Home Blog Page 698

 धनगर समाजाचा आदिवासींमध्ये समावेश अशक्य; मुख्यमंत्र्यांचा जाहीर निषेध

पुणे- धनगर समाजाला (Nashik) अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आरक्षण मिळावे यासाठी सकारात्मक पावले उचलली जातील. ही सर्व प्रक्रिया कायद्याच्या चौकटीत टिकणारी असावी आणि यात अन्य कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही असे प्रयत्न केले जातील. असे आश्वासन मुख्यमंत्री यांनी धनगर समाजाच्या शिष्टमंडळाला दिले आहे. अशा अज्ञानी, अविचारी व संधीसाधू मुख्यमंत्र्यांचा महाराष्ट्रातील आदिवासी समाजाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे.

महाराष्ट्रातील धनगर समाजाला ST प्रवर्गातून आरक्षण देण्याची अनेक वर्षांची मागणी आहे. तर सध्या धनगर समाजाला NT प्रवर्गातील आरक्षण लागू आहे. मात्र मध्यप्रदेश, छत्तीसगडसह अनेक राज्यात धनगड समाजाला अनुसूचित जमाती या प्रवर्गातून आरक्षण आहे. मात्र इंग्रजीत उच्चार करताना D चा उच्चार R असा करण्यात आला आहे. त्यामुळे धनगर आणि धनगड एकच असल्याचा युक्तिवाद करीत धनगर समाजाने ST प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी केली होती. ती उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाने आधीच फेटाळली आहे.

याबाबत सर्वोच्च न्यायालयाने कोळी, कोष्टी, गोवारी व धनगर॒ या जातींच्या याचिका वेळोवेळी फेटाळल्या आहेत. तरीही धनगरांना आदिवासींमधून आरक्षण देण्याबाबत आश्चासन देणे (Nashik) म्हणजे खोटारडेपणाचा कळस आहे. याबाबत तात्काळ शासननिर्णय काढावा आदिवासी समाज त्याला अवमान याचिकेद्वारे आव्हान दिल्याशिवाय राहणार नाही अशी माहिती आदिवासी सेवक पुरस्कार्थी रवींद्र तळपे यांनी दिली आहे.

धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे यासाठी सचिव स्तरावर तातडीने पाठपुरावा करण्यासाठी प्रयत्न केले जातील. यात राज्याचे महाधिवक्ता, विधी व न्याय विभाग यांचा सल्ला घेतला जाईल. आदिवासी विकास विभागासह संबंधित अन्य विभागांचे सचिव तसेच समन्वय समितीच्या सदस्यांचा सक्रिय सहभाग घेऊन अन्य मागण्यांबाबत तातडीने कार्यवाही व्हावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

असे निर्देश देणे म्हणजे हास्यास्पद आहे. उच्च व सर्वोच्च न्यायालयातील धनगर आरक्षणाबाबतच्या घडामोडी व लागलेले निकाल हे मुख्यमंत्री व शासकीय यंत्रणेला माहिती आहे तरीही फक्त येणाऱ्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून धनगर मतदारांना आश्वासने देण्याचा प्रकार सुरू आहे. यापूर्वीच कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब मनमानीपणे करण्याचा प्रयत्न झालेला आहे.

तो आदिवासींनी वेळोवेळी हाणून पाडला आहे. आता धनगरांचा आदिवासींमध्ये समावेश करण्याचा प्रयत्न करणारा (Nashik) कोणताही बेकायदेशीर व घटनाबाह्य शासननिर्णय आदिवासी विकास विभाग किंवा इतर कोणत्याही विभागाने काढल्यास 24 तासांच्या आत त्याला कायद्याच्या व घटनेच्या चौकटीत आदिवासींकडून आव्हान दिले जाईल असेही रवींद्र तळपे यांनी स्पष्ट केले.

संदीप शिंदे यांचे निधन


पिंपरी, पुणे (दि. १७ सप्टेंबर २०२४) चिखली (ऐश्वर्या हमारा, म्हाडा सोसायटी) येथील रहिवाशी युवा उद्योजक संदीप दगडू शिंदे पाटील (वय ४९ वर्षे) यांचे मंगळवारी (दि. १७) निधन झाले. त्यांच्या मागे आई, वडील, दोन भाऊ, एक बहिण, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. अहमदनगर जिल्हा शिक्षक पतसंस्थेचे माजी चेअरमन दगडू शिंदे पाटील यांचे ते चिरंजीव होत. त्यांचा अंत्यविधी मूळ गाव आढळगाव, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर येथे दुपारी करण्यात आला. यावेळी शेती, उद्योग, व्यापार शिक्षण, राजकीय क्षेत्रातील शोकाकुल नागरिक उपस्थित होते.

मानाच्या गणपतींचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पूजन करून विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ

सर्वांना सुख, शांती मिळू दे, सगळीकडे समाधानाचे वातावरण निर्माण होऊ दे-उपमुख्यमंत्र्यांचे गणरायाला साकडे

पुणे, दि. १७: सर्वांना सुख, शांती, आनंद मिळू दे, सगळीकडे समाधानाचे वातावरण निर्माण होऊ दे, असे साकडे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी गणरायाच्या चरणी घातले. शहरातील विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ करताना ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या…!’ असा घोष करून भावपूर्ण वातावरणात निरोप दिला.

श्री. पवार यांनी महात्मा फुले मंडई परिसरात पुण्यातील कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी गणपती, गुरुजी तालिम मंडळ, श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, लोकमान्य टिळक गणेशोत्सव मंडळ केसरीवाडा या मानाच्या पाच गणपतीचे पूजन करुन दर्शन घेतले. त्यानंतर या मंडळाच्यावतीने विसर्जन मिरवणुकीस सुरु करण्यात आली.

