Home Blog Page 702

‌‘दाम करी काम येड्या‌’,‘देव देव्हाऱ्यात नाही‌…एकाहून एक सरस गीतांनी सजला ‘सत्य शिवाहून सुंदर हे!‌ कार्यक्रम

सुधीर फडके यांच्या विविध पैलूंवरील गीतांचे प्रभावी सादरीकरण
पुणे : अलौकिक प्रतिभा असलेल्या गायक व संगीतकार सुधीर फडके यांचे विविध पैलू उलगडून दाखविणाऱ्या ‌‘सत्य शिवाहून सुंदर हे!‌’ या अनोख्या कार्यक्रमाची पर्वणी आज पुणेकर रसिकांनी अनुभवली.
निमित्त होते संवाद, पुणे, प्रबोधन विचारधारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कोथरूड गणेश फेस्टिवलचे. कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात फेस्टिवल आयोजित करण्यात आला आहे. ‌‘हृदयी प्रित जागते‌’, ‌‘चंद्र आहे साक्षीला‌’, ‌‘का रे दुरावा‌’, ‌‘तोच चंद्रमा नभात‌’, ‌‘दाम करी काम येड्या‌’, ‌‘आज प्रितीला पंख हे लाभले‌’, ‌‘धुंदी कळ्यांना‌’, ‌‘फिटे अंधाराचे जाळे‌’, ‌‘सत्य शिवाहून सुंदर हे‌’, ‌‘देव देव्हाऱ्यात नाही‌’, ‌‘स्वप्नात रंगले मी‌’, ‌‘लिंबलोण उतरू कशी‌’, ‌‘मी आज फुल झाले‌’, ‌‘घर दोघांचे‌’, ‌‘असा नेसून शालू‌’, ‌‘मधुराणी तुला सांगू का?‌’, ‌‘जीवलगा कधी रे येशील‌’, ‌‘नसे राऊळी‌’, ‌‘कशी करू स्वागता‌’, ‌‘पाठशिवा हो‌’, ‌‘माझ्या रे प्रिती फुला‌’, ‌‘असेल कोठे रुतला काटा‌’, ‌‘वेद मंत्राहून आम्हा..‌’ आदी गीते सादर करण्यात आली. कलाकारांनी सादर केलेल्या गीतांना रसिकांनी उस्फूर्त दाद देत अनेक गीतांसाठी वन्समोअरची मागणी केली.
गायक म्हणून सादरीकरण करताना योग्य मराठी भाषेचा वापर, शुद्ध व स्पष्ट उच्चार तर संगीतकाराच्या भूमिकेत असताना चित्रीत होणारे गाणे कोणत्या परिस्थितीत, कुणावर आणि गायक कोण या सर्व बाबींचा विचार करून दिलेले संगीत हे बाबूजींचे वैशिष्ट्य. या त्यांच्या अलौकिक प्रतिभेचे दर्शन या अनोख्या कार्यक्रमातून घडले.
सचिन घनपाठी, गौरी कुंटे, पल्लवी आनिखिंडी आणि श्रृती घनपाठी या गायक कलाकारांचा सहभाग होता. अद्वैत कुलकर्णी, मंदार गोडसे, अक्षय पाटणकर, हेमंत पोटफोडे यांनी समर्पक साथसंगत केली. प्राजक्ता वैद्य यांचे निवेदन होते. कलाकारांचा सत्कार बढेकर ग्रुपचे केशव बढेकर यांच्या हस्ते करण्यात आला. प्रास्ताविकात कार्यक्रमाचे निमंत्रक, संवाद, पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाविषयी माहिती दिली.
फोटो ओळ : ‌‘सत्य शिवाहून सुंदर हे!‌’ कार्यक्रमात गीते सादर करताना श्रृती घनपाठी, गौरी कुंटे, सचिन घनपाठी, पल्लवी आनिखिंडी.

केजरीवालांकडून 2 दिवसात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची घोषणा .. आरोपांचा डाग घेऊन खुर्चीवर नाही बसणार, निर्दोष साबित होईल तेव्हाच लोकइच्छेने CM च्या खुर्चीवर बसेल

दिल्ली- अरविंद केजरीवाल यांनी आपण मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊ केल्याचे जाहीर केलं आहे.

दोन दिवसांपूर्वी जामिनावर तुरुंगातून बाहेर आलेले अरविंद केजरीवाल यांनी रविवारी सांगितले की, दोन दिवसांत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार आहे. आम आदमी पार्टीच्या कार्यालयात केजरीवाल बोलत होते. ते म्हणाले- भाजपने माझ्यावर अप्रामाणिकपणा आणि भ्रष्टाचाराचे आरोप केले,

आता जनतेच्या कोर्टात माझ्या प्रामाणिकपणाचा निर्णय होईल. निवडणुकीपर्यंत मी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसणार नाही.

मनीष सिसोदिया यांच्यावरही माझ्यासारखेच आरोप आहेत, असे केजरीवाल म्हणाले. तेही पद भूषवणार नाहीत, निवडणूक जिंकल्यावरच पद भूषवणार, असे त्यांनी सांगितले.

