी देवेंद्र यांचा उल्लेख ‘आदिवासींचे नेते’ असा केला.
राज्याचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून फडणवीस शपथ घेतील. यापूर्वी २०१४ ते २०१९ दरम्यान ५ वर्षे, २०१९ मध्ये ७२ तासांचे मुख्यमंत्री होण्याची नोंद त्यांच्या नावे. मुख्यमंत्र्याचा उपमुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्याचा मुख्यमंत्री होणारे ते एकमेव नेते.
यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्ष आहे. त्या वेळी भाजपचाच व संघभूमीतलाच मुख्यमंत्री हवा असा परिवाराचा आग्रह होता. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवताना श्रेष्ठींचा आदेश शिरसावंद्य मानून देवेंद्र यांनी आपल्या दाव्याचा ‘त्याग’ केला. तसेच इच्छा नसतानाही उपमुख्यमंत्री हे डिमोशनचे पद स्वीकारून पक्षनेतृत्वाच्या शब्दाचा मान राखला. त्याची बक्षिसी आता देवेंद्र यांना मिळाली. त्यांची प्रतिमा एकदम स्वच्छ आहे. भ्रष्टाचाराचे डाग नाहीत, प्रशासनावरही उत्तम पकड आहे.
मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये भाजपचे स्वबळावर सरकार होते. म्हणून तिथे नवा चेहरा देता आला. मात्र, महाराष्ट्रात महायुतीत तीन पक्ष आहेत. त्यातही एकनाथ शिंदे व अजित पवार या मुरब्बी नेत्यांवर ‘अंकुश’ ठेवू शकेल असे फडणवीस हे एकमेव नेते भाजपकडे आहेत. त्यामुळे महायुतीचे सरकार चालवण्यासाठी त्यांनाच पसंती देण्यात आली.
कुमार महाराष्ट्र केसरी पैलवान विक्रम पारखींचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
पुणे- कुमार महाराष्ट्र केसरीसह राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर मुळशीचे नाव करणारा विक्रम पारखी यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. बुधावरी नेहमीप्रमाणे व्यायामाल गेलेले असतानाच त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला आहे. थोड्याच दिवसात विक्रम यांचे लग्न देखील होणार होते, मात्र त्याआधीच काळाने घाला घातला.
कुस्तीच्या आखाड्यात अनेक दिग्गजांना चितपट करणारा पैलवान हृदयविकाराने गेल्याने मुळशी येथे शोककळा पसरली आहे. मुळशी येथील माण गावात विक्रम यांनी कसरत करत मेहनत घेत कुस्ती क्षेत्रात आपले नाव कमावले होते. येत्या 12 डिसेंबर रोजी विक्रम यांचा विवाह होणार होता. कुस्तीच्या आखाड्यात दंगल माजवणारा पैलवान गडी संसारच्या आखाड्यात उतरण्यापूर्वीच हारला. वयाच्या अवघ्या तिशीतच मृत्यू झाल्याने कुटुंबीयांना देखील मोठा धक्का बसला आहे.
विक्रम पारखी यांनी कुमार महाराष्ट्र केसरी पदावर आपले नाव कोरत मनांची गदा मिळवली होती. 2014 साली महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद द्वारे आयोजित कात्रज येथे महाराष्ट्र राज्य कुमार अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत विक्रम यांनी अजिंक्यपद पटकावले होते. याच सोबत विक्रम यांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पदके व किताब मिळवले आहेत.
विक्रम पारखी हे हिंदकेसरी पैलवान अमोल बुचडे यांचे शिष्य होते. विक्रम यांचे वडील शिवाजीराव पारखी हे निवृत्त सैनिक असून त्यांनी 1999 च्या कारगिल युद्धात लढा दिला आहे. विक्रम यांच्या जाण्यामुळे मुळशीसह कुस्ती जगतात देखील दुःख व्यक्त केले जात आहे.
30 कोटी रुपयांचे कर्ज देतो सांगून 13 लाखांची फसवणूक
पुणे- व्यवसायासाठी ३० कोटी रुपयांचे कर्ज तात्काळ मंजूर करून देतो असे सांगत, एकाने कन्स्ट्रक्शन व्यावसायिक व्यक्तीची १३ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात मंगळवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. राकेश विठ्ठल मारणे (रा. रिजेंट पार्क, बिबवेवाडी) असे आरोपीचे नाव असून, विकास गोपाल कुलकर्णी (६२, रा. सहकारनगर) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,हा प्रकार डिसेंबर २०२१ ते ऑगस्ट २०२२ दरम्यानच्या कालावधीत घडला. आरोपी राकेश मारणे याने विकास कुलकर्णी यांना ३० कोटी रुपयांचे कर्ज त्याच्या आरंभ लक्ष्मी निधी लिमिटेड मधून तात्काळ कर्ज मंजूर करून देतो असे सांगितले. तसेच, यासाठी फिर्यादी यांच्याकडून स्टँम्प ड्यूटीसाठी म्हणून १० लाख ५० हजार रुपये तीन टप्प्यात फोन पे व आरटीजीएस द्वारे त्याच्या स्वतःच्या बँक खात्यावर वळवून घेतले. यावेळी तक्रारदार यांच्याकडून सिक्युरिटी म्हणून घेतलेल्या एकूण १२ चेक पैकी एक चेक त्याने त्याची आई सुशिला मारणे यांच्या नावाने परस्पर बनवून घेतला. त्याद्वारे तक्रारदार यांच्या बँक खात्यातून २ लाख ३० हजार रूपये काढून घेतले.
यानंतर विकास कुलकर्णी यांना राकेश मारणे याने कर्ज मंजूर करुन देतो असे सांगत आपली १२ लाख ८० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आले. यानंतर त्यांनी विश्रामबाग पोलिसांकडे धाव घेत आरोपीविरोधात तक्रार दिली. दिलेल्या तक्रारीची चौकशी करून वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयमाला पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक एस खाडे करत आहेत.