यावेळी केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार सुनेत्रा पवार, आमदार रवींद्र धंगेकर,दीपक मानकर ,संदीप खर्डेकर , राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे आदी उपस्थित होते.

तत्पूर्वी श्री. पवार यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ आणि अखिल मंडई गणेशोत्सव मंडळाला भेटी देऊन श्री गणेशाची आरती करुन दर्शन घेतले.

श्री. पवार म्हणाले, देशासह राज्यात मोठ्या उत्सवात भक्तीमय वातावरणात गणरायाचे आगमन झाले आणि त्याचे स्वागत झाले. पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवाची एक मोठी परंपरा असून मोठा नावलौकिक आहे. गणेशोत्सवात सर्व जातीधर्माचे नागरिक सहभागी होतात, याला साजेसे काम पुणेकरांनी करावं, असे आवाहन श्री. पवार यांनी केले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाच्या गणपतीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात, हे पाहता आजच दुपारी ४ वाजेपर्यंत श्री गणेश मूर्तीचे विसर्जन करण्याच्या निर्णय श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाने घेतला आहे, यामुळे नागरिक आणि प्रशासनावरील ताण कमी होतो, असे नवनवीन पायंडे पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांकडून पाडण्यात येत असतात, ही चांगली बाब आहे.

राज्यात कायदा सुव्यवस्था सुस्थितीत ठेवण्यासाठी राज्य शासन नेहमीच प्रयत्नशील असते. सण, उत्सवाच्या काळात प्रशासनाच्यावतीने करण्यात नियमांचे पालन करुन नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही श्री. पवार यांनी केले.

यावेळी कसबा गणपतीचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, तांबडी जोगेश्वरी गणपती मंडळाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, गुरुजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी, श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष विकास पवार आणि लोकमान्य टिळक गणेशोत्सव मंडळाचे उत्सवप्रमुख डॉ. रोहित टिळक, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदीराचे अध्यक्ष माणिक चव्हाण, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे अध्यक्ष संजीव जावळे, अखिल मंडई गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांच्यासह विविध मंडळाचे विश्वस्त, पदाधिकारी उपस्थित होते.तत्पूर्वी महात्मा फुले मंडई परिसरातील लोकमान्य टिळक आणि उप पंतप्रधान स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास श्री. पवार यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

मद्यधुंद चालकाच्या मोटारीची थेट मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या ताफ्यातील गाडीला धडक; कोथरूड पोलिसात गुन्हा दाखल

पुणे- थेट दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांमुळे पुण्यात सामान्य नागरिकांसह मंत्री देखील असुरक्षित असल्याचे दिसून आले आहे. कोथरूड येथील आशिष गार्डन चौकात सोमवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या ताफ्यातील वाहनास अशाच एका मद्यधुंद चालकाच्या मोटारीची धडक बसली असून चंद्रकांत पाटील थोडक्यात बचावले आहे.

एका कार चालकाने दारू पिऊन बेदरकारपणे वाहन चालवत चंद्रकांत पाटलांच्या ताफ्यातील गाडीला भीषण धडक दिली. त्यामुळे खळबळ उडाली. मद्यधुंद चालकासह सोबत असलेल्या दोन महिलांवरही याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, काल रात्री माझा ताफ्यातील वाहनास मोठा अपघात झाला. दारूने तर्र झालेल्या दोन पोरांच्या गाडीने आमच्या एसपीओ वाहनास उडवलं. आता याला गृहमंत्री काय करणार ? गृहमंत्र्यांनी तिथे येऊन उभे राहिले पाहिजे का की, दादाची गाडी तिथे चालली आहे. पोलिसांनी आता दोषींवर कारवाई केली असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी या वेळी म्हटले आहे.

चंद्रकांत पाटील यांनी गणेश मिरवणुकीचे उत्सवात सहभागी झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले की, यंदाचा गणपती उत्सव उत्तम झाला. लोकांमध्ये मोठा उत्साह होता, खूप गर्दी देखील होती.बाप्पाला एकच प्रार्थना केली तुझा आज विसर्जन करत आहोत, कुठलेही अडचण येऊ देऊ नको. महायुतीचा सरकार पुन्हा एकदा राज्यात आले पाहिजे, हे मागणे मागितले आहे. बाप्पाचे आशीर्वाद आहेच, पण आमचे ही कर्तुत्व आहे. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात सरकारने अनेक योजना आणलेल्या आहेत त्यामुळे 170 वर आम्ही पोहचू, असा दावा देखील त्यांनी केला.

मराठा समाजाला आता समजू लागलेला आहे की, मनोज जरांगे आता तथ्य सोडून बोलत आहेत. तथ्य काय आहे ते देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण प्रथम दिलेले आहे. उद्धव ठाकरे यांनी घालवलेला आरक्षण देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा दिले. एकनाथ शिंदे यांनी आरक्षण दिले तरी मराठा समाजाचा राग देवेंद्र फडणवीस यांच्यावर का? हे कळत आहे. वारंवार देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करून जरांगे त्यांची सहानभूती घालवत आहेत. खासदार शरद पवार यांच्या कारकिर्दीत मंडल आयोग आला असताना सुतार ओबीसीमध्ये टाकले, लोहार टाकला…मग मराठा समाजाला ओबीसी मध्ये टाकण्यास त्यांची का हरकत होती? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. तेव्हा तुम्ही का टाकले नाही, असा प्रश्न त्यांनी विचारला. 10 टक्के मराठा आरक्षण केंद्र सरकारनी दिले आहे. तरीसुद्धा सारखे राज्य, केंद्रावर बोट का दाखवतात? मनोज जारंगे एका मोठ्या शिखरावर गेले, तिथे त्यांनी सर्वांना समान न्याय देऊन वागवले तर ठीक असल्याचेही पाटील यांनी म्हटले आहे.