दिल्ली विधानसभेच्या निवडणुका नोव्हेंबरमध्ये व्हाव्यात: केजरीवाल म्हणाले- निवडणुका फेब्रुवारीमध्ये आहेत, निवडणुका नोव्हेंबरमध्ये व्हाव्यात अशी माझी मागणी आहे. महाराष्ट्रासोबत निवडणुका झाल्या पाहिजेत. तुमचा निर्णय येईपर्यंत मी जबाबदारी घेणार नाही. आम आदमी पक्षाचा दुसरा कोणीतरी मुख्यमंत्री होईल.

केजरीवाल म्हणाले,’ मी नुकतेच एलजीला पत्र लिहिले. 15 ऑगस्ट रोजी दिल्ली सरकारचे मुख्यमंत्री ध्वजारोहण करतात. याच्या तीन दिवसांपूर्वी मी एलजीला पत्र लिहून आतिशीला माझ्या जागी ध्वज फडकवण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती केली होती.
स्वातंत्र्यानंतर इंग्रजांपेक्षाही क्रूर आणि जुलमी राज्यकर्ता येईल, असे इंग्रजांनाही वाटले नसेल. भगतसिंग आणि बटुकेश्वर यांनी विधानसभेत बॉम्ब फेकले होते. दोघांनाही त्याच कारागृहात शेजारील कोठडीत ठेवण्यात आले होते. 95 वर्षांनंतर मनीष आणि केजरीवाल एकाच प्रकरणात तुरुंगात गेले, दोघांनाही वेगळ्या तुरुंगात ठेवण्यात आले, एकत्र भेटू दिले नाही. गांधी, नेहरू, पटेल तुरुंगात गेले, त्यांना सर्वांना भेटण्याची परवानगी होती.
आम आदमी पार्टी आणि केजरीवाल यांचे मनोधैर्य खचवणे हा त्यांचा उद्देश आहे. आमदार फोडा, तुरुंगात टाका, ईडीकडे पाठवा, पक्ष फोडा, सरकार पाडा आणि स्वतःचे सरकार बनवा, असा त्यांचा फॉर्म्युला आहे. केजरीवाल यांना तुरुंगात पाठवले तर त्यांचा पक्ष फुटेल, असे त्यांना वाटत होते. आमचे आमदार सोडा, कार्यकर्तेही तुटले नाहीत.
त्यांच्याकडे आणखी एक सूत्र आहे. ते जिथे हरले, त्या ठिकाणच्या मुख्यमंत्र्यांवर खोटा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करून सरकार बनवणे. सिद्धरामय्या, ममता आणि पिनाराई विजयन यांच्यावर गुन्हा दाखल आहे. मी तुरुंगात गेल्यावर तुरुंगातून सरकार का चालवता येत नाही, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने केला.
आयकर आयुक्त होतो . 2000 मध्ये नोकरी सोडली आणि 2010 पर्यंत दिल्लीची सेवा केली. जर मला पैसे कमवायचे असतील तर माझी नोकरी वाईट नव्हती. त्यावेळी कोणताही पक्ष नव्हता, मुख्यमंत्री होण्याची इच्छा नव्हती, फक्त देशाप्रति तळमळ होती. 49 दिवसांच्या सरकारनंतर तत्त्वांसाठी राजीनामा दिला. कोणीही मागितली नव्हती. शिपायाची नोकरी कोणी सोडत नाही, मी मुख्यमंत्रिपद सोडले होते. पदाचा लोभ नाही.
2013 पासून दिल्लीत केजरीवाल यांचे सरकार, सलग 3 वेळा मुख्यमंत्री झाले
दिल्लीतील केजरीवाल सरकारचा कार्यकाळ फेब्रुवारी 2025 मध्ये संपणार आहे. केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पक्ष 2013 पासून दिल्लीत सत्तेत आहे. 4 डिसेंबर 2013 रोजी दिल्लीत एकूण 70 जागांवर विधानसभा निवडणुका झाल्या. 8 डिसेंबर 2013 रोजी निकाल आले. यामध्ये भाजप 32 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला. मात्र, बहुमत मिळाले नाही.आपला 28, तर काँग्रेसला 8 जागा मिळाल्या. काँग्रेसच्या पाठिंब्याने अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी सरकार स्थापन केले. मात्र, दोन्ही पक्षांची युती 49 दिवसांनंतर तुटली. 7 फेब्रुवारी 2015 रोजी दिल्लीत पुन्हा विधानसभा निवडणुका झाल्या. यामध्ये आप ने 67 जागा जिंकल्या. पाच वर्षांनंतर 8 फेब्रुवारी 2020 रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने एकूण 70 जागांपैकी 62 जागा जिंकल्या. 8 जागा भाजपच्या खात्यात गेल्या.

पॅरा ऑलिंपिकवीर सचिन खिलारीला ‘पुनीत बालन ग्रुप’कडून पाच लाखांचे बक्षिस

  • स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या संदीप सरगरला २ लाखांचे बक्षिस जाहीर

पुणे : प्रतिनिधी
पॅरिसमध्ये नुकत्याच पार पडलेल्या पॅरा ऑलिंपिक स्पर्धेत गोळा फेक मध्ये भारताला सिल्वर मेडल मिळवून देणाऱ्या सचिन खिलारीला युवा उद्योजक व श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे उत्सव प्रमुख पुनीत बालन यांच्या ‘पुनीत बालन ग्रुप’कडून पाच लाखांचे बक्षिस जाहीर करण्यात आले आहे. तर याच स्पर्धेत या मोसमातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या संदीप सरगरला दोन लाखांचे बक्षीस देण्यात येणार आहे.

हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची आरती खिलारी आणि सरगर यांच्या हस्ते झाली. यावेळी पुनीत बालन यांनी ही घोषणा केली. ‘पुनीत बालन ग्रुप’कडून विविध खेळांच्या विविध स्पर्धांबरोबर खेळांडूना प्रोत्साहन दिले जाते. अनेक खेळांडूना आर्थिक मदतही केली जाते. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत नेमबाजीत कांस्य पदक मिळविणाऱ्या स्वप्निल कुसळेला ११ लाखांचे बक्षीसही ‘पुनीत बालन ग्रुप’कडून देण्यात आले. पॅरिसमध्ये पार पडलेल्या पॅरा ऑलम्पिक स्पर्धेत सिल्वर मेडल विजेत्या सचिन खिलारी आणि भाला फेक स्पर्धेत कांस्य पदकाने हुलकावणी दिलेल्या संदीप सरगर यांना प्रोत्साहान देण्यासाठी पुनीत बालन यांनी अनुक्रमे ५ व २ लाखांचे बक्षिस जाहीर केले आहे. यावेळी दोन्ही खेळाडूंनी पुनीत बालन यांचे आभार मानले तर या खेळाडूनी आगामी काळात चांगली कामगिरी करून भारत देशाला पदके मिळवून द्यावीत, अशी प्रार्थना पुनीत बालन यांनी श्री. गणरायाकडे केली.

फोटो मध्ये – पॅरा ऑलिंपिकमधील सिल्वर मेडल विजेता सचिन खिलारीचा सत्कार करताना युवा उद्योजक पुनीत बालन.

राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फेक न्यूजची फॅक्टरी चालवत आहेत का ?

पुणे- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच फेक न्यूज ची फॅक्टरी चालवत आहेत का ? असा सवाल करत राहुल गांधींनी आरक्षण संदर्भात केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करून त्यांची आरक्षणविरोधी अशी खोटी प्रतिमा तयार करणाऱ्या बातम्या चालविणे तसेच कर्नाटकात कॉंग्रेस सरकारने गणपतीला अटक केल्याचे खोटे तथ्यहीन भ्रामक वक्तव्ये करत धार्मिक द्वेष भावना भडकावणे अशी कामे या दोहोंनी सुरु केल्याचा थेट आरोप कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात तसेच माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केला आहे. या संदर्भात बाळासाहेब थोरात यांनी ट्वीट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत .

१६ चोरीच्या मोबाईलसह पकडला १९ वर्षाचा मोबाईलचोर

पुणे- एकूण १६ चोरीच्या मोबाईलसह १९ वर्षाचा मोबाईलचोर पुणे पोलिसांनी पकडला असून उमर सलीम शेख वय १९ वर्ष रा. ग.न.१ पिताश्री आश्रम जवळ शिवनेरीनगर कोंढवा खुर्द पुणे असे त्याचे नाव आहे .

या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’गणपती उत्सवानिमित्त पोलीस उप आयुक्त गुन्हे निखिल पिंगळे यांचे मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे शाखा युनिट २ प्रभारी प्रताप मानकर, यांचे पथकातील अधिकारी व अंगलदार हे पेट्रोलिंग करीत असताना पथकातील पोलीस अंमलदार विनोद चव्हाण, पुष्पेंद्र चव्हाण, शुभम देसाई यांना बातमी मिळाली की, पुणे स्टेशन परिसरात रेकार्डवरील आरोपी उमर सलीम शेख हा काळे रंगाचे ब्लॅगमॅन मोपेडवर उभा राहिलेला आहे. मिळालेल्या बातमी प्रमाणे गुन्हे शाखा युनिट २ कडील अधिकारी व अंमलदार यांनी पुणे स्टेशन परिसरात जावून उमर सलीम शेख वय १९ वर्ष रा. ग.न.१ पिताश्री आश्रम जवळ शिवनेरीनगर कोंढवा खुर्द पुणे यास काळे रंगाचे ब्लॅगमॅन मोपेड हिचेसह ताब्यात घेतले. त्याचे मोपेडचे डिकी मध्ये व त्याचेजवळ एकुण १६ मोबाईल फोन मिळून आले असता ते जप्त करण्यात आले आहेत. नमुद इसमाचे शर्टमध्ये मिळून आलेल्या मोबाईल फोनबाबत समर्थ पोलीस स्टेशन गुन्हा रजि क्रमांक १९७/२०२४ भादविक ३९२ मधील जबरी चोरीचा गुन्हा दाखल असलेबाबत खात्री झाली. सदर गुन्हा हा त्यानेच केलेबाबत चौकशीवरुन निष्पन्न झाले. सदर आरोपीस वैदयकिय तपासणी करुन पुढील कायदेशीर कारवाई कामी समर्थ पोलीस स्टेशन गुन्हा रजि क्रमांक १९७/२०२४ भादविक ३९२ कामी पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे.
हि कारवाई पोलीस उप आयुक्त गुन्हे निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे १ श्री. गणेश इंगळे यांचे मागदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ प्रभारी पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, पोलीस उप निरीक्षक राजेंद्र पाटोळे, पोलीस हवालदार संजय जाधव, शंकर नेवसे, उज्वल मोकाशी, शंकर कुंभार, निखिल जाधव, साधना ताम्हाणे, उज्वल मोकाशी, शुभम देसाई,नागनाथ राख या पथकाने केली आहे.

