Home Blog Page 755

तेजज्ञान फाउंडेशनच्या रौप्य महोत्सवी सोहळा ८ डिसेंबर रोजी पार पडणार

पद्मभूषण डॉ. विजय भटकर, सुप्रसिद्ध अभिनेता सोनू सुद यांची विशेष उपस्थिती राहणार

पुणे – गेल्या २५ वर्षांपासून समाजात अविरतपणे लोकहिताचे काम करणाऱ्या आणि जनसामान्यांच्या मनात सकारात्मक विचार  (हॅपी थॉट्स) रुजवणाऱ्या तेजज्ञान फाउंडेशन रौप्य महोत्सवी वर्ष यंदा साजर करत आहे. या रौप्य महोत्सवी सोहळा येत्या रविवारी ८ डिसेंबर रोजी सकाळी १०.०० वा. मोठ्या दिमाखात हा सोहळा पार पडणार असून प्रसिद्ध संगणक शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर हे विशेष पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

सदरील सोहळ्याला सन्माननीय अतिथी म्हणून सुप्रसिद्ध अभिनेता व चित्रपट निर्माता सोनू सूद उपस्थित राहणार आहे. सदरील सोहळा सिहंगड रोड येथील नांदोशीगावाजवळील मनन आश्रम येथे पार पडणार आहे. अशी माहिती पुणे श्रमिक पत्रकार भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये तेजज्ञान फाऊंडेशनच्या विश्वस्त कल्याणी धरणे, वरिष्ठ समन्वयक गोविंद बोंदिया, हेमंत सलामे, शिल्पा भटेवरा यांनी दिली.

तेजज्ञान फाउंडेशनची स्थापना तेजगुरू सरश्री यांनी केली असून त्यांनी आपले जीवन संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी समर्पित केले आहे.  या महोत्सवात त्यांचे हजारो शिष्य सहभागी होणार होणार आहेत.  या कार्यक्रमासाठी पुणेकरांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन तेजज्ञान फाऊंडेशनच्यावतीने करण्यात आले आहे.

संवादाची भाषा जपली तरच लोकशाही जिवंत राहील – प्रा. अपूर्वानंद.

पुणे (प्रतिनिधी): भारताच्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या संमिश्र संस्कृतीचा आढावा आणि मूल्यांचा गौरव, त्यांचं विश्लेषण या सर्वांचा सारांश म्हणजेच पंडित जवाहरलाल नेहरू लिखित “भारताचा शोध” हे पुस्तक असे प्रतिपादन दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक, प्रख्यात विद्वान आणि सामाजिक कार्यकर्ते प्रा. अपूर्वानंद यांनी केले. निमित्त होते लोकायत, ज्ञानभारती प्रतिष्ठान आणि ALERT आयोजित ‘भारत एक खोज’ या व्याख्यानमालेतील नेहरू के रस्ते या पहिल्या व्याख्यानाचे. हे व्याख्यान रविवार, 1 डिसेंबर 2024 रोजी सायं 6 वा. पत्रकार भवन येथे झाले. पुढे ते म्हणाले कि
अठरापगड जाती जमाती, विविध धर्म असून सुद्धा भारताला एकसंध बांधून ठेवलं ते संवादाने हि शिकवन महात्मा गांधी पासून ते जवाहरलाल नेहरू  यांनी आपल्याला दिली आहे संवादाची भाषा जर खऱ्या अर्थाने जपली तरच लोकशाही जिवंत राहील हाच विचार नेहरू यांनी दिला आहे. एकमेकांना जर आपण समजून घेत नसेल तर नवीन समाज निर्माण करू नाही शकणार अशा विचारसरणीमुळेच आंतरराष्ट्रीय जगात नेहरूंची स्वंतत्र ओळख बनली होती
भाषेच्या आनंदासाठी तरी कमीत कमी भारत एक खोज हे नेहरू लिखित पुस्तक सर्वांनी वाचायला पाहिजे असं आवाहन प्रा. अपूर्वानंद यांनी केलं.
भारतातील विविध परंपरा, भाषा, पेहराव, खाद्य नक्की काय होत्या हे आजच्या तरुणाईने समजून घेणं या उद्देशाने या व्याख्यानमालेच आयोजन केलं अस कार्यक्रमाचे समन्वयक नीरज जैन यांनी सांगितले.

सोशल मीडियावर माहिती शेअर केल्याने लवकर झाली आई-मुलाची भेट,हरवलेल्या 3 वर्षाच्या मुलाचा 4 तासात शोध

पुणे-पुणे शहरातील वाघोली परिसरात हरवलेल्या तीन वर्षांच्या मुलाचा शोध पोलिसांनी चार तासात लावला आहे. एका सजग महिलेने संबधित हरवलेला मुलगा मिळून आल्याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांच्या पथकाने तात्काळ त्याचा पालकांचा शोध घेऊन मुलाला सुखरूप त्यांच्या ताब्यात दिले.

वाघोली भागात बायफ रस्त्यावरील निखार लेडीज शॉपजवळ मनीषा चेतन सोनार यांना एक तीन वर्षांचा मुलगा एकटा दिसला. सोनार यांनी त्याच्याबरोबर कोण आहे का?, याचा शोध घेतला. परंतु, त्याच्या पालकांचा शोध न लागल्याने त्यांनी त्वरीत या घटनेची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट सहाचे पोलिस कर्मचारी प्रतिक्षा पानसरे, सचिन पवार यांना दिली. त्यांनी संबधित माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांना दिली.त्यामुळे पुणे शहरातून बेपत्ता झालेल्या महिला आणि मुलांचा शोध घेण्यासाठी ऑपरेशन मुस्कान मोहीम राबविण्यात येत आहे.