विश्वकर्मारुपी मोदींच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक आणि पूजा..पाटण्यात मोदी भक्तांनी केला कहर

१७ सप्टेंबर हा दिवस भगवान विश्वकर्मा पूजा दिन म्हणून ओळखला जातो आणि १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७४वा वाढदिवस साजरा होत आहे, या दोन प्रसंगांच्या निमित्ताने पाटण्यातील मोदी भक्तांचा उत्साह ओसंडून वाहू लागला आहे, त्यांनी अनोख्या पद्धतीने आपला आदर व्यक्त केला.

पाटण्यातील वेद शाळेत भाजपा नेते कृष्ण सिंह कल्लू यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मोदी यांची एक चित्रकला भगवान विश्वकर्मांच्या रूपात साकारली आणि त्या प्रतिमेचे दुधाने अभिषेक केले. यावेळी मोदी यांच्या प्रतिमेला तिलक लावून आरतीही करण्यात आली. कार्यकर्त्यांनी सांगितले की, “पीएम मोदी आधुनिक भारताचे विश्वकर्मा आहेत, आणि त्यांच्या नेतृत्वात भारताने जागतिक स्तरावर आपले नाव कमावले आहे.”

कृष्ण सिंह कल्लू यांनी सांगितले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ भारताचे नव्हे तर जागतिक स्तरावरही प्रभावी नेते आहेत. आम्ही त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली आहे, आणि त्यांच्या कार्यातून देशाचा विकास अधिक गतीने होत आहे.”

कार्यकर्त्यांनी मोदी यांना भारताच्या नव्या रूपाचे शिल्पकार मानले असून, त्यांची तुलना भगवान विश्वकर्माशी केली आहे, जे निर्माण आणि सृजनाचे देवता म्हणून ओळखले जातात. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी मोदी यांच्या नेतृत्त्वातील भारताच्या वाढत्या विकासाचा गौरव केला आणि त्यांच्या यशस्वी भविष्याची कामना केली.

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भारतभरातील भाजप कार्यकर्त्यांनी विविध ठिकाणी आपापल्या पद्धतीने उत्सव साजरा केला आहे. पाटण्यातील हा प्रसंग मात्र विशेष ठरला, कारण त्यात भगवान विश्वकर्मा पूजेचा संदर्भ घेत मोदी यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.

बिहार भाजपा प्रवक्ते प्रभाकर मिश्रा यांनी सांगितले की, “भगवान विश्वकर्मा आणि पीएम मोदी यांचा वाढदिवस एकाच दिवशी येणे हा एक अद्वितीय योगायोग आहे. नरेंद्र मोदी हे आधुनिक भारताचे विश्वकर्मा आहेत. त्यांच्या नेतृत्त्वाखाली भारताचा नवनिर्माण होत आहे आणि देश प्रगतीच्या मार्गावर वेगाने पुढे जात आहे.”मिश्रा यांनी पुढे म्हटले की, “आजच्या दिवशी आपण भगवान विश्वकर्मा यांच्या रूपात पंतप्रधान नरेंद्र मोदींची पूजा केली आहे कारण त्यांनी देशाच्या सर्व क्षेत्रांमध्ये नवे शिल्प तयार केले आहे. त्यांच्या नेतृत्वात भारत २०४७ पर्यंत विकसित देशांच्या यादीत स्थान मिळवेल यात शंका नाही.”

देशातील विविध राज्यांमध्ये देखील भाजप कार्यकर्त्यांनी पीएम मोदींच्या वाढदिवसाचा मोठ्या उत्साहाने साजरा केला आहे. काही ठिकाणी रक्तदान शिबिरे, मोफत आरोग्य तपासणी शिबिरे आणि वृक्षारोपणाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

भगवान विश्वकर्मा हे निर्माण तंत्रज्ञान आणि शिल्पकलेचे देवता मानले जातात. मोदी यांच्या नेतृत्वात भारताच्या औद्योगिक आणि तांत्रिक विकासाने नवी उंची गाठली आहे. त्यांनी नव्या योजनांची अंमलबजावणी करून देशातील गरिबांना विकासाच्या प्रवाहात आणले आहे. मोदी यांच्या कार्यातून भारताच्या जागतिक प्रभावाची ओळख झाली आहे.

यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी मोदी यांच्या नेतृत्वाची स्तुती करताना सांगितले की, “पीएम मोदी हे संपूर्ण जगात भारताच्या गौरवाचे प्रतीक बनले आहेत. त्यांच्या दूरदृष्टीने भारत नव्या युगात प्रवेश करत आहे, आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली देश समृद्धीच्या दिशेने चालला आहे.”

आतिशी होणार दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री:केजरीवाल यांनी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला, थोड्याच वेळात घोषणा

नवी दिल्ली- केजरीवाल सरकारमध्ये शिक्षणमंत्री असलेल्या आतिशी या दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री असतील. अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी आम आदमी पक्षाच्या (AAP) विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. आतिशी यांच्या नावाची लवकरच घोषणा केली जाईल.दुपारी 4:30 वाजता केजरीवाल लेफ्टनंट गव्हर्नर (एलजी) विनय सक्सेना यांच्याकडे राजीनामा सोपवतील आणि नवीन मुख्यमंत्र्यांचे नाव सांगतील. नवीन मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा शपथविधीही याच आठवड्यात होणार आहे.

26 आणि 27 सप्टेंबर रोजी विधानसभेचे दोन दिवसीय अधिवेशन बोलावण्यात आले आहे. 13 सप्टेंबरला मद्य धोरण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर केजरीवाल यांनी 15 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होण्याची घोषणा केली होती. ते म्हणाले होते, ‘मी प्रामाणिक की बेईमान हे आता जनतेने ठरवावे. जनतेने हा डाग धुवून विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला तर मी पुन्हा खुर्चीवर बसेन.

