Home Blog Page 678

राज्यातील सहकार वाढून तो समृद्धीकडे जायला हवा- केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ

: कैलास कोद्रे, तुकाराम गुजर यांना पुणे  नागरी सहकारी बँक असोसिएशनचा जीवन गौरव पुरस्कार प्रदान ; पुणे नागरी सहकारी बँक्स् असोसिएशन लि. (महाराष्ट्र) च्या वतीने  कार्यक्रमाचे आयोजन 
पुणे : महाराष्ट्राच्या सहकाराचा गौरव देशात केला जातो. सहकार हा महाराष्ट्राचा प्राण आहे. राज्यातील निम्म्यापेक्षा जास्त लोकसंख्या ही सहकाराशी जोडली गेलेली आहे. त्यामुळे सहकार वाढून तो समृद्धीकडे जायला हवा. यासाठी रिझर्व बँक ऑफ इंडिया, देशाचा सहकार आणि राज्य यांच्यातील समन्वय साधण्याचे काम सरकारच्या माध्यमातून यापुढील काळात केले जाईल, अशी ग्वाही सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

सहकार व बँकिंग क्षेत्रात बहुमूल्य योगदान दिल्याबद्दल पुणे नागरी सहकारी बँक्स असोसिएशन लि. (महाराष्ट्र) तर्फे सन २०२२-२३ वर्षासाठी पुणे कँन्टोमेंट बँकेचे अध्यक्ष कैलास कोद्रे आणि सन २०२३-२४ वर्षासाठी प्रेरणा सहकारी बँक थेरगावचे संस्थापक संचालक तुकाराम उर्फ भाऊसाहेब गुजर यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. केंद्र सरकारमध्ये सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचाही यावेळी विशेष सन्मान झाला. शिवदर्शन येथील राजीव गांधी अ‍ॅकॅडमी आॅफ ई-लर्निंग स्कूल साहित्य सम्राट तेंडुलकर सभागृह येथे हा कार्यक्रम झाला.  

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे सहकार आयुक्त दीपक तावरे, तर रिझर्व बँक ऑफ इंडियाचे संचालक सतिश मराठे, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त अनिल कवडे, वैकुंठ मेहता राष्ट्रीय सह. प्रबंधन संस्थानच्या निदेशक डॉ.हेमा यादव आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मुंबईचे प्रशासक विद्याधर अनास्कर,असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड.सुभाष मोहिते, उपाध्यक्ष अ‍ॅड.साहेबराव टकले, सुनिल रुकारी, निलेश ढमढेरे, डॉ. प्रिया महिंद्रे, बाळकृष्ण उंद्रे, मंगला भोजने मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत शेळके उपस्थित होते. 
ज्या बँकांनी शून्य टक्के एन.पी.ए. राखला, त्या बँकांचा गौरव कार्यक्रमात करण्यात आला. असोसिएशनने आयोजित केलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये ज्या बँकांनी जास्तीत जास्त सहभाग घेतला, त्या बँकांना देखील यावेळी सन्मानित करण्यात आले. सी.ए. मिलिंद काळे यांची नॅफकॅबचे उपाध्यक्ष पदी , डॉ अनिल कारंजकर यांची पुणे विद्यापीठाच्या विखे पाटील अध्यासनाचे प्रमुख म्हणून नेमणूक झाल्याबद्दल तर प्रसाद पाटील केंद्रीय सहकार निबंधक कार्यालयात सल्लागार म्हणून नियुक्ती झाल्यानबद्दल  विशेष सन्मान यावेळी झाला.

प्रवीण दरेकर म्हणाले, महाराष्ट्राला सहकाराचा मोठा वारसा आहे. परंतु सहकारी बँकेच्या अनेक गोष्टी रिझर्व बँक ऑफ इंडियापाशी येऊन थांबतात. रिझर्व बँक ऑफ इंडिया समजून घेत नाही तोपर्यंत अडचणी सुटणार नाहीत. महाराष्ट्रात सहकाराचे जाळे आहे. छोट्या बँकांची गरज खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात आहे. त्यामुळे या बँकांना अडचणीत असतानाच मदत करा. सहकारी बँकांना ताकद देण्याची आवश्यकता आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

अनिल कवडे म्हणाले, देशातील नागरी सहकारी बँकेच्या एक तृतीयांश बँका या महाराष्ट्रात आहेत. सहकारी तत्त्वांवर बँक उभ्या करताना ज्ञान मिळवून त्या ज्ञानाचा योग्य वापर केला पाहिजे. सहकारी बँकांमध्ये काम करताना आपण सर्वज्ञ नाहीत बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत हे लक्षात ठेवले पाहिजे. केवळ प्रशिक्षण देऊन उपयोग नाही तर ग्रहण करण्याची इच्छाशक्ती देखील पाहिजे.

अ‍ॅड. सुभाष मोहिते म्हणाले, नागरी सहकारी बँकांच्या अडचणी मांडणे आणि त्या कमी करण्याचे प्रयत्न पुणे नागरी सहकारी बँक्स असोसिएशनच्या वतीने सातत्याने केले जाते. सहकारी बँकांसाठी सरकार सकारात्मक असते परंतु आरबीआयचे धोरण बघता ते नकारात्मक आहेत का असे वाटते. सहकारी बॅंकाना समजून घेण्याची आणि त्यांना सहकार्य करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. 

चार हजारांहून अधिक धावपटू, सायकलपटूंनी घेतली मतदान करण्याची शपथ

पुणे: पिंपरी चिंचवड महानगर पालिका आणि रोटरी क्लब ऑफ निगडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘रनथॅान’ कार्यक्रमात ४ हजारांहून अधिक धावपटू, सायकलपटूंनी आगामी विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याची शपथ घेतली.

आगामी निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्या अंतर्गत निगडी प्राधिकरण येथील नियोजित महापौर निवासाच्या ठिकाणी ‘रनथॅान’ चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महानगर पालिकेचे मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, रोटरी क्लब ऑफ निगडीचे अध्यक्ष सुहास ढमाले, रनथाॅनचे संचालक केशव मानगे, नियोजित प्रांतपाल नितीन ढमाले, महापालिकेचे उप आयुक्त अण्णा बोदडे, सहाय्यक आयुक्त अजिंक्य येळे, किरण मोरे, मुकेश कोळप, क्षेत्रीय अधिकारी शीतल वाकडे,कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.

मतदान जनजागृती कार्यक्रमात तरूणांचा मोठा उत्साह
रनथॅान कार्यक्रमात सहभागी झालेल्या धावपटू, सायकलपटूंनी स्वयंस्फूर्तीने मतदान जागृतीचे फलक धरले होते तसेच त्यांनी सेल्फीही काढले आणि येणाऱ्या निवडणूकीत मतदानासह मतदान जनजागृतीचा प्रसार व प्रचार करण्यावचीही तयारी दर्शविली. एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी आजच्या कार्यक्रमात मतदार यादी नाव नोंदणी करणे, नाव तपासणे, नावात दुरूस्ती करणे यासाठी फ्लेक्सद्वारे प्रचार करण्यात आला.

घोषवाक्यांद्वारे मतदान जनजागृती
‘मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो…!’, ‘जना-मनाची पुकार आहे, मतदान आमचा अधिकार आहे…!’, ‘आपले अमूल्य मत,करेल लोकशाही मजबूत…!’ आदी मजकुराचे मतदान जनजागृतीच्या हस्तफलकांद्वारे अधिकारी, खेळाडू तसेच उपस्थित सायकलपटूंनी जनजागृती केली.