वाघोली भागात तीन वर्षांचा मुलगा मिळाल्याची माहिती फोटोसह पोलिसांनी त्वरीत सोशल मीडियावर प्रसारित केली. पोलिसांनी डोमखेल रस्ता, बायफ रस्ता, दत्तविहार परिसरातील सोसायटी, तसेच मजुरांच्या वसाहतीत शोधमोहीम राबविली. त्यानंतर अक्षय संस्कृती सोसायटीतून एक तीन वर्षांचे मुलगा काही तासापूर्वी बेपत्ता झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांचे पथक तेथे पोहोचले. पोलिसांनी मुलाचे फोटो सोसायटीतील रहिवाशांना दाखविले. मुलाच्या आईने फोटो पाहिले. मुलगा सुखरुप सापडल्याने तिला अश्रू अनावर झाले. पोलिसांनी मुलाचा शोध घेऊन त्याला सुखरुप ताब्यात दिल्याने मुलाच्या आईने पोलिसांचे आभार मानले.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक वाहिद पठाण, सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, सुहास तांबेकर, कानिफनाथ कारखेले, कीर्ती मांदळे यांनी ही कामगिरी केली आहे.

एकनाथ शिंदे रुग्णालयातून माघारी:ताप, घशाचा संसर्ग अन् पांढऱ्या पेशी घटल्यामुळे चेकअपसाठी गेले होते रुग्णालयात

ठाणे-महायुती सरकारचा शपथविधी अवघ्या एका दिवसावर आला असताना काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली आहे. ताप, घशाचा संसर्ग अन् पांढऱ्या पेशा घटल्यामुळे मंगळवारी दुपारी ते ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात गेले. तिथे विविध तपासण्या केल्यानंतर ते 3 च्या सुमारास मुंबईच्या दिशेने रवाना झालेत.एकनाथ शिंदे 3 दिवसांपूर्वी सातारा जिल्ह्यातील दरेगाव या आपल्या मूळ गावी गेले होते. तिथे त्यांना 105 डिग्री ताप आला होता. त्यांना सलाईनही लावण्यात आली होती. मुंबईत परतल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत काहीशी सुधारणा झाली. पण ताप उतरत नसल्यामुळे आता अखेर त्यांच्यावर रुग्णालयात जाण्याची वेळ आली होती.रुग्णालयातून माघारी परतल्नंयातर शिंदेंनी पत्रकारांशी संक्षीप्त संवाद साधला. त्यात ते म्हणाले, आता माझी तब्येत बरी आहे. मी चेकअपसाठी येथे आलो होतो.

निवडणूक आयोगाचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात: मारकडवाडीत मतपत्रिकेवर मतदान घेण्यास प्रशासनाने मज्जाव केल्याने संशय अधिकच बळावला : नाना पटोले

पोलीसांच्या दडपशाहीने मारकडवाडीच्या ग्रामस्थांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न हा लोकशाही व संविधानाचा खूनच.

लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी मारकडवाडीने सुरु केलेल्या लढाईला काँग्रेसचा पाठिंबा, हुकूमशाही हरेल व लोकशाहीच विजयी होईल.

मुंबई, दि. ३ डिसेंबर २०२४
विधानसभा निवडणुका पारदर्शक पद्धतीने पार पडल्या नाहीत अशी राज्यातील जनतेला शंका असल्यानेच विविध मार्गाने ईव्हीएम व निवडणूक आयोगाच्या कारभाराचा पंचनामा जनता करत आहे. सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी ग्रामस्थांनी मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याची तयारी केली होती पण पोलीस प्रशासनाने बळाचा वापर करून गावक-यांना मतदान करु दिले नाही. मतदान प्रक्रियेत काही घोळ नाही तर मारकडवाडीत मतपत्रिकेद्वारे मतदान घ्यायला प्रशासन का घाबरले? असा सवाल विचारत निवडणूक आयोगाचे बिंग फुटेल म्हणूनच गावकऱ्यांना मतपत्रिकेवर मतदान करु दिले नाही का?, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

यासंदर्भात प्रतिक्रीया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, मारकडवाडीमध्ये प्रशासन अत्याचारी ब्रिटिशांप्रमाणे वागले, त्यामुळे EVM आणि निष्पक्ष निवडणूक प्रक्रियेवर जे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे ते अधिक गडद झाले आहे. ‘कर नाही तर डर कशाला?’ याप्रमाणे प्रशासनाने हे मतदान पार पडू द्यायला हवे होते, पण भाजपा सरकारच्या काळात सर्व सरकारी यंत्रणाच दबावाखाली काम करत आहे. त्यामुळे सोलापूर पोलिसांनी त्यांना ‘वरून’ आलेल्या आदेशाची फक्त अंमलबजावणी केली. मारकडवाडीत प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून जनतेचा आवाज दाबण्याचाच प्रकार झाला आहे आणि हाच लोकशाही व संविधानाचा खून आहे.

विधानसभा निवडणुक प्रक्रियेदरम्यान गैरप्रकार होत असल्याच्या अनेक तक्रारी निवडणूक आयोगाकडे केलेल्या आहेत. काँग्रेस पक्षानेही सातत्याने निवडणुकीतील गैरप्रकाराच्या तक्रारी केल्या पण निवडणूक आयोग ‘कुंभकर्णी’ झोपेतून जागे झाले नाही. निवडणूक आयोग आता फक्त नावालाच स्वायत्त संस्था उरली असून आज ते भाजपाच्या हाताखालचे कठपुतली बाहुले झाले आहे का? असा प्रश्न जनता विचारत आहे. मारकडवाडीच्या ग्रामस्थांनी लोकशाहीच्या रक्षणार्थ एका मोठ्या लढ्याची सुरुवात केली आहे. काँग्रेस पक्ष या लढाईत मारकडवाडीच्या ग्रामस्थांसोबत आहे. या लढ्याचे आगामी काळात मोठ्या युद्धात रुपांतर होऊन हुकूमशाही हरेल व लोकशाहीचाच विजय होईल, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.