सातारा रस्त्यावरील डी-मार्ट चौकातले ‘ते’ लुटारू ४ अल्पवयीन मुले..पोलिसांनी पकडली

पुणे- रात्रीच्या वेळी चालत जाणा-या नागरिकांना चाकुचा धाक दाखवुन जबरदस्तीने मोबाईल हिसकवणारे 4 अल्पावायीन मुलांना सहकारनगर पोलीसांनी पकडले आहे. पुणे सातारा रस्त्यावर डी-मार्टचे चौकात पहाटे पावणेचार वाजता त्यांनी एका तरुणाला चाकूचा धाक दाखवून लुटले होते .

पोलिसांनी सांगितले कि,’ दि.10/09/2024 रोजी फिर्यादी हे पुणे सातारा रोड येथील डी-मार्टचे चौकात ट्रॅव्हल्स मधून उतरून डी मार्टचे समोर मित्राची वाट पाहत थांबले असता.त्यावेळी अचानक पाठीमागुन एका मोपेड दुचाकीवर चार अनोळखी इसम आले व फिर्यादी यांना चाकुचा धाक दाखवुन हातातील मोबाईल फोन व बॅग जबरदस्तीने हिसकावुन घेतली.व इतर दोन साथीदारांनी पॅन्टचे खिशातील रक्कम जबरदस्तीने काढुन घेतली. त्याबाबत सहकारनगर पोलीस स्टेशन गु.र.नं.299/2024 भारतीलय न्याय संहिता 2023 चे कलम 309(4), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दिनांक 15/09/2024 रोजी सदर दाखल गुन्हयाचा तपास वरिष्ठ पालीस निरीक्षक श्री छगन कापसे यांचे मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलीस स्टेशन कडील तपास पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार असे तपास करित असताना पोलीस अंमलदार महेश मंडलीक व अमित पदमाळे यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की सदर गुन्हा करणारे इसमापैकी एक इसम हा डायस प्लॉट गुलटेकडीचे कॅनलवर थांबलेला आहे.त्यास ताब्यात घेवुन त्याच्या कडे सदर गुन्हयाच्या अनुशंगाने तपास केला असता सदर विधीसंघर्षीत बालकाने सदरचा गुन्हा त्याचे इतर तीन विधीसंघर्षीत बालकां सोबत मिळुन केल्याचे कबुल केल्याने तीन विधीसंघर्षीत बालकांना पिंपरी येथुन ताब्यात घेवुन त्यांचे कडुन चोरीस गेलेला मोबाईल तसेच गुन्हयात वापरलेला चाकु व एक दुचाकी गाडी तसेच विविध कंपनीचे इतर चार मोबाईल असे
एकुण 2,68,200/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

सदरची कामगीरी अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ-2, श्रीमती स्मार्तना पाटील , सहा.पोलीस आयुक्त,स्वारगेट विभाग श्रीमती नंदिनी वग्यानी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. छगन कापसे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) उत्तम भजनावळे यांचे मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकाचे सहा पोलीस निरीक्षक सागर पाटील, सहा.पोउपनिरी बापु खुटवड, पोलीस अंमलदार महेश मंडलिक,अमित पदमाळे, अमोल पवार, किरण कांबळे, विशाल वाघ , बजरंग पवार, चंद्रकांत जाधव, सागर सुतकर, खंडु शिंदे,योगेश ढोले,महेश भगत, सागर कुंभार यांनी केली

‘बाईचे जीवन अवघड असतं इतकच आईन सांगितलं‌’