यावेळी रोटरी क्लब सदस्य डाॅ.रविंद्र कदम, शशांक फडके, माजी सैनिक, पोलीस प्रशासन, वाहतूक पोलीस, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते आणि विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
0000

आम आदमी वडगावशेरी विधानसभेची उमेदवारी प्रशांत केदारी यांना देणार – अजित फाटके

– प्रशांत केदारींसह शेकडो अल्पसंख्याक कार्यकर्त्यांचा आम आदमी पक्षात प्रवेश –

पुणे — सामाजिक कार्यकर्ते प्रशांत(लुकस)केदारी यांनी दिमाखदार कार्यक्रमात आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह आम आदमी पार्टी मध्ये प्रवेश केला.त्यांच्या या प्रवेशाने वडगावशेरी मतदारसंघात प्रशांत केदारी यांना आम आदमी पक्षाची उमेदवारी मिळू शकते त्यासाठी आम्ही आग्रही राहणार असल्याचे मत आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र कार्यकारी अजित फटाके यांनी व्यक्त केले .वडगावशेरी मतदारसंघात आज शेकडो कार्यकर्त्यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला त्यावेळी ते बोलत होते .
प्रशांत केदारी गेल्या २० वर्षांपासून वडगावशेरी मतदार संघ व संबंध महाराष्ट्र राज्यात सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत, पुरोगामी विचार आणी मानवता वादी मूल्ये या विचारसरणीवर समाजातील वंचित व गरजू बांधवासाठी त्यांनी अनेक आंदोलणे, मोर्चे, परिषदा आयोजित केल्या आहेत, तसेच प्रशांत केदारी हे उच्चशिक्षित असून पुणे विद्यापीठातून त्यांनी एम बी ए केलेले आहे.
वडगावशेरीत सामान्य माणसाने सामान्य माणसांना मूलभूत व पायाभूत सुविधा मिळण्यासाठी, पूर नियंत्रण योजना, रहदारी व्यवस्थापण,सरकारी योजनाची अंमल बजावणी करण्यासाठी आपण पराकष्टा करू असे प्रशांत केदारी यांनी प्रवेशाच्या वेळी सांगितले.
फेबियाणं सॅमसन यांनी हा प्रवेश घडवून आणला ते या प्रवेशाचे शिल्पकार ठरले आहेत.
प्रशांत केदारी यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केल्याने राजकीय समीकरणे बदलणार आहेत. वडगाव शेरीत तुल्यबळ विधानसभा उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पहिले जाईल, तसेच त्यांची प्रतिमा देखील चांगली आहे.

यावेळी महाराष्ट्र कार्यकारी अधिकारी अजित फाटके, शहर अध्यक्ष सुदर्शन जगदाळे, मुकुंद किर्दत , डॉ. अभिजित मोरे, अमित म्हस्के,रिपब्लिकन नेते राहुल डंबाळे,मुस्लिम कॉन्फरेन्स चे हाजी झुबेर मेमन, ख्रिश्चन सोसायटीच्या प्रदेश महिला संघटक तेरेसा केदारी,आप शहर अध्यक्ष धनंजय बेनकर, फुलचंद म्हस्के, प्रमोद पारधे,अविनाश भाकरे, सौ.सुनिता काळे,सौ.प्रिया जाधव,सौ. मेरी पारगे,सौ.तहसील देसाई,प्रिती निकाळजे,मनोज शेट्टी,मनोज फुलारे,शिवाजी डोलारे,मिलींद ओहोळ,माधुरी गायकवाड,संजय कोणे,सौ.शितल कांदिळकर,जितेंद सोनवणे,सौ.अनिता सॅमसन यासह पुणे शहरातील प्रमुख पदाधिकारी ,महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

श्री देवी चतुःशृंगी मंदिर ट्रस्ट असा असेल या वर्षीचा नवरात्रौत्सव 2024

1 ) नवरात्र उत्सव दि. 03 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर 2024
2 ) नवरात्र उत्सवामध्ये मंदिर भाविकांसाठी 24 तास उघडे राहिल
3 ) घटस्थापना गुरूवार दि. 03/10/24 सकाळी 9.00 वाजता यावेळेस होईल.
4 ) श्री देवेंद्र देवदत्त अनगळ मंदिर व्यवस्थापक विश्वस्त यांच्या हस्ते घटस्थापना व नवचंडी होम 5 ) पौरोहित्य श्री श्रीराम नारायण कानडे गुरूजी.
6 ) अभिषेक, रूद्राभिषेक, महापूजा, महावस्त्र अर्पण करण्यात येईल.
7 ) दररोज सकाळी 10 व रात्री 9 वा. महाआरती करण्यात येईल. त्या दोन्ही वेळेस 10/10 लोकांतर्फे शंखनाद करण्यात येईल.
8 ) गणपती मंदिरात दररोज भजन, किर्तन, प्रवचन होईल. तसेच मंदिर परिसरात सुयोग मित्र मंडळाच्या वतीने निवारा वृद्धाश्रमातील आजींसाठी एक दिवस आजीबाईचा भोंडलाही आयोजित केला आहे. श्रीसुक्त, ललितासहस्त्रनाम, महिषासुर मर्दिनी स्त्रोत्र व वेदपठण यावेळेस मुख्य देवीच्या मंदिरात करण्याची योजना आहे.
9 ) दस – याच्या दिवशी शनिवार दि. 12/10/24 रोजी सकाळी 8.30 वाजता नवचंडी होम होणार आहे
10 ) दस – याच्या दिवशी शनिवार दि. 12/10 / 23 सायं. 5 पासून सिमोल्लंघनाची पालखी मंदिरापासून बँड, ढोल, लेझीम, नगारा, चौघडा, भुत्ये, वाघ्या मुरळीसह, देवीच्या सेवेक – यांचा सहभाग. हेलिकॉप्टरमधून देवीच्या पालखीवर पुष्पवृष्टी. यंदा पालखीच्या मिरवणुकीत कलावंत हे ढोल ताशाचे पथक हे प्रमुख आकर्षण राहणार आहे. मराठी सिनेसृष्टितील कलावंताचे हे पथक आहे. तसेच 25 लोक शंखनाद करणार आहे.
11 ) मंदिराच्या जिर्णोध्दाराचे काम सुरू झाले असुन साधारणपणे 40 % बांधकाम पुर्णत्वास आले आहे. उर्वरित बांधकाम व परिसराचे सुशोभिकरण पुढील 6 ते 8 महिन्यात पुर्ण करण्याचा संस्थेचा मानस आहे. मुख्य मंदिरातील सभामंडपाचे काम पुर्ण झाले नसले तरी भाविकांना देवीचे व्यवस्थित दर्शन घेता येईल. तसेच नविन सभामंडप पुर्वीच्या सभामंडपापेक्षा दुपटीने मोठा झाला असुन सभामंडपात प्रवेश केल्याबरोबर भाविकांना देवीचे दर्शन होईल.
12 ) एक भाविक देवीला सोने व मोत्याची नथ नवरात्र उत्सवात अर्पण करणार असुन त्याचीअंदाजे किंमत 3 लाख रू. आहे.
13 ) पुजा साहित्य, लहान मुलांची खेळणी, कपडे, महिलांसाठी दागिने कपडे, गृहपयोगी वस्तु, फोटो, मसाले, खाण्यापिण्याचे पदार्थ यांच्या स्टॉलची रेलचेल
14 ) भाविकांच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक, स्वयंसेवक, पोलिसदल, निमलष्करी दल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच संपुर्ण मंदिर परिसरात जागोजागी सीसी टिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
15 ) आपत्ती व्यवस्थापन सहाय्यासाठी अनिरूध्द सेवा केंद्राचे ( डीएमव्ही ) डिझास्टर मॅनेजमेंट वॉलेंटियर 150 स्वयंसेवक तैनात केले आहेत.
16 ) भाविकांच्या आरोग्यासाठी संपुर्ण परिसरात जंतुनाशके तसेच किटकनाशकांची फवारणी करण्यात आली आहे.
17 ) ग्रीन हिल्स ग्रुपच्या सहकार्याने देवस्थान ट्रस्टने देवळामागील डोंगरावर 12000 रोपे लावली असुन त्यांची उत्कृष्टरीत्या जोपासना केली आहे. त्यास लागणा – या खताची निर्मीती देवीला वाहिलेल्या फुलांच्या निर्माल्यापासुन करण्यात येते.
18 ) अग्निशामक दलाची गाडी ( घटस्थापना ते दस – यापर्यंत ) मंदिर परिसरात ठेवण्यात आली आहे. 19 ) युवराज तेली मेमोरीअल ट्रस्टतर्फे भाविकांसाठी cardiac ambulance ची सोय करण्यात आली आहे. तसेच 24 तास 2 डॉक्टर व सपोर्ट स्टाफ असा 9 जणांचा ग्रुप भाविकांच्या सेवेला असणार आहेत. वैद्यकीय अत्यावश्यकता पडल्यास औषधोपचार मोफत दिले जाणार आहेत. 20 ) पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या मैदानावर विनामूल्य पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. 21 ) भाविकांना देवीचे सुलभ दर्शन व्हावे यासाठी संपुर्ण बॅरिकेटींग सह रांगांची व्यवस्था करण्यात आली आहे.
22 ) मंदिर व परिसरात सुशोभिकरण करण्यात आले आहे.
23 ) मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच 24 तास जनरेटरची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
24 ) सर्व भाविकांचा यात्रेसह संपूर्ण वर्षाचा रूपये दोन कोटीचा विमा करण्यात आला आहे. कोणतीही दुर्घटना घडल्यास दुर्घटनाग्रस्त भाविकांना विम्याचे कवच देण्यात आले आहे. 25 ) देवस्थान ट्रस्टनी भाविकांसाठी ऑनलाईन दर्शन पासची व्यवस्था केलेली आहे. तसेच मंदिर परिसरात देखील ऑफलाईन दर्शन पासेस वितरणासाठी तीन काऊंटरची व्यवस्था करण्यात आलेली आहे. ऑनलाईन दर्शन पाससाठी www.chatushrungidevi.com या वेबसाईटवर भाविकांना ऑनलाईन पास मिळु शकतील

