पुणे:
३६व्या पुणे फेस्टिव्हल अंतर्गत आयोजित पुरुष आणि महिला बॉक्सिंग स्पर्धेत सृष्टी चोरगे बेस्ट बॉक्सर ठरल्या. याशिवाय अभंग वायदंडे – मोस्ट प्रॉमिसिंग, रश्मी माने – बेस्ट चॅलेंजर, मनोज यादव – बेस्ट रेफ्री आणि योगेश भोरे – बेस्ट जज यांची निवड झाली. या स्पर्धा पुण्यातील भवानी पेठ येथील वस्ताद लहुजी साळवे स्टेडियमवर शनिवार, १४ सप्टेंबर रोजी रंगल्या. संपूर्ण दिवसभर झालेल्या या स्पर्धेत ४० पुरुष आणि ४० महिला खेळाडू विविध वजन गटांमध्ये सहभागी झाले होते. या जिल्हास्तरीय स्पर्धा पुणे जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनच्या सहकार्याने आयोजित करण्यात आल्या होत्या.
स्पर्धेचे उद्घाटन सकाळी माजी गृह राज्यमंत्री रमेश बागवे, माजी नगरसेवक अविनाश बागवे, पुणे फेस्टिव्हलचे मुख्य समन्वयक अॅड. अभय छाजेड व क्रीडा समन्वयक प्रसन्न गोखले यांच्या हस्ते संपन्न झाले. सायंकाळी बक्षीस वितरण मोटोक्रॉस विजेते संजय टकले यांच्या हस्ते झाले. यावेळी पुणे बॉक्सिंग असोसिएशनचे मदन वाणी, विजय गुजर, सुरेश गायकवाड आणि अशोक मेमजादे यांची विशेष उपस्थिती होती.