दाहक सत्य, उपहास, विडंबन काव्यातून कवींनी केले थेट भाष्य
कोथरूड गणेश फेस्टिवलचा समारोप
पुणे : सध्याच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय विषयांवर भाष्य करीत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या कवींनी आपल्या सादरीकरणातून वास्तव चित्र मांडले.
‌‘कधी कधी सरस्वतीचा मोर होऊन तर कधी कधी सिंहासनाचा मुकुट होऊन लक्ष्मीच्या स्पर्शाने शय्येवर पहुडलेला असतो आणि चारित्र्यवान मनातसुद्धा एक आसारामबापू दडलेला असतो‌’, ‌‘तळ्याच्या काठाला रेशमी पातळ, पाण्यात पांगल्या सावल्या नितळ‌’, ‌‘मला वाटले जग हे सुंदर बाहेरून‌’, ‌‘ग्रुपवर पडू लागतात मेसेज‌’, ‌‘तुझ्या मनगटावर दादा बांधला मी धागा‌’, ‌‘खळखळून हसायची, निगुतीन रहायची‌’ अशा वैविध्यपूर्ण विषयांवरील कविता तर काही उपहासात्मक, विडंबनात्मक काव्यांनी पुणेकरांच्या चेहऱ्यावर कधी हसू तर डोळ्यात कधी आसू आणले.
संवाद, पुणे, प्रबोधन विचारधारा यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित कोथरूड गणेश फेस्टिवलचा समारोप सोमवारी (दि. 16) सायंकाळी मराठी कविसंमेलनाने झाला. यात प्रकाश होळकर (लासलगाव), आबा पाटील (मंगसुळी), भरत दौंडकर (निमगाव म्हाळुंगी), लता ऐवळे (सांगली), भाग्यश्री केसकर (धाराशिव), गुंजन पाटील (संभाजीनगर), अंजली कुलकर्णी (पुणे), अनिल दीक्षित (पुणे), विजय पोहनेरकर (संभाजीनगर), शशिकांत तिरोडकर (पुणे), बालिका बिटले (सातारा), प्रशांत मोरे (मालेगाव) यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वात्रटिकाकार, प्रसिद्ध कवी रामदास फुटाणे यांनी केले. महोत्सवाचे यंदाचे तिसरे वर्ष आहे.
‌‘सामना‌’ चित्रपटाच्या निर्मितीला 50 वर्षे झाल्यानिमित्ताने रामदास फुटाणे यांचा श्री रवळनाथ को-ऑप फायनान्स सोसायटीचे चेअरमन एम. एल. चौगुले, श्री रवळनाथ को-ऑप फायनान्स सोसायटीचे ब्रँच मॅनेजर सुहास नाडगौडा यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. संवाद, पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन, निकिता मोघे यांची उपस्थिती होती.
‘नुसतच वाहत जावं खळाळत्या ओढ्यातून, ‌‘सांजवेळी आला फुलांचा पाऊस‌’, ‌‘माझे आभाळ तुला घे, तुझे आभाळ मला‌’ अशा कवितांमधून निसर्गाचे गाणे ऐकवले तर ‌‘तुमच्या हुकुमावरून फोटो लावला‌’, ‌‘वड म्हटला बाई‌’, ‌‘माझा भाकरीचा शोध संपेपर्यंत हसत रहा मोनालिसा‌’, ‌‘जीणं फाटतया तिथच ओवावा धागा‌’, ‌‘तो ती ते‌’, ‌‘फाटकेच लुगडं झंपर आणि धोतर जाडे-भरडे‌’ अशा विविध काव्यांमधून समाजजीवनातील दाहक सत्य मांडले गेले.
‌‘हल्ली कुणाचं काय सुरू काहीच मेळ लागत नाही‌’, ‌‘माझ्या डोळ्यातील आसवं कुणी मायेनं पुसताना, उरी हुंदका दाटतोया गोष्ट बापाची सांगताना‌’, ‌‘बाईचे जीवन अवघड असतं इतकच आईन सांगितलं‌’, ‌‘काहीच गुन्हा नसताना बापाला पोलिस घेऊन गेले तेव्हा मुलगा पुस्तक वाचत होता‌’ अशा ओळींमधून मानवी नात्यांमधील भावनिक गुंतागुंतीचे दर्शनही घडविले.
गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात झालेली राजकीय स्थित्यंतरे, फायद्यासाठी पक्षबदलूपणा, खुर्ची टिकविण्यासाठी होत असलेल्या गळाभेटी, मतदारांना आकर्षित करण्यासाठी जाहीर केलेल्या योजनांवर कवींनी विडंबनात्मक पद्धतीने केलेले भाष्य उपस्थितांना विशेष भावले.
मान्यवरांचा सत्कार सुनील महाजन, निकिता मोघे यांनी तर कवींचा सन्मान एम. एल. चौगुले, सुहास नाडगौडा, महेंद्र काळे यांच्या हस्ते करण्यात आला.

३६व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये अभिनेत्री वैजयंतीमालांवरील गीते व नृत्य सादर

पुणे-

‘जुलमी संघ आख लडी’, ‘नील गगन की छाव मे’, ‘दिल पुकारे आरे आरे’, ‘दिल तडप तडप’ अशा बहारदार गाण्यांना वन्समोअर मिळत राहिला आणि आपल्या लयबद्ध व वेगवान नृत्याविष्कारातून कोट्यवधी चित्रपट रसिकांच्या मनात कायमचा स्थान मिळवणाऱ्या अभिनेत्री वैजयंतीमाला यांच्याबद्दलच्या आठवणी जाग्या झाल्या. त्यांच्या चित्रपटातील गाजलेल्या गाण्यांवर आधारित ‘आम्रपाली’ हा विशेष संगीत व नृत्य कार्यक्रम पुणे फेस्टिव्हल अंतर्गत बालगंधर्व रंगमंदिर येथे दि. १५ सप्टे. रोजी संपन्न झाला. अभिनेत्री वैजयंतीमाला यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले गेले. त्यानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन पुणे फेस्टिव्हलमध्ये करण्यात आले होते. प्रख्यात गायिका गीतांजली जेधे यांनी या कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमास रसिक प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिला.

प्रख्यात गायिका गीतांजली जेधे आणि प्रसिद्ध गायक हिंमत कुमार पंड्या यांनी सदाबहार गीते सादर केली. त्यांना प्रज्ञा खरात, अश्विनी बिरारी, ज्योती साळुंखे यांनी गायन साथ दिली. वाद्यसंगत अभिजीत भदे, मिहीर भडकमकर, नितीन दोशी, रोहित जाधव, रोहित साने, केविन, सचिन वाघमारे, हार्दिक रावल, रशीद शेख आणि सुनील गायकवाड यांनी केले. या गायकांसमवेत भरतनाट्यम  नृत्यांगना रमा वाळिंबे आणि स्वाती धोकटे यांनी नृत्य सादर केली.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नामवंत मेलडी मेकर्सचे संस्थापक अशोक कुमार सराफ, प्रवीण सराफ, महावीर जैन कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष युवराज शहा, शाहू विद्यामंदिरचे व लॉ कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष अंकलकोटे पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमाचे निवेदन अनुराधा भारती यांनी केले.

