पुणे : युवा सेना आयोजित हिंदुहृयदसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे करंडक खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत पुण्यातील मराठवाडा मित्र मंडळाच्या शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालयाने सादर केलेल्या ‘मून विदाऊट स्काय’ या एकांकिकेने करंडकावर मोहोर उमटवली.
बालगंधर्व रंगमंदिरात स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पारितोषिक वितरण सभारंभास बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा निलम शिर्के-सामंत, केंद्रीय ऊर्जा विभाग स्थायी समिती अध्यक्ष तथा शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांची प्रमुख उपस्थिती होती. स्पर्धेचे परिक्षण विनिता पिंपळखरे, अनुपमा कुलकर्णी, प्रदीप रत्नपारखी यांनी केले.
पुण्याच्या एमइएस, आयएमसीसीने सादर केलेल्या ‘सखा’ ही एकांकिक द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली. तर मएसो सिनियर कॉलेज, पुणेच्या ‘तेंडुलकर्स’ या एकांकिकेला तृतीय क्रमांक मिळाला. विजेत्या संघांना अनुक्रमे 51 हजार, 31 हजार आणि 21 हजार रुपये आणि सन्मानचिन्ह देण्यात आले.
स्पर्धेचे संयोजक कौस्तुभ कुलकर्णी प्रास्ताविकात म्हणाले, बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित होणारी ही एकमेव स्पर्धा आहे. स्पर्धेचे यंदाचे दुसरे वर्ष असून स्पर्धेत यंदा 31 संघांनी सादरीकरण केले. हैद्राबाद येथील संघही स्पर्धेत सहभागी झाला होता. पुढील वर्षीपासून विभागीय स्तरावर प्राथमिक फेरी घेतली जाणार असून त्यातून निवड झालेल्यांची अंतिम फेरी पुण्यात घेण्यात येणार आहे.
कार्यक्रमाला सिने-नाट्य क्षेत्रातील सुनील गोडबोले, सुरभी भावे, राजू बावडेकर, हंसराज जगताप, मदन देवधर, राष्ट्रवादी चित्रट व सांस्कृतिक विभाग प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील, चित्रपट निर्माते नितीन धवणे पाटील तसेच स्पर्धेचे संयोजक सहसंयोजक कुणाल शहा, अजय सूर्यवंशी, युवा सेनेचे महाराष्ट्र सचिव किरण साळी, युवा सेनेचे पश्चिम महाराष्ट्र सचिव विश्वजीत बारणे, शिवसेना जिल्हा प्रमुख रमेश कोंडे, युवा सेना महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य रूपेश कदम, युवा सेना विद्यापीठ उपाध्यक्ष ऋषिकेश जोशी, युवा सेना पुणे जिल्हा समन्वयक सागर पाचर्णे, युवा सेना पुणे शहर प्रमुख निलेश गिरमे, युवा सेना पुणे जिल्हाप्रमुख निलेश घारे आदी मंडळी उपस्थित होती.
पारितोषिकांचे मानकरी
उत्कृष्ट लेखन – सौरभ घाटकार (अर्धम्), उत्कृष्ट दिग्दर्शन – वेदिका कुलकर्णी (11,111), उत्कृष्ट संगीत – परितोष ठाकर (ड्रायव्हर), उत्कृष्ट रंगभूषा – राहुल परमने (नाटक बसते आहे), उत्कृष्ट वेशभूषा – शांभवी धामणीकर, रसिका मुळ्ये (तिसरी मंझील), उत्कृष्ट नेपथ्य – ऋतुजा बोढे (बॉईल्ड शुद्ध शाकाहारी), प्रकाशयोजना – आरती वढारे (कडियल), अभिनय शुभ्रा जाधव (बिजागिरी) आणि ऋत्विक रास्ते (फिर्यादी). प्रेक्षक चॉई संघ – फायडिंग खड्डा (अवतार प्रॉडक्शन). शिस्तबद्ध संघ – रंगभूमी राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय.
पुण्याची रंगभूमी ही सजीव आहे; जी कायम कार्यमग्न असते. प्रेक्षकही तेवढाच चोखंदळ आहे असे प्रांजळ मत निलम शिर्के – सामंत यांनी व्यक्त केले. परीक्षकांतर्फे विनिता पिंपळखरे यांनी मनोगत व्यक्त केले.
ज्येष्ठ कलाकार श्रीराम रानडे यांचा या वेळी जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला तर नाट्य क्षेत्रात समर्पित कार्य करणारे राधिका देशपांडे, ऋतुजा देशमुख, राहुल रानडे व प्रदिप वैद्य या कलाकारांचा विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाग्यश्री देशपांडे यांनी केले. प्रस्तावना आणि आभार प्रदर्शन युवा सेनेचे महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य आणि स्पर्धेचे संयोजक कौस्तुभ कुलकर्णी यांनी मानले.