संरक्षण मंत्रालयातून निवृत्त अधिकाऱ्याची २ कोटी ९० लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक

गेल्या सहा महिन्यांत १ हजार ८९४ तक्रारीपुण्यात सायबर गुन्ह्यात चालू वर्षात सहा महिन्यात ऑनलाईन फसवणुकीच्या पुणे सायबर पोलिस ठाण्यात १ हजार ८९४ तक्रारी प्राप्त झाल्या आहे. त्यातील ६६९ गुन्हे दखल सायबर गुन्हे शाखेने घेतली आहे. शेअर ट्रेडिंग फसवणुकीचे ४५९ तक्रारीत ६४ कोटी ४५ लाखांच्या नागरिकांच्या ऑनलाईन फसवणुकी झाल्या आहेत. या सर्व प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

पुणे-संरक्षण मंत्रालयातून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्याची सायबर चोरट्यांनी शेअर मार्केटमध्ये दुप्पट परताव्याच्या आमिषाने तब्बल २ कोटी ९० लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली. याप्रकरणी शिवाजीनगर येथील सायबर पोलिस ठाण्यात ६३ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात सायबर चोरट्यांविरुद्ध आयटी अॅक्ट तसेच फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २३ एप्रिल ते ५ सप्टेंबर या कालावधीत हा प्रकार घडला आहे. अवघ्या चार महिन्यांत एवढ्या मोठ्या प्रमाणात फसवणूक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार पुण्यातील मगरपट्टा सिटीत राहण्यास आहेत. ते केंद्र शासनाच्या संरक्षण मंत्रालयातील मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस विभागात नोकरीस होते. ते २०२१ मध्ये निवृत्त झाले आहेत. दरम्यान, त्यांना एप्रिल महिन्यात शेअर मार्केट ट्रेडिंग व ट्रेनिंगसाठी एसएमएस आला होता. त्यात व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंक दिली होती. तो ग्रुप तक्रारदारांनी जाइन केला. यानंतर त्यांना त्या ग्रुपवरून माहिती तसेच ट्रेनिंग करून दिले. सुरुवातीला तक्रारदार स्वत:च्या डीमॅट खात्यावरून सगळा व्यवहार करत होते. यानंतर जास्त परतावा, डिस्काउंटमध्ये आणि प्री ओपन मार्केटमध्ये शेअर खरेदीसाठी इन्स्टिट्युशनल अकाउंट ओपन करण्यास सांगून त्यांना गंडा घालण्यात आला. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

पैसे परत मिळण्यासाठी १ महिन्याचा कालावधी लागेल, असे सांगण्यात आल्याने त्यांनी एक महिना वाट पाहिली. मात्र, पैसे काही परत आले नाही. यानंतर तक्रारदार इंटरॅक्टिव्ह ब्रोकर या कंपनीच्या बांद्रा कुर्ला कॉम्पलेक्स येथे जाऊन विचारणा केली असता तेथील कर्मचाऱ्यांनी त्यांची फसवणूक करण्यात आली आल्याचे सांगितले. तक्रारदाराने चार महिन्यांत तब्बल २ कोटी ९० लाख ५० हजार रुपये पाठवले आहेत. पैसे परत मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत खात्री केली. तेव्हा त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. पुढील तपास सायबर पोलिस करत आहेत.

तक्रारदार यांना एक लिंक पाठवून आयबी इन्स्टिट्युशनल एडिशन नावाचे अॅप डाऊनलोड करायला लावले. या अकाउंटवरूनच सगळे व्यवहार करायला लावले. तक्रारदारांना सायबर चोरट्यांनी सांगितल्यानुसार बँक खात्यावर पैसे पाठवत होते. त्यांना पाठवलेल्या पैशांवर इन्स्टिट्युशनल अॅपमध्ये तब्बल ८ कोटींचा प्रॉफिट दिसत होता. त्यामुळे त्यांचाही विश्वास बसला होता. यानंतर तक्रारदार यांनी पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता कमिशन ३० लाख रुपये भरायला सांगण्यात आले. त्याप्रमाणे तक्रारदार यांनी ३० लाखसुद्धा भरले. त्यानंतर सायबर चोरट्यांनी १० टक्क्यांप्रमाणे एकूण ५५ लाख रुपये भरावे असल्याचे सांगितल्याने तक्रारदार यांनी पुन्हा ५५ लाख रुपये सायबर चोरट्यांनी सांगितलेेल्या बँक खात्यावर पाठवले.

ईद-ए-मिलादची सुट्टी सोमवारीच….