 महिला सक्षमीकरणाच्या अनोख्या साडी रन उपक्रमास महिलांचा  उस्फुर्त  प्रतिसाद

तनाएरा आणि जे जे ऍक्टिव्हने पुणेकरांना दिला संस्मरणीय साडी रन अनुभव

पुणे: महिला सक्षमीकरणाच्या अनोख्या साडी रन उपक्रमास महिलांचा  उस्फुर्त  प्रतिसाद मिळाला असून तनाएरा सारी रन ने पारंपरिक आणि आधुनिक फिटनेसचे संपूर्ण एकत्रीकरण करण्यावर भर दिला संस्कृती आणि वारसा यांचे प्रतिबिंब असलेली साडी सक्रिय आणि आधुनिक जीवन शैलीसाठी अतिशय अनुरूप ठरू शकते हे यावेळी प्रदर्शित करण्यात आले
टाटा समूहातील एक ब्रँड तनाएराने जे जे ऍक्टिव्ह या बंगलोरमधील नामांकित कंपनीसोबत हातमिळवणी करून एका वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन करत साड्यांच्या कालातीत सौंदर्याची नवी व्याख्या रचली रविवारी सकाळी पुणे विद्यापीठाच्या आवारात एक आगळावेगळा उत्साह संचारला होता महिला वेगवेगळ्या उठावदार रंगांच्या साड्या परिधान करून ताकद स्त्रीत्व स्वातंत्र्य आणि फिटनेसचा सन्मान करण्यासाठी एकत्र आल्या होत्या तनाएराचे सीईओ श्री अंबुज नारायण आणि जे जे ऍक्टिव्हचे कोच श्री प्रमोद यांनी या उपक्रमाचे उदघाटन केले.
तनाएरा सारी रन ने पारंपरिक आणि आधुनिक फिटनेसचे संपूर्ण एकत्रीकरण करण्यावर भर दिला संस्कृती आणि वारसा यांचे प्रतिबिंब असलेली साडी सक्रिय आणि आधुनिक जीवन शैलीसाठी अतिशय अनुरूप ठरू शकते हे यावेळी प्रदर्शित करण्यात आले या उपक्रमामध्ये शान आणि सक्षमता यांची सांगड घालून महिलांना स्टिरी ओटाइप्सना आव्हान देण्यासाठी वमर्यादांच्या पलीकडे जाण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आलेया आधी कोलकाता पुणे बंगलोर आणि हैदराबाद या शहरांमध्ये अतिशय यशस्वी ठरलेल्या या उपक्रमाने सामाजिक एकता फिटनेस फॅशन आणि व्यक्तिगत अभिव्यक्ती यांना चालना दिली साडी हे फक्त एक परिधान नाहीतर शान परंपरा आणि वैयक्तिक अभिरुची व शैली यांचे बहुमुखी प्रतीक आहे जे महिलांना स्वतःची अनोखी शैली फक्त खासप्रसंगीच नव्हे तर रोजच्या रोज व्यक्त करता यावी यासाठी प्रोत्साहित करते.
तनाएराचे सीईओ श्री अंबुज नारायण यांनी यावेळी सांगितले तनाएरामध्ये आम्ही साडी हे स्त्रीत्वाची व सक्षमतेची अभिव्यक्ती आहे असे मानतो आणि तिचा सन्मान करण्यासाठी प्रतिबद्ध आहोत सारी रन हा उपक्रम साडीची शान अधोरेखित करतो इतकेच नव्हेतर आधुनिक सक्रिय जीवनशैलीचा आवश्यक भाग म्हणून साडी लानवा अर्थप्राप्त करून देण्यासाठी बांधील आहोत जे जे ऍक्टिव्हसोबत आमच्या सहयोगाने ही बांधिलकी अधोरेखित करता आली आहे गतिशील जीवनशैली आणि व्यक्तिगत अभिव्यक्ती यांची सांगड साडी सुंदर पद्धतीने घालू शकते हे यामधून दर्शवले जात आहे स्वतःची ताकद आणि व्यक्तित्व ठामपणे अभिव्यक्त करत असताना वारसापुढे नेण्यासाठी महिलांना प्रेरणा द्यावी हा या उपक्रमामागचा आमचा उद्देश आहे.
जे जे
ऍक्टिव्हचे कोच श्री प्रमोद यांनी सांगितले साडी रनची सुरुवात आठ वर्षांपूर्वी बंगलोरमध्ये झाली गेली दोन वर्षे तनाएराच्या सहयोगाने हा उपक्रम स्थानिक पातळीवरून राष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे आज तनाएरा सारी रन हा उपक्रम ठामपणे सांगतो की महिलात्यांच्या आरोग्याला प्राधान्य देताना सक्षमता समावेशकता आणि कल्याणावर भर देताना त्यांच्या अनोख्या शैलीचा सन्मान करू शकतात.