पुण्यात पुन्हा दिवसा ढवळ्या गोळीबार

पुणे-पुण्यातल्या कोंढवा परिसरात आज भरदिवसा एका वाळू सप्लाय करणाऱ्या व्यवसायिकावर अज्ञातांनी तीन गोळ्या झाडल्या आणि तिथून ते फरार झाले. वाळू व्यवसायिक गंभीररित्या जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. दिलीप गायकवाड असं जखमी झालेल्या व्यवसायिकाचं नाव आहे. तर पोलिसांनी याप्रकरणी तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतलं आहे. घटनास्थळी पोलीस उपायुक्त आर. राजा यांनी घटनास्थळी पाहणी केली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
पुणे शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. मागील काही दिवसांत हत्या, मारामारी, कोयता गँगचे हल्ले, गोळीबाराच्या अनेक घटना समोर आल्या. आता पुन्हा एकदा पुणे शहर गोळीबाराच्या घटनेनं हादरलं आहे. पुण्यात गोळीबार झाल्याची घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. एका महिन्यात ही तिसरी ते चौथी गोळीबाराची घडना घडली आहे. त्यामुळे पोलीस सुरक्षा राम बोरसे आहे असं म्हणायची वेळ सर्वसामान्य नागरिकांवर आली आहे.

क्राफ्टनने BGMI साठी केली दीपिका पादुकोणबरोबर भागीदारी

दीपिका पादुकोण BGMI मध्ये एक खेळण्यायोग्य पात्र म्हणून दिसणार आहे.

चाहते दीपिकाला वेगवेगळ्या पात्रांमध्ये तिच्या आयकॉनिक स्टाइल आणि व्यक्तिमत्त्वासह बघू शकतील.

नवी दिल्ली, १६ सप्टेंबर २०२४ – भारतातील सर्वात प्रिय बॅटल-रॉयल गेम, बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडिया (BGMI) चे निर्माते क्राफ्टन यांनी जागतिक सिनेमा आयकॉन दीपिका पादुकोण बरोबर भागीदारीची घोषणा केली आहेहे. या एका वर्षाच्या खास भागीदारीत दीपिका पादुकोण BGMI ची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून सहभागी होणार आहे. त्यामुळे गेमिंग आणि मनोरंजनाच्या नव्या युगाची सुरुवात होणार आहे.

या भागीदारीचाच एक भाग म्हणून, दीपिका पादुकोण लवकरच BGMI मध्ये एक खेळण्यायोग्य पात्र म्हणून दिसणार आहे, दोन विविध पोशाखात दीपिका पादुकोण दिसेल. त्यातून तिचं व्यक्तिमत्त्व आणि स्टाइल आणखी खुलून दिसेल.

रणवीर सिंग, हार्दिक पांड्या आणि मुंबई इंडियन्स सारख्या भारतीय स्टार्ससोबतच्या यशस्वी भागीदारीनंतर, क्राफ्टनने भारतीय खेळाडूंना लक्षात घेऊन सखोल गेमिंग अनुभव देण्याची कटिबद्धता कायम ठेवली आहे.. दीपिका पादुकोणबरोबरची भागीदारी कंपनीसाठी आणखी एक मोलाचा टप्पा ठरणार आहे.

या भागीदारीबद्दल बोलताना क्राफ्टन इंडियाचे सीईओ सीन ह्यूनिल सोन म्हणाले, “आम्ही दीपिका पादुकोणसोबत भागीदारी करण्यास उत्सुक आहोत. दीपिका ही जागतिक पातळीवरची ब्रँड अॅम्बेसेडर आणि आयकॉन आहेत. तिच्यामुळे आमच्या खेळाडूंना अविस्मरणीय क्षण अनुभवता येतील. ही भागीदारी म्हणजे नवीन अनुभवांची निर्मिती करण्याचा तसंच BGMI चाहत्यांसाठी वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न आहे. गेमिंग आणि मनोरंजनाच्या जगाला एकत्र आणून, दीपिका पादुकोण सारख्या मोठ्या स्टारला केंद्रस्थानी ठेवून, आम्ही BGMI मध्ये खरोखरच सखोल आणि गुंतवून ठेवणारा अनुभव निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहोत.”

दीपिका पादुकोण म्हणाली, “BGMI कुटुंबासोबत या नवीन अध्यायाची सुरुवात करण्याची संधी मिळाल्यामुळे मला खूप आनंद होत आहे. भारतात गेमिंग हे सांस्कृतिक आकर्षण झालं आहे, आणि मी गेमिंग समुदायाच्या जबरदस्त उर्जेचा भाग होण्यास उत्सुक आहे. इतक्या गतिमान आणि आकर्षक गोष्टीचा भाग होणं ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. माझ्या चाहत्यांचा इन-गेम अवतार आणि विशेष वस्तूंना कसा प्रतिसाद मिळतो ते पाहण्यासाठी मी खूप उत्सुक आहे!

क्राफ्टनने कायमच भारतीय खेळाडूंशी संबंधित गेमिंग क्षेत्राचे अनुभव देऊन पुनर्रचनेवर भर दिला आहे .नवीन भागीदारी, गेम रिलीज, आणि टायटल अपडेटच्या माध्यमातून कंपनीने नावीन्य आणि कस्टमायझेशन या त्यांच्या वचनबद्धतेची पूर्तता केली आहे. भारताच्या सर्वात मोठ्या सुपरस्टार दीपिका पादुकोणसोबतची ही भागीदारी या दृष्टिकोनाचं द्योतक आहे. त्यामुळे BGMI चे सांस्कृतिक आयकॉन म्हणून स्थान अधिक बळकट झाले आहे.