पुणे, दि.१४: राज्य शासनाने १० नोव्हेंबर २०२३ च्या राजपत्रानुसार अधिसूचित केलेल्या सुट्ट्यांमध्ये ईद-ए-मिलादची सुट्टी सोमवार १६ सप्टेंबर २०२४ रोजी दर्शविण्यात आलेली होती; ही सुट्टी सोमवार १६ सप्टेंबर रोजीच कायम करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी आज जारी केले आहेत.
0000

३६व्या पुणे फेस्टिव्हलअंतर्गत बॉक्सिंग स्पर्धेत सृष्टी चोरगे विजयी

पुणे:

३६व्या पुणे फेस्टिव्हल अंतर्गत आयोजित पुरुष आणि महिला बॉक्सिंग स्पर्धेत सृष्टी चोरगे बेस्ट बॉक्सर ठरल्या. याशिवाय अभंग वायदंडे – मोस्ट प्रॉमिसिंग, रश्मी माने – बेस्ट चॅलेंजर, मनोज यादव – बेस्ट रेफ्री आणि योगेश भोरे – बेस्ट जज  यांची निवड झाली. या स्पर्धा पुण्यातील भवानी पेठ येथील वस्ताद लहुजी साळवे स्टेडियमवर शनिवार, १४ सप्टेंबर रोजी रंगल्या. संपूर्ण दिवसभर झालेल्या या स्पर्धेत ४० पुरुष आणि ४० महिला खेळाडू विविध वजन गटांमध्ये सहभागी झाले होते. या जिल्हास्तरीय स्पर्धा पुणे जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनच्या सहकार्याने आयोजित करण्यात आल्या होत्या.

स्पर्धेचे उद्घाटन सकाळी माजी गृह राज्यमंत्री रमेश बागवे, माजी नगरसेवक अविनाश बागवे, पुणे फेस्टिव्हलचे मुख्य समन्वयक अॅड. अभय छाजेड व क्रीडा समन्वयक प्रसन्न गोखले यांच्या हस्ते संपन्न झाले. सायंकाळी बक्षीस वितरण मोटोक्रॉस विजेते संजय टकले यांच्या हस्ते झाले. यावेळी पुणे बॉक्सिंग असोसिएशनचे मदन वाणी, विजय गुजर, सुरेश गायकवाड आणि अशोक मेमजादे यांची विशेष उपस्थिती होती.

सकारात्मक, तणावमुक्त आयुष्यासाठी आत्मबोध व शांतता महत्वाची

श्री भूपेंद्र यांचे प्रतिपादन; अमेरिकेतील सर्कल ऑफ कॉन्सिएसनेस अँड हॅप्पीनेस व सोल फाउंडेशन इंडियातर्फे ‘मेटा अवेकनिंग’ कॉन्सर्ट

पुणे: “जीवन एक नृत्यकला, उत्सव आहे. त्यामुळे आयुष्यातील चढ-उतारांतून मार्ग काढता आले पाहिजेत. आपल्यामधील क्षमता ओळखून सकारात्मक, तणावमुक्त जीवन जगण्याची कला अवगत करावी. चेहऱ्यावरील हास्य, मनातील समाधान आणि आत्मिक सुखाची अनुभूती घेत आनंदी जीवन जगावे,” असा अनुभव जागतिक ख्यातीचे तत्वज्ञ-शास्त्रज्ञ, लेखक व अध्यात्मिक ऊर्जेचे प्रभावक श्री भूपेंद्र यांनी दिला. आत्मबोध व दोन विचारांतील, दोन श्वासांतील शांतता आपल्याला यामध्ये वाहक म्हणून उपयुक्त ठरतात, असे त्यांनी नमूद केले.

वैज्ञानिक, आध्यात्मिक व सांस्कृतिक याचा त्रिवेणी संगम असलेल्या ‘मेटा अवेकनिंग’ या कार्यक्रमातून पुणेकरांना आत्मिक संजीवनीची अनुभूती मिळाली. तत्वज्ञ-शास्त्रज्ञ श्री भूपेंद्र यांच्या ऊर्जादायी मार्गदर्शन व सहवासाने अनेकांच्या जीवनात आनंद पेरला. सर्कल ऑफ कॉन्सिएसनेस अँड हॅप्पीनेस कॅलिफोर्निया (अमेरिका) आणि सोल फाउंडेशन इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने हॉटेल रामी ग्रँड येथे ‘मेटा अवेकनिंग’ कॉन्सर्टचे आयोजन केले होते. लेव्हल अपचे संस्थापक प्रा. डॉ. श्रीकांत कल्लूरकर, अलार्ड विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. पूनम कश्यप, पुणे विद्यार्थी गृहाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोज तारांबळे, कॉर्पोरेट कीर्तनकार समीर लिमये, धनश्री नानिवडेकर, आद्या ज्वेलरीच्या सायली मराठे, इंडिगो रूट्सच्या सुषमा चोपडा, सर्कल ऑफ कॉन्सिएसनेस अँड हॅप्पीनेस कॅलिफोर्नियाच्या (अमेरिका) प्रतिनिधी कीर्ती गद्रे आदी उपस्थित होते.