सलग 14 तास 11 कलाकारांचे होणार सादरीकरण : गायन, वादन आणि नृत्याची पर्वणी

रौप्य महोत्सवी वि. वि. द. स्मृती संगीत समारोह रविवारी
गांधर्व महाविद्यालय, पुणेतर्फे आयोजन : यंदाची संकल्पना ‌‘भैरव ते भैरवी‌’
पुणे : भारतीय संगीत प्रसारक मंडळाच्या गांधर्व महाविद्यालय, पुणेतर्फे पं. विष्णू दिगंबर पलुस्कर, पं. विनायकबुवा पटवर्धन आणि पं. दत्तात्रय विष्णू पलुस्कर यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित करण्यात येत असलेला यंदाचा रौप्य महोत्सवी (25वा) वि. वि. द. स्मृती संगीत समारोह येत्या रविवारी (दि. 8 डिसेंबर) आयोजित करण्यात आला आहे. दरवर्षी नव-नव्या संकल्पनेवर आधारित समारोहाचे आयोजन करण्यात येत असून यंदाची संकल्पना ‌‘भैरव ते भैरवी‌’ अशी आहे.
गायन, वादन, नृत्याचा समावेश असलेला यंदाचा समारोह सकाळी 8 ते रात्री 10 असा 14 तास चालणार असून यात 30 ते 40 वयोगटातील 11 कलाकारांचे सादरीकरण होणार आहे, अशी माहिती गांधर्व महाविद्यालय, पुणेचे प्राचार्य पंडित प्रमोद मराठे आणि उपप्राचार्या परिणीता मराठे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. वि. वि. द. स्मृती संगीत समारोह गांधर्व महाविद्यालय, पुणेच्या विष्णू विनायक स्वरमंदिरात होणार आहे. समारोह सर्वांसाठी खुला आहे.
पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी दि. 5 मे 1901 रोजी गांधर्व महाविद्यालयाची लाहोर येथे स्थापना केली. त्यानंतर या संकल्पनेचा प्रसार संपूर्ण भारतात झाला आणि देशाच्या विविध भागात गांधर्व महाविद्यालयांना सुरुवात झाली. पंडित पलुस्कर यांचे पट्टशिष्य पंडित विनायकबुवा पटवर्धन यांनी दि. 8 मे 1932 रोजी गांधर्व महाविद्यालय, पुणेची स्थापना केली. पलुस्कर यांचे चिरंजीव पंडित दत्तात्रय विष्णू पलुस्कर यांचे सांगीतिक शिक्षण याच संस्थेत झाले. गांधर्व महाविद्यालयाचे तीन महान कलाकार पं. विष्णू दिगंबर पलुस्कर, पं. विनायकबुवा पटवर्धन आणि पं. दत्तात्रय विष्णू पलुस्कर यांच्या स्मृती प्रित्यर्थ गेल्या 24 वर्षांपासून म्हणजे 1999 सालापासून वि. वि. द. स्मृती संगीत समारोहाचे आयोजन केले जात आहे. या तीनही महान कलाकारांच्या कार्याचे स्मरण कलाकार आणि रसिकांना असावे या प्रामाणिक हेतूने समारोहाचे आयोजन केले जाते. या समारोहात सहभागी होणारे कलाकार श्रद्धायुक्त भक्तीभावाने आपली कला सादर करत असतात.
यंदाच्या समारोहाची सुरुवात नम्रता गायकवाड यांच्या शहनाई वादनाने होणार आहे. त्यानंतर गायत्री जोशी (गायन), अभिषेक शिनकर (स्वतंत्र संवादिनी वादन), आदित्य मोडक (गायन), जयंत केजकर (गायन), ओजस अढीया (तबला), अभिषेक बोरकर (सरोद), अनन्या गोवित्रीकर (कथक), रमाकांत गायकवाड (गायन), शाकीर खान (सतार), आदित्य खांडवे (गायन) हे आपली कला सादर करणार आहेत. कलाकारांना किशोर कोरडे, आशय कुलकर्णी, अभिजित बारटक्के, रोहित मुजुमदार, प्रणव गुरव तबला साथ करणार असून अमेय बिच्चू, अभिनव रवंदे, अभिषेक शिनकर संवादिनीची साथ करणार आहेत. वि. वि. द. स्मृती संगीत समारोहाचे उद्घाटन सीजीएसटीचे आयुक्त डॉ. रवींद्र डांगे यांच्या हस्ते होणार आहे.
गेल्या 24 वर्षात वि. वि. द. स्मृती संगीत समारोहात पंडित संजीव अभ्यंकर, विदुषी आरती अंकलीकर-टिकेकर, पंडित विश्वमोहन भट्ट, पंडित उदय भवाळकर, पंडित भवानीशंकर, विदुषी अश्विनी भिडे-देशपांडे, पंडित विजय घाटे, पंडित प्रभाकर कारेकर, पंडित उल्हास कशाळकर, पंडित राजन-साजन मिश्रा, पंडित मधुप मुद्गल, विदुषी एन. राजम, पंडित निलाद्रीकुमार, विदुषी मालिनी राजूरकर, विदुषी वीणा सहस्रबुद्धे, उस्ताद सुजात खान, पंडित सुरेश तळवलकर, विदुषी पद्मा तळवलकर, पंडित व्यंकटेशकुमार आदी सुप्रसिद्ध कलाकारांनी आपली सेवा रुजू केली आहे.

एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली:ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात तातडीने केले दाखल

मुंबई–
महायुती सरकारचा शपथविधी अवघ्या एका दिवसावर आला असताना काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथे त्यांच्यावर घशाच्या संसर्गावर उपचार होणार असल्याची माहिती आहे.

एकनाथ शिंदे 3 दिवसांपूर्वी सातारा जिल्ह्यातील दरेगाव या आपल्या मूळ गावी गेले होते. तिथे त्यांना 105 डिग्री ताप आला होता. त्यांना सलाईनही लावण्यात आली होती. मुंबईत परतल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत काहीशी सुधारणा झाली. पण ताप उतरत नसल्यामुळे आता अखेर त्यांच्यावर रुग्णालयात जाण्याची वेळ आली आहे.

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची डेंग्यू आणि मलेरियाची चाचणी करण्यात आली होती. मात्र, या दोन्ही चाचण्या नेगेटिव्ह आल्या आहेत. मात्र, पांढऱ्या पेशी कमी जास्त होत असल्याने अजूनही त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सतत येत असणाऱ्या तापामुळे अँटी बायोटिक औषधे सुरु आहेत.

