गेल्या सहा महिन्यांत १ हजार ८९४ तक्रारी–पुण्यात सायबर गुन्ह्यात चालू वर्षात सहा महिन्यात ऑनलाईन फसवणुकीच्या पुणे सायबर पोलिस ठाण्यात १ हजार ८९४ तक्रारी प्राप्त झाल्या आहे. त्यातील ६६९ गुन्हे दखल सायबर गुन्हे शाखेने घेतली आहे. शेअर ट्रेडिंग फसवणुकीचे ४५९ तक्रारीत ६४ कोटी ४५ लाखांच्या नागरिकांच्या ऑनलाईन फसवणुकी झाल्या आहेत. या सर्व प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
पुणे-संरक्षण मंत्रालयातून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्याची सायबर चोरट्यांनी शेअर मार्केटमध्ये दुप्पट परताव्याच्या आमिषाने तब्बल २ कोटी ९० लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली. याप्रकरणी शिवाजीनगर येथील सायबर पोलिस ठाण्यात ६३ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात सायबर चोरट्यांविरुद्ध आयटी अॅक्ट तसेच फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २३ एप्रिल ते ५ सप्टेंबर या कालावधीत हा प्रकार घडला आहे. अवघ्या चार महिन्यांत एवढ्या मोठ्या प्रमाणात फसवणूक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार पुण्यातील मगरपट्टा सिटीत राहण्यास आहेत. ते केंद्र शासनाच्या संरक्षण मंत्रालयातील मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस विभागात नोकरीस होते. ते २०२१ मध्ये निवृत्त झाले आहेत. दरम्यान, त्यांना एप्रिल महिन्यात शेअर मार्केट ट्रेडिंग व ट्रेनिंगसाठी एसएमएस आला होता. त्यात व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंक दिली होती. तो ग्रुप तक्रारदारांनी जाइन केला. यानंतर त्यांना त्या ग्रुपवरून माहिती तसेच ट्रेनिंग करून दिले. सुरुवातीला तक्रारदार स्वत:च्या डीमॅट खात्यावरून सगळा व्यवहार करत होते. यानंतर जास्त परतावा, डिस्काउंटमध्ये आणि प्री ओपन मार्केटमध्ये शेअर खरेदीसाठी इन्स्टिट्युशनल अकाउंट ओपन करण्यास सांगून त्यांना गंडा घालण्यात आला. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
पैसे परत मिळण्यासाठी १ महिन्याचा कालावधी लागेल, असे सांगण्यात आल्याने त्यांनी एक महिना वाट पाहिली. मात्र, पैसे काही परत आले नाही. यानंतर तक्रारदार इंटरॅक्टिव्ह ब्रोकर या कंपनीच्या बांद्रा कुर्ला कॉम्पलेक्स येथे जाऊन विचारणा केली असता तेथील कर्मचाऱ्यांनी त्यांची फसवणूक करण्यात आली आल्याचे सांगितले. तक्रारदाराने चार महिन्यांत तब्बल २ कोटी ९० लाख ५० हजार रुपये पाठवले आहेत. पैसे परत मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत खात्री केली. तेव्हा त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. पुढील तपास सायबर पोलिस करत आहेत.
तक्रारदार यांना एक लिंक पाठवून आयबी इन्स्टिट्युशनल एडिशन नावाचे अॅप डाऊनलोड करायला लावले. या अकाउंटवरूनच सगळे व्यवहार करायला लावले. तक्रारदारांना सायबर चोरट्यांनी सांगितल्यानुसार बँक खात्यावर पैसे पाठवत होते. त्यांना पाठवलेल्या पैशांवर इन्स्टिट्युशनल अॅपमध्ये तब्बल ८ कोटींचा प्रॉफिट दिसत होता. त्यामुळे त्यांचाही विश्वास बसला होता. यानंतर तक्रारदार यांनी पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता कमिशन ३० लाख रुपये भरायला सांगण्यात आले. त्याप्रमाणे तक्रारदार यांनी ३० लाखसुद्धा भरले. त्यानंतर सायबर चोरट्यांनी १० टक्क्यांप्रमाणे एकूण ५५ लाख रुपये भरावे असल्याचे सांगितल्याने तक्रारदार यांनी पुन्हा ५५ लाख रुपये सायबर चोरट्यांनी सांगितलेेल्या बँक खात्यावर पाठवले.