श्री भूपेंद्र यांनी त्यांच्या ३० वर्षांच्या तपश्चर्येतून त्यांना समजलेला जीवनाचा अन्वयार्थ उपस्थितांना सांगितला. हीलिंग, मेडिटेशन व सांस्कृतिक कार्यक्रम आणि श्री भूपेंद्र यांच्या अमोघ वाणीतील मार्गदर्शनाने सकारात्मक ऊर्जा निर्माण केली. विविध उदाहरणांच्या माध्यमातून त्यांनी आयुष्यात शांतता व आत्मबोधाचे महत्व अधोरेखित केले. गुरु अष्टकम, निर्वाण षटकं, कृतज्ञता भावगीत यातून कलाकारांनी मनोहारी सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली. जवळपास २५० पुणेकरांनी यामध्ये सहभागी होत कॉन्सर्टची अनुभूती घेतली.

श्री भूपेंद्र म्हणाले, “ईश्वर, आत्मा आणि नशीब या विश्वास ठेवण्याच्या, तर जगण्यातील अडचणी, त्यावरील उपाय आणि स्वतःतील क्षमता या जाणून घेण्याच्या गोष्टी आहेत. निसर्गातून आपल्याला खूप शिकायला मिळते. वाघ किंवा गरुड जसा शिकार करताना ध्येयवादी असतो, त्याप्रमाणे आपण ध्येयवादी असायला हवे. भविष्याची चिंता करत बसण्यापेक्षा अनुभवलेल्या कठीण प्रसंगातून प्रेरणा घेत वाटचाल केली पाहिजे. प्रत्येकामध्ये ‘जिनियस’ दडलेला असतो. आपण स्वतःला ओळखून क्षमतांचा विकास करत ‘जिनियस’ बनण्याची गरज आहे. त्यासाठी कोणत्याही दोन घटकांमध्ये दडलेली शांतता अनुभवता यावी. त्यातूनच आयुष्याची रहस्ये उलगडतात.”

“आजच्या धकाधकीच्या जीवनात माणूस हा उत्सव साजरा करत नाही. आयुष्यात सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही शक्ती महत्त्वाच्या आहेत. स्वतःची स्वतःशी ओळख होणे गरजेचे आहे. ही गोष्ट साध्य झाली, तर आपण आपली सर्व ध्येय सहजरीत्या पूर्ण करू शकतो. त्यासाठी स्वतःतील क्षमता आणि हीलिंगची शक्ती जाणून घ्यावी. माणूस स्वतःची सावली सोडून जाऊ शकत नाही किंवा स्वतःची सावली बनू शकत नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्ट जशी आहे, तशी स्वीकारावी. स्वतःवर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःची ओळख करून घेणे अधिक महत्वाचे आहे,” असेही श्री भूपेंद्र यांनी नमूद केले.

कीर्ती गद्रे म्हणाल्या, “पुणेकरांना मेटा अवेकनिंग या जागतिक चळवळीची ओळख करून देणारा हा कार्यक्रम होता. आपल्यातील जाणीव-नेणिवांना हात घालणाऱ्या या कॉन्सर्टमधून अनुभूती मिळते. सर्वांसह स्वतःला जोडण्याची ही प्रक्रिया आहे. ‘विश्वास’ आणि ‘ज्ञान’ या दोन संकल्पनांचा नेमका अर्थ यातून उलगडतो. स्वओळख हे तत्वज्ञान नसून, भूपेंद्रजी यांनी सिद्ध केलेले शास्त्र आहे. याचा उपयोग लाखो लोकांना होत आहे. यशाचे मार्ग कसे खुले होतात, हे आम्ही अनुभवतो आहोत. तुम्हालाही हे सगळे अनुभवता यावे आणि यशाचे मार्ग खुले व्हावेत, या उद्देशाने संस्थेने जगभर हा उपक्रम घेण्यास सुरुवात केली. मेटा अवेकनिंग युगाची ही सुरवात आहे.”

‘मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास १७ सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

मुंबई, दि. १४ : शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असून आता १७ सप्टेंबर २०२४ पर्यंत नोंदणी अर्ज करता येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर अर्ज करावा, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण ५० हजार योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार आहे. या योजनादूतांना दरमहा १० हजार रूपये मानधन दिले जाणार आहे. हे योजनादूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांबाबत नागरिकांना माहिती देतील. या उपक्रमासाठी आतापर्यंत १ लाख ६६ हजारांहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली आहे.
या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार १८ ते ३५ वयोगटातील असावा, उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे, उमेदवाराकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवारास संगणक ज्ञान असावे. त्याच्याकडे अद्ययावत मोबाईल (स्मार्ट फोन) आणि आधारसंलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे.
मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज, आधार कार्ड, पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्यादाखल कागदपत्रे / प्रमाणपत्र इ., अधिवासाचा दाखला. (सक्षम यंत्रणेने दिलेला), उमेदवाराकडे आधार जोडणी असलेल्या बँक खात्याचा पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो, हमीपत्र (ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामधील) नियुक्तीवेळी सादर करणे आवश्यक आहे. दि. १७ सप्टेंबर २०२४ पर्यंत इच्छुक उमेदवारांना www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल. योजनादूत पोर्टलवर ज्या उमेदवारांनी नोंदणी केली आहे अशा उमेदवारांनी Apply बटन दाबून अर्ज Submit करायला विसरू नये. तरच नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
0000

कोथरुड मधील बौद्ध विहाराचे होणार सुशोभीकरण!

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध

पुणे-कोथरूड मधील बौद्ध विहाराचे सुशोभीकरण होणार असून, त्यासाठी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी पुढाकार घेऊन, निधी उपलब्ध करून दिला आहे. आज या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यामुळे भीमप्रेमींकडून आनंद व्यक्त होत आहे.

कोथरूड मधील जयभवानी नगर येथील बौद्ध विहाराचे सुशोभीकरण व्हावे, अशी मागणी येथील आंबेडकर प्रेमींनी केली होती‌. महापालिका बरखास्त झाल्याने या मागणीला आवश्यक प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर कोथरुडचे आमदार आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी यासाठी पुढाकार घेतला असून; लोकसहभागातून यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. आज या कामाचे भूमिपूजन झाले.

यावेळी उद्योजक समीर पाटील, स्थानिक नगरसेविका छाया मारणे, भाजप कोथरुड दक्षिणचे अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, रिपाइं आठवले गटाचे महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य ॲड. मंदार जोशी, कोथरुड मंडल अध्यक्ष बाळासाहेब खंकाळ, भारत भोसले, भाजपा प्रभाग ११ चे अध्यक्ष आशुतोष वैशंपायन, भाजपा महिला मोर्चाच्या स्वातीताई मोहोळ, सौ. मायाताई पोस्ते, भीमाज्ञान प्रसारक संघाचे अध्यक्ष जितेंद्र दामोदरे, सल्लागार तात्या कसबे, विनोद बुचटे, दिपक सगर यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.

वंचित घटकांना एकत्र आणणे, त्यांच्या आर्थिक, सामाजिक उन्नतीसाठी प्रयत्न करणे आवश्यकच – सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे 

पुणे : मागासवर्गीय, बहुजन समाजामध्ये आज काही प्रमाणात आर्थिक सक्षमता आली आहे,  त्याचे कारण शिक्षण, नोकऱ्यातील प्रमाण हे आहे. परंतु आजही या समाजातील बहुतांश लोकांचा सामाजिक स्तर उंचावलेला नाही. सामाजिक न्याय विभाग या लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी, त्यांना रोजगाराच्या संधी, स्किल डेव्हलपमेंट करण्यासाठी सातत्याने मदत करत आहे. आज ज्या लोकांचे सामाजिक जीवन उंचावले आहे त्यांनीही पुढे येऊन समाजातील वंचित घटकाला, लोकांना एकत्र आणणे आणि त्यांच्या आर्थिक, सामाजिक उन्नतीसाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मत राज्याच्या सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी व्यक्त केले. 

पं. जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, घोले रोड, पुणे येथे बहुजन हिताय नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पुणे, ची 17 वी  वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. यावेळी ‘बहुजन समाजाचे आर्थिक सक्ष्मीकारण’ या विषयावर मार्गदर्शन करताना लोंढे बोलत होते.  यावेळी पतसंस्थेचे सचिव विलास वनाशिव, विश्वस्त रवींद्र दुधेकर, उपाध्यक्ष वसंत साळवी, संचालक राजेंद्र डोळस, जयश्री वाघमारे, अनिल सूर्यवंशी, व्यवस्थापक संतोष मेश्राम, दिपक म्हस्के आदि मान्यवर उपस्थित होते. 

पुढे बोलताना विशाल लोंढे म्हणाले की, या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आलेला बहुजन समाजातील हा वर्ग सामाजिक स्तर उंचावलेला आहे. आपण राबवत असलेले सामाजिक उपक्रम अतिशय चांगले आहेत, परंतु आपल्या कामाची माहिती वस्ती, झोपडपट्टी भागात नाही याचे कारण काय आहे? याचा विचार करणे गरजेचे आहे, कारण आज तुम्ही मोठे झाले आता आपल्याला समूहाला मोठे करण्याची गरज आहे. सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना आहेत मात्र त्या गरजू लोकांपर्यंत अजूनही पोहचल्या नाही. कारण जनजागृतीचा अभाव किंवा युवकांना काही ठराविक गोष्टी पलीकडे जाणून घेण्यात रस नसल्याचे दिसते.  तसेच लोंढे यांनी एका संस्थे मार्फत वैयक्तिक पातळीवर केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देणाऱ्या 40 मुलांना दत्तक घेतल्याचेही सांगितले. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सभेच्या इतिवृत्ताचे  वाचन विलास वनाशिव यांनी केले, तसेच संस्थेचे संचालक, विश्वस्त यांनी विविध ठराव पारित केले आणि अंदाजपत्रक मांडले. दारम्यान 2023 – 24 साठी सभासदांना 10 टक्के लाभांश जाहीर करण्यात आला. याप्रसंगी ठेवीदार, कर्जदार यांच्यासह सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक म्हस्के यांनी केले.

एस. बी. पाटील यांचा वारसा पीसीईटी कर्तव्यनिष्ठ भावनेने पुढे चालवत आहे – ज्ञानेश्वर लांडगे

कर्मयोगी स्व. शंकरराव पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण

पिंपरी, पुणे (दि. १४ सप्टेंबर २०२४) पिंपरी चिंचवड या कामगार नगरीचे नाव आता जागतिक पातळीवर शिक्षण क्षेत्रात अभिमानाने घेतले जाते याची पायाभरणी कर्मयोगी स्व. शंकरराव बाजीराव पाटील यांनी केली. त्यांचा वारसा पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट कर्तव्यनिष्ठ भावनेने आणि जबाबदारीने पुढे चालवत आहे. या संस्थेने मागील वर्षांमध्ये हजारो सुसंस्कृत व जबाबदार नागरिक घडवले. हे आमचे माजी विद्यार्थी देश, परदेशात सर्वसामान्य नागरिकांचे जीवन सुखकर होण्यासाठी विविध विकास प्रकल्पामधून काम करीत आहेत आणि देशाच्या आर्थिक विकासात योगदान देत आहेत. याचा पीसीईटीच्या सर्व विश्वस्त मंडळाला आणि प्राध्यापक, कर्मचारी वर्गाला सार्थ अभिमान आहे असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांनी केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे संस्थापक कर्मयोगी स्व.शंकरराव (भाऊ) बाजीराव पाटील यांच्या १८ व्या स्मृतिदिनानिमित्त पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट येथे आणि सातेझ वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठ येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
पीसीईटीच्या उपाध्यक्षा पद्माताई भोसले, खजिनदार शांताराम गराडे, सचिव विठ्ठल काळभोर, उद्योजक नरेंद्र लांडगे व अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्यासह पीसीईटीच्या सर्व कॉलेजेसचे संचालक, प्राचार्य, विभाग प्रमुख आदी उपस्थित होते.
तसेच साते, वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयू) येथे स्व. शंकरराव बाजीराव पाटील यांच्या प्रतिमेस
पीसीयू चे कुलगुरू डॉ. मणिमाला पुरी, डॉ. सुदीप थेपाडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी पीसीयूचे सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
स्व. शंकरराव पाटील यांनी १९९० मध्ये पीसीईटीची स्थापना केली. ४६००० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना सेवा देणाऱ्या १३ आता कार्यरत आहेत. २०२३ मध्ये पीसीयूची स्थापना करण्यात आली येथे मागील वर्षी तेथे प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून यावर्षी एकूण ३३०० पेक्षा जास्त विद्यार्थी पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत अशी माहिती डॉ. गिरीश देसाई यांनी यावेळी दिली.

पुण्याच्या विकासासाठी महाविकास आघाडीचे सरकार येवू दे-माजी आमदार मोहन जोशी यांचे गणरायाला साकडे

पुणे – शहराचा विकास खऱ्या अर्थाने व्हायचा असेल, तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येऊ दे!, असे साकडे माजी आमदार आणि प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी दगडूशेठ गणपतीला घातले.

दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेऊन मोहन जोशी यांनी सहकुटुंब श्रींची आरती केली. याप्रसंगी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी त्यांना मानाचे महावस्त्र देऊन त्यांचे स्वागत केले.

पुणे शहरात उत्सव शांततेत आणि गुण्यागोविंदाने साजरा होईल, असा विश्वास मोहन जोशी यांनी व्यक्त केला.

काँग्रेसने गणपत्ती बाप्पांना अटक केली:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका…

धाराशिव -काँग्रेसने गणपत्ती बाप्पांना अटक करण्याचे काम केल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी कर्नाटकमधील एका घटनेचा दाखला देत महाविकास आघाडीवर निशाणा साधताना केली. काँग्रेस हे पाप कुठे व कसे फेडणार? असा सवालही त्यांनी यासंबंधी उपस्थित केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शनिवारी धाराशिव येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर उपरोक्त टीका केली. एकनाथ शिंदे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करणाऱ्या लोकांनी कर्नाटकात गणपती उत्सव बंद करण्याचे काम केले. काँग्रेसने कर्नाटकात गणपती बाप्पाला अटक करण्याचे काम केले. गणेशोत्सवात गणपती बाप्पांसोबत त्यांनी हे काम केले. ते हे पाप कुठे फेडणार?

कर्नाटकात नेमके काय घडले? कर्नाटकच्या मंड्या जिल्ह्यातील नागमंगला येथे बुधवारी रात्री 8 च्या सुमारास गणेश विसर्जन मिरवणुकीत दोन गटांत राडा झाला होता. यामुळे शहरात तणाव निर्माण झाल्याने पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बंदोबस्त तैनात केला. तसेच काही जणांना ताब्यातही घेतले. यावेळी खबरदारी म्हणून पोलिसांनी गणपतीची मूर्ती पोलिस व्हॅनमध्ये ठेवली होती. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांच्या या कृतीवर आता भाजप व सत्ताधारी पक्षाकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. एकनाथ शिंदेंनीही याच घटनेचा दाखला देत काँग्रेसवर हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला.

राहुल गांधींवरही साधला निशाणा-एकनाथ शिंदे यांनी यावेळी आरक्षण संपवण्याच्या कथित विधानाप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला. राहुल गांधी यांनी परदेशात जाऊन आरक्षण संपवण्याची भाषा केली. आता माझ्या बहिणी या काँग्रेसवाल्यांना घरी पाठवण्याचे काम करतील, असे ते म्हणाले.