सरश्रींच्या ध्यान शिबिराचे आयोजन

विनामूल्य ध्यान शिबिराचे आयोजन

पुणे-ध्यान के गुलिस्तान से सफल इंसान कैसे बनें मेरा उत्थान आवाहन या विषयावर सरश्रींच विनामूल्य शिबिराचे आयोजन २ ऑक्टोबर रोजी दुपारी १.०० वा. मनन आश्रम, सिंहगड रोड येथे आयोजीत करण्यात आला आहे. तेजज्ञान फाउंडेशनचे हे रौप्य महोत्सवी वर्ष सर्वांसाठी असणार आहे. कारण अनेक मोफत ऑनलाइन आणि ऑफलाइन ध्यान शिबिरे आणि नवीन, काही शिबिरे प्रत्येकासाठी सातत्याने आयोजित केली जात आहेत. याशिवाय, सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे या वर्षी सरश्रींना ऐकण्याची आणि प्रत्यक्ष पाहण्याची सुवर्णसंधी देखील मिळणार आहे.

ध्यानामुळे गहन, आंतरिक शांतीचा अनुभव येतो, मानसिक समाधान मिळते. याशिवाय दैनंदिन तणाव, चिंता, भय यातून आपण मुक्त होऊन एकाग्रता, सजगता  आपल्यात येते. अचूक निर्णय घेण्याची क्षमता वृद्धिंगत होते, ध्यानाद्वारे जीवनाला योग्य दिशा मिळते. म्हणून या कार्यक्रमाचा सर्वांनी आवश्यक लाभ घेऊन जीवन सार्थक करावे. हा कार्यक्रम पूर्णपणे मोफत असून जास्तीतजास्त पुणेकरांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

अग्रवाल समाजाचे आराध्य दैवत महाराजा अग्रसेन जयंती उत्सवाचे आयोजन

20 वर्षात पहिल्यांदाच वाकडमध्ये साजरी होणार महाराजा अग्रसेन जयंती

पिंपरी चिंचवड : अग्रवाल समाजाचे आराध्य दैवत महाराजा अग्रसेन यांच्या जयंती उत्सवाचे येत्या 03 ऑक्टोबर 2024 रोजी आयोजन करण्यात आले आहे. अग्रवाल समाज, पार्क स्ट्रीट्स, वाकड यांच्या वतीने या जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असून 20 वर्षात पहिल्यांदाच या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराजा अग्रसेन जयंती उत्सवापूर्वी दुपारी ४ वाजता शोभायात्रा काढण्यात येणार आहे. यामध्ये मोठ्या संख्येने अग्रवाल समाज सहभागी होणार आहे. ही शोभायात्रा वाकड येथील गणेश मंदिरापासून सुरू होऊन पार्क स्ट्रीट, मेन सर्कल, विस्डम वर्ल्ड स्कूल जवळ गेट-बी येथे सायंकाळी ६ वाजता शोभायात्रेची सांगता होईल. त्यानंतर हॉटेल ॲम्बियन्स एक्सेलन्सी, वाकड येथे महाराजा अग्रसेन यांचा जयंती उत्सव साजरा केला जाईल.
या दरम्यान, महाराजा अग्रसेन यांची पूजा व आरती केली जाईल. त्याच बरोबर 8 वी ते 12 वी व ग्रॅज्युएशन पर्यंतच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान केला जाईल. याशिवाय ज्या विद्यार्थ्यांनी संगीत, नाट्य, कला, खेळ, शरीर सौष्ठव स्पर्धेत जिल्हा, राज्य, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवले त्या विद्यार्थ्यांचाही सत्कार होईल. याशिवाय 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना सन्मानित करण्यात येणार आहे. याच दिवशी नवरात्रोत्सवाच्या मंगलमय पर्वालाही सुरूवात होत आहे. या पार्श्वभूमीवर जयंती महोत्सवाच्या समारोपात मुंबई येथील अंध संगीतकारांच्या वतीने विनोदी कार्यक्रम, म्युझिकल नाईट्स आणि दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे.

‘संविधान भवन’ जनजागृती :…. आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केली दिलगिरी! 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोखाली नाव छापल्याने विरोधकांचे राजकारण

पिंपरी –
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून आम्ही महाराष्ट्रातील पहिले संविधान भवन पिंपरी-चिंचवडमध्ये उभारण्याचे काम हाती घेतले आहे. त्याची जनजागृती करण्यासाठी काही रिक्षाचालक व हितचिंतकांनी आपल्या रिक्षांवर हुड फलक लावले आहेत. त्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्राखाली नजरचुकीने माझ्या नावाचा फाऊंट छापण्यात आला आहे. सदर रिक्षा हुडवरील फलकांमुळे समाजबांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, अशी भूमिका आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केली आहे. 

पिंपरी-चिंचवडमध्ये भारतातील पहिले संविधान भवन उभारले जात आहे. या पार्श्वभूमीवर जनजागृती करण्यात येत असून, रिक्षा चालकांकडून रिक्षा हुडवर छावलेल्या बॅनरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्राखाली महेश लांडगे यांचे नाव छापलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे शहरातील विरोधी राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते यांनी समाजमांध्यमांमध्ये टिका-टिपण्णी करुन सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केला होता. 

दरम्यान, आमदार महेश लांडगे यांनी सोशल मीडियाद्वारे पिंपरी-चिंचवडकरांशी संवाद साधला. यामध्ये महेश लांडगे म्हणाले की, राजकीय उद्देशाने काही व्यक्ती संबंधित रिक्षांवरील हुड बॅनरबाबत समाजामध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे सबंधित रिक्षांवरील जनजागृतीचे हुड काढावेत, असे आवाहन रिक्षाचालक व माझ्या सहकारी-हितचिंतकांना करीत आहे. 

काय म्हणाले आहेत महेश लांडगे वाचा… 

अखंड भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, युगपुरुष महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीमाई फुले, राजर्षी शाहू महाराज अशा कित्येक थोर महामानवांच्या योगदानामुळेच आपला हा महाराष्ट्र आज प्रगतीपथावर अग्रेसर आहे..

पण आजही स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी काही राजकीय समाजकंटक जातीय धार्मिक तसेच भावनिक तेढ निर्माण करून आपला सामाजिक सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न करत असतात.. असाच काहीसा प्रकार काल माझ्या कानावर आला…विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दिलेल्या सर्वश्रेष्ठ संविधानाच्या विचारांनी समृद्ध असलेले देशातील सर्वात पहिले भव्य असे संविधान भवन आपण आपल्या शहरात उभारत आहोत, त्यासाठी मी प्रयत्नशील आहे, लवकरच या संविधान भवनाचे कामही सुरू होणार आहे.. याबाबतीत माहिती देणारे रिक्षा हुड एका रिक्षाचालकाने आपल्या रिक्षावर बसवले.. त्यावर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या खालच्या भागात अनावधानाने व नजरचुकीने माझे नाव छापले गेले होते.. यामध्ये कुणाचीही भावना दुखावण्याचा हेतू मुळीच नव्हता..! पण तरीही विरोधकांनी त्या रिक्षाच्या हुड चे फोटो समाजमाध्यमांमध्ये पसरवून ‘मी माझी सही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेवर लावली अशी खोटी आणि संतापजनक बातमी व सोशल मीडिया पोस्ट व्हायरल केली.

