गुजरातमध्ये कॉलनीत चालली बोट; १३ राज्यांना मुसळधार पाऊस आणि वादळाचा इशारा
मुंबई | प्रतिनिधी
देशभरात मान्सूनने जोरदार हजेरी लावली असून महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) महाराष्ट्र, केरळ, पश्चिम बंगाल, ओडिशासह १३ राज्यांसाठी मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याचा इशारा जारी केला आहे.
वसईच्या नालासोपारा परिसरात मुसळधार पावसामुळे रस्त्यांचे नदीत रूपांतर झाले. मधुबन परिसरात सुमारे पाच फूट पाणी साचल्याने २० कार पाण्याखाली गेल्या, तर एका कारला पाण्याच्या प्रवाहाने जवळपास ५० मीटरपर्यंत वाहून नेल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबईत गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे ६४ झाडे पडली, आठ घरांच्या भिंती कोसळल्या, तर विविध भागांत पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला.
पालघरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने सहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला असून, प्रशासनाने १८० हून अधिक नागरिकांची सुरक्षित सुटका केली आहे.
गुजरातच्या जुनागढमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक भागांत चार फूट पाणी साचले. काही कॉलनींमध्ये नागरिकांना ये-जा करण्यासाठी बोटींचा वापर करावा लागला. तर नवसारीतील अंबिका नदीवरील पुलाला भगदाड पडल्याने ११ गावांचा संपर्क तुटला आहे.
दरम्यान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि उत्तराखंडमध्येही मुसळधार पावसाचा तडाखा कायम आहे. उत्तराखंडमध्ये दरड कोसळल्याने यमुनोत्री राष्ट्रीय महामार्ग काही काळ बंद ठेवावा लागला, तर मंदाकिनी नदीच्या वाढलेल्या प्रवाहात अडकलेल्या दोन चालकांची सुखरूप सुटका करण्यात आली.
देशातील अनेक भागांत पुढील २४ तासांतही मुसळधार पाऊस, पूरसदृश परिस्थिती आणि वादळी वाऱ्याचा धोका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