नेमबाजीत उंड्री येथील ध्रुव ग्लोबल स्कूलला ८ पदके१ सुवर्ण, ३ रौप्य आणि ४ कांस्य पदके

पुणे, 16 सप्टेंबरः पुणे जिल्हास्तरीय शालेय नेमबाजी स्पर्धेत ध्रुव ग्लोबल स्कूलच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करून एकूण ८ पदकांवर वर्चस्व प्रस्थापित केले. यामध्ये १ सुवर्ण, ३ रौप्य आणि ४ कांस्य पदकांचा समावेश आहे. ही स्पर्धा १४, १७ व १९ वर्षाखालील मुले व मुलींमध्ये पीप साईट रायफल, ओपन साईट रायफल आणि एअर पिस्तूल या प्रकारात पार पडल्या.
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे व पुणे शूटिंग स्पोर्टस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने उंड्री येथील ध्रुव ग्लोबल स्कूल मध्ये पुणे जिल्हास्तरीय शालेय नेमबाजी (शूटिंग) स्पर्धा २०२४-२५ नुकतीच संपन्न झाली. यामध्ये जिल्ह्यातील अनेक शाळांमधील १८५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदिविला होता. जिल्ह्याच्या अनेक संघाने चुरशीने लढत देत वर्चस्व राखले. सर्व विजेतांना ध्रुव ग्लोबल स्कूलच्या मुख्याध्यापिका शारदा राव यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. सर्व विजयी खेळाडूंना स्कूलच्या संचालिका अनिष्का यशवर्धन मालपाणी यांनी शुभेच्छा दिल्यात.
विजयी खेळाडूः
ओपन साईट एअर रायफलः १७ वर्षाखालील मुलांमध्ये राजवीर गायकवाड (सुवर्ण), १४ वर्षाखालील मुलीं मध्ये मासिरा बेंनुर (रौप्य), १४ वर्षाखालील मुलीं मध्ये शर्वरी सुरवासे (कांस्य) , १४ वर्षाखालील मुलां मध्ये दिशांक तितोरीया (कांस्य) आणि १७ वर्षाखालील मुलीं मध्ये रोशनी साबळे (कांस्य) पदकांचे मानकरी ठरले.
पीप साईट एअर रायफलः१४ वर्षाखालील मुलीं मध्ये अनन्या कांबळे (रौप्य) व १४ वर्षाखालील मुलांमध्ये विक्रमादित्य परमार (कांस्य) याला पदक मिळाले.
एअर पिस्तूलः १४ वर्षाखालील मुलांमध्ये शिवांश कुलथे (रौप्य) पदक मिळाले.

आर्थिक देवाणघेवाणीतून गोळीबार:बंदुकीसह तब्बल 175 काडतुसे व पिस्टलचे 40 जिवंत काडतुसे जप्त

पुणे-सोलापूर रस्त्यावर उरळीकांचन पोलिस स्टेशनच्या हद्दीत इनामदारवस्ती येथे भरदिवसा एकाने पिस्तुलातून दोघांवर गोळीबार केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. याप्रकरणी उद्योजक दशरथ विठ्ठल शितोळे (वय-४६,रा.कोरेगाव, ता.हवेली,पुणे) , त्याची पत्नी निलीबा दशरथ शितोळे (४२), जिग्नेश बापु ऊर्फ दशरथ शितोळे (१९), आशा सुरेश भोसले (५२), निखील अशोक भोसले (२५, सर्व रा.कोरेगाव,ता.हवेली,पुणे) या आरोपींवर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.

४० लाखांचे आर्थिक देवाणघेवाणीतून सदरचा गोळीबार झाला असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून आरोपींच्या ताब्यातून स्थानिक गुन्हे शाखेने एक बंदुक तिचे १७५ काडतुसे व पिस्टलचे ४० काडतुसे, तीन बॅरल, दोन खाली मॅगझीन हा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली आहे.

या घटनेत काळुराम महादेव गोते व शरद कैलास गोते ( दोघे रा.भिवरी, ता.हवेली,पुणे) हे जखमी झाले आहे. आरोपी व जखमी यांच्यात आर्थिक व्यवहाराचा वाद सुरु होता, तक्रारदार गोते यांचे आरोपीकडे ४० लाख रुपये दीड वर्षापूर्वी उसने दिलेले होते. सदरची रक्कम परत देतो असे सांगुन आरोपीने काळुराम गोते व शरद गोते यांना त्यांचे पैसे परत देतो माझ्या घरी या असे सांगितले.

त्यांना घरी बोलावून पैसे परत मागितल्याच्या रागातून आरोपीने त्याच्याकडील परवाना असलेल्या पिस्टलमधून सदर दोघांवर गोळीबार केला. यात काळुराम गोते याच्यावर जीवे ठार मारण्याचे उद्देशाने चार राऊंड फायरिंग करुन काळुराम गोते यांना हाताला व पायाला राऊंड लागून गंभीर जखमी करण्यात आले आहे.

उरळीकांचन सारख्या मध्यवर्ती गजबजलेल्या ठिकाणी गोळीबार झाल्याने पोलिस अधीक्षक यांनी घटनास्थळी भेट देऊन एलसीबी व उरळीकांचन पोलिस स्टेशन यांचे वेगवेगळे तपास पथक कार्यरत केले. एलसीबीचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांचे पथकास या गुन्हयातील मुख्य आरोपी हा उरळीकांचन परिसरात रेल्वे रुळाचे पलीकडे असलेल्या शेतात लपवून बसल्याची माहिती मिळाली. त्यानुसार आरोपींना सापळा रचून अटक करण्यात आली आहे.

व्ही जॉन इंडियातर्फे शेविंग क्रीम आणि फोमने बनविलेल्या आशियातील पहिल्या ८ फुटी गणपतीचे अनावरण

पुणे – सर्जनशीलता, परंपरा आणि नावीन्याचा अनोखा मेळ घालत, व्ही जॉन इंडिया या पुरुषांसाठीच्या ग्रुमिंग क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीने ८ फुटी गणपतीच्या आकर्षक मूर्तीचे अनावरण केले असून, ही मूर्ती पूर्णपणे शेविंग क्रीम आणि फोम वापरून बनविण्यात आली आहे. पुण्यातील ग्रँड स्ट्रीट मॉल येथे ‘व्ही जॉन गणपती’ नावाने ही मूर्ती बसविण्यात आली आहे. या मूर्तीला एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये शेविंग क्रीम आणि फोमपासून बनविलेल्या सर्वात मोठ्या गणपतीचे अधिकृत स्थान मिळाले आहे.

