पुणे-सोलापूर रस्त्यावर उरळीकांचन पोलिस स्टेशनच्या हद्दीत इनामदारवस्ती येथे भरदिवसा एकाने पिस्तुलातून दोघांवर गोळीबार केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. याप्रकरणी उद्योजक दशरथ विठ्ठल शितोळे (वय-४६,रा.कोरेगाव, ता.हवेली,पुणे) , त्याची पत्नी निलीबा दशरथ शितोळे (४२), जिग्नेश बापु ऊर्फ दशरथ शितोळे (१९), आशा सुरेश भोसले (५२), निखील अशोक भोसले (२५, सर्व रा.कोरेगाव,ता.हवेली,पुणे) या आरोपींवर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.
४० लाखांचे आर्थिक देवाणघेवाणीतून सदरचा गोळीबार झाला असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून आरोपींच्या ताब्यातून स्थानिक गुन्हे शाखेने एक बंदुक तिचे १७५ काडतुसे व पिस्टलचे ४० काडतुसे, तीन बॅरल, दोन खाली मॅगझीन हा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली आहे.
या घटनेत काळुराम महादेव गोते व शरद कैलास गोते ( दोघे रा.भिवरी, ता.हवेली,पुणे) हे जखमी झाले आहे. आरोपी व जखमी यांच्यात आर्थिक व्यवहाराचा वाद सुरु होता, तक्रारदार गोते यांचे आरोपीकडे ४० लाख रुपये दीड वर्षापूर्वी उसने दिलेले होते. सदरची रक्कम परत देतो असे सांगुन आरोपीने काळुराम गोते व शरद गोते यांना त्यांचे पैसे परत देतो माझ्या घरी या असे सांगितले.
त्यांना घरी बोलावून पैसे परत मागितल्याच्या रागातून आरोपीने त्याच्याकडील परवाना असलेल्या पिस्टलमधून सदर दोघांवर गोळीबार केला. यात काळुराम गोते याच्यावर जीवे ठार मारण्याचे उद्देशाने चार राऊंड फायरिंग करुन काळुराम गोते यांना हाताला व पायाला राऊंड लागून गंभीर जखमी करण्यात आले आहे.
उरळीकांचन सारख्या मध्यवर्ती गजबजलेल्या ठिकाणी गोळीबार झाल्याने पोलिस अधीक्षक यांनी घटनास्थळी भेट देऊन एलसीबी व उरळीकांचन पोलिस स्टेशन यांचे वेगवेगळे तपास पथक कार्यरत केले. एलसीबीचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांचे पथकास या गुन्हयातील मुख्य आरोपी हा उरळीकांचन परिसरात रेल्वे रुळाचे पलीकडे असलेल्या शेतात लपवून बसल्याची माहिती मिळाली. त्यानुसार आरोपींना सापळा रचून अटक करण्यात आली आहे.