महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन आता सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला असून आता महायुती सरकारचे भाजपचे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असणार आहेत. आज 5 तारखेला मुंबई येथील आझाद मैदानावर फडणवीस मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. याच पार्श्वभूमीवर जाणून घेऊया देवेंद्र फडणवीस यांची एकूण संपत्ती किती आहे.
निवडणूक आयोगासमोर देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीच्यावेळी त्यांच्या संपत्तीची माहिती सादर केली होती. त्यानुसार फडणवीस यांची एकूण 13.27 कोटी रुपयांची संपत्ती आहे. याचसोबत त्यांच्यावर 62 लाख रुपयांचे देणे देखील आहे.विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस तसेच त्यांच्या पत्नीकडे कुठलेही चारचाकी वाहन नाही. 2023-24 या कालावधीत देवेंद्र फडणवीस यांचे उत्पन्न एकूण 79.3 लाख रुपये होती. याच्या एक वर्षांपूर्वी त्यांचे उत्पन्न जवळपास 92.48 लाख रुपये इतकी होती.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे स्थावर मालमत्ता बघितली तर पती-पत्नी दोघांकडे मिळून 1.27 कोटी रुपयांची शेतजमीन आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर 3 कोटींचे एक घर आणि 47 लाख रुपयांचे दुसरे घर आहे. या व्यतिरिक्त त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्या नावावर देखील 36 लाखांची रेसिडेन्शियल प्रॉपर्टी आहे.
निवडणूक आयोगासमोर सादर करण्यात आलेल्या उत्पन्न दाखल्यानुसार देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्या बँक खात्यात 5 लाखांहून अधिक डिपॉजिट आहे. देवेंद्र फडणवीस यांनी शेअर बाजार, बॉन्ड इत्यादीमध्ये गुंतवणूक केलेली नाही, मात्र त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी जवळपास 5.63 कोटी रुपयांचे बॉन्ड, शेअर आणि म्यूचुअल फंडमध्ये गुंतवणूक केली आहे. या व्यतिरिक्त देवेंद्र फडणवीस यांच्या एनएसएस पोस्टल सेव्हिंग खात्यात 17 लाख रुपये जमा आहेत, तसेच त्यांच्याकडे 3 लाख रुपयांची एलआयसी पॉलिसी देखील आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या इतर संपत्ती बद्दल बोलायचे झाले तर त्यांच्याकडे जवळपास 450 ग्रामचे सोने आहे व त्यांच्या पत्नी अमृता यांच्याकडे 900 ग्राम सोने आहे. याची किंमत जवळपास 98 लाख रुपये एवढी सांगितली जाते. . देवेंद्र फडणवीस यांच्यावर दोन कर्ज आहेत, जे त्यांच्या पत्नीकडून घेण्यात आले आहे, जवळपास 62 लाख रुपयांचे हे कर्ज त्यांच्यावर आहे.