दैनंदिन जीवनातील ग्रुमिंगचे महत्त्व अधोरेखित करण्याच्या व्ही जॉन इंडियाच्या प्रयत्नांतून ही सर्जनशील मूर्ती साकारण्यात आली आहे. हुशारी, नवा आरंभ आणि यशाचे प्रतीक असलेल्या गणरायाची निवड करत व्ही जॉन ब्रँडने सेल्फ केयर व ग्रुमिंगचे महत्त्व कल्पकतेने इतरांपर्यंत पोहोचविले आहे. हा संदेश प्रभावीपणे देण्यासाठी व्ही जॉन गणपती, व्ही जॉनची अत्याधुनिक उत्पादने – व्ही जॉन प्रीमियम शेविंग क्रीम आणि व्ही जॉन स्पेशल मॉइश्चरायझिंग फॉर्म्युला- बेस्ड शेविंग फोम वापरून साकारण्यात आला आहे.

हा अशा प्रकारचा पहिलाच गणपती साकारण्यासाठी शेविंग क्रीम आणि फोमचे ३,५०० युनिट्स वापरण्यात आले असून, १५ दिवसांच्या अथक मेहनतीतून मूर्ती तयार करण्यात आली आहे. ही मूर्ती नेत्रदीपक आमि शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना असून, ग्रुमिंग आणि सेल्फ-केयर ही ब्रँडची तत्त्वे ठळकपणे अधोरेखित करणारी आहे.

याप्रसंगी व्ही जॉन इंडियाचे विपणन व्यवस्थापक आशुतोष चौधरी म्हणाले, ‘गणेश चतुर्थी हा भक्तीचा, नवी सुरुवात करण्याचा आणि उत्सवाचा काळ असतो. ज्याप्रकारे गणपती बाप्पांना आपल्या हृदयात महत्त्वाचे स्थान आहे, त्याप्रमाणे पर्सनल केयरलाही आयुष्यात महत्त्वाचे स्थान असायला हवे, हे आम्हाला अधोरेखित करायचे होते. व्ही जॉन गणपतीच्या माध्यमातून आम्ही परंपरा जपत ग्रुमिंगचे महत्त्व कल्पकतेनं दाखविले आहे.’

व्ही जॉन गणपतीच्या अनावरणप्रसंगी मॉलमधील ग्राहक आणि भक्तांनी भरभरून प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असलेल्या या मूर्तीला मीडियामध्येही ठळक प्रसिद्धी मिळाली. यामुळे उत्सवी काळात ब्रँडचे ग्राहकांशी असलेले नाते आणखी दृढ होण्यास मदत झाली आहे.

या उपक्रमासह व्ही जॉन इंडियाने गणेश चतुर्थीचा उत्सव आणि ब्रँडचे तत्त्व यांचा यशस्वीपणे मेळ घालत परंपरा व आधुनिक मूल्यांशी सुसंगत अविस्मरणीय मार्केटिंग कॅम्पेनची निर्मिती केली आहे.

बेताल आमदार संजय गायकवाडच्या मुसक्या आवळा!: नाना पटोले

राहुल गांधींच्या केसाला धक्का लावण्याचा प्रयत्न कराल तर याद राखा!

गावगुंड आमदाराच्या वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी.

मुंबई. दि. १६ सप्टेंबर २०२४
आपल्या बेताल वक्तव्यांसाठी आणि बेलगाम वागण्यासाठी कुप्रसिद्ध बुलढाण्याचा आमदार संजय गायकवाड याने पुन्हा एकदा आपली लायकी आणि पातळी दाखवून देत लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांची जीभ कापणा-यास ११ लाखांचे बक्षीस जाहीर केले. या गुंड प्रवृत्तीच्या आमदाराच्या वक्तव्याची सरकारने गंभीर दखल घ्यावी आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याच्या मुसक्या आवळाव्यात अन्यथा काँग्रेस कार्यकर्ते या गुंडांचा बंदोबस्त करतील असा खणखणीत इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.

यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, जननायक राहुल गांधी यांची वाढती लोकप्रियता बघून भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. त्यामुळे हताश आणि निराश झालेले सत्ताधारी. राहुलजींच्या वक्तव्याची मोडतोड करून विपर्यास करून त्यांच्या बदनामीची मोहिम चालवत आहेत. राहुल गांधी कधीही आरक्षण बंद करू असे म्हटले नाहीत. उलट आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवून ज्या समाजाचे आरक्षणाचे प्रश्न प्रलंबित आहेत ते सोडवू असे म्हटले आहेत. पण भारतीय जनता पक्ष आणि त्यांची पिलावळ साततत्याने अफवा पसरवून फेक नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांचे गुंड प्रवृत्तीचे लोक तर त्यापुढे जाऊन जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत. सरकार या गुंडावर काहीच कारवाई करत नाही, त्यामुळे देशात कायद्याचे राज्य आहे की भाजपाच्या गुंडांचे असा प्रश्न जनतेला पडला आहे?

संजय गायकवाड सारख्या अडाणी लोकांना राहुल गांधी अमेरिकेत काय बोलले ते माहित तरी आहे का? राहुल गांधी मोदी, शाह यांना घाबरत नाहीत. संजय गायकवाड सारख्या गावगुंडांच्या धमक्यांना ते थोडेच घाबरणार आहेत. आमच्यासारखे महाराष्ट्रासह देशभरातील कोट्यवधी काँग्रेस कार्यकर्ते ढाल बनून त्यांचे संरक्षण करायला सज्ज आहेत. त्यांच्या केसाला धक्का लावायचा प्रयत्न सोडा विचारही करू नका असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी दिला.