‘ मुळात संबंधित रिक्षा हुड वर माझी सही किंवा स्वाक्षरी नसून तो फक्त नावाचा फॉन्ट आहे.. पण तरीही विरोधक महाविकास आघाडीच्या समाजकंटकांनी सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला.. या प्रकाराबाबत मला जेव्हा माहिती कळाली तेव्हा संबंधित रिक्षाचालकांना बोलावून त्यांना सदर हुड काढण्याची विनंती आम्ही केली, त्यांनीदेखील ते रिक्षा हुड तात्काळ काढून सहकार्य केले. हा सर्व प्रकार अनावधानाने घडला असून त्याबद्दल मी सर्व नागरिकांची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो, या प्रकारामध्ये कुणाच्याही भावना दुखावण्याचा अजिबात हेतू नव्हता, हे केवळ नजरचुकीने झाले असून कृपया कुणीही याबाबत कसलाही गैरसमज करून घेऊ नये ही नम्र विनंती करतो..

महाविकास आघाडीचे जे कार्यकर्ते या विषयाला हवा देऊन राजकीय वळण देण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनी व त्यांच्या नेत्यांनी मागील अडीच वर्षाच्या त्यांच्या सत्तेच्या काळात संविधान भवनाची उभारणी प्रक्रिया पुढे का नेली नाही याचे उत्तर त्यांनी समस्त पिंपरी चिंचवडकरांना दिलं पाहिजे, अस माझं आवाहन आहे..

मुळात देशातील पहिले संविधान भवन हा प्रत्येक भारतीयासाठी आत्मीयतेचा विषय आहे शिवाय घटनाकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या देशाचा स्वाभिमान आहेत..केवळ स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी त्यांच्याबाबतीत कुणीही स्वार्थी राजकारण करू नये अशी नम्र विनंती करतो, कारण प्रत्येक पिंपरी-चिंचवडकर याआधीही एकजूट होता आणि यापुढेही एकजूटच राहील यात तिळमात्र शंका नाही

धन्यवाद..! 

  • महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा.

युवा सेना आयोजित बाळासाहेब ठाकरे करंडकावर ‌‘मून विदाऊट स्काय‌’ची मोहोर

पुणे : युवा सेना आयोजित हिंदुहृयदसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे करंडक खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत पुण्यातील मराठवाडा मित्र मंडळाच्या शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालयाने सादर केलेल्या ‌‘मून विदाऊट स्काय‌’ या एकांकिकेने करंडकावर मोहोर उमटवली.
बालगंधर्व रंगमंदिरात स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पारितोषिक वितरण सभारंभास बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा निलम शिर्के-सामंत, केंद्रीय ऊर्जा विभाग स्थायी समिती अध्यक्ष तथा शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांची प्रमुख उपस्थिती होती. स्पर्धेचे परिक्षण विनिता पिंपळखरे, अनुपमा कुलकर्णी, प्रदीप रत्नपारखी यांनी केले.
पुण्याच्या एमइएस, आयएमसीसीने सादर केलेल्या ‌‘सखा‌’ ही एकांकिक द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली. तर मएसो सिनियर कॉलेज, पुणेच्या ‌‘तेंडुलकर्स‌’ या एकांकिकेला तृतीय क्रमांक मिळाला. विजेत्या संघांना अनुक्रमे 51 हजार, 31 हजार आणि 21 हजार रुपये आणि सन्मानचिन्ह देण्यात आले.
स्पर्धेचे संयोजक कौस्तुभ कुलकर्णी प्रास्ताविकात म्हणाले, बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित होणारी ही एकमेव स्पर्धा आहे. स्पर्धेचे यंदाचे दुसरे वर्ष असून स्पर्धेत यंदा 31 संघांनी सादरीकरण केले. हैद्राबाद येथील संघही स्पर्धेत सहभागी झाला होता. पुढील वर्षीपासून विभागीय स्तरावर प्राथमिक फेरी घेतली जाणार असून त्यातून निवड झालेल्यांची अंतिम फेरी पुण्यात घेण्यात येणार आहे.
कार्यक्रमाला सिने-नाट्य क्षेत्रातील सुनील गोडबोले, सुरभी भावे, राजू बावडेकर, हंसराज जगताप, मदन देवधर, राष्ट्रवादी चित्रट व सांस्कृतिक विभाग प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील, चित्रपट निर्माते नितीन धवणे पाटील तसेच स्पर्धेचे संयोजक सहसंयोजक कुणाल शहा, अजय सूर्यवंशी, युवा सेनेचे महाराष्ट्र सचिव किरण साळी, युवा सेनेचे पश्चिम महाराष्ट्र सचिव विश्वजीत बारणे, शिवसेना जिल्हा प्रमुख रमेश कोंडे, युवा सेना महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य रूपेश कदम, युवा सेना विद्यापीठ उपाध्यक्ष ऋषिकेश जोशी, युवा सेना पुणे जिल्हा समन्वयक सागर पाचर्णे, युवा सेना पुणे शहर प्रमुख निलेश गिरमे, युवा सेना पुणे जिल्हाप्रमुख निलेश घारे आदी मंडळी उपस्थित होती.
पारितोषिकांचे मानकरी
उत्कृष्ट लेखन – सौरभ घाटकार (अर्धम्‌‍), उत्कृष्ट दिग्दर्शन – वेदिका कुलकर्णी (11,111), उत्कृष्ट संगीत – परितोष ठाकर (ड्रायव्हर), उत्कृष्ट रंगभूषा – राहुल परमने (नाटक बसते आहे), उत्कृष्ट वेशभूषा – शांभवी धामणीकर, रसिका मुळ्ये (तिसरी मंझील), उत्कृष्ट नेपथ्य – ऋतुजा बोढे (बॉईल्ड शुद्ध शाकाहारी), प्रकाशयोजना – आरती वढारे (कडियल), अभिनय शुभ्रा जाधव (बिजागिरी) आणि ऋत्विक रास्ते (फिर्यादी). प्रेक्षक चॉई संघ – फायडिंग खड्डा (अवतार प्रॉडक्शन). शिस्तबद्ध संघ – रंगभूमी राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय.
पुण्याची रंगभूमी ही सजीव आहे; जी कायम कार्यमग्न असते. प्रेक्षकही तेवढाच चोखंदळ आहे असे प्रांजळ मत निलम शिर्के – सामंत यांनी व्यक्त केले. परीक्षकांतर्फे विनिता पिंपळखरे यांनी मनोगत व्यक्त केले.
ज्येष्ठ कलाकार श्रीराम रानडे यांचा या वेळी जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला तर नाट्य क्षेत्रात समर्पित कार्य करणारे राधिका देशपांडे, ऋतुजा देशमुख, राहुल रानडे व प्रदिप वैद्य या कलाकारांचा विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाग्यश्री देशपांडे यांनी केले. प्रस्तावना आणि आभार प्रदर्शन युवा सेनेचे महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य आणि स्पर्धेचे संयोजक कौस्तुभ कुलकर्णी यांनी मानले.