एकनाथ शिंदे यांची तब्बेत बरी नसल्याने ते कुठेही बाहेर पडत नाहीयेत. तर दुसरीकडे नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात आता शिंदेंची शिवसेना सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील, संजय शिरसाट यांनी भाजप नेत्यांसोबत आझाद मैदानावर पहाणी केली.

-वेद विद्येचे संरक्षण हे राष्ट्रीय कर्तव्यज्येष्ठ वेद अभ्यासक डाॅ. गणेश थिटे

शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळ तर्फे वेद पुरस्कार प्रदान
 पुणे: आज वेदाभ्यास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे; परंतु माध्यंंदिन शाखेतील शतपथ ब्राह्मण आणि कात्यायन श्रौतसूत्र यांचा अभ्यास होणे आवश्यक आहे . हे दोन्ही ग्रंथ कंठस्थ करण्याची खंंडित झालेली परंपरा पुन्हा सुरू व्हायला हवी. पूर्वी वेदांचा अभ्यास आणि त्यांचे संवर्धन करण्यासाठी आर्थिक अडचणी होत्या,  परंतु  आजच्या काळात वेद अभ्यासासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. वेद विद्येचे संरक्षण हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे, असे मत ज्येष्ठ वेद अभ्यासक डाॅ. गणेश थिटे यांनी व्यक्त केले.

शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळ यांच्या वेदविद्या संवर्धन उपक्रमाअंतर्गत सारसबागेजवळील वेदशास्त्रोत्तेजक सभा येथे मंंळा तर्फे वैदिकांना दिल्या जाणार्या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे आणि वेदविद्या संवर्धन समितीचे अध्यक्ष  डॉ. रवींद्र मुळे, संस्थेचे कार्याध्यक्ष विश्राम कुलकर्णी, कार्यवाह श्रीकांत जोशी, कोषाध्यक्ष दिलीप संभूस ,आहिताग्नी सुधाकरपंत कुलकर्णी उपस्थित होते.

वेदाचार्य देवेंद्र रामचंद्र गढीकर यांचा योगीश्वर याज्ञवल्क्य वैदिक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. वेदमूर्ती भगवान त्र्यंबकराव जोशी यांना आदर्श वेद-अध्यापक पुरस्कार प्रदान करण्यात आला. मानपत्र, पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ आणि २५ हजार रोख असे पुरस्काराचे स्वरूप होते.

कार्यक्रमात नारायण ज्ञानोबा बराटे यांना ज्ञानेश्वरी प्रदान करण्यात आली तर डॉ. ज्योत्स्ना संजय कुलकर्णी यांना कै. श्रीमती रत्नमाला जोशी यांच्या स्मरणार्थ सेवा रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. समर्थ काकडे, अद्वैत काकडे, अथर्व दुषी, विराज जोशी यांना वैदिक छात्र पुरस्कार  प्रदान करण्यात आले.

डाॅ. गणेश थिटे म्हणाले,  काही वर्षांपूर्वी वेदांचा अभ्यास करण्यासाठी छात्र संख्या खूपच कमी असे . मात्र या वर्षी  वेदांच्या परीक्षेसाठी ८०० ते ९००  बसले होते . यावरून वेदाभ्यास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे असे दिसते. भारतीयांनी वेदांचे जतन करणे आवश्यक असल्याचेही  त्यांनी सांगितले.

डॉ. रवींद्र मुळे म्हणाले, वेदांचे सामर्थ्य मोठे आहे. ज्ञान आणि भक्तीची जीवनात आवश्यकता आहे. ज्ञानाचा निधी असणारे वेद हे भारतीय संस्कृतीचे आधारभूत ग्रंथ आहेत. वेद कंठस्थ करताना परिश्रम घ्यावे लागतात. एकही शब्द मागेपुढे झाला तरी संपूर्ण अभ्यासाला ग्लानी येते . त्यामुळे वेद विद्येचा अभ्यास करणारे आणि वेद कंठस्थ करणाऱ्यांचा सन्मान व्हायला हवा.

अनघा भावे यांनी सूत्रसंचालन केले. विश्राम कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. श्रीकांत जोशी यांनी आभार मानले.

ईव्हीएममध्ये प्रोग्रामिंग शक्य:माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

पुणे : ईव्हीएममध्ये प्रोग्रामिंग शक्य आहे. जगातील प्रगत देशांमध्ये ईव्हीएमवर निवडणुका होत नाहीत. भारतात हट्टाने ईव्हीएमवर निवडणुका घेतल्या जात आहेत. भारतातील लोकशाही टिकावी, ही जगातील लोकशाही प्रेमी नागरिकांची इच्छा आहे. निवडणूक प्रक्रियेबाबत आणि निकालाबाबत सामान्य नागरिकांच्या मनात संशयाचे वातावरण आहे. केंद्रीय निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारने जनतेमधील संशय दूर केला पाहिजे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी केले.

अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या माजी अध्यक्षा,  श्रीमती सोनीया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा, कर्तव्य आणि त्याग सप्ताहाचे उद्घाटन पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

 माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, माजी आमदार रवींद्र घंगेकर, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस संजय बालगुडे , माजी नगरसेविका लता राजगुरू, अविनाश बागवे, दत्ता बहिरट , सौरभ अमराळे, सदानंद शेट्टी, कैलास कदम आणि सप्ताहाचे आयोजक व माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यावेळी उपस्थित होते. टिळक रस्त्यावरील मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या

 पदमजी हॉल येथे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या गर्दीत हा कार्यक्रम पार पडला.

पद असो नसो पण वीस वर्षे हा उपक्रम होत आहे. देशात असा कार्यक्रम होत नाही. याबद्दल मोहन जोशी यांचे अभिनंदन केले पाहिजे, असे उद्गार चव्हाण यांनी काढले. ते म्हणाले, देशातील लोकशाही आणि राज्य घटनेवा गंभीर धोका निर्माण झाला आहे. देशात लोकशाही आहे का , हा मूलभूत प्रश्न निर्माण झाला आहे. लोकशाही देशात चढ उतार येतात. परंतु, सध्याचा निकाल आश्चर्यकारक आहे. लोकशाही पद्धतीने निवडणूक घेतली हे सिद्ध करण्याची जबाबदारी निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारची आहे. लोकशाहीचा खून झाला तर राज्य घटनेला अर्थ उरणार नाही. सामान्य लोकांचा विश्वास बसेल यासाठी सरकारला प्रयत्न करावे लागतील.

सोनिया गांधींबद्दल ते म्हणाले, सोनियाजींनी पंतप्रधानपदाचा त्याग केला या क्षणाचा मी साक्षीदार आहे. १९९१ ला सोनिया गांधी यांनी केवळ इच्छा व्यक्त केली असती तरी त्या पंतप्रधान झाल्या असत्या. २००४ चा विजय सोनिया गांधींचा होता. त्यांच्या जाहीरनाम्यावर लोकांनी मते दिली. तरीही त्यांनी पंतप्रधानपद स्वीकारले नाही. माहितीचा अधिकार, अन्न सुरक्षा कायदा , मनरेगा हे कायदे आणि योजना ही सोनिया गांधी यांची दूरदृष्टी आहे. राष्ट्रीय  सल्लागार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी मोठे काम केले आहे.

पवार म्हणाले, सत्तेत बसलेले लोक भारतीय संस्कृतीचे  ठेकेदार नाहीत. सोनिया गांधींनी भारतीय संस्कृती जपली आहे. राजीव गांधी यांच्या मृत्यूनंतर त्या देश सोडून गेल्या नाहीत. त्यांनी भारताची सेवा केली. आज महात्‍मा गांधी, पं. नेहरू , इंदिरा गांधी यांची प्रतिमा मलिन करण्याचा डाव सुरू आहे. त्याविरोधात रस्त्यावर उतरले पाहिजे.

जोशी म्हणाले,  सोनियाजी गांधी यांनी पंतप्रधान पदाचा त्याग केला याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी २००४ सालपासून सेवा, कर्तव्य आणि त्याग सप्ताह काँग्रेसच्या वतीने साजरा करत असून यंदाचे २० वे वर्ष आहे. देशातील लोकशाही धोक्यात आली आहे. एकतर्फी निकालामुळे अस्वस्थता असली तरी काँग्रेसचा कार्यकर्ता जिवंत आहे. पुढील निवडणुकींना सामोरे जाण्यासाठी तो तयार आहे. प्रथमेश आबनावे यांनी सूत्रसंचालन केले. आभारप्रदर्शन दत्ता बहिरट यांनी केले.

झी स्टुडिओज आणि रिंकू राजगुरू पुन्हा एकत्र

जिजाई’ चित्रपटाचा मुहूर्त सोहळा संपन्न

झी स्टुडिओज आणि कोकोनट फिल्म्स निर्मित ‘जिजाई’ हा बहुप्रतीक्षित चित्रपट लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्याने ‘जिजाई’बद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. नुकताच जिजाई चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्याचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला असून नवोदित दिग्दर्शक तृशांत इंगळे दिग्दर्शित या चित्रपटात ‘सैराट फेम’ रिंकू राजगुरू प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. तर अपूर्वा शाळीग्राम या चित्रपटाच्या डीओपी आहेत. कपाळी चंद्रकोर लावलेली रिंकू या चित्रपटात एका वेगळ्याच अंदाजात दिसणार आहे.

‘सैराट’च्या यशानंतर रिंकू राजगुरू आणि झी स्टुडिओज यांच्यात एक वेगळं नातं निर्माण झालं आहे. आता या जोडीने पुन्हा एकदा ‘जिजाई’च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्याचा निर्धार केला असून हा नवीन चित्रपट लवकरच प्रकारांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार, याची आता प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत.

झी स्टुडिओजचे बवेश जानवलेकर म्हणतात, ‘’झी स्टुडिओजने नेहमीप्रमाणे नवोदितकलाकारांना आणि दिग्दर्शकांना व्यासपीठ उपलब्ध करून देऊ असते. झी स्टुडिओजने प्रेक्षकांसाठी कायमच दर्जेदार आणि वेगळ्या आशयाचे चित्रपट सादर केले आहेत. ‘जिजाई’ हा त्याच परंपरेचा भाग आहे.’’

‘जीनोम टू ओम’ विज्ञानाकडून मेटासायन्सचे संक्रमण शोधतोयूजीसीचे- माजी उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन

पुणे, दि.२ डिसेंबर: “आधुनिक आणि तंत्रज्ञानातील नेत्रदीपक प्रगती मुळे आपले जीवन अधिक आरामदायी बनले आहे. परंतु ते अधिक निरोगी किंवा शांततेचे नाही. जीनोम टू ओम हे आधुनिक विज्ञानाकडून मेटासायन्सकडे इच्छित संक्रमण शोधून काढतो. जीवनाच्या सर्व पैलूंमधील परस्परसंबंध ओळखून नैतिक आणि आध्यात्मिक अंतदृष्टी यांचे मिश्रण करते. हे सर्वांगीण वैज्ञानिक दृष्टिकोनावर जोर देते.” असे विचार यूजीसीचे माजी उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत आणि संतश्री ज्ञानेश्वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने युनेस्को अध्यासना अंतर्गत आयोजित २९वी तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेत ‘जीनोम टू ओम’ या विषयावर ते बोलत होते.
सत्राच्या अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष व युनेस्को अध्यासनाचे प्रमुख प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड होते. तसेच डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस व २९ व्या तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेचे समन्वयक व प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, डॉ. चौधरी व डॉ.अनिल हिवाळे उपस्थित होते.
डॉ. भूषण पटवर्धन म्हणाले,“ जीनोम गतिशील आधुनिक विज्ञानाचे प्रतिनिधित्व करतो तर ओम वैश्विक चेतनेला अंतिम वास्तव म्हणून मूर्त रूप देतो. हे पुस्तक प्रायोगिक ज्ञान आणि उच्च शहाणपणा यांच्यातील अंतर भरून काढण्याचा एक प्रयत्न आहे. जीनोम टू ओम हे मेटा सोसायटीच्या अर्थपूर्ण प्रगतीची आशा देते आणि वैज्ञानिक प्रगती आणि कालातील मानवी मूल्ये यांच्यात सामंजस्याने पुढे जाण्याची आशा देते. तसेच सार्वत्रिक शांतता आणि कल्याणासाठी विविधतेमध्ये एकता शोधण्याच्या आपल्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचण्यासाठी आणि प्रवास सुरू ठेवण्यासाठी जीवनाचा ओम मार्ग आहे.”
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“ मन आणि आत्मा या गोष्टींचे अधिक चिंतन होणे गरजेचे आहे. जीवनाचा हेतू व कर्तव्य काय आहे याची जाणिव यातून होते. सृष्टीवरील सर्व धर्म हे मानवाला कसे जगावे आणि कसे जगू नये याची शिकवण देतात. ओम यामध्ये संपूर्ण विश्वाचे ज्ञान समावलेले आहे.”
तत्पूर्वी सकाळच्या सत्रात शिवव्याख्याते प्रा. नितिन बालगुडे पाटील यांनी ‘ मराठा तितुका मेळवावा’ या विषयावर सांगताना, छत्रपती शिवरायांचा काळच डोळ्यासमोर उभा केला. त्यांनी हिंदवी स्वराज्याची उभारणी बरोबरच आजच्या काळात त्याचा उपयोग कसा करावा हे सांगितले. छत्रपती राजांनी ज्या पद्धतीने राज्य कारभार केला ती पद्धत आज अस्तित्वात आणावी. तसेच राजांनी ज्या पद्धतीने संपूर्ण हिंदुस्थानावर राज्य केले तसेच आज प्रत्येक मराठी व्यक्ती ने देशात कुठेही काम करावे. असा सल्ला ही त्यांनी दिला.
तत्पूर्वी प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. जगदीश हिरेमठ यांनी प्रेम आणि विश्वास या गोष्टीवर भर देऊन आज प्रत्येकाला प्रेमाची गरज का आहे हे सांगितले. प्रेमाच्या भावनेने शरीरात होणार्‍या हालचालीचे विस्तृतीकरण केले. त्यामुळे व्यक्तीची मन स्थिती किती उत्तम राहते हे समजावले.
सूत्रसंचालन डॉ. मिलिंद पात्रे आणि डॉ. यांनी आभार मानले.

रक्तास जात, पात, धर्म नसुन, रक्तदान मानवता धर्म शिकवतो ⁃ काँग्रेस नेते गोपाळ तिवारी

स्व.एस एस धोत्रे फौंडेशन तर्फे रक्तदान शिबीरात ७५ जणांचे रक्तदान..!
पुणे –
पुणे शहरात ‘रक्ताचा तुटवडा’ असल्याने रक्तदान शिबीर वरदान ठरते आहे मात्र रक्तास जात, पात, धर्म नसल्याने रक्तदानाचे संस्कार मानवता धर्म शिकवत असल्याचे उदगार काँग्रेस नेते व राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी काढले.
महाराष्ट्र राज्य वडार समाज संघटनेचे नेते, संस्थापक अध्यक्ष स्व. संगण्णाजी धोत्रे व स्व. संजयजी धोत्रे यांचे स्मरणार्थ मॉडेल कॉलनी छ. शिवाजी महाराज नगर येथील ‘एस. एस. धोत्रे फाऊंडेशन’ वतीने आयोजित ‘रक्तदान शिबिराचे’ उद्घाटन काँग्रेस नेते गोपाळ तिवारी यांचे हस्ते झाल्या प्रसंगी ते बोलत होते. सामाजिक व मानवी गरजेची हाक लक्षांत घेऊन तत्परतेने रक्तदान करणाऱ्या तरुण – तरुणींना धन्यवाद देत अभिनंदन करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
शिबिराचे संयोजक – निमंत्रक विक्रांत धोत्रे (उपाध्यक्ष छत्रपती शिवाजीनगर युवक काँग्रेस) व धोत्रे कुटुंबीयांनी ऊपस्थितांचे स्वागत केले.
वडार समाजाचे नेते स्व. शिव्वाण्णा धोत्रे यांचे पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
या प्रसंगी माजी उपमहापौर मुकारी अलगुडे, इंटक कामगार संघटनेचे कायदे सल्लगार ॲड. फैयाज शेख, राकेश विटकर, शहर काँग्रेस सरचिटणीस संजय मोरे, भाजप युवा मोर्चाचे हेमंत डाबी, सौ पौर्णिमा भगत, अदिती निकम, अण्णा भंडगर, सुरेश सपकाळ, अपर्णा कुऱ्हाडे, प्रा. रोहित आळंदीकर, नरेश आवटे, सौ वैशाली धोत्रे इ उपस्थित होते..!
माजी आमदार रविंद्र धंगेकर, युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष सौरभ अमराळे यांनी रक्तदान शिबिरास भेट दिली असता त्यांचे हस्ते “रक्तदात्यांस सर्टिफिकेट व स्व एस एस धोत्रे यांचे स्मरणार्थ भेट वस्तु” देऊन सन्मानित करण्यात आले.धंगेकर यांनी संयोजकांचे सामाजिक उपक्रमा बद्दल कौतुक केले.
सुत्र संचालन – ॲड फैयाज शेख यांनी केले तर आभार प्रदर्शन संयोजक श्री विक्रांत धोत्रे यांनी केले. रक्तदान शिबिराचे संकलन “अक्षय ब्लड बँकेने” केले. सदर शिबिरात ७५ रक्त बाटल्यांचे संकलन झाले. डॅा राजकुमार आणि त्यांचे सहकारी पल्लवी महांडवे, प्रीती पवार, प्रणाली होले, प्रणय घाडगे, नवनाथ कानडे इ मेडीकल टिम चे सहकार्य लाभले.
रक्तदान शिबिराचे यशस्वी करण्यात राहुल शिंदे, साहिल शिंदे, इंद्रनील मराठे, जैष्णवी धोत्रे, सचिन धोत्रे, नरेश आवटे, यशवंत इरकल, रुपाली ठाकरे, प्रशांत शेट्टी, विकास सोनावणे, अनुष्का बुरगुटे, विद्या जाधव, सिकंदर शेख,आकाश सुरवसे,इ चे सहकार्य लाभले.
तसेच ट्रस्टचे कार्यकर्ते इंद्रनील मराठे, रुपाली ठाकरे, राहुल शिंदे, शुभम साबळे, रोहित शर्मा, आकाश सुरवसे, सोमनाथ निळ, प्रमोल पाटील, शुभम सावळे, विकास सोनवणे, अनुष्का बुरगुटे,आदित्य जरड, श्रावस्ती कांबळे, विद्या जाधव, अजिंक्य जोगदंड, यशोधन मोरे, विशाल भोर, प्रद्ध्युम स्वामी, प्रज्वल सुवर्ण, गणेश पवार व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

५ कि.मी., १० कि.मी. व व्हीलचेअर स्पर्धेला पुणेकरांचा प्रतिसाद

पुणे– ३८वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन रविवार १ डिसेंबर रोजी पहाटे ३.०० वाजता ‘नाइट मॅरेथॉन’ म्हणून सुरू झाल्यानंतर सकळी ६.३० वाजता १० कि.मी, सकाळी ७.०० वाजता ५ कि.मी आणि ३ कि.मी..व्हीलचेअर स्पर्धा पार पडल्या. यास पुणेकरांनी उदंड प्रतिसाद दिला.छत्रपती संभाजीनगरचे लाचलुचपत प्रतिबंधक अधीक्षक संदीप अटोळे व बीडचे उपअधीक्षक शंकर शिंदे यांनी १० कि.मी, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी ५ कि.मी आणि पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन ट्रस्टचे अध्यक्ष अभय छाजेड यांनी व्हीलचेअर स्पर्धेला फ्लॅग ऑफ केला. त्यानंतर यास्पर्धांना प्रारंभ झाला.
पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन ३८ वर्षे चालू आहे हे कौतुकास्पद असून, पुणे महानगरपालिकेत सत्ताबदल झाला तरी या मॅरेथॉनला पुणे महानगरपालिकेचे सहकार्य कायम राहिले व राहील..मी पुण्याचा खासदार म्हणून पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनला सदैव सहकार्य करेन, अशी ग्वाही केंद्रीय राज्यमंत्री व पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी यानिमित्त दिली.
१० कि.मी पुरुष गटात प्रथम क्रमांक अभिनंदन सूर्यवंशी, द्वितीय क्रमांक युनूस शहा आणि तृतीय क्रमांक नरेंद्र सिंग यांना मिळाला. १० कि.मी महिला गटात प्रथम क्रमांक रिया धोत्रे, द्वितीय क्रमांक साक्षी भंडारी आणि तृतीय क्रमांक शिवानी चौरसिया यांना मिळाला.
५ कि.मी पुरुष गटात प्रथम क्रमांक सौरभ मेहरा, द्वितीय क्रमांक उत्तम पाटील आणि तृतीय क्रमांक ओमकार जाधव यांना मिळाला. ५ कि.मी महिला गटात प्रथम क्रमांक मानसी यादव, द्वितीय क्रमांक वैष्णवी सावंत आणि तृतीय क्रमांक प्रिया गुळवे यांना मिळाला.
३ कि.मी व्हीलचेअर स्पर्धेत पुरुष गटात प्रथम क्रमांक सोमनाथ यादव, द्वितीय क्रमांक गिरीश सव्वाशेर आणि तृतीय क्रमांक ओम शिंदे यांना मिळाला. ३ कि.मी. व्हीलचेअर महिला गटात प्रथम क्रमांक भाग्यश्री माझिरे, द्वितीय क्रमांक तृप्ती चोरडिया आणि तृतीय क्रमांक कोमल माळी यांना मिळाला.

या सर्व स्पर्धा सणस ग्राऊंड येथून सुरू झाल्या. १० कि.मी. स्पर्धा सणस मैदान – सारसबाग – सिंहगड रस्तामार्गे हिंगणे चौक येथून परत, ५ कि.मी स्पर्धा सणस ग्राऊंड – सिंहगड रस्ता – पानमळा व परत आणि व्हीलचेअर स्पर्धा सणस मैदान – सिंहगड रस्ता तेथून दांडेकर पूल तेथून परत अशा संपन्न झाल्या. या संपूर्ण मार्गावर पुणेकरांनी मोठी गर्दी करून स्पर्धकांना टाळ्याचा कडकडाट करीत प्रोत्साहन दिले.

न्यायपालिकेत पुरोगामी राज्याला सुसंगत अशी भूमिका मध्यस्थींनी घ्यावी- सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती भूषण गवई

पुणे, दि. 2: महाराष्ट्र ही संत, महापुरुषांची भूमी असून त्याला समाजसुधारकांचा वारसा लाभलेला आहे; न्यायपालिकेत पुरोगामी राज्याला सुसंगत अशी भूमिका मध्यस्थींनी घ्यावी, न्यायानंतर संबंधित व्यक्तींच्या चेहऱ्यावर आंनद व समाधानाची भावना दिसली पाहिजे, यादृष्टीने काम करावे, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती व राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे (नालसा) कार्याध्यक्ष भुषण गवई यांनी केले.

पुणे येथे 30 नोव्हेंबर रोजी आयोजित एकदिवसीय विभागीय मध्यस्थी परिषदेच्या उद्धाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती प्रसन्न वराळे, मुंबई उच्च न्यायलयाचे न्यायमुर्ती तथा महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरणाचे कार्याध्यक्ष अतुल चांदूरकर, मुंबई उच्च न्यायलयाचे न्यायमुर्ती रेवती मोहिते-ढेरे, रवींद्र घुगे, नितीन सांभरे, भारती डांगरे, अमित बोरकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई चे सदस्य सचिव समीर अडकर. तसेच चेतन भागवत, श्रीपाद देशपांडे, सागर इंगळे व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव सोनल पाटील आदी उपस्थित होते.

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती गवई म्हणाले, भारतीय राज्यघटनेत न्यायाचा हक्काला मुलभूत हक्क मानला आहे. देशात महाराष्ट्राची न्यायपालिका देशात अतिशय चांगली न्यायपालिका म्हणून ओळखली जाते, याचा आम्हाला अभिमान आहे. देशात विविध कायदे निर्माण करुन गावागावातील तंटे सर्वांनुमते मिटवून सकारात्क मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

मध्यस्थींनी दोन व्यक्ती, संस्थामधील मतभेद दूर करुन समान न्याय मिळेल यादृष्टीने प्रयत्य करावे. न्यायपालिकेत व्यक्तींना न्याय देतांना तो कमी वेळेत व कमी खर्चासोबतच चांगल्यारितीने न्याय देण्यावर भर दिला पाहिजे, हे उद्दिष्ट साध्य करण्यावर सकारात्म दृष्टीकोन अंगीकारत मध्यस्थीची महत्वाची भूमिका पार पाडावी. राज्यात मध्यस्थीची सुरू असलेली चळचळ यशस्वी करण्याकरीता प्रयत्न करावे. याकरीता अंगी इच्छा, तळमळ असावी लागते, असेही न्यायमुर्ती गवई म्हणाले.

श्री. वराळे म्हणाले, पुणे ही संताची भूमी असून या भूमीला संताची शिकवण लाभलेली आहे. समाजात विषमता दूर करुन समता प्रस्थापित करण्यासोबच वंचिताना न्याय देणे ही संताची शिकवणीप्रमाणेच आपल्या संविधानाचे तत्व आहे. यादृष्टीने समाजातील वंचिताना न्याय देण्यासोबतच विषमता दूर करण्याकरीता प्रयत्न करावे. नालसा उद्धघोष गीताच्या माध्यमातून ‘न्याय सर्वांसाठी’ ही संकल्पना सर्वत्र रुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यातून विधीसेवेचा उद्देशही व्यक्त होत आहे, असेही श्री. वराळे म्हणाले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरणाचे (मालसा) मराठी भाषेतील उद्धघोष गीत, मध्यस्थी हस्तपुस्तिका तसेच विधी सेवा हस्तपुस्तिकेचे अनावरण करण्यात आले त्याच बरोबर राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या समाज माध्यमांचे ई-लोकार्पण करण्यात आले.

निवडणूक संपताच एसटीची भाडेवाढ, लाडकी बहीण, शेतकरी कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव योजनेवरही संशय.

राज्यात पुन्हा कंत्राटी भरती सुरु करून भाजपा युती कडून तरुणांच्या स्वप्नावर नांगर फिरवण्याचे काम: नाना पटोले

काँग्रेस पक्षाचा कंत्राटी नोकर भरतीला तीव्र विरोध, कंत्राटी भरती रद्द करा अन्यथा रस्त्यावर उतरू.

मुंबई, दि. २ डिसेंबर २०२४
राज्यात जवळपास २.५ लाख सरकारी पदे रिक्त आहेत. विविध विभागातील मागासवर्गिय पदांचा अनुशेषही भरला नाही. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून दहा दिवस झाले तरी राज्याचे मुख्यमंत्रीपद ही रिक्त आहे. बेरोजगारांची मोठी फौज राज्यात असून लाखो तरुण मुले मुली नोकरीची अपेक्षेने वाट पहात असताना सरकारने पुन्हा एकदा कंत्राटी भरती सुरु करून सुशिक्षित तरुणांना नोकर भरतीच्या दिलेल्या आश्वासनाला हरताळ फासला आहे. काँग्रेस पक्षाचा कंत्राटी नोकर भरतीला तीव्र विरोध असून ही भरती रद्द करा अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.
यासंदर्भात प्रतिक्रीया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करण्यास काँग्रेस पक्षाचा तीव्र विरोध आहे. याप्रश्नी काँग्रेस पक्ष नेहमीच तरुण मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेला आहे. यापूर्वी भाजपा युती सरकारने सुरु केलेल्या कंत्राटी पद्धतीच्या नोकर भरतीला तीव्र विरोध केला होता. मागील सरकारमधील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंत्राटी भरती करणार नाही असे जाहीर करून ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी कंत्राटी भरतीचा निर्णय रद्द केला होता. यानंतरही आरोग्य विभाग व एमपीएससीच्या माध्यमातून कंत्राटी पद्धतीने लिपीक व टंकलेखक भरण्यास सरकारने परवानगी दिली होती. भारतीय जनता पक्षाच्या करनी व कथनीत फरक असतो. आताही अमरावती जिल्हा सत्र न्यायालय व एस. टी. महामंडळ यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी विभागीय कार्यालयात कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करण्यासाठी जाहिरात दिली आहे. भाजपा युती सरकारच्या काळात तहसीलदार व नायब तहसीलदार पदाचीही कंत्राटी भरती करण्याची जाहिरात प्रसिद्ध केली होती. विशेष म्हणजे कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करण्याची कंत्राटे भाजपाच्याच बगलबच्च्यांच्या कंपनीला दिली जातात. विधानसभा निवडणुकीत भाजपा युतीने नोकर भरतीचे आश्वासनही दिले होते त्याचा भाजपाला विसर पडलेला दिसत आहे. राज्यात प्रचंड बेरोजगारी वाढली आहे पण भाजपाला त्याचे काही देणेघेणे नाही.
निवडणूक पार पडून अजून सरकारची स्थापनाही झालेली नाही तरी लगेच एस. टी. महामंडळाने तिकटांचे दर वाढवून जनतेच्या खिशाला कात्री लावण्यास सुरुवात केली आहे. भाजपा सरकारने आतापासूनच जनतेला लुटण्याचे काम सुरु केले असून कंत्राटी भरती व एसटी भाडेवाढ पाहता हे सरकार लाडक्या बहिणीला २१०० रुपये, शेतकऱ्यांची कर्जमाफी, वीजमाफी, शेतमालाला हमीभाव देतील, असे वाटत नाही असेही नाना पटोले म्हणाले.