धाराशिव -काँग्रेसने गणपत्ती बाप्पांना अटक करण्याचे काम केल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी कर्नाटकमधील एका घटनेचा दाखला देत महाविकास आघाडीवर निशाणा साधताना केली. काँग्रेस हे पाप कुठे व कसे फेडणार? असा सवालही त्यांनी यासंबंधी उपस्थित केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शनिवारी धाराशिव येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर उपरोक्त टीका केली. एकनाथ शिंदे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करणाऱ्या लोकांनी कर्नाटकात गणपती उत्सव बंद करण्याचे काम केले. काँग्रेसने कर्नाटकात गणपती बाप्पाला अटक करण्याचे काम केले. गणेशोत्सवात गणपती बाप्पांसोबत त्यांनी हे काम केले. ते हे पाप कुठे फेडणार?
कर्नाटकात नेमके काय घडले? कर्नाटकच्या मंड्या जिल्ह्यातील नागमंगला येथे बुधवारी रात्री 8 च्या सुमारास गणेश विसर्जन मिरवणुकीत दोन गटांत राडा झाला होता. यामुळे शहरात तणाव निर्माण झाल्याने पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बंदोबस्त तैनात केला. तसेच काही जणांना ताब्यातही घेतले. यावेळी खबरदारी म्हणून पोलिसांनी गणपतीची मूर्ती पोलिस व्हॅनमध्ये ठेवली होती. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांच्या या कृतीवर आता भाजप व सत्ताधारी पक्षाकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. एकनाथ शिंदेंनीही याच घटनेचा दाखला देत काँग्रेसवर हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला.
राहुल गांधींवरही साधला निशाणा-एकनाथ शिंदे यांनी यावेळी आरक्षण संपवण्याच्या कथित विधानाप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला. राहुल गांधी यांनी परदेशात जाऊन आरक्षण संपवण्याची भाषा केली. आता माझ्या बहिणी या काँग्रेसवाल्यांना घरी पाठवण्याचे काम करतील, असे ते म्हणाले.