दाहक सत्य, उपहास, विडंबन काव्यातून कवींनी केले थेट भाष्य
कोथरूड गणेश फेस्टिवलचा समारोप
पुणे : सध्याच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय विषयांवर भाष्य करीत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या कवींनी आपल्या सादरीकरणातून वास्तव चित्र मांडले.
‘कधी कधी सरस्वतीचा मोर होऊन तर कधी कधी सिंहासनाचा मुकुट होऊन लक्ष्मीच्या स्पर्शाने शय्येवर पहुडलेला असतो आणि चारित्र्यवान मनातसुद्धा एक आसारामबापू दडलेला असतो’, ‘तळ्याच्या काठाला रेशमी पातळ, पाण्यात पांगल्या सावल्या नितळ’, ‘मला वाटले जग हे सुंदर बाहेरून’, ‘ग्रुपवर पडू लागतात मेसेज’, ‘तुझ्या मनगटावर दादा बांधला मी धागा’, ‘खळखळून हसायची, निगुतीन रहायची’ अशा वैविध्यपूर्ण विषयांवरील कविता तर काही उपहासात्मक, विडंबनात्मक काव्यांनी पुणेकरांच्या चेहऱ्यावर कधी हसू तर डोळ्यात कधी आसू आणले.
संवाद, पुणे, प्रबोधन विचारधारा यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित कोथरूड गणेश फेस्टिवलचा समारोप सोमवारी (दि. 16) सायंकाळी मराठी कविसंमेलनाने झाला. यात प्रकाश होळकर (लासलगाव), आबा पाटील (मंगसुळी), भरत दौंडकर (निमगाव म्हाळुंगी), लता ऐवळे (सांगली), भाग्यश्री केसकर (धाराशिव), गुंजन पाटील (संभाजीनगर), अंजली कुलकर्णी (पुणे), अनिल दीक्षित (पुणे), विजय पोहनेरकर (संभाजीनगर), शशिकांत तिरोडकर (पुणे), बालिका बिटले (सातारा), प्रशांत मोरे (मालेगाव) यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वात्रटिकाकार, प्रसिद्ध कवी रामदास फुटाणे यांनी केले. महोत्सवाचे यंदाचे तिसरे वर्ष आहे.
‘सामना’ चित्रपटाच्या निर्मितीला 50 वर्षे झाल्यानिमित्ताने रामदास फुटाणे यांचा श्री रवळनाथ को-ऑप फायनान्स सोसायटीचे चेअरमन एम. एल. चौगुले, श्री रवळनाथ को-ऑप फायनान्स सोसायटीचे ब्रँच मॅनेजर सुहास नाडगौडा यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. संवाद, पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन, निकिता मोघे यांची उपस्थिती होती.
‘नुसतच वाहत जावं खळाळत्या ओढ्यातून, ‘सांजवेळी आला फुलांचा पाऊस’, ‘माझे आभाळ तुला घे, तुझे आभाळ मला’ अशा कवितांमधून निसर्गाचे गाणे ऐकवले तर ‘तुमच्या हुकुमावरून फोटो लावला’, ‘वड म्हटला बाई’, ‘माझा भाकरीचा शोध संपेपर्यंत हसत रहा मोनालिसा’, ‘जीणं फाटतया तिथच ओवावा धागा’, ‘तो ती ते’, ‘फाटकेच लुगडं झंपर आणि धोतर जाडे-भरडे’ अशा विविध काव्यांमधून समाजजीवनातील दाहक सत्य मांडले गेले.
‘हल्ली कुणाचं काय सुरू काहीच मेळ लागत नाही’, ‘माझ्या डोळ्यातील आसवं कुणी मायेनं पुसताना, उरी हुंदका दाटतोया गोष्ट बापाची सांगताना’, ‘बाईचे जीवन अवघड असतं इतकच आईन सांगितलं’, ‘काहीच गुन्हा नसताना बापाला पोलिस घेऊन गेले तेव्हा मुलगा पुस्तक वाचत होता’ अशा ओळींमधून मानवी नात्यांमधील भावनिक गुंतागुंतीचे दर्शनही घडविले.
गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात झालेली राजकीय स्थित्यंतरे, फायद्यासाठी पक्षबदलूपणा, खुर्ची टिकविण्यासाठी होत असलेल्या गळाभेटी, मतदारांना आकर्षित करण्यासाठी जाहीर केलेल्या योजनांवर कवींनी विडंबनात्मक पद्धतीने केलेले भाष्य उपस्थितांना विशेष भावले.
मान्यवरांचा सत्कार सुनील महाजन, निकिता मोघे यांनी तर कवींचा सन्मान एम. एल. चौगुले, सुहास नाडगौडा, महेंद्र काळे यांच्या हस्ते करण्यात आला.