सुधीर फडके यांच्या विविध पैलूंवरील गीतांचे प्रभावी सादरीकरण
पुणे : अलौकिक प्रतिभा असलेल्या गायक व संगीतकार सुधीर फडके यांचे विविध पैलू उलगडून दाखविणाऱ्या ‘सत्य शिवाहून सुंदर हे!’ या अनोख्या कार्यक्रमाची पर्वणी आज पुणेकर रसिकांनी अनुभवली.
निमित्त होते संवाद, पुणे, प्रबोधन विचारधारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कोथरूड गणेश फेस्टिवलचे. कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात फेस्टिवल आयोजित करण्यात आला आहे. ‘हृदयी प्रित जागते’, ‘चंद्र आहे साक्षीला’, ‘का रे दुरावा’, ‘तोच चंद्रमा नभात’, ‘दाम करी काम येड्या’, ‘आज प्रितीला पंख हे लाभले’, ‘धुंदी कळ्यांना’, ‘फिटे अंधाराचे जाळे’, ‘सत्य शिवाहून सुंदर हे’, ‘देव देव्हाऱ्यात नाही’, ‘स्वप्नात रंगले मी’, ‘लिंबलोण उतरू कशी’, ‘मी आज फुल झाले’, ‘घर दोघांचे’, ‘असा नेसून शालू’, ‘मधुराणी तुला सांगू का?’, ‘जीवलगा कधी रे येशील’, ‘नसे राऊळी’, ‘कशी करू स्वागता’, ‘पाठशिवा हो’, ‘माझ्या रे प्रिती फुला’, ‘असेल कोठे रुतला काटा’, ‘वेद मंत्राहून आम्हा..’ आदी गीते सादर करण्यात आली. कलाकारांनी सादर केलेल्या गीतांना रसिकांनी उस्फूर्त दाद देत अनेक गीतांसाठी वन्समोअरची मागणी केली.
गायक म्हणून सादरीकरण करताना योग्य मराठी भाषेचा वापर, शुद्ध व स्पष्ट उच्चार तर संगीतकाराच्या भूमिकेत असताना चित्रीत होणारे गाणे कोणत्या परिस्थितीत, कुणावर आणि गायक कोण या सर्व बाबींचा विचार करून दिलेले संगीत हे बाबूजींचे वैशिष्ट्य. या त्यांच्या अलौकिक प्रतिभेचे दर्शन या अनोख्या कार्यक्रमातून घडले.
सचिन घनपाठी, गौरी कुंटे, पल्लवी आनिखिंडी आणि श्रृती घनपाठी या गायक कलाकारांचा सहभाग होता. अद्वैत कुलकर्णी, मंदार गोडसे, अक्षय पाटणकर, हेमंत पोटफोडे यांनी समर्पक साथसंगत केली. प्राजक्ता वैद्य यांचे निवेदन होते. कलाकारांचा सत्कार बढेकर ग्रुपचे केशव बढेकर यांच्या हस्ते करण्यात आला. प्रास्ताविकात कार्यक्रमाचे निमंत्रक, संवाद, पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाविषयी माहिती दिली.
फोटो ओळ : ‘सत्य शिवाहून सुंदर हे!’ कार्यक्रमात गीते सादर करताना श्रृती घनपाठी, गौरी कुंटे, सचिन घनपाठी, पल्लवी आनिखिंडी.