कलावंतांना वास्तववादाचे बंधन अन्‌‍ समकलानीत्वाच्या बेड्या

चं. प्र. देशपांडे : पुरुषोत्तम करंडक स्पर्धेचे पारितोषिक वितरण
पुणे : कलेच्या क्षेत्रात अनुभव हा मूल्य ठरू शकत नाही. अनुभव हे कलाकृतीचे माध्यम आहे. कल्पना मांडल्या जातात त्यावर शंका घेता आली पाहिजे. पण आजच्या समाजाला कलेविषयी देणे-घेणे राहिलेले नाही. तात्कालिक समस्या कलेच्या माध्यमातून मांडण्यासाठी कलावंतांवर प्रचंड दडपण आहे. भूमिका घेण्यासाठी तसेच वास्तववादासाठी बंधने अन्‌‍ समकालीनत्वाच्या बेड्याही घातल्या जात आहेत. त्याच प्रमाणे माणसाच्या जगण्यात बुद्धी प्रामाण्यवादाचे स्तोम माजविले जात आहेत, असे परखड मत ज्येष्ठ नाटककार चं. प्र. देशपांडे यांनी आज व्यक्त केले.
महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित आंतर महाविद्यालयीन पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शनिवारी (दि. 28) सायंकाळी भरत नाट्य मंदिर येथे आयोजित करण्यात आला होता. पारितोषिक वितरण देशपांडे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते अध्यक्षपदावरून बोलत होते. स्पर्धेचे यंदो 59वे वर्ष असून स्पर्धेचे जनक राजाभाऊ नातू यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. महाराष्ट्रीय कलोपासकचे अध्यक्ष अनंत निघोजकर, राजाभाऊ नातू यांचे स्नेही आणि सहकारी धनंजय गोळे, परिक्षक मंजुषा जोशी, गिरीश परदेशी, गोपाळ जोशी, अभिजित मकाशिर मंचावर होते. पारितोषिक स्वीकारल्यानंतर विद्यार्थ्यांनी जल्लोष करीत आनंद साजरा केला.
ज्याच्याकडे जगण्यातील सुख-दु:ख, समजून घेण्याची जिज्ञासा असते, चिंतनशीलता असते असा व्यक्ती कला क्षेत्रात काम करू शकतो, असे नमूद करून देशपांडे पुढे म्हणाले, मराठी माणसाला नाटकाकडे गंभीरपणे बघायचे नाही अशी सध्याची परिस्थिती आहे. भीक भागून प्रेक्षक गोळा करावे लागतात, अशी प्रायोगिक रंगभूमीची अवस्था आहे. एकीकडे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा असे वाटत असताना दुसरीकडे मराठी भाषा मरेल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नाटक हे केवळ करमणुकीचे साधन वाटू लागले आहे. वास्तववाद हा मराठी नाटकात अतिमहत्त्वाचा झाला आहे. कलेचे क्षेत्र मानसिक वास्तव्याचे आहे. अनुभव, वास्तववाद, मातीशी जोडलेले मुद्दे याविषयीही त्यांनी परखड शब्दात मते नोंदविली.
परिक्षकांच्या वतीने बोलताना गिरीश परदेशी म्हणाले, नाटकाची परिभाषा वेगळी असल्याने नाटकाचे शास्त्र समजून घेणे आवश्यक आहे. तांत्रिक बाजूंना अधिक महत्त्व दिल्यास नाटकाचा धागा हरविण्याची शक्यता असते. नाटक का करीत आहोत, हे प्रत्येकाने स्वत:ला विचारले पाहिजे. त्याच वेळी नाटकाच्या निर्मितीपासून ते प्रयोगापर्यंतचा धागा सापडू शकतो. वाचिक अभिनयाविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना मोलाच्या सूचना केल्या.
रंगभाषा आणि चित्रभाषा यातील फरक समजून घेणे आवश्यक आहे, असे मत गोपाळ जोशी यांनी व्यक्त केले. स्पर्धेत सादर झालेल्या एकांकिका प्रचारकी स्वरूपाच्या नव्हत्या याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. सादरीकरणात सामाजिक भान असावे, असे सूचित केले जात पण प्रत्येक वेळी सामाजिक भान कशाला हवे? मुलांचे प्रश्न मांडणे हे सामाजिक भान नाही का? नवे काही करताना जुन्याची जाण ठेवली जावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
मान्यवरांचे स्वागत अनंत निघोजकर यांनी केले. चं. प्र. देशपांडे यांचा परिचय धनंजय गोळे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, निकालपत्र वाचन आणि आभार प्रदर्शन संस्थेचे चिटणीस ॲड. राजेंद्र ठाकूरदेसाई यांनी केले.

पिंपरी-चिंचवड शहरात असीम सरोदेयांच्याशी खुला संवादाचा कार्यक्रम

  • बुधवारी दिशा सोशल फाऊंडेशनचा उपक्रम

पिंपरीः दिशा सोशल फाऊंडेशनच्या वतीने बुधवारी (२ ऑक्टोबर) ज्येष्ठ विधीज्ञ असीम सरोदे यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
बुधवारी सकाळी साडेदहा वाजता निगडी-प्राधिकरणातील गदिमा नाट्यगृहात हा मुलाखतीचा कार्यक्रम होणार आहे. सरोदे यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार नितीन ब्रह्मे हे संवाद साधणार आहेत.
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही वर्षांमध्ये प्रचंड उलथापालथ सुरू आहे. राजकीय पक्षांची तोडफोड, निवडणूक चिन्हांचे दावे-प्रतिदावे, आमदारांची अपात्रता, न्यायालयीन तसेच विधिमंडळातील निवाडे ते थेट बदलापूर अत्याचार प्रकरणातील प्रमुख आरोपीचा पोलिसांनी नुकताच केलेला एन्काऊंटर ! या सगळ्या प्रकरणांमध्ये संविधानाची पायमल्ली केली जात असल्याची टीका सातत्याने होत आहे. संविधानिक नैतिकता पायदळी तुडवण्यात येत असल्याच्या विविध घटनांचे अन्वयार्थ लावत, परखड विश्लेषण करणारे ज्येष्ठ विधीज्ञ असीम सरोदे यांच्याशी थेट संवादाचा हा कार्यक्रम आहे. सदर कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. तथापि, मर्यादित आसनक्षमतेमुळे प्रथम येईल, त्यास प्राधान्य या न्यायाने प्रवेश दिला जाणार आहे, असे आयोजकांनी कळवले आहे.

शालेय क्रीडा स्पर्धेत खेळाडूंची गैरसोय, आयोजकांचे दुर्लक्षक्रीडा अधिकाऱ्यांची पालक व शिक्षकांना तंबी

पिंपरी, पुणे – पुणे जिल्हा क्रीडा परिषद, पुणे जिल्हा अधिकारी कार्यालय आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आंतर शालेय क्रीडा स्पर्धा २०२३-२४ आयोजित करण्यात आल्या आहेत. या अंतर्गत शनिवारी (दि. २८) चिंचवड, शाहूनगर येथील पंडित दीनदयाळ मैदानात (अटल बिहारी वाजपेयी उद्यानासमोर) सकाळ पासून आंतरशालेय खो खो च्या क्रीडा स्पर्धा सुरू आहेत. या मैदानावर पावसामुळे सर्वत्र चिखल साचला असून अशा चिखलात खेळाडूंचा जीव धोक्यात घालून खो-खोच्या स्पर्धा सुरू करण्यात आल्या आहेत. काही पालक व क्रीडा शिक्षकांनी येथील त्रुटी आयोजकांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर अधिकाऱ्यांनी याची दखल घेण्याऐवजी तक्रारी कडे दुर्लक्ष केले आणि चिखलात साचलेल्या गाळात खो-खो स्पर्धा सुरू केल्या आहेत. अशा धोकादायक पद्धतीने स्पर्धा घेण्याऐवजी मैदानावर सुविधा उपलब्ध करून देऊन मगच स्पर्धा घ्याव्यात. या पालक व क्रीडा शिक्षकांच्या मागणीकडे संबंधित अधिकारी व आयोजकांनी दुर्लक्ष करून विद्यार्थी खेळाडूंचा जीव धोक्यात घातला आहे. दोन दिवसांपूर्वी हवामान खात्याने पुणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जाहीर केला होता. त्यावेळी मा. पंतप्रधानांचा नियोजित पुणे दौरा देखील रद्द करण्यात आला. तसेच त्याच दिवशी होणारी शालेय विद्यार्थ्यांची चित्रकलेची इंटरमीडिएट ची स्पर्धा देखील रद्द करण्यात आली होती. ती चित्रकलेची स्पर्धा आज होती. अनेक विद्यार्थी या चित्रकला स्पर्धेत आणि आज होणाऱ्या खो-खो च्या स्पर्धेत सहभागी झाले होते. एकाच वेळी दोन स्पर्धा वेगवेगळ्या ठिकाणी देणे विद्यार्थ्यांना शक्य नव्हते. त्यामुळे अनेक पालक व क्रीडा शिक्षकांनी ही अडचण आयोजकांच्या निदर्शनास आणून दिली होती. तरी देखील खो-खोच्या स्पर्धा आज खुल्या मैदानात चिखलात घेण्याचा हट्ट धरला. त्यामुळे अनेक विद्यार्थी घसरून पडले, किरकोळ जखमी झाले. त्यांना सक्षमपणे आपला नैसर्गिक खेळ करता आला नाही. या स्पर्धांचे वेळ किंवा ठिकाण बदलून शहरात उपलब्ध असणाऱ्या बंदिस्त क्रीडा संकुलात आयोजन करणे अपेक्षित होते.
भारतीय शालेय खेळ महासंघाद्वारा पुरस्कृत क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, पुणे द्वारा विविध खेळांच्या शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन तालुका ते राष्ट्रीय स्तरापर्यंत दरवर्षी करण्यात येते. क्रीडा विभागाच्या योजने अंतर्गत जिल्हा नियोजन समितीच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून नागरी व ग्रामीण क्षेत्रात सुसज्य क्रीडांगणे तयार करण्यासाठी क्रीडांगण विकास अनुदान योजनेअंतर्गत क्रीडांगण तयार करणे करिता ७ लाख अनुदान व क्रीडा साहित्यासाठी ३ लाख रुपये अर्थसहाय्य देण्यात येते. तसेच व्यायाम शाळा विकास अनुदान योजनेअंतर्गत व्यायामशाळा साहित्य व खुली व्यायाम शाळा साहित्यकरिता ७ लाख रुपये दिले जाते.
सन २०२२-२३ या वर्षात शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये पुणे ग्रामीण, पुणे महानगरपालिका व पिंपरी-चिंचवड मनपा क्षेत्रातील एकूण २६८३ शाळा मधील ३,३६,४०३ खेळाडूंनी सहभाग घेतला असून आत्तापर्यंतची ही विक्रमी आकडेवारी आहे.
या हेतूने या स्पर्धांचे आयोजन केले आहे. अशी माहिती पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी मनोगतामध्ये दिली आहे.
या क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याच्या शासनाच्या उद्देशालाच आजच्या क्रीडा अधिकाऱ्यांनी केलेल्या वर्तणुकीमुळे हरताळ फासला गेला आहे. अशा हेकेखोर आणि मनमानी करणाऱ्या क्रीडा अधिकाऱ्यांवर पुणे जिल्हाधिकारी आणि पुणे व पिंपरी चिंचवड मनपा आयुक्तांनी कडक कारवाई करावी अशी मागणी पालकांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना केली.
चिखलात स्पर्धा सुरू असल्याचा व्हिडिओ सेंड केला आहे.

‘आयजीबीसी’च्या माध्यमातून ग्रीन बिल्डिंग संकल्पना अभ्यासण्याची संधी – पूर्वा केसकर


एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर मध्ये ‘आयजीबीसी’ स्टुडंट चॅप्टरचे उद्घाटन

पिंपरी, पुणे – इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिलच्या (आयजीबीसी) माध्यमातून एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाईन मधील विद्यार्थ्यांना ग्रीन बिल्डिंग संकल्पना तसेच आधुनिक तंत्रज्ञान अभ्यासण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये वास्तुरचनेत प्रामुख्याने विचारात घेतले जाणारे पाण्याची उपलब्धता, शुद्ध हवा, कमीत कमी कचरा, कार्बन उत्सर्जन अशा विविध बाबींची माहिती मिळेल. देशातील नवीन प्रकल्पांना भेटी देऊन त्याचा अभ्यास करण्याची संधी मिळणार आहे. याचा तुमच्या पुढील आयुष्यामध्ये फायदा होऊन चांगले वास्तुविशारद म्हणून ख्याती मिळवाल. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा फायदा घ्यावा, असे मार्गदर्शन ‘आयजीबीसी’ च्या संचालक आर्किटेक्ट पूर्वा केसकर यांनी विद्यार्थ्यांना केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचलित एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्ट अँड डिझाईन (एसबीपीआयएम) येथे आयजीबीसीच्या स्टुडन्ट चॅप्टरचे उद्घाटन मंगळवारी (दि. २४) करण्यात आले. यावेळी उद्योजक हृषिकेश मांजरेकर, नम्रता धामणकर, विष्णू नायर, प्रभारी प्राचार्या शिल्पा पाटील, आर्किटेक्ट ऋतुराज कुलकर्णी, लक्ष्मण तोरगळे आदी उपस्थित होते.
शिल्पा पाटील म्हणाल्या की, एस. बी. पाटील आर्किटेक्चर कॉलेज मधील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग वास्तुरचनेत कसा केला जात आहे याची माहिती मिळावी, ग्रीन बिल्डिंग संकल्पना काय आहे हे समजून घेता यावे यासाठी आयजीबीसी स्टुडंट चॅप्टरची स्थापना करण्यात आली आहे. यामाध्यमातून विद्यार्थ्यांना विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धां, कार्यशाळां मध्ये सहभागी होता येईल. विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासाला चालना मिळेल, असे पाटील यांनी सांगितले.
वास्तुरचनाकाराने वास्तूचे संकल्प चित्र तयार करताना वास्तूचे ठिकाण, जमिनीचा पोत, स्थानिक हवामान, पाणी या सर्व गोष्टींचा विचार केला पाहिजे. ज्या उद्देशाने वास्तू उभी केली जाणार आहे, त्यामागील हेतू, परिणाम या बाबी लक्षात घेऊन वास्तुरचना केली पाहिजे. तरच योग्य परिणाम साधता येईल, असे हृषिकेश मांजरेकर यांनी सांगितले.
शहरीकरण मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे घरांची मागणी वाढली असून उंच इमारती उभारल्या जात आहेत. शहरीकरणाचा परिणाम पर्यावरणावर होत आहे. काळाची गरज ओळखून ग्रीन बिल्डिंग संकल्पना पुढे आली आहे. यापुढील काळात मोठ्या प्रमाणावर ग्रीन बिल्डिंग उभारण्यात येतील. कारण नागरिकांना याचे महत्त्व पटते आहे, असे नम्रता धामणकर म्हणाल्या.
यावेळी विविध स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच शिक्षक दिनाचे औचित्य साधून प्राध्यापकांचा सत्कार करण्यात आला. २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थी समितीची स्थापना करण्यात आली.
कार्यक्रमाचे संयोजन ऋतुराज कुलकर्णी, धनश्री झडगावकर यांनी केले. सुत्रसंचालन नीलिमा भिडे, ग्रिश्मी रेडकर आणि सुकन्या गावडे यांनी केले. आभार नीलिमा भिडे यांनी मानले.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी आयजीबीसी स्टुडंट चॅप्टरच्या स्थापने निमित्त विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

गेमिंग, ॲनिमेशन, रील मेकिंग, फिल्म मेकिंग अशा माध्यमांमधील क्रिएटर्स अर्थात सर्जकांना प्रचंड वाव असून यात संगीत, शिक्षण आणि पायरसी विरोधी क्षेत्रातील आव्हानांचा समावेश आहे : नरेंद्र मोदी

0

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात च्या 114व्या भागात  झपाट्याने बदलणारे कामाचे स्वरूप आणि उदयाला येणाऱ्या गेमिंग, फिल्म मेकिंग अशा सर्जनशील क्षेत्रांमधील वाढत्या संधींवर भर दिला. पंतप्रधानांनी भारतातील सर्जनशील प्रतिभेच्या अफाट क्षमतेला अधोरेखित केले आणि क्रिएटर्सना  अर्थात सर्जकांना माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने,  आयोजित केलेल्या ‘क्रिएट इन इंडिया’ या संकल्पनेअंतर्गत 25 आव्हानांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.

रोजगार बाजारपेठेला नवा आकार देणारी उदयोन्मुख सर्जनशील क्षेत्रे

पंतप्रधानांनी आपल्या भाषणात रोजगाराच्या बाजारपेठेला नवा आकार देणाऱ्या उदयोन्मुख क्षेत्रांवर प्रकाश टाकला, “आजच्या बदलत्या काळात कामाचे स्वरूप बदलत चालले आहे, आणि गेमिंग, ॲनिमेशन, रील मेकिंग, फिल्म मेकिंग किंवा पोस्टर मेकिंग अशी नवनवी क्षेत्रे उदयाला येत आहेत. यापैकी एखादे कौशल्य आपल्याकडे असेल तर आपल्या प्रतिभेला खूप मोठ्या मंचावर संधी मिळू शकते.” असे ते म्हणाले. त्यांनी बँड, सामुदायिक रेडिओ या क्षेत्रातील उत्साही आणि सर्जनशील व्यावसायिकांसाठी वाव वाढत असल्याची नोंद घेतली.

या क्षमतेला अधिक वाव देऊन त्याची जोपासना करण्याच्या उद्देशाने, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने संगीत, शिक्षण आणि  पायरसी विरोधी यासह विविध क्षेत्रांमध्ये प्रतिभा आणि सर्जनशीलतेला चालना देण्याच्या उद्देशाने 25 आव्हानांची आखणी केली आहे. यात भाग घेण्यासाठी क्रिएटर्सनी wavesindia.org या संकेतस्थळाला भेट द्यावी असे पंतप्रधान म्हणाले. “देशभरातील क्रिएटर्सनी यात अवश्य भाग घ्यावा आणि आपली सर्जनशीलता जगासमोर आणावी असा माझा विशेष आग्रह आहे.” असे ते म्हणाले

क्रिएट इन इंडिया आव्हान – पर्व 1

केंद्रीय माहिती आणि प्रसारण,  रेल्वे आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञानमंत्री, अश्विनी वैष्णव यांनी 22 ऑगस्ट, 2024 रोजी नवी दिल्ली येथे ‘क्रिएट इन इंडिया चॅलेंज- सीझन 1’ चा भाग म्हणून 25 आव्हाने प्रसिद्ध केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या 78 व्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात व्यक्त केलेल्या “डिझाईन इन इंडिया, डिझाइन फॉर द वर्ल्ड” या संकल्पनेशी सुसंगत असणारी ही आव्हाने आगामी वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट (WAVES) साठी अग्रदूत म्हणून काम करतील.

मराठी भाषेतील गीतरामायणाचे वैभव आता हिंदीत

गदिमांच्या जयंतीनिमित्त कोथरूड मध्ये पहिल्या प्रयोगाचे उद्या आयोजन

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचा विशेष पुढाकार

पुणे- अधुनिक वाल्मिकी गदिमा आणि श्रेष्ठ संगीतकार सुधीर फडके या दोन कलाकारांच्या अथक परिश्रमातून निर्माण झालेली ‘गीतरामायण’ ही कलाकृती म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीचे अमोल असे वैभव! या वैभवाचा लाभ संपूर्ण भारत वर्षाला मिळावा यासाठी त्याचा भावानुवाद हिंदी भाषेत करण्यात आले असून, त्याचा देशातील पहिला प्रयोग १ ऑक्टोबर रोजी कोथरूड मध्ये आयोजित करण्यात आला आहे. यासाठी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी विशेष पुढाकार घेतला आहे.

प्रभू रामचंद्राची कथा अजरामर आहे. अनेक ‌कवींनी, साहित्यिकांनी साहित्याच्या विविध प्रकारातून ती गुंफली आहे. परंतु, गजानन दिगंबर माडगूळकर यांनी हे काव्यबद्ध करत त्यातील भावसौंदर्य वाढवले आहे.

कारण, मानवी ‌जीवनविषयक तात्विक मौलिक विचार सहजसुलभ भाषेत गीतरामायणातून व्यक्त झालेले आहेत. गीतरामायणात सुबोध भाषेत बोध आहे. विविध व्यक्तीमत्वाचे प्रभावी स्वरुपाचे चित्रण यामधून गदिमांनी केले आहे. संभ्रमित मनाला जीवनमूल्यांची ओळख गीतरामायणाने करून दिली आहे. त्यामुळे हे वैभव संपूर्ण देशाला लाभावे यासाठी प्रसिद्ध गझलकार देवदत्त जोग यांनी हिंदी भाषेत भावानुवादित केले आहे. याला भारत सरकारने ही प्रायोजकत्व दिले आहे.

गदिमांच्या १०५ व्या जयंतीचे औचित्य साधून नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून कोथरुड मध्ये याचे आयोजन करण्यात आले असून; १ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ०९.३० वा. ते १२.३० वा. या वेळेत कोथरूड मधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित करण्यात आले आहे. त्यामुळे या कार्यक्रमाचा सर्व रामभक्त आणि गदिमा प्रेमींनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.