पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात च्या 114व्या भागात झपाट्याने बदलणारे कामाचे स्वरूप आणि उदयाला येणाऱ्या गेमिंग, फिल्म मेकिंग अशा सर्जनशील क्षेत्रांमधील वाढत्या संधींवर भर दिला. पंतप्रधानांनी भारतातील सर्जनशील प्रतिभेच्या अफाट क्षमतेला अधोरेखित केले आणि क्रिएटर्सना अर्थात सर्जकांना माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने, आयोजित केलेल्या ‘क्रिएट इन इंडिया’ या संकल्पनेअंतर्गत 25 आव्हानांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.
रोजगार बाजारपेठेला नवा आकार देणारी उदयोन्मुख सर्जनशील क्षेत्रे
पंतप्रधानांनी आपल्या भाषणात रोजगाराच्या बाजारपेठेला नवा आकार देणाऱ्या उदयोन्मुख क्षेत्रांवर प्रकाश टाकला, “आजच्या बदलत्या काळात कामाचे स्वरूप बदलत चालले आहे, आणि गेमिंग, ॲनिमेशन, रील मेकिंग, फिल्म मेकिंग किंवा पोस्टर मेकिंग अशी नवनवी क्षेत्रे उदयाला येत आहेत. यापैकी एखादे कौशल्य आपल्याकडे असेल तर आपल्या प्रतिभेला खूप मोठ्या मंचावर संधी मिळू शकते.” असे ते म्हणाले. त्यांनी बँड, सामुदायिक रेडिओ या क्षेत्रातील उत्साही आणि सर्जनशील व्यावसायिकांसाठी वाव वाढत असल्याची नोंद घेतली.
या क्षमतेला अधिक वाव देऊन त्याची जोपासना करण्याच्या उद्देशाने, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने संगीत, शिक्षण आणि पायरसी विरोधी यासह विविध क्षेत्रांमध्ये प्रतिभा आणि सर्जनशीलतेला चालना देण्याच्या उद्देशाने 25 आव्हानांची आखणी केली आहे. यात भाग घेण्यासाठी क्रिएटर्सनी wavesindia.org या संकेतस्थळाला भेट द्यावी असे पंतप्रधान म्हणाले. “देशभरातील क्रिएटर्सनी यात अवश्य भाग घ्यावा आणि आपली सर्जनशीलता जगासमोर आणावी असा माझा विशेष आग्रह आहे.” असे ते म्हणाले
क्रिएट इन इंडिया आव्हान – पर्व 1
केंद्रीय माहिती आणि प्रसारण, रेल्वे आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञानमंत्री, अश्विनी वैष्णव यांनी 22 ऑगस्ट, 2024 रोजी नवी दिल्ली येथे ‘क्रिएट इन इंडिया चॅलेंज- सीझन 1’ चा भाग म्हणून 25 आव्हाने प्रसिद्ध केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या 78 व्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात व्यक्त केलेल्या “डिझाईन इन इंडिया, डिझाइन फॉर द वर्ल्ड” या संकल्पनेशी सुसंगत असणारी ही आव्हाने आगामी वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट (WAVES) साठी अग्रदूत म्हणून काम करतील.