पुणे ः अबला महिलांसाठी मदत करणाऱ्या आणि शिक्षणसेवेसाठी नेहमी तत्पर असणाऱ्या अन्नपूर्णाबाई जोशी यांनी नेहमीच काळाच्या पुढे जाऊन विचार केला आणि समाजसेवेत मोलाचे योगदान दिले. अन्नपूर्णाबाई जोशी यांचे कार्य हे उद्याच्या पिढीला प्रेरणादायी आहे, असे मत गीताधर्म मंडळाचे अध्यक्ष डाॅ. मुकुंद दातार यांनी व्यक्त केले.
आदर्श परिचारिका व आदर्श माता कै. अन्नपूर्णाबाई जोशी पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन सदाशिव पेठेतील गीताधर्म मंडळातील सभागृहात करण्यात आले. यंदाचा पुरस्कार आदर्श विद्यार्थी प्रकाशनचे रमेश कुंदूर यांना प्रदान करण्यात आला. या प्रसंगी शिक्षणतज्ञ डॉ. न.म. जोशी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ आणि सन्मानपत्र असे होते. या कार्यक्रमात रमेश कुंदूर यांनी कैलासाचे दिव्य अंतरंग हा स्लाईड शो सादर केला.
रमेश कुंदूर म्हणाले, मला मिळालेला हा पुरस्कार म्हणजे आणखी जोमाने काम करण्याची जबाबदारी आहे. ‘श्यामची आई’ या पुस्तकाच्या माध्यमातून घराघरातील मुलांमध्ये चांगले संस्कार रुजवण्याचा प्रयत्न केला. मला ही प्रेरणा माझ्या आई-वडिलांकडून मिळाली आहे. यापुढेही माझ्या हातून उत्तम कार्य घडावे, असेही त्यांनी सांगितले.शैलजा कात्रे यांनी प्रास्ताविक केले. सुरेखा जोशी यांनी